श्राद्धविधि : पितरांना संतुष्ट करण्यासाठी केला जाणारा एक हिंदू धर्मविधी. श्राद्ध हा शब्द ‘ श्रद्धा’ ह्या शब्दापासून आलेला आहे. पितरांच्या हितार्थ, त्यांना उद्देशून योग्य काळी व स्थळी सत्पात्र व्यक्तींना आणि बाह्मणांना धर्मशास्त्रात सांगितलेल्या, बल, लक्ष्मी, पशू , सौख्य, विधीनुसार जे श्रद्धापूर्वक देण्यात येते, त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध केल्याने आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी धन, धान्य ह्या गोष्टींची प्राप्ती होते, असा उल्लेख स्मृतिचंद्रिका व इतरही काही गंथांत आढळतो. श्राद्धक्रिया प्रथम मनूने सुरू केली, असे बह्मांडपुराणा त म्हटले आहे. विष्णू व वायू या पुराणांमध्ये मनूला ‘ श्राद्धदेव’ म्हटले आहे, त्याचे कारण हेच दिसते. प्राचीन काळी श्राद्धाला पिंडपितृयज्ञ हे नाव होते. महापितृयज्ञ किंवा अष्टका हे शब्दही श्राद्ध या अर्थी वापरलेले आहेत पण अष्टका ह्याचा अर्थ कोणत्याही महिन्यातील वदय अष्टमी ही तिथी होय. श्राद्ध हा शब्द कठोपनिषदा त प्रथम आढळतो. श्राद्धकल्पना ही पुनर्जन्म व कर्मविपाक इ. सिद्धांतांच्या नंतरची आहे, असे म्हणतात. याज्ञवल्क्यस्मृतीत म्हटले आहे, की वसू , रूद्र आणि आदित्य ह्या श्राद्धातल्या देवता आहेत. श्राद्धामुळे त्या संतुष्ट होऊन माणसांच्या पूर्वजांना संतोष देतात. ह्याचा अर्थ असा सांगितला जातो : पिता, पितामह आणि प्रपितामह ह्या तीन पूर्वजांच्या अधिष्ठात्री देवता अनुक्रमे वसू , रूद्र आणि आदित्य ह्या असून संबंधित पितराचे आपल्या अधिष्ठात्री देवतेशी ऐक्य असते. ⇨हेमाद्री ( हेमाडपंत) याने ⇨चतुर्वर्गचिंतामणि ह्या गंथात परिशेष या पाचव्या भागात श्राद्ध हे एक प्रकरण अंतर्भूत केले आहे. ⇨पूर्वमीमांसे त निष्णात असलेल्या हेमाद्रीने श्राद्धाचे विवरण त्या मीमांसेनुसार तपशीलवार केले आहे.

श्राद्धाची प्रथा इ. स. पू. पासून अनेक शतके चालू आहे. आपले पितर आपले हित किंवा अनहित करू शकतात, ही कल्पना प्राचीन काळापासूनची आहे ( उदा., ऋग्वेद १०.१५.६). त्यामुळे त्यांना प्रसन्न ठेवून आपले हित साधण्याच्या हेतूने प्राचीन मानवाने त्यांना काही पदार्थ विधिपूर्वक अर्पण करावयास आरंभ केला असावा आणि पुढे पितरांविषयीच्या प्रेम व  पूज्य भावनेतून हे केले जाऊ लागले असावे.

श्राद्धाचे नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे तीन विभाग केले जातात :   जो श्राद्धविधी एखादया विवक्षित वा निश्चित प्रसंगी – उदा., प्रतिदिवशी वा अमावास्येला –  केला जातो, तो श्राद्धविधी नित्य एखादया अनिश्चित प्रसंगी   – उदा., पुत्रजन्म-करावयाचा विधी नैमित्तिक आणि विशिष्ट फलप्राप्तीसाठी करावयाचा विधी काम्य. श्राद्धाचे चार प्रकार आहेत : पार्वण, एकोद्दिष्ट, नांदी ( वृद्धिश्राद्ध हे पर्यायी नाव ) आणि सपिंडीकरण. एखादया महिन्याच्या अमावास्येला, भाद्रपद कृष्ण पक्षात वा संकांतीला करण्यात येते, ते पार्वण श्राद्ध त्याचे महालय श्राद्धादी अनेक प्रकार आहेत. एकाच मृत व्यक्तीला उद्देशून केले जाते, ते एकोद्दिष्ट श्राद्ध ह्याचे अनेक प्रकार आहेत. पुत्रजन्म, उपनयन, विवाह ह्यांसारख्या शुभप्रसंगी करतात ते नांदी श्राध्द ज्यांना पिंड अर्पण केले जातात, अशा पितृगणात मृत व्यक्तीचा समावेश करण्याच्या विधीस सपिंडीकरण अथवा सपिंडन म्हणतात. संन्याशांना प्रेतत्वस्थिती भोगावी लागत नसल्यामुळे त्यांचे एकोद्दिष्ट वा संपिडीकरण करू नये, फक्त अकराव्या दिवशी व त्यानंतर प्रतिवर्षी पार्वण श्राद्ध करावे.

