राधावल्लभ पंथ : उत्तर भारतातील एक वैष्णव संप्रदाय. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हा पंथ अस्तित्वात आला असावा. विद्यमान उत्तर प्रदेश राज्यातील वृंदावन आणि त्याच्या आसपासचा परिसर येथेच विशेष करून या पंथाचा प्रसार झाला. हित हरिवंश (१५०२ – ५२) हा संस्थापक. म्हणून या पंथाला ‘हरिवंशी संप्रदाय’ असेही म्हणतात. हरिवंश माध्व किंवा निंबार्क संप्रदायी होता, असेही एक मत आहे. याला श्रीकृष्णाच्या मुरलीचा अवतार मानतात. त्याचे जन्मस्थळ आणि काळ यांविषयी मतभेद असले, तरी त्याचा शिष्य सेवक याच्या मतानुसार मथुरेपासून जवळच बाद येथे त्याचा जन्म इ. स. १५०२ मध्ये झाला. केशवदास मिश्रा पिता आणि माता तारावती. लहानपणापासूनच हित हरिवंश श्रीकृष्णाची पूजाअर्चा करीत असे. स्वप्नात आलेल्या राधेच्या सांगण्यावरून याने वृंदावनला जाऊन तेथे राधावल्लभ श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती त्याला यमुनेत सापडली असे म्हणतात. एकदा हरिवंश वृंदावनला जात असताना रस्त्यात एका ब्राह्मणाने त्याला आपल्या दोन मुली व एक कृष्णमूर्ती भेट दिली. वृंदावनला त्याच मूर्तीची राधावल्लभ म्हणून स्थापना करून त्यावर त्याने मंदिर बांधले, असेही काहींचे मत आहे. पुढे त्याने राधेवरील मंगलयुक्त भक्तिप्रेमासाठी ‘हित हरिवंश’ असे नाव धारण केले. नंतर त्याच्या अनेक शिष्यांनीही हीच प्रथा अनुसरली. उदा., हित ध्रुवदास, हित दामोदरदास.

हित हरिवंशाचा साधनामार्ग गूढ व रहस्यमय आहे, सर्वसामान्य साधक या साधनेचा अधिकारी होऊ शकत नाही. इतर वैष्णव संप्रदायांपेक्षा यातील प्रेमाचे स्वरूप व्यापक, मोहक पण आगळेच आहे. राधाप्रेम आणि प्रेमस्वरूपी भक्ती हेच या पंथाचे मूलाधार आहेत. प्रेममूर्ती राधा-माधव यांच्या नित्य मीलनप्रसंगी साधकाने तन्मय होऊन त्यांची सेवा करणे, हेच त्याच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट होय. या पंथात चिरंतन सहवाससुखाला महत्त्व असून वियोग मान्य नाही. मीलनातही क्षणैक वियोग अतृप्ती दर्शवितो. यासाठी हरिवंशाने चक्रवाक पक्ष्याचे उदाहरण दिले आहे. राधा, कृष्ण, वृंदावन व सहचरी ही चार विधायक तत्त्वे मानली असून ती आनंदस्वरूप आहेत. राधा-कृष्ण अभिन्न असून तेच प्रेमाचे कारण आणि कार्यही आहेत. जललहरींप्रमाणे ते परस्परांत समाविष्ट आहेत. राधा हे परतत्त्व असून श्रीकृष्ण हा रसिक किशोररूपात एकमेव पुरुष आहे. सखी वा सहचरी म्हणजे अध्यात्मसाधक जीव असून वृंदावन हे श्रीकृष्णाचे निवासस्थान होय. वृंदावनातील वास्तव्याने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात, अशी या पंथीयांची धारणा आहे.

हित हरिवंश हा राधा-कृष्णाच्या युगुल मूर्तीचा उपासक होता. त्याच्या मते श्रीकृष्णापेक्षा राधेची भक्ती अधिक श्रेयस्कर आणि शीघ्र फलदायी आहे. याने राधावल्लभाची उपासना व प्रेमभक्ती यांचा उपदेश व प्रचार केला. याने दोन महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले असून त्यांपैकी राधासुधानिधि हा संस्कृतमध्ये आहे व त्यात राधेचे सौंदर्य व तिची सेवा वर्णन करणारी पदे आहेत. हितचौरासी हा त्याचा दुसरा ग्रंथ ब्रज भाषेत असून त्यातही राधाकृष्णांचे सौंदर्य व सेवामाधुर्य वर्णिले आहे.

या पंथाचा दुसरा आचार्य दामोदरदास हा सेवक या नावानेही प्रसिद्ध आहे. हरिवंशाचे माहात्म्य सोळा प्रकरणांत वर्णन करून राधावल्लभ पंथाचे तात्त्विक विवेचन त्याने केले आहे. यानंतरचा आचार्य हरिराम शुक्ल. याला काशीच्या पंडितांनी ‘व्यास’ अशी पदवी दिली होती. वैष्णव भक्त त्याला विशाखा सखीचा – राधा- माधवाच्या मीलनाला साहाय्य करणाऱ्या सखीचा – अवतार मानतात. नवरत्न आणि व्यासवाणी हे याचे दोन प्रसिद्ध ग्रंथ. नवरत्न हा संस्कृतमध्ये लिहिलेला अप्रकाशित ग्रंथ असून पंथाचे सिद्धांत यात सांगितले आहेत. व्यासवाणी ब्रज भाषेत व दोन खंडांत असून त्यात सातशे पदांचा समावेश आहे. पहिल्या खंडात भक्तिसिद्धांताचे वर्णन, तर दुसऱ्यात राधा-कृष्णांच्या लीलांचे प्रत्ययकारी वर्णन आहे. यानंतरचे आचार्य चतुर्भुजदास, ध्रुवदास यांचेही ग्रंथ प्रसिद्ध आहेत. शिवाय नेही नागरीदास, कल्याण पुजारी, रसिकरास, वृंदावनदास इ. भक्त कवींनी वृंदावनाच्या सौंदर्याचे आणि राधा-कृष्णांच्या दिव्य लीलांचे चित्रण आपापल्या काव्यांतून ब्रज भाषेत केले आहे.

वैष्णव धर्मातील बाह्याचारासंबंधीच्या रूढींना या पंथात फारसे महत्व नाही. मात्र राधा-कृष्णांच्या पूजेअर्चेबाबत काही विशिष्ट नियम आहेत. १५३४ मध्ये हित हरिवंशाचा पहिला पटमहोत्सव साजरा झाला. याचवेळी राधावल्लभाच्या मूर्तीची विधियुक्त स्थापना केली. यात मूर्ती फक्त श्रीकृष्णाची असून त्याच्या डावीकडे एका गादीवर ‘श्रीराधा’ असे नाव लिहिलेले सुवर्णपत्र ठेवलेले आहे. मंदिरात रोज अष्टयाम सेवा होते. अनेक नैमित्तिक उत्सवही केले जातात. उदा., फागू (होळी किंवा रंगपंचमी), तीज (अक्षय्य तृतीया), वसंत पंचमी वगैरे. शिवाय आचार्य परंपरेतील गोस्वामींचे जन्मोत्सवही साजरे केले जातात.

कपाळावर दोन सरळ उभ्या रेषा व त्यांमध्ये काळा बिंदू असा तिलक हे सांप्रदायिक लावतात. तिलक कृष्णरूपाचे व बिंदू राधारूपाचे प्रतीक समजतात. संप्रदायाची दीक्षा घेतल्यावर दुहेरी तुलसीमाला धारण करावी लागते. ही माळ युगल ध्यानाची निदर्शक मानतात. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातही या पंथाचे अनुयायी आहेत.

संदर्भ : १. गुप्त, दीनदयालु, अष्टछाप और वल्लभ संप्रदाय, अलाहाबाद, १९४७.

२. स्नातक, विजयेंद्र, राधावल्लभ संप्रदाय और साहित्य, दिल्ली, १९५७.

कापडी, सुलभा