कन्नड साहित्य : प्राचीनतेच्या दृष्टीने द्राविडी भाषांच्या साहित्यांत कन्नड साहित्याचा क्रम तमिळनंतरचा म्हणजे दुसरा आहे. सामान्यपणे कन्नड साहित्याला १,५०० वर्षांची दीर्घ परंपरा आहे. कन्नड साहित्याच्या प्राचीनतेविषयी व उगमाविषयी अनेक मते आहेत. काहींच्या मते ते ख्रिस्तपूर्व काळापासूनचे असून प्रारंभीचे कन्नड कवी बौद्धधर्मीयच होते. आजवर उपलब्ध असलेल्या लेखी पुराव्यात ‘हल्मिडी शासन ’(इ. स. ४५०) हा शिलालेख सर्वांत जुना समजला जातो.तथापि त्यात कवित्वाला फारसा वाव नाही. पाचव्या शतकातील दुसऱ्या एका लाल दगडावरील शिलालेखात साहित्यिक लक्षणे असलेले एक काव्य कोरलेले आहे. त्यावरून कन्नडमध्ये त्यापूर्वीही साहित्यनिर्मिती होत असावी असे दिसते. साहित्यिक लक्षणे असलेले सातव्या शतकातील अनेक शिलालेख सापडतात. कप्पे अरभट्टाच्या स्वभावाचे चित्रण असलेला बदामीचा शिलालेख (इ. स. ७००) साहित्यिक दृष्टीने श्रेष्ठ दर्जाचा ठरतो.

आजवर उपलब्ध झालेल्या कन्नड ग्रंथांपैकी नवव्या शतकातील कविराजमार्ग हा ग्रंथ सर्वांत प्राचीन मानला जातो. या ग्रंथात गद्य साहित्याच्या लक्षणांचे विवेचन आहे. त्याचप्रमाणे विमळोदय, नागार्जुन, जयबंधू, दुर्विनीत इ. गद्यलेखकांचा, तसेच परमश्रीविजय, कवीश्वर, पंडित, चंद्र, लोकपाल इ. कवींचा उल्लेख आहे. शिवाय इतर काही ग्रंथांतून निवडलेली लक्षणकाव्ये त्यात आहेत. यावरून इ. स. च्या सहाव्याशतकापासून कन्नडमध्ये साहित्यनिर्मिती होत असावी, असे निःसंशयपणे म्हणता येईल.

कन्नड साहित्यात ‘अच्चगन्नड’ म्हणजे शुद्ध कन्नडचा  एक कालखंड होऊन गेला असावा, असा काहींचा तर्क आहे पण त्याला आधार नाही. ‘हल्मिडी शासन’ या शिलालेखात संस्कृतचा वापर विशेष असून, त्यात कन्नड शब्द फक्त वीसच आहेत. कन्नड ही जरी बोलभाषा व लोकभाषा होती, तरी ती साहित्यिक भाषा नव्हती. राजे आणि विद्वान लोक साहित्यिकभाषा म्हणून संस्कृत भाषेलाच मान्यता देत. सम्राट अशोकाच्या शिलालेखांपासूनच बहुधा कन्नडमधील साहित्यनिर्मितीला प्रथमप्रेरणा मिळाली असावी.

अभ्यासाच्या सोयीसाठी कन्नड साहित्याची विभागणी अनेकरीतीने केली जाते : जैनांचा, वीरशैवांचा आणि ब्राह्मणांचा काळ अशी विभागणी करण्याची प्रथा प्रथम प्रचारात आली. परंतु भाषेचे स्वरूप आणि विकास लक्षात घेऊन मूळ कन्नड (मूळगन्नड), जुनी कन्नड (हळगन्नड), मध्य कन्नड(नडुगन्नड), नवी कन्नड (होसगन्नड) आणि आधुनिक कन्नड (नवगन्नड) असे पाच ऐतिहासिक कालखंड सध्या मान्य झालेले आहेत. त्याचप्रमाणे काव्यरसांना अनुसरुन क्षात्र काळ, मतप्रचारककाळ, सार्वजनिक काळ आणि आधुनिक काळ असे चार विभागही पाडले जातात. काव्याच्या छंदवृत्तादी बाह्य स्वरूपास अनुसरून चंपू, रगळे, षट्पदी, मार्ग आणि क्रांती असेही काव्याचे कालखंड मानले जातात. अलीकडे विशिष्ट कवींच्या प्रभावास अनुसरून पंपपूर्वकाळ, पंपकाळ, बसवकाळ, कुमारव्यासकाळ आणि आधुनिक काळ अशीही विभागणी केली जाते. या शेवटच्या विभागणीप्रमाणे कन्नड साहित्याचा आढावा येथे घेतला आहे.

