महावस्तु : हा बौद्धांच्या महासांघिक पंथातील लोकोत्तरवादी शाखेचा विनयपिटकातील ग्रंथराज आहे. ह्यात सूत्र, व्याकरण, जातक, अवदान ह्या निरनिराळ्या वाङ्‌मयप्रकारांची खिचडी आहे असे दिसते. गौतम ⇨ बुद्धाच्या जातक रूपात असलेल्या पूर्वजन्मांच्या काही कथांपासून तो त्याच्या शारिपुत्र, मौदगल्यायन, राहुल, उपाली ह्यांसारख्या शिष्यांना दीक्षा देईपर्यंतच्या कालखंडात झालेल्या काही घडामोडींचा वृत्तांत त्यात आढळतो. ह्यात अनेक जातक-कथा [⟶ जातके] असून पाली सुत्तनिपातमध्ये आढळणाऱ्या ‘खग्गविसाणसुत्त’, ‘नाळकसुत्त’, ‘पब्बज्जासुत्त’, ‘पधानसुत्त’ ह्यांतील बऱ्याचशा गाथा ह्या ग्रंथात पालि-प्राकृत-प्रभावित अशा संमिश्र संस्कृत भाषेत लिहिलेल्या आढळतात. ⇨ बोधिसत्त्व, बोधिसत्त्वभूमी, बुद्धाची लोकोत्तरता त्यात प्रामुख्याने सर्वत्र आढळते.

हा ग्रंथ गद्यपद्य असा मिश्रित असून छापील स्वरूपातील सु. १,३२५ पृष्ठे व्यापणारा आहे. पद्यातील मजकूर अनेकवेळा गद्यात आहे तोच असतो, मात्र पद्यातील भाषा ही जास्त पालि-प्राकृत भाषांतील शब्दांच्या व धातूंच्या रूपांना जवळ असते. ह्या ग्रंथाचा कर्ता किंवा संग्राहक कोण, ह्यासंबंधी काही माहिती मिळत नाही. ह्या ग्रथांचा रचनाकाल ख्रिस्त शकापूर्वी सु. दुसरे-पहिले शतक समजला जातो पण ह्यात नंतरच्या काळात समाविष्ट केलेले प्रक्षिप्त भाग नाहीत असे नाही. कारण बोधिसत्त्वांना शिकविल्या जाणाऱ्या अनेक लिप्यांमध्ये चीन, हूण, आपीरा (आभीरा ?)  ह्यांच्या लिप्यांचा उल्लेख आहे.

हा ग्रंथ प्रथमतः फ्रेंच विद्वान सेनार ह्याने तीन भागांत देवनागरी लिपीत १८८२–१८९७ ह्या कालात प्रसिद्ध केला. आता कलकत्ता संस्कृत कॉलेजच्या संशोधन-ग्रंथमालिकेत बंगाली भाषांतरासह हा मूळ ग्रंथ देवनागरी लिपीत पुनर्मुद्रित झाला असून त्यातील तीन भाग (मालिकाक्रम २१, ३० व ६३) प्रसिद्ध ही झाले आहेत (१९६२, ६४, ६८). ह्या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर जे. जे. जोन्स ह्या विद्वानाने सेक्रेड बुक्स ऑफ द बुद्धिस्ट्स ह्या मालेत दोन खंडात (१९४९–५२) प्रसिद्ध केले आहे.

पहा : बौद्ध साहित्य.

संदर्भ : Conze. Edward and Others. Ed. Buddhist Texts Through the Ages, Oxford, 1954.

बापट, पु. वि.