यल्लम्मा : द. भारतातील एक मातृदेवता. कर्नाटकातील सौंदत्ती (जि. बेळगाव) हे तिचे मुख्य स्थान आहे. ती कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र या प्रांतांतील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. तिच्या भक्तांमध्ये तथाकथित खालच्या थरातील लोकांची संख्या अधिक आहे. ‘यल्लम्मा’ या कानडी शब्दाचे ‘सर्वांची माता’ आणि ‘सप्तमातृका’ हे दोन्ही अर्थ तिचे सर्जनशील मातृस्वरूप दर्शवितात.

यल्लम्मा व रेणुका यांचे ऐक्य मानले जाते. गंधर्वांची जलक्रीडा पाहताना विचलित झालेल्या रेणुकेचा ⇨जमदग्नीच्या आज्ञेवरून ⇨परशुरामाने वध केला आणि तिला पुन्हा जिवंत करताना मातंगीचे (मांगिणीचे) मस्तक तिच्या धडाला व तिचे मस्तक मांगिणीच्या धडाला जोडले गेले, अशी पुराणकथा आहे. जिवंत झालेल्या दोघींपैकी एक यल्लम्मा व दुसरी मरिअम्मा बनली. काळाच्या ओघात स्थानिक मातृदेवतेचे पुराणातील रेणुकेशी ऐक्य झाले, हे या कथेवरून सूचित होते. तिला पार्वतीचा अवतार मानण्यात आले असून लज्जागौरी, एकवीरा, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, यमाई व सांतेरी ही तिचीच रूपे होत, असे अभ्यासकांना वाटते.

रेणुका या शब्दाचा रेणुमयी पृथ्वी हा अर्थ, भूदेवीचे योनिप्रतिक असलेल्या वारुळाच्या स्वरूपात होणारी रेणुका व यल्लम्मा यांची पूजा, योनिप्रतीक असलेल्या कवड्यांचे यल्लम्माच्या पूजेतील महत्त्वाचे स्थान, अपत्यप्राप्तीसाठी वांझ स्त्रियांकडून तिला केले जाणारे नवस, ती आईबापाविना पृथ्वीतून निर्माण झाल्याची आणि तिने कोंबडी बनून घातलेल्या तीन अंड्यांतून ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा जन्म झाल्याची कथा इ. गोष्टींवरून यल्लम्मा ही सर्जनशील आदिशक्ती असल्याचे सूचित होते. [⟶ आदिमाता]. यल्लम्माचे वैधव्य सूचित करण्यासाठी तिची मानवी प्रतिनिधी असलेल्या जोगतिणीचा माघी (रांडाव) पौर्णिमेचा चुडा फोडतात आणि सौभाग्य सूचित करण्यासाठी ज्येष्ठी (अहेव) पौर्णिमेला पुन्हा चुडा भरतात, ही प्रथाही तिचे हे स्वरूप स्पष्ट करते. यल्लम्माच्या उपासनेत जोगतिणींना व पुरुषत्वहीन जोगत्यांना असलेले महत्त्व, पुरुष जोगत्यांनीही स्त्रीवेष धारण करण्याची प्रथा, निर्मिती केल्यानंतरही देवीचे कौमार्य भंगत नाही या श्रद्धेमुळे तिला ‘कोरी भूमिका’ (कुमारी भूमी) मानण्याची पद्धत, परशुरामाला बिनबापाचा मुलगा म्हणून हिणवले जाण्याची कथा इत्यादींवरून यल्लम्माच्या उपासनेत मातृतत्त्वाचे प्राधान्य पितृतत्त्वाचे गौणत्व असल्याचे स्पष्ट होते.

सौंदत्ती येथील देवीचे मंदिर सु. तेराव्या शतकातील आहे. आंध्रमधील आलमपूर या शक्तिपीठाचे मूळचे नाव एल्लाम्मापूरच असले पाहिजे, असे रा. चिं. ढेरे मानतात. देवी कडक परंतु भावभोळी असल्याचे मानले जाते. तिची मूर्ती चतुर्भुज व बसलेल्या स्थितीतील असते. तिच्या डोक्यावर मुकुट व हाती डमरू, त्रिशूळ, पाश व ब्रह्मकपाल ही आयुधे असतात. सौंदत्ती येथे प्रचंड यात्रा भरते. देवीला चांदीचा पाळणा वाहणे, बगाड घेणे, लिंब नेसणे इ. प्रकारे ⇨नवस फेडले जातात. चंद्रगुत्ती (जि. शिमोगा) येथे रेणुकाम्बेची नग्न होऊन पूजा केली जाते. सौंदत्ती येथेही ब्रिटिश अमदानीत तसे घडत असल्याचा उल्लेख मिळतो. नवसाने झालेल्या मुलामुलींना वा केसात जट झालेल्या मुलींना देवीला वाहतात. वाहिलेला मुलगा जोगती व मुलगी जोगतीण बनते. मुली ⇨देवदासी बनून गणिकावृत्तीने जगतात. कवड्यांची माळ घालणे, देवीची मूर्ती असलेली परडी म्हणजेच ‘जग’ डोक्यावर घेणे आणि कपाळाला भंडार लावणे, ही जोगती बनण्याचा विधी असतो.

संदर्भ : १. ढेरे, रा. चिं. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.

२. ढेरे, रा. चिं. लज्जागौरी, पुणे, १९७८.

साळुंखे, आ. ह.