पंपपूर्वकाळ : (आरंभापासून ते ९४० पर्यंत). यात आरंभापासून पंप या कवीच्या काळापर्यंतच्या सर्व साहित्याचा समावेश होतो. या कालखंडातील कविराजमार्ग आणि वड्डाराधने हे दोनच ग्रंथ उपलब्ध आहेत. तथापि हा आद्य काळ कन्नड साहित्याच्या वैभवाचा काळ होता, असे म्हणावे लागते. दुर्विनीत (सु. ६००) या गंगवंशाच्या राजाने रचलेल्या ग्रंथांचा उल्लेखशिलालेखांत सापडतो. कविराजमार्गात तो कन्नडमधील एकप्रसिद्ध गद्यलेखक होता, असे म्हटले आहे. भारवीच्या किरातार्जुनीयमधील पंधराव्या सर्गाचे भाष्य, गुणाढ्याच्या ‘पैशाची ’ भाषेतील बृहत्कथेचा संस्कृतमध्ये अनुवाद आणि शब्दावतार हा व्याकरणग्रंथ हे तीन ग्रंथ दुर्विनीताने लिहिलेले आहेत. तथापि आजपर्यंत त्यांतील एकही ग्रंथ उपलब्ध होऊ शकला नाही. तुंबलूराचार्य (सु. ६५०) या जैनधर्मीय कवीने जैन तत्त्वांचे प्रतिपादन करणारा चुडामणि नावाचा ९६,००० श्लोकसंख्येचा ग्रंथ लिहिला आहे. याच सुमारास श्यामकुंदाचार्य (सु. ६५०) याने जैनतत्त्वांवर प्राभृत हा शास्त्रग्रंथ लिहिला.सैगोट्ट शिवपूर (सु. ८००) या गंगराजाने गजशास्त्रावर गजाष्टक नावाचे आठ भागांचे काव्य रचले. आसर्ग (सु.९००),गुणनंदी (सु. ९००), पहिल्या गुणवर्म (कार. ९०७-९२०)इत्यादींचा उल्लेख जरी इतरत्र आढळत असला, तरी त्यांचेसाहित्य उपलब्ध नाही. तसेच विमळोदय, नागार्जुन, जयबंधूइत्यादींविषयीही माहिती उपलब्ध नाही.

कविराजमार्गाच्या कर्त्याविषयीही अनेक मतमतांतरे आहेत.तथापि श्रीविजय हा त्याचा कर्ता आहे, असे म्हणण्यास आधारआहे. या ग्रंथात चरित्राची विपुल साधने आणि कन्नडव्याकरणासंबंधी अनेक विषय आलेले आहेत. हा ग्रंथ दंडीच्याकाव्यादर्शाचा जरी अनुवाद असला, तरी त्यात स्वतंत्र आणिप्रगल्भ असे विमर्शक सामर्थ्य दिसून येते. शिवकोट्याचार्य (सु.९२०) याने रचलेला वड्‌डाराधने हा आद्य कन्नड गद्यग्रंथ होय.त्यात एकोणीस जैन महापुरुषांच्या कथा आहेत. त्यातीलकथारचनेचे कौशल्य असामान्य आहे. पुनरुक्ती आढळत असली, तरी कथाप्रसंग आणि संवाद यांत जिवंतपणा आहे. पंपपूर्वकाळातच गुणगांकियम्‌ नावाचा एक कन्नड छंदोग्रंथही झाला असल्याची माहिती तमिळ छंदोग्रंथांवरून मिळते.

पंपकाळ : (९४० – ११५०). हा काळा राजकीय दृष्ट्या उज्ज्वल असला, तरी अस्थिर होता. कन्नड साहित्याला राजाश्रय देणारे राजे म्हणजे राष्ट्रकूट आणि तळकाडचे गंग राजे होत. दहाव्या शतकाच्या अखेरीस कल्याणच्या चालुक्यांकडून राष्ट्रकूट पराभूत झाले. गंगांचे राज्य चोलांनी संपुष्टात आणले. अकराव्या शतकापासून कर्नाटकातील राजकीय-सामाजिक जीवनात नव्या युगाचा प्रारंभ झाला. धार्मिक क्षेत्रात जैन, शैव आणि वैष्णव हे धर्म वा पंथ आपापल्या मतप्रसारासाठी व आत्मसंरक्षणासाठी झटत-झगडत होते .साहजिकच परस्परद्वेष आणि संघर्ष यांनी ह्या काळात धुमाकूळ घातला.