अमावास्या, एखादया महिन्याचा कृष्ण पक्ष, दोन अयनदिन, विव्दान बाह्मणाचे आगमन, संकांत, व्यतिपात, गजच्छाया योग, सूर्यचंद्र गहणे, युगादी व मन्वादी तिथी, मृत्युदिन इ. काल श्राद्धाला योग्य होत. दिवसाचे पाच भाग केल्यावर त्यांतल्या चौथ्या भागाला अपराण्ह असे म्हणतात. हा काल श्राद्धाला योग्य समजावा. एकोद्दिष्ट श्राद्ध मध्यान्ही व हिरण्यश्राद्ध आणि आमश्राद्ध दिवसाच्या पूर्वभागात करावे. वृद्धिश्राद्ध प्रात:काली किंवा संगवकाली ( दिवसाच्या पाच भागांपैकी दुसऱ्या भागात ) करावे. ग्रहणकालीन श्राद्ध व पुत्रजन्माच्या वेळचे वृद्धिश्राद्ध ही रात्री करावीत. श्राद्ध कोणत्या ठिकाणी करावे, ह्या विषयीही निरनिराळे नियम सांगण्यात आलेले आहेत. उदा., श्राद्धस्थळ दक्षिणेकडे, उतरते असावे तिथे वर्दळ नसावी शुद्ध आणि आच्छादित अशी पुण्यभूमी, नदीकाठ, तीर्थक्षेत्र, स्वत:ची जागा किंवा पर्वतशिखर इ. जागाही योग्य मानल्या आहेत. दुसऱ्याच्या  घरी श्राद्ध करणे झाल्यास, त्या घराच्या मालकास त्या कालापुरते गृहमूल्य देऊन श्राद्ध करावे.

श्राद्ध करणारी व्यक्ती कोणत्याही वर्णाची असली, तरी श्राद्धविधीसाठी ब्राह्मणच बोलवावे लागतात. हे ब्राह्मण वेदविदयासंपन्न, सदाचरणी, शुद्ध आणि अव्यंग असले पाहिजेत. मात्र अनेक विव्दान ब्राह्मण श्राद्धविधीसाठी जायला तयार नसतात, असे दिसते.

श्राद्धात वापरावयाचे पदार्थ, तसेच भांडी ठरलेली आहेत. तीळ, तांदूळ, यव, पाणी, मुळे, फळे ह्यांचा श्राद्धात उपयोग करावा, असे आपस्तंब धर्मसूत्रा त सांगितले आहे. श्राद्धासाठी सोन्याचांदीची, पंचधातूंची, नुसत्या तांब्याची वा अन्य कोणत्याही धातूची भांडी चालतील तथापि अग्नीत भाजलेले आणि पाण्यात बुडविलेले मातीचे भांडे श्राद्धाचे अन्न शिजविण्यासाठी सर्वोत्तम मानलेले आहे. काही कारणाने अन्नासाठी धान्य शिजविणे शक्य नसल्यास न शिजलेले अन्नधान्य देऊन केलेल्या श्राद्धास आमश्राद्ध म्हणतात. आमश्राद्ध शक्य नसल्यास आवश्यक त्या धान्याच्या चौपट किंमतीचे सोने ब्राह्मणांना देऊन हिरण्यश्राद्ध करतात. श्राद्धासाठी ब्राह्मण न मिळाल्यास ब्राह्मणांच्या जागी दर्भ ( चट ) ठेवून चटश्राद्ध करतात. संन्यास घेतलेल्या पित्याच्या पुत्राने आपल्या वडिलांचे पार्वण श्राद्ध करावे. तीर्थाच्या ठिकाणी केलेल्या श्राद्धास तीर्थश्राद्ध म्हणतात.

पार्वण श्राद्ध हा इतर सर्व श्राद्धांचा एक आदर्श नमुना मानतात. त्याच्या धर्तीवर अन्य श्राद्धविधी होतात. हा विधी बराच मोठा असला, तरी त्याचे थोडक्यात वर्णन असे : काही ब्राह्मण देवस्थानी पूर्वाभिमुख आणि काही पितृस्थानी उत्तराभिमुख असे दर्भासनावर बसविले जातात. यजमान ब्राह्मणांकरवी पिता, पितामह आणि प्रपितामह ह्यांना अर्घ्य देतो. नंतर ब्राह्मणांसाठी भोजनाची पात्रे मांडून त्या पात्रांभोवती भस्माची वर्तुळे   काढतात. त्यानंतर अग्नौकरण  म्हणजे अन्नावर तूप ओतून त्याचा अग्नीत होम करणे वा ते ब्राह्मणांच्या हातांवर अर्पण करणे. पुढे ब्राह्मणभोजन आपण जेवून तृप्त झाल्याचे ब्राह्मणांनी सांगितल्यावर पिंडदान. पिंड हे जलाशयात टाकतात किंवा गायीला देतात. हे  झाल्यावर ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. श्राद्धविधीतील सर्व कर्मे ईश्वरार्पण करून उरलेल्या अन्नाचे यजमान आप्तेष्टांसह सेवन करतो. श्राद्धाच्या वेळी एखादा अतिथी अचानक आल्यास, त्याला अवश्य भोजन द्यावे कारण योगी, सिद्धपुरूष व देव हे भिन्न रूपे घेऊन पृथ्वीवर हिंडत असतात व ब्राह्मणाच्या रूपाने श्राद्धविधीचे निरीक्षण करायला येतात, असे वायू , वराह व विष्णू या पुराणांत सांगितले आहे. त्याचप्रमाणे श्राद्धाच्या वेळी योगी किंवा संन्यासी याला भोजन दिल्यास त्यामुळे पितर अत्यंत तृप्त होतात, असे मार्कंडेयपुराणा त सांगितले आहे.


 श्राद्धविधी दरम्यान विघ्न उत्पन्न झाल्यास, उदा., जननाशौच किंवा मृताशौच आल्यास, श्राद्ध त्या तिथीला न करता ज्या दिवशी ⇨आशौचा ची निवृत्ती होईल, त्या दिवशी करावे. श्राद्धातील बाह्मण भोजनास बसले असता, आशौच प्राप्त झाले, तर त्वरित श्राद्ध समाप्त करावे. मात्र पाकप्रोक्षण झाल्यावर आशौच लागू होत नाही. पत्नी रजस्वला असल्यास तिच्या चौथ्या दिवशी श्राद्ध करावे. व्याधी, संकटे इ. अडचणी आल्यास पुढील मासातील योग्य तिथीस श्राद्ध करावे. एखादयाचा दूरदेशी मृत्यू झाल्यामुळे त्या मृत्यूचा मास व तिथी ठाऊक नसेल, तर प्रस्थानाच्या तिथीस किंवा मृत्यूवार्ता ज्या तिथीमासी समजली, त्या तिथीमासी श्राद्ध करावे. यांपैकी काहीच माहीत नसेल, तर मार्गशीर्ष किंवा माघ या मासांच्या अमावास्येला श्राद्ध करावे.

माता-पित्याचा मृत्युदिवस एकच असल्यास प्रथम पित्याचे व नंतर निराळी पाकसिद्धी करून मातेचे श्राद्ध करावे. एका दिवशी एकाने तिघांची श्राद्धे करू नयेत.

पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी ह्या संस्थेने प्रकाशित केलेल्या एका संस्कार-विषयक पुस्तकात उपर्युक्त एकोद्दिष्ट श्राद्धाविषयी सुधारणावादी दृष्टिकोणातून दिलेली माहिती थोडक्यात अशी : व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या, अकराव्या, बाराव्या, तेराव्या दिवशी श्राद्ध करून दशाह, एकादशाह, व्दादशाह, सपिंडीकरण, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध, गयाश्राद्ध इ. किया करावयास सांगतात तथापि आर्य समाजाचे संस्थापक  स्वामी ⇨दयानंद सरस्वती ह्यांच्या मते ह्या किया वेदप्रणीत नसल्यामुळे त्या करण्याचे कारण नाही. मृत जीवाचा संबंध पूर्वी असलेल्या संबंधितांशी काहीच राहिलेला नसतो. त्याचप्रमाणे जिवंत राहिलेले मृताच्या गतीला काहीच मदत करू शकत नाहीत. क्रियेनंतर त्यांचा मृताशी संबंध नसतो. मृत व्यक्ती आपल्या कार्यानुसार जन्म पावते, असे त्यांचे म्हणणे होते.

धर्मनिर्णय मंडळाचे असे प्रतिपादन आहे की, मृताच्या नावाने कोणताही अवास्तव खर्च करू नये. स्वसंतोषाने सत्पात्री दान दयावे. ते  पैशाचे, धान्याचे, कपडयांचे, अन्य वस्तूंचे वा निव्वळ शारीरिक श्रमांचेही असेल. मरण पावलेल्या आपल्या आप्तांची आठवण लोकांच्या, तसेच आपल्या मनात जागृत ठेवणे म्हणजे श्राध्द. त्यासाठी आप्तेष्टांसह काही काळ ईश्वराचे भजन करावे. काही क्षण ध्यानस्थ अवस्थेत मृत व्यक्तीच्या गुणांचे स्मरण करावे. नंतर काही व्यक्तींनी मृत व्यक्तीच्या आठवणी सांगाव्यात.

श्राध्दसभा योजावी. मृत व्यक्तीचे छायाचित्र हार घालून ठेवावे. श्रद्धांजली वाहण्यासाठी पांढरी फुले प्रसाद म्हणून बत्तासे, खडीसाखर असे काही आणून ठेवावे. त्यानंतर तीन वेळा ओम् म्हणून भजन करावे.

पहा : पितर पितृपूजा.

संदर्भ : १. काणे, पां. वा. अनु. भट, यशवंत आबाजी, धर्मशास्त्राचा इतिहास, सारांशरूप गंथ, उत्तरार्ध, मुंबई, १९८०.

             २. ज्ञानप्रबोधिनी संस्कार माला, अन्त्येष्टि व एकोद्दिष्ट श्राद्घ, पुणे, २००५.

कुलकर्णी, अ. र.