मुअज्‍जिन : इस्लाम धर्मानुसार अजान देणारा म्हणजेच दैनिक प्रार्थनेसाठी-नमाजासाठी-हाक किंवा बांग देणारा तो मुअज्जिन होय. त्यालाच ‘बांगी’ असेही म्हणतात. नमाज पढण्यासाठी योग्य वेळी मशिदीमध्ये लोकांनी जमावे कसे याविषयी, पुष्कळ वादविवाद होऊन शेवटी एका मनुष्याने उंच ठिकाणी उभे राहून लोकांना ऐकू जाईल अशा रीतीने खुल्या आवाजात ‘नमाज पढण्याची वेळ झाली, चला,’ असे अरबी भाषेत सांगितले असता ही अडचण दूर होईल असे ठरले. या कामावर सर्वानुमते बिलाल नावाचा दस्युपुत्र लायक म्हणून ठरला. बिलाल हाच इस्लामचा पहिला ‘बांगी’ ठरला. मशिदीच्या नजिक एक उंच घर होते त्या घराच्या छप्परावर उभे राहून बिलाल पुढील शब्द मोठ्याने म्हणत असे :

(१) अल्लाहु अक्‌बर (परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे). ४ वेळा पुकारावयाचे असते.

(२) अशहदु अलला इलाह इल्‍लल्‍लाह (माझी साक्ष आहे, त्याच्याशिवाय दुसरा पुज्य नाही). २ वेळा पुकार.

(३) अशहदु अन्न मुहम्मदर्रसूलुल्‍लह (माझी साक्ष आहे, मुहम्मद ईश्वराचे प्रेषित आहेत). २ वेळा पुकार.

(४) हय्या अलस्स्वलात्‌ (प्रार्थनेला चला). २ वेळा पुकार. तोंड उजवीकडे वळविणे.

(५) हय्या अल्‍ल फलाह ( मुक्तीकडे चला). २ वेळा पुकार. तोंड डावीकडे वळविणे.

(६) अल्लाहु अक्‌बर (परमेश्वर सर्वांत श्रेष्ठ आहे). २ वेळा पुकार.

(७) ला इलाह इल्‍लल्‍लाह (त्याच्याशिवाय दुसरा पूज्य नाही). १ वेळा पुकार.

सकाळच्या नमाजाच्या वेळी याच शब्दात आणखी एक वाक्य असते : ‘अस्सलातु खैरूम मिनन्नोम’ (निद्रेपेक्षा नमाज अधिक हितकर आहे). शिया मुस्लिम या बांगेच्या भरीला ‘हय्या अल खैरूल अमल’ (उत्तम कार्याला लागा) असेही पुकारतात.

वरील सात विधाने अजानची अधिकृत संहिता म्हणून सर्वमान्य आहेत. अजानची विधाने ऐकू आल्यावर मुसलमान मनातल्या मनात त्यांचा पुनरूच्चार करतात. १, २, ३, ६ व ७ क्रमांकाची विधाने उच्चारताना बांगी किब्लाभिमुखी म्हणजे पश्चिमाभिमुख असतो. अशुचितावस्थेत अजान म्हणणे निषिद्ध आहे. मुखप्रक्षालन (वुजू) हे अजानसाठी श्रेयस्कर आहे. अजानचा सूर निश्चित नसला, तरी शब्दोच्चार मात्र सुस्पष्टच हवा, ‘मुअज्जिन लोक सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे द्वारपाल आहेत’, असे मुहंमद पैगंबर एकदा म्हणाले होते. अजानची विधाने नवजात अर्भकाच्या व जिन्नने (भूतपिशाचांनी) पछाडलेल्या व्यक्तीच्या कानात उच्चारतात.

पहा : नमाज मशीद.

आजम, मुहंमद