अभिषेक : संस्कृतमध्ये ‘अभिषेक’ शब्दाचा व्युत्पत्यर्थ ‘सभोवती सिंचन करणे’ असा आहे. ‘स्‍नान’ वा‘तीर्थस्‍नान’ असाही अर्थ होतो. राजाला धर्मतः अधिकार प्राप्त व्हावा म्हणून राजसूय यज्ञात वा स्वतंत्र रीतीने अनेक मंत्र म्हणून राजाच्या मस्तकावर जलसिंचन करतात यास ‘अभिषेक’ ही संज्ञा विशेषकरून लावतात.’मूर्धाभिषिक्त’ वा ‘अभिषिक्त’ असे राजाचे जे विशेषण असते त्यात वरील अर्थ असतो. राजास अधिकारप्राप्त्यर्थ अभिषेक करताना जे मंत्र म्हटले जातात त्यांत इंद्र, वरुण, अश्विदेव इ. देवतांच्या सामर्थ्याचा हा अभिषेक मी करीत आहे, असे पुरोहित म्हणत असतो. 

गृहस्थ व्यक्तीस धार्मिक मंगल कर्मे धर्मशास्त्रात सांगितली आहेत त्या कर्मांच्या अखेरीस, समाप्तीच्या अगोदर यजमान व पत्नी यांच्या मस्तकावर पल्लव, दूर्वा, पुष्पे इत्यादिकांनी पवित्र जलाचे सिंचन मंत्रपूर्वक करतात, या सिंचनासही ‘अभिषेक’ म्हणतात. अशा अभिषेकाने कल्याणकारक व पापनाशक पुण्यशक्ती अभिषिक्तांना प्राप्त होते अशी समजूत आहे.

महानद्या, सरोवरे, विहिरी इत्यादिकांच्या जलाचे पावित्र्य जगातील यहुदी, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, हिंदू इ. धर्मांमध्ये मानले आहे. प्राचीन काळी ख्रिस्ती राजांचा राज्याभिषेक करीत. ख्रिस्ताला व ख्रिस्तशिष्यांना देवाने अभिषेक करून पवित्र केले, अशी ख्रिस्ती धर्मात कल्पना आहे. ख्रिस्ती धर्माच्या दीक्षाविधीत पवित्र जलाचा अभिषेक आवश्यक असतो. सूर्य, शिव, विष्णू, गणेश, देवी इत्यादिकांच्या मूर्तींची देवालयात प्रतिष्ठा करतात,तेव्हा त्यांच्यावर द्रवद्रव्यांचा अभिषेक होत असतो. द्रवद्रव्ये म्हणजे जल, दूध, तूप, दही, मध, तेल इ. पदार्थ होत. 

जोशी, लक्ष्मणशास्त्री