या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे मार्ग-संप्रदायाची स्थिरता होय. तत्कालीन कवी बहुधा जैनच होते. त्यांच्या काव्यात लौकिक आणि आगमिक असे दोन प्रकार दिसून येतात. लौकिककाव्यात आश्रयदात्या राजाचे चरित्र आणि तत्कालीन राजकीय-सामाजिक जीवनदर्शन असे. डॉ. रं. श्री. मुगळी यांनी या काव्यास ‘चारित्रिक-ध्वनि-काव्य’ म्हटले आहे. आगमिक काव्यात तीर्थंकरांची, महापुरुषांची आणि सम्राटांची चरित्रे आहेत. या काळातील सर्व महाकाव्ये ‘चंपू’ प्रकारातील आहेत. कन्नड चंपूकाव्यात संस्कृत महाकाव्यांची सर्व लक्षणे आहेतच त्यांशिवाय त्यात ‘कंद’, ‘रगळे’, ‘अक्कर’, ‘त्रिपदी’ इ. जानपद वृत्तछंदांचेही मिश्रण झाले  आहे.

कन्नड साहित्याच्या अखंड परंपरेची सुरुवात बहुधा चंपूकाव्यांनी झाली असावी. त्रिविक्रम भट्टाचे नळचंपू हे संस्कृतमधील आद्य चंपूकाव्य असून, ते दहाव्या शतकातील आहे. संस्कृत चंपूकाव्याची बरोबरी करू शकेल असे परिणतचंपूकाव्य, कन्नडशिवाय तेलुगू, तमिळ आणि मलयाळम्‌ या इतर द्राविडी भाषांत सापडत नाही, हे लक्षणीय आहे. या काळातील लौकिक काव्यांत वीर व रौद्र आणि आगमिक काव्यांत अद्‌भुतव शांत हे रस मुख्य आहेत. कन्नड काव्यावर संस्कृतचा प्रभावअसला, तरी ‘देशी ’ व ‘मार्ग’ या दोन्ही पद्धतींचा सुंदर समन्वय त्यात आढळतो.


दहावे शतक हे कन्नड साहित्याचे सुवर्णयुग म्हटले जाते. याच शतकात पंप, रन्न यांसारखे असामान्य प्रतिभेचे कवी कन्नडमध्ये होऊन गेले. अकराव्या शतकात त्यांच्या तोडीचे कवी झाले नाहीत. म्हणून अकराव्या शतकाला काहींनी ‘निष्फळ ’ अथवा ‘वैराणकाळ ’ असे संबोधिले आहे पण हे म्हणणे तितकेसे खरे नाही.

या काळातील आदिपंप (९४०) हा कन्नडमधील आद्यमहाकवी समजला जातो. आदिपुराण आणि विक्रमार्जुन-विजयम्‌ ही दोन महाकाव्ये त्याने लिहिली असून ती अनन्यसाधारण आहेत. त्यामुळे त्यांची एक प्रदीर्घ परंपराच उत्तरकालीन कन्नड काव्यांत निर्माण झाली [Ž पंप]. पोन्न (९५०) या कवीने शांतिपुराण व सध्या उपलब्ध नसलेले भुवनैकरामाभ्युदय  या दोन महाकाव्यांबरोबर जिनाक्षरमाले नावाची जिन-स्तुती रचली आहे. या कवीवर कालिदासाचा प्रभाव विशेष दिसून येतो.एकूण जैनपुराणांपैकी शांतिपुराण हे महाकाव्य रचनादृष्टीने अधिक परिपक्व असले, तरी संप्रदायावरील आत्यंतिक निष्ठा आणि कंटाळवाणे निरूपण यांच्या ओझ्याखाली कवीची प्रतिभा दबल्यासारखी दिसते. रन्न (९९०) याने रचलेल्या एकूण पाचकाव्यांपैकी साहसभीमविजय  व अजितपुराण ही दोनच काव्ये आज उपलब्ध आहेत. यांतील पहिले लौकिक आणि दुसरे आगमिक काव्य आहे. त्यांवरही पंपाचा प्रभाव असला, तरीत्यांत स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा व प्रतिभेचा आविष्कार दिसून येतो. [Ž रन्न].

