बूशीडो : जपानमधील ‘सामुराई’ या उच्च स्तरीय लढवय्या वर्गाची आणि ‘डाइम्यो’ नावाच्या सरदार वर्गाचीही आचारसंहिता चिनी ‘बूशीडो’ या शब्दाने ओळखली जाते. तिचा उगम जपानमधील कामाकुरा कालखंडात (११८५-१३३३) असला, तरी सोळाव्या शतकात ती लेखनबद्ध केली गेली आणि सतराव्या शतकात तिला आजचे ‘बुशीडो’ हे नाव मिळाले. ‘बूशी’ म्हणजे सामुराई वा योद्धा आणि ‘डो’ म्हणजे मार्ग वा धर्म यावरून योद्ध्यांचा मार्ग वा धर्म ह्या अर्थाने ‘बूशीडो’ संज्ञा वापरली जाते. वरिष्ठांविषयीची अत्यांतिक निष्ठा, पितृप्रेम, नम्रता, दयाळुत्व, खडतर जीवन, आत्मत्याग, कमालीचा आज्ञाधारकपणा दुःखाने उद्विग्न न होणे, मृत्यूला न भिणे आणि युद्धातील अतुल शौर्य व त्याग या क्षात्रगुणांचा आदर्श या संहितेने जपानमध्ये निर्माण केला. मूलतः ही क्षात्र आचारसंहिता असली, तरी परिणामतः ती जपानची राष्ट्रीय आचारसंहिताही बनली. ⇨ हाराकिरी नावाने ओळखली जाणारी प्राणत्यागाची वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आणि पिढ्यानिपिढ्या जोपासले जाणारे हाडवैर यांना जपानमध्ये जे गौरवपूर्ण स्थान प्राप्त झाले. त्याचेही मूळ बूशीडोत असावे. शासकीय सेवेत शिरू इच्छिणाऱ्यांना शालेय अभ्यासक्रमात या आचारसंहितांचे पाठ दिले जात. ⇨ कन्फ्यूशस मताची नीतितत्वे व ⇨ झेन पंथाची आचारांगे यांच्या मिलाफातून बूशीडो संहिता निर्माण झाली. १८६८साली सुरू झालेल्या मेजी कारकीर्दीत जपानमधील सम्राट पूजेला बूशीडोचा आधार देण्यात आला. जपानी राष्ट्रवादाच्या उदयास आणि युद्धकाळातील नागरी मनोधैर्य (मोराल) अविचल राखण्याचा बूशीडो संहितेचा १९४५पर्यंतखूपच उपयोग झाला.

दीक्षित, श्री. ह.