हरिश्चंद्र : एक पौराणिक दानशूर राजा. पारंपरिक इतिहास व त्याच्या अनुषंगाने इतर धार्मिक साहित्यातून आलेले उल्लेख यांवरून हरिश्चंद्र हा इक्ष्वाकू वंशीय राजा होता. कसोशीने सत्त्वपालन करणारा राजा अशी त्याची विशेष ख्याती होती. राजा त्रिशंकू याचा तो ज्येष्ठ मुलगा. आईचे नाव सत्यवती. पत्नीचे नाव तारामती (देवी भागवत ७.१८). चंद्रमती या नावानेही त्याच्या पत्नीचा उल्लेख आढळतो. ती शिबी राजाची कन्या होती. याशिवाय त्याला नव्याण्णव पत्न्या होत्या, असाही निर्देश आढळतो. तत्संबंधीच्या कथा महाभारत, मार्कण्डेय पुराण, देवी भागवत आदींत आढळतात. देवराज ⇨ वसिष्ठ ऋषी हे त्याचे गुरू होते आणि वसिष्ठ व ब्रह्मर्षी ⇨ विश्वामित्र यांच्यात वितुष्ट होते. हरिश्चंद्र राजाच्या रोहित या मुलाच्या प्रकरणातही (ऐतरेय ब्राह्मण -३३) त्यांच्यातील वितुष्ट दिसून येते. हरिश्चंद्रास दीर्घकाळापर्यंत मूलबाळ झाले नव्हते मात्र नंतर रोहितझाला तोही वरुणाच्या कृपेमुळे. ‘तो मोठा झाल्यावर त्याला मी बळीदेईन’ असे अभिवचन हरिश्चंद्राने वरुणास दिले होते परंतु उपनयनानंतरवेळ आल्यावर रोहित याने बळी जाण्यास नकार दिला व तो रानात पळून गेला. दिलेले वचन हरिश्चंद्र पूर्ण करू शकला नाही. तेव्हा वरुणाच्या रोषाने हरिश्चंद्रास जलोदर (वरुण रोग) जडला. रोहितला हे कळताच तो रानातून परतणार होता तथापि इंद्राने त्यास परावृत्त केले. तेव्हा वसिष्ठांच्या सल्ल्यानुसार रोहित याने अजीगर्त या ब्राह्मणाकडून शंभर गायींच्या बदल्यात त्याचा मधला मुलगा शुनःशेप यास विकत घेतले व स्वतःऐवजी त्यास बळी देण्याचे ठरविले परंतु विश्वामित्रांनी त्याचे वरुणमंत्राद्वारे रक्षण केले. त्यानंतर हरिश्चंद्र या रोगातून बरा झाला. पुढे रोहित राजवाड्यात परत आला. त्यानंतर हरिश्चंद्राने राजसूय यज्ञ केला. एक उदार, सत्त्वशील व दानशूर राजा म्हणून त्याची कीर्ती झाली.

हरिश्चंद्र एकदा जंगलात शिकारीस गेला असता, एक स्त्री कण्हत असताना त्याला आढळली. त्याने तिला दुःखाचे कारण विचारले. तेव्हा तीम्हणाली, ‘हे राजा, मी सिद्धरूपिणी (लोकांना मदत करणारी देवता). विश्वामित्र मला आत्मसात करण्यासाठी तपश्चऱ्या करीत आहेत. माझे रक्षण कर.’ तेव्हा ‘यापुढे तुला उपद्रव होणार नाही’, असे हरिश्चंद्राने तिला वचनदिले. नंतर तो विश्वामित्रांच्या आश्रमात गेला आणि त्याने अशा प्रकारची तपश्चऱ्या थांबविण्यास त्यांना सांगितले. तेव्हा विश्वामित्रांना राग आला. याच सुमारास इंद्रसभेत सर्व देवांसमोर वसिष्ठांनी हरिश्चंद्राची स्तुती केली. तेव्हा विश्वामित्रांनी त्याचे सत्त्व पाहण्याचे अनेक प्रयत्न केले. महाभारतदेवी भागवत (स्कंध-७) यांतील कथेनुसार राजा मृगया करताना विश्वामित्रांनी एका असुरास मायावी डुकराचे रूप धारण करण्यास सांगितले. त्या डुकराने राजाची बाग उद्ध्वस्त करून राजास सर्वत्र फिरविले वजंगलात एका अज्ञात स्थळी नेले. तिथे विश्वामित्र एका ब्राह्मणाच्यारूपात त्या ठिकाणी आले. त्या ब्राह्मणाने दक्षिणेनिमित्त सर्व राज्य वअडीच भार सोने मागितले. हरिश्चंद्राने त्यास राज्य देऊन सोन्याच्याभरती करिता पत्नी तारामती व पुत्र रोहित यांस विकले आणि स्वतःसहीएका चांडाळास विकून घेतले. या चांडाळाने स्मशानभूमीतील प्रेतांचीवस्त्रे व द्रव्य आणण्यासाठी हरिश्चंद्राची योजना केली. इकडे रोहितास विश्वामित्राने सर्पाकडून मारविले आणि तारामती आपलीच पोरे भक्षण करणारी राक्षशीण आहे, असे लोकांना भासवून तिला मारण्यासाठी चांडाळाकडे नेले. तिथे तिला मारण्यासाठी चांडाळाने हरिश्चंद्राला आज्ञा केली. जेव्हा तिने जन्मोजन्मी हेच पती, पुत्र, गुरू व विश्वामित्रांसारखे याचक मिळावेत, अशी शेवटची इच्छा दर्शविली, तेव्हा विश्वामित्र सद्गदित झाले व त्यांनी हरिश्चंद्रास पत्नी आणि पुत्रासह संकटातून सोडवून पुन्हा राज्यावर बसविले.

देवी भागवतात या कथेचा शेवट थोडा वेगळा आहे. मुलाच्या चितेत देहत्याग करण्यासाठी सज्ज असलेल्या राजा-राणीसमोर ब्रह्मदेव अवतरतात व त्यांना ते देहत्यागापासून परावृत्त करतात. त्याच सुमारास इंद्र वअन्य देव स्वर्गातून अमृताचा शिडकाव करतात. रोहित जिवंत होऊन पेटलेल्या चितेतून बाहेर येतो. हरिश्चंद्र व चंद्रमती यांना शाही पोशाखव अलंकार प्राप्त होतात. विश्वामित्र त्यांना राज्य परत देतात. सर्वांचे आशीर्वाद घेऊन राजा सहकुटुंब राजधानीत येतो. तो रोहितास राज्या-भिषेक करून सिंहासनावर बसवितो. देवांसोबत हरिश्चंद्र स्वर्गात जातो. या कथेतील चांडाळ हा धर्मदेव असतो. वसिष्ठ आणि विश्वामित्रांच्या स्पर्धेचे ऋग्वेदातील स्वरूप निराळे आहे. ऐतरेय ब्राह्मणातही (७, १३-१८) हरिश्चंद्राची कथा आहे.

राजा हरिश्चंद्राच्या करुणोदात्त, हृदयद्रावक कथांवर नामदेव, जनाबाई, विष्णुदास, कृष्णयाज्ञवल्की, मुक्तेश्वर, श्रीधर अशा अनेक संत–माहात्म्यांनी लिहिले असले, तरी या सर्वांमध्ये जनाबाईचे हरिश्चंद्राख्यान विशेष लोकप्रिय आहे. ‘हरिश्चंद्राची सत्त्वपरीक्षा पाहण्यासाठी विश्वामित्र ऋषी त्याचे राज्य स्वप्नात मागून घेतात. स्वप्नात दिलेले दान हरिश्चंद्रदुसरे दिवशी जागेपणी मान्य करतो व राज्य सोडतो ‘, अशी कथाजनाबाईने मोठ्या कल्पकतेने रचली आहे. लोकमुखातून, श्रवणपरंपरेने जिवंत राहिलेल्या वाङ्मयस्रोतांतून तिने ही रचना केली असून तीमध्ये सहजसुलभ साधेपणाचा प्रत्यय येतो.

पद्मपुराणात (उत्तरकांड, प्रकरण ३२) हरिश्चंद्रनामक आणखी एका प्राचीन राजाची कथा असून ब्रह्मदेवाच्या कृपेने त्यास सर्व वैभव वइच्छित गोष्टी प्राप्त होतात. तेव्हा तो सनतकुमार या साधूस आपल्या पूर्वजन्माविषयी विचारतो. तेव्हा साधू म्हणतो, ‘तू पूर्वजन्मी सत्यवानवैश्य होतास. व्यवसाय सोडून तू घराबाहेर पडलास. त्या सुमारास दुष्काळ पडला. एक दिवशी तू पत्नीसह एका तळ्यात पडलास. तिथली कमळे गोळा करून ती विकण्यासाठी काशीस गेलास, पण कोणीही ती विकत घेईनात. अखेर इंद्रद्युमनाची कन्या चंद्रमती हिने ती घेतली व विष्णूला वाहिली. तूही त्याची पूजा केलीस, त्याचीच फळे तू उपभोगीत आहेस.’ याशिवाय हरिश्चंद्र नावाचा नवव्या शतकात एक संस्कृत कवी होऊन गेला. त्याने धर्मशर्माभ्युदय हे महाकाव्य (२१ सर्ग) व जीवंधरचम्पू हा ग्रंथ लिहिला.

संदर्भ : Mani, Vettam, Ed. Puranic Encyclopaedia, Varanasi, 1975.

पोळ, मनीषा