या काळातील इतर प्रमुख कवींची नावे खालील प्रमाणेआहेत : चावुंडराय (९७५), पहिला नागवर्मन्‌ (९९०), दुर्गसिंह (१०३०), नागचंद्र (उपनाम – अभिनवपंप, ११००), नयसेन (१११२) व ब्रह्मशिव (११५०). चावुंडरायाच्या त्रिषष्टि  लक्षणमहापुराण नावाच्या गद्यग्रंथात जैनांच्या त्रेसष्ट शलाका-पुरुषांच्या कथा आहेत. ⇨ पहिला नागवर्मन्‌ ह्या ब्राह्मण कवीच्या कर्नाटक कादंबरी व छंदोंबुधी ह्या दोन रचना प्रसिद्ध आहेत. कर्नाटक कादंबरी हा बाणभट्टाच्या कादंबरीचा चंपूप्रकारातील अनुवाद आहे. दोन्ही भाषांवरील कवीचे प्रभुत्व आणि रसात्मक दृष्टीयांमुळे प्रस्तुत अनुवाद उत्तम उतरला आहे. छंदोंबुधी हा छंदशास्त्रावरील आद्य कन्नड ग्रंथ आहे. दुर्गसिंह या कवीने केलेल्या वसुनागभट्टाच्या पंचतंत्राच्या भाषांतरात पद्यापेक्षा गद्याचा वापर अधिक असल्यामुळे चंपूकाव्याहून त्याचे स्वरूप वेगळे झाले आहे. नागचंद्र हा अभिनवपंप म्हणून प्रख्यात आहे. मल्लिनाथ-पुराण आणि रामचंद्रचरित-पुराण ह्या त्याच्या चंपूरचना. ‘अर्थांतरन्यासालंकारप्रिय’ अशी त्याची ख्याती आहे. नयसेन हा मातृभाषेचा (कन्नडचा) अत्यंत अभिमान असलेला कवी. संस्कृतचे वर्चस्व कमी करून चंपूकाव्य हे सामान्य लोकांना समजेल, अशा शुद्ध कन्नड भाषेतच कटाक्षाने लिहून एका दृष्टीने कन्नड साहित्यात त्याने क्रांती घडवून आणली. कन्नड भाषेत सुबोध आणि लालित्यपूर्ण अशी काव्यरचना करणाऱ्या कवींत नयसेनच पहिला आहे. त्याने धर्मामृत नावाचे काव्यही लिहिले आहे. त्यात चौदा महापुरुषांची चरित्रे आहेत. ब्रह्मशिव याची समय-परीक्षे ही एक स्वतंत्र रचना आहे. त्यातील  भाषा प्रासादिक आणि लालित्यपूर्ण असून ती कन्नडमधील पहिले तात्त्विक विडंबनपर काव्य मानले जाते.

पंपकाळातील ⇨ दुसरा नागवर्मन्‌ (११४५) याने काव्यावलोकन, कर्णाटकभाषाभूषण, वस्तुकोश अभिधानरत्‍नमाले हे लक्षणग्रंथ आणि व्याकरण व शब्दकोश यांची रचना केली. उदयादित्याच्या (११५०) उदयादित्यालंकार या अलंकारग्रंथात रीती, काव्यगुण व अलंकार यांचे संक्षिप्त प्रतिपादन आहे. याच काळात दुसरा चावुंडराय (१०२५), जगद्दळ सोमनाथ (११५०), चंद्रराज ( १०४०), श्रीधराचार्य (१०४९), राजादित्य (११२०) इ. कवी होऊन गेले. या सर्वांनी शास्त्रग्रंथांची रचना केली आहे. दुसऱ्या चावुंडरायाचा लोकोपकार हा उपयुक्त असा शास्त्रग्रंथ आहे. हा त्या काळाचा विश्वकोशच होय, असे म्हणता येईल. त्यात पंचांगफलवर्णन, वास्तुप्रकरण, सूपशास्त्र (पाकशास्त्र), विषवैद्यक, वृक्षायुर्वेद, नरादिवैद्यकप्रकरण इ. विषय आहेत. जगद्दळ सोमनाथाने पूज्यपादाच्या संस्कृत वैद्यकग्रंथाचे कल्याणकारक या नावाने कन्नडमध्ये भाषांतर केले आहे. चंद्रराजाने कामशास्त्रावर मदनतिलक नावाचा ग्रंथ रचला आहे. श्रीधराचार्याचा जातकतिलक नावाचा ग्रंथ ज्योतिषशास्त्रावर आहे. राजादित्याने रचलेल्या व्यवहारगणित, क्षेत्रगणित इत्यादींत गणितविषयक सामान्यज्ञानाशिवाय श्रेढीसूत्राचे विवरणही आढळते.

बसवकाळ : ( ११५०-१४००). बसवकाळात क्रांतिकाळ किंवा स्वातंत्र्यकाळ असेही म्हटले जाते. ही दोन्ही नावे अर्थपूर्णआहेत. बसवकाळातील क्रांतीची बीजे पंपकाळातच दिसून येतात. परंतु पंपकाळात राजकीय, सामाजिक तथा धार्मिक स्थितीस अनुसरून साहित्यात क्रांती घडवून आणण्या इतक्या प्रतिभेची एकही व्यक्ती नव्हती.

या काळातील कर्नाटकाची राजकीय स्थिती अस्थिर होती, असे दिसते. बाराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास कल्याणच्या चालूक्य वंशाचा ऱ्हास झाला. चालुक्यांना बाजूला सारून पुढे आलेले कलचुरी हे यादवांच्या उदयाने अस्तंगत झाले. