आरती : ताम्हणात नीरांजन वा कापूर लावून त्याने देवादिकांना ओवाळणे म्हणजे आरती. याला संस्कृतात आरात्रिक, आर्तिक्य, आरार्तिक्य अथवा महानीरांजना असे म्हणतात. या वेळी वाद्ये वाजवावयाची असतात. देवादिकांच्या स्तुतिपर विशिष्ट प्रकारचे जे गीत या वेळी म्हणतात, त्यालाही आरती असे म्हणतात. पूजेतील ‘दीप’ या उपचाराहून ‘आरती’ हा उपचार भिन्न आहे. नैवेद्यसमपर्णानंतर आरती करावयाची असते. आरतीचे पात्र देवाच्या पायापुढे चार वेळा, नाभीपुढे दोन वेळा, मुखापुढे एक वेळा व सर्व शरीरापुढे सात वेळा ओवाळावयाचे असते. नीरांजनात वाती अनेक असाव्यात. कर्मांची अविकलता व पापनाश हे आरतीचे फल होय.

केळकर, गोविंदशास्त्री