ईशकृपा : ईश्वराच्या कृपेशिवाय किंवा अनुग्रहाशिवाय जीवात्म्याचा संसारबंध किंवा पापबंध नष्ट होत नाही व मोक्ष मिळत नाही, असे सर्व ईश्वरवादी मानतात. ईश्वभक्ती केल्याशिवाय व ईश्वराच्या आज्ञा पाळल्याशिवाय किंवा धर्माचरण केल्याशिवाय ईश्वराची कृपा होत नसते, असे सर्वच ईश्वरवादी धर्म मानतात. ख्रिस्ती धर्मात ईश्वरकृपेला हिंदुधर्मातील भक्तिपंथाप्रमाणे अत्यंत महत्त्व दिले आहे. त्यात मुख्यत: दोन मते आहेत. एका मताप्रमाणे ईश्वरकृपेने सर्वच जीवात्मे मुक्त होऊ शकतात मात्र कृपा प्राप्त करून देणारा सन्मार्ग प्रत्येक मानवी जीवात्म्याने अनुसरला पाहिजे. ⇨ जॉन कॅल्व्हिन याच्या मताप्रमाणे, ईश्वर काही निवडक मानवात्म्यांनाच मोक्षपात्र म्हणून केवळ स्वेच्छेने निवडतो. ईशकृपा असल्याच्या खुणा अशा मानवात्म्यांमध्ये या प्रपंचातच प्रगट झालेल्या असतात.

संदर्भ : Hodgson, L. The Grace of God in Faith and Philosophy, 1936. 

जोशी, लक्ष्मणशास्त्री