शुक्राचार्य : दैत्यांचे (असुरांचे) आचार्य आणि पुरोहित म्हणून महाभारतात तसेच पुराणांत निर्देशिलेले एक ऋषी. [→ दैत्य]. ⇨ भृगू ऋषी आणि दिव्या (हिरण्यकशिपू ह्या दैत्याची कन्या) ह्यांचे ते पुत्र. त्यांना ‘काव्य’ ह्या अन्य नावानेही संबोधले जाते. देवासुरांच्या संघर्षात अगदी सुरुवातीपासून त्यांनी असुरांची बाजू घेतली होती. ⇨ बळीराजाने केलेल्या अश्वमेध यज्ञाचे पौरोहित्य शुक्राचार्य करीत होते. त्या वेळी विष्णूने वामनावतार धारण करून बळीराजाकडे तीन पावले जमीन दान म्हणून मागितली. हे दान देण्यातला धोका ओळखून शुक्राचार्यांनी ते न देण्याचा सल्ला बळीराजाला दिला पण त्याने तो न मानल्यामुळे दानाचे उदक सोडण्यासाठी बळीराजाने हाती घेतलेल्या झारीच्या तोटीत शुक्राचार्य शिरले आणि त्यांनी पाण्याची धार अडवून धरली. त्या वेळी बळीराजाने दर्भाच्या टोकाने त्या झारीची तोटी साफ करण्याचा प्रयत्न केला असता, ते टोक शुक्राचार्यांच्या एका डोळ्यात घुसून ते एकाक्ष झाले, अशी कथा आहे.

शुक्राचार्य हे अंगिरस् ऋषींचे शिष्य होते पण आपले गुरू शिकवताना पक्षपात करतात, असा अनुभव आल्यामुळे त्यांनी त्यांचे शिष्यत्व सोडून दिले. नंतर शिवाची आराधना करून मृतांना जिवंत करणारी संजीवनी विद्या त्यांनी त्याच्याकडून प्राप्त केली. ह्या विद्येमुळे देवासुरांच्या युद्धात असुरांना नेहमी विजय मिळे. हे लक्षात आल्यावर देवांचे गुरू ⇨ बृहस्पती ह्यांनी आपला पुत्र कच ह्याला ती विद्या शिकण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठविले. अनेक संकटे सोसून कचाने ती विद्या मिळवली तथापि कचावरील प्रेमाने विव्हल झालेल्या देवयानी ह्या शुक्राचार्यांच्या कन्येला विवाहासाठी नकार दिल्यामुळे ‘त्या विद्येचा तुला काहीही उपयोग होणार नाही’, असा शाप देवयानीने त्याला दिला. तथापि कचाने ती विद्या आपल्या पित्याला शिकवलेली असल्यामुळे ती सर्व देवांनी आत्मसात केली.

शुक्राचार्यांनी बार्हस्पत्य-शास्त्र नावाचा एक हजार अध्यायांचा ग्रंथ रचल्याचा निर्देश महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो.    

गो आणि जयंती अशा शुक्राचार्यांच्या दोन भार्या होत्या. देवयानी ही जयंतीची कन्या. त्वष्टा, वरुत्री, शंड आणि मर्क हे गोचे पुत्र. तेही असुरांच्या बाजूचे होते. शुक्राचार्यांचा वंश पुढे नष्ट झाला. 

कुलकर्णी, अ. र.