शीख धर्म : शीख या शब्दाचा अर्थ शिष्य असा आहे. संस्कृत शिष्य &gt पाली सिस्स &gt पंजाबी सिख (मराठी शीख) अशी शीख या संज्ञेची व्युत्पत्ती सांगता येते. शीख धर्मानुसार परमेश्वर एक आहे आणि गुरुग्रंथसाहिब हा त्याचा पवित्र ग्रंथ आहे. आदिग्रंथ, गुरुबानी म्हणूनही हा ग्रंथ ओळखला जातो. शीख व्यक्तीचा या दोहोंवर विश्वास असतो. भारतातील व भारताबाहेरील मिळून शीख धर्मियांची लोकसंख्या २,२८,३७,००० (इ. स. २००१) असून १९९१ च्या भारतीय जनगणनेनुसार भारतातील शीख धर्मियांची लोकसंख्या १,६३,००,००० होती.

गुरू नानक हे शिखांचे पहिले गुरू होते. त्यांचा जन्म इ. स. १४६९ मध्ये लाहोरजवळ तळवंडी–सध्याचे नानकाना साहिब-गावामध्ये झाला. शिखांचे एकूण दहा गुरू आहेत. ते असे : (१) गुरू ⇨नानकदेव (१४६९–१५३९), (२) गुरू अंगददेव (१५०४–५२), (३) गुरू अमरदास (१४७९–१५७४), (४) गुरू रामदास (१५३५–८१), (५) गुरू ⇨अर्जुनदेव (१५६३–१६०६), (६) गुरू हरगोविंद (१५९५–१६४४), (७) गुरू हरराए (१६३०–६१), (८) गुरू हरकिशन (१६५६–६४), (९) गुरू ⇨तेगबहादुर (१६२१-७५), (१०) गुरू ⇨गोविंदसिंग (१६६६–१७०८).

या दहा गुरूंनी आपल्या शीख अनुयायांना आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवला. गुरू गोविंदसिंग यांनी आपल्यानंतर आपल्या अनुयायांनी ग्रंथसाहिबासच गुरूस्थानी मानावे असा आदेश दिला. तेव्हापासून या ग्रंथास श्रीगुरुग्रंथसाहिब असे आदरपूर्वक संबोधले जाते. गुरू गोविंदसिंगांनी शीख धर्माचा आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वाधिकार ग्रंथसाहिबास आणि ऐहिक क्षेत्रातील सर्वाधिकार खालसा पंथास असल्याचा आदेश दिला. गुरू गोविंदसिंगांनी इ. स. १६९९ मध्ये शीख दीक्षाविधीची सुरुवात केली. तेव्हा पाच शिष्यांनी पहिल्यांदा गुरूंकडून दीक्षा घेतली. हे पाच शिष्य म्हणजे भाई दयासिंग, भाई धरमसिंग, भाई मोहकमसिंग, भाई साहिबसिंग आणि भाई हिंमतसिंग. यांना शीख पंज प्यारे म्हणतात. यानंतर त्यांच्याकडून म्हणजेच आपल्या शिष्यांकडून स्वतः गुरू गोविंदसिंग यांनी दीक्षा घेतली. जगाच्या धार्मिक इतिहासामध्ये असा प्रसंग कधीच घडलेला नाही.

धर्मग्रंथ : श्रीगुरुग्रंथसाहिब हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ. त्यात शिखांचे सहा गुरू, पंधरा भारतीय भक्त व चौदा कवी यांची बानी (उपदेशवचने) आहे. या धर्मग्रंथांचे संकलन व संपादन शिखांचे पाचवे गुरू अर्जुनदेव यांनी इ. स. १६०४ मध्ये केले. हा पहिलाच असा धर्मग्रंथ आहे, की जो त्या धर्माचे संस्थापक हयात असताना संकलित करण्यात आला. [⟶ ग्रंथसाहिब].

शिखांचा दीक्षाविधी : अमृत किंवा शीख-दीक्षा प्रत्येक शिखाने घेणे आवश्यक आहे. दीक्षा कोणत्याही वयाचे स्त्री-पुरुष घेऊ शकतात. कोणत्याही देशातील, वंशातील किंवा सामाजिक थरातील स्त्री-पुरुषांना शीख धर्मतत्त्वांवर विश्वास असेल, तर दीक्षा घेण्याचा व खालसा पंथामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार आहे. दीक्षा घेतलेल्या स्त्री-पुरुषांना पाच क-वस्तू स्वतःकडे अहोरात्र बाळगाव्या लागतात. त्यांत केस (लांब आणि न कापलेले केस), कंगा (कंगवा), कडा (लोखंडी किंवा स्टीलचे कडे), कच्छा (लांब विजार), किरपान (तलवार) यांचा समावेश आहे. शीख धर्मानुसार पुढील चार गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत : (१) मद्यपान, तंबाखू आणि त्यापासून केलेल्या अंमली पदार्थांचे सेवन करणे. (२) केस कापणे (दाढी, भुवया किंवा शरीराच्या कुठल्याही भागावरचे केस कापणे). (३) हलाल (विशिष्ट पद्धतीने ठार मारलेला पशू) मांस खाणे. (४) व्यभिचार.

शिखांची आचारसंहिता : शीख धर्माची आचारसंहिता ही शीख-रहित-मर्यादा म्हणून ओळखली जाते. ही रहित-मर्यादा श्रीगुरुग्रंथसाहिबाची शिकवण तसेच शीख परंपरा आणि संकेत यांवर आधारित आहे. शीख धार्मिक विधी व आचार यांसंबंधीच्या नियमांत कोणताही बदल एखादी व्यक्ती किंवा संस्था करू शकत नाही. फक्त सरबत खालसालाच हा अधिकार असतो. त्यांत सर्व शीख प्रादेशिक केंद्रे व संघटना यांचे प्रतिनिधी सहमतीने निर्णय घेतात. अपत्याचा जन्म, त्याचे बारसे किंवा नामकरण, दीक्षा (अमृत घेणे), विवाह, मृत्यू (अंत्यविधी) यांसंबंधीचे विशिष्ट संस्कारविधी शीख धर्मात असून त्यापैकी अमृतविधी सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. या सगळ्या विधीप्रकारांत श्रीगुरुग्रंथसाहिबमधील वचनांचे व मंत्रांचे पठण येते. शीख अंत्यविधीप्रमाणे मृत व्यक्तीला अग्नी दिला जातो आणि तिची रक्षा जवळच्या नदीमध्ये टाकली जाते. मृत व्यक्तीचे स्मारक म्हणून थडगे किंवा कबर उभारण्यास बंदी असते. फक्त गुरुद्वाराच्या रूपाने थोर शीख हुतात्म्यांचे स्मारक उभारता येते. शीख धर्मानुसार ब्रम्हचर्यावर विश्वास ठेवला जात नाही त्याचप्रमाणे मुक्ती मिळविण्यासाठी ब्रम्हचर्य आवश्यक मानले जात नाही. वैवाहिक-कौटुंबिक जीवन नैसर्गिक, आदरणीय व आदर्श मानले जाते. श्रीगुरुग्रंथसाहिबाभोवती चार प्रदक्षिणा घालून शीख विवाहविधी साजरा केला जातो. विधवेच्या किंवा विधुराच्या पुनर्विवाहातही हाच विधी पाळला जातो.

धार्मिक सण-उत्सव : शीख धर्मातील सण आणि उत्सव पुढीलप्रमाणे आहेत : (१) दहा गुरूंच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या. (२) आध्यात्मिक गुरू असलेल्या ग्रंथसाहिब या पवित्र ग्रंथाचा प्रतिष्ठापना दिवस. प्रतिवर्षी हा दिवस साधारणपणे सप्टेंबर महिन्यात येतो. (३) खालसाचा स्थापना दिवस (१६९९). हा दिवस प्रतिवर्षी १३ किंवा १४ एप्रिल या दिवशी येतो. म्हणजे ज्या दिवशी गुरू गोविंदसिंग यांनी दीक्षाविधी देऊन खालसा पंथ स्थापन केला. (४) स्वधर्मासाठी तसेच पीडितांच्या संरक्षणासाठी ज्या शिखांनी हौतात्म्य स्वीकारले, त्यांचे स्मृतिदिन.

शीख समाजामध्ये स्त्रीचे स्थान : शीख समाजात स्त्रीला आदराचे स्थान असते. मुलीचा जन्म अनिष्ट, अशुभ मानला जात नाही. शीख स्त्री पडदा घेत नाही. हुंडा आणि घटस्फोट शीख धर्मामध्ये मान्य नाही. स्त्रीला पुरुषांप्रमाणेच आपला धार्मिक, आध्यात्मिक व ऐहिक विकास साधण्याची समान संधी उपलब्ध असते. धार्मिक सभेला ती जशी उपस्थित राहू शकते, त्याचप्रमाणे ⇨गुरुद्वारामध्ये पठण, कीर्तन किंवा प्रवचन करू शकते. सर्व धार्मिक विधींमध्ये ती सहभागी होऊ शकते. त्याचप्रमाणे ते विधी करण्याचा तिला अधिकार असतो.

शीख पुजारी, ग्रंथी आणि जथेदार : शीख धर्मात वेगळी अशी पुजाऱ्यांची श्रेणी नसते. कोणतीही स्त्री-पुरुष-व्यक्ती श्रीगुरुग्रंथसाहिबाचे पठण करू शकते, तसेच धार्मिक सभेत कीर्तन किंवा प्रवचन करू शकते. गुरुद्वारामध्ये जी व्यक्ती साधारणपणे दररोज श्रीगुरुग्रंथसाहिबाचा नित्यपाठ करते आणि गुरुद्वाराची देखरेख करते, तिला ग्रंथी सिंग म्हणतात. तसेच जे स्त्री-पुरुष गुरुद्वारामध्ये कीर्तन करतात, त्यांना रागी म्हणतात. त्याचप्रमाणे धर्माच्या बाहेरील लौकिक-सामाजिक बाबींसंबंधी जे निर्णय करतात, त्यांना जथेदार म्हणतात. जथेदार हा शीख तख्ताचा प्रमुख असतो. ज्याला आध्यात्मिक आणि ऐहिक किंवा सामाजिक मुख्य पीठ (सिंहासन) म्हणून अधिकार असतो, अशा गुरुद्वाराला तख्त म्हणतात. तख्त व त्यांचे जथेदार शीख धर्मश्रद्धेशी निगडीत अशा बाबी सोडल्या, तर इतर प्रकारच्या राजकीय घडामोडीत भाग घेत नाहीत.

शिखांची पाच तख्ते आहेत. ती अशी : (१) अकाल तख्त (अमृतसर), (२) तख्त श्री हरिमंदिरसाहेब (पटणा साहेब), (३) तख्त श्री केशगढसाहेब (आनंदपूर), (४) तख्त श्री दमदमासाहेब (तळवंडी साबो), (५) तख्त सचखंड श्री हुजूरसाहेब (नांदेड). यांपैकी अकाल तख्त हे सर्वांत श्रेष्ठ मानले जाते. खालसा पंथासाठी कुठलाही हुकूमनामा जारी करण्यापूर्वी पाच तख्तांचे जथेदार एकत्र बसून विचार-विनिमय करतात. कुठल्याही एका जथेदाराला हुकूमनामा जारी करण्याचा अधिकार नाही.

गुरुद्वाराचे प्रशासकीय कामकाज शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीद्वारा करण्यात येते. पाच तख्तांचे जथेदार या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. तसेच दिल्लीच्या गुरुद्वाराचे प्रशासकीय काम दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समिती बघते. शिरोमणी अकाली दल राजकीय बाबींत निर्णय घेते.

खालसा : जे शीख, दीक्षा म्हणजे खंडे-की-पाहूल पंच प्यारे यांच्याकडून घेतात, शीख रहित-मर्यादांनुसार आपले जीवन व्यतीत करतात आणि शीख गुरुंच्या मतानुसार आचरण राखतात, त्यांना खालसा म्हणतात. लोकांच्या हिताकरिता, देशासाठी आणि धर्मासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यास खालसा तयार असतात. त्यांच्या दृष्टीने प्रेमाचा आदर्श व वैश्विक बंधुता यांच्या तुलनेत स्वतःचे जीवन कःपदार्थ ठरते. गुरू गोविंदसिंगांचा खालसा पंथ हा एकनिष्ठ तसेच धाडसी, सत्यवादी आणि विश्वासू शिखांचा गट आहे.

तत्त्वज्ञान : शीख धर्म एकेश्वरवादी असून ईश्वर हा स्वयंभू, सर्वव्यापी, सर्वोच्च, एकमेव व अद्वितीय आहे, अशी शीखश्रद्धा आहे. शीख गुरू परमेश्वराला परमात्मा, परब्रम्ह असेही म्हणतात. शीख धर्म हा सगुण देवदेवता तसेच सैतानाची शक्ती यांचे अस्तित्व मानत नाही. सर्व चराचर सृष्टी ही परमेश्वराची निर्मिती असून तो सर्वत्र भरून राहिला आहे तो स्वयंभू असून त्यानेच नाम (वाक्) निर्माण केले, स्वतःच्या निर्मितीचा त्याला आनंद झाला, असे हा धर्म मानतो. परमेश्वराने सत्त्व, रज व तम हे तीन गुण निर्माण केले तो चांगल्या-वाईटाचे उगमस्थान आहे एक परमेश्वर पुण्यमय आणि दुसरा पापमय असे दोन परमेश्वर नाहीत सैतानी शक्ती किंवा माया यांसारखी माणसाचे अधःपतन करणारी स्वतंत्र अशी शक्ती अस्तित्वात नाही एकमेव परमेश्वरानेच ब्रम्हा, विष्णू, शिव यांसारखे देव निर्माण केले आहेत यांसारख्या श्रध्देय कल्पना शीख धर्मात आहेत. शीख धर्मात परमेश्वराच्या अवताराची कल्पना मान्य नाही. परमेश्वर जन्म घेत नाही व मृत्यूही पावत नाही. 

शीख धर्माचे महत्त्वाचे गृहीतक असे, की जीवन मूलतः पापयुक्त नाही त्याचा उगम पवित्र वा शुद्धतेत असल्यामुळे सत्याने त्यात वास केलेला आहे.

शिखांमध्ये जातिव्यवस्था नाही. मूर्तिपूजेवर ह्या धर्माचा विश्वास नाही. मानवतेची सेवा, सहिष्णुता व बंधुता या तत्त्वांना महत्त्व देणारा हा धर्म ऐहिक जीवनावर भर देतो. शीख गुरूंच्या मतानुसार मोक्षप्राप्तीसाठी निवृत्तीमार्गाची आवश्यकता नाही जी व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करते आणि सर्वसामान्य जीवन जगते, तिला मोक्ष मिळू शकतो अशा व्यक्तीलाच मोक्षाचा मार्ग समजलेला असतो. ‘किरत करो, नाम जपो, बंड छ्को’ (इतरांना वाटेकरी करून घ्या) या वचनात शीख धर्माचे तत्त्वज्ञान गर्भित आहे. दुसऱ्याने दिलेल्या दानावर जगू नये, तर कोणतेही काम इमानेइतबारे करून उदरनिर्वाह करावा, असे शीख गुरू सांगतात.

गुरू नानक यांनी अपमानित झालेल्या समाजाची अस्मिता जागृत करून त्यास समतेची शिकवण व नवीन दिशा दिली. शीख धर्मानुसार जीवनातील श्रीमंती आणि व्यक्तिगत मालमत्ता ही आध्यात्मिक ध्येयाच्या आड येत नाहीत. मात्र आपल्या मिळकतीत इतरांनाही सहभागी करून घेतले पाहिजे, असे गुरूंनी सांगितले आहे. यालाच ‘बंड छकना’ म्हटले आहे. त्यामागील तत्त्व सर्वांवर प्रेम करणे आणि मानवजातीची सेवा करण्याची इच्छा बाळगणे हे आहे. दुर्दैवी बांधवांच्या मदतीसाठी प्रत्येक शिखाने आपल्या उत्पन्नातील दहा टक्के द्रव्य दिले पाहिजे हा नियम आहे. याला दसवंद असे म्हणतात. शीख धर्म मानव जातीच्या सेवेवर आधारलेला आहे. गुरू नानक म्हणतात, ‘या जगात सेवा केल्यानेच तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल’.

संदर्भ : 1. Harbans Singh, Ed., The Encyclopedia of Sikhism, Vol. I-IV, Patiala, 1998.

           2. Jodh Singh,Outlines of Sikh Philosophy, Patiala, 2000.

           3. Jodh Singh, Ed., Sikhism and Human Civilisation,Patiala, 1999.

           4. Sher Singh, Philosophy of Sikhism, Amritsar, 1998.

           ५. गाडगीळ, न. वि.शिखांचा इतिहास, पुणे, १९६३.

           ६. जुनेजा, प्रीतम सिंग, नामा म्हणे त्रिलोचना-भक्त नामदेव, पुणे, १९९७.

           ७. नहार संजय, गुरू गोविंदसिंग, पुणे, २००२.

           ८. नहार, सुषमा, गुरुग्रंथसाहिबमधील संत नामदेव, पुणे,१९९९.

चाहल, सुरजीत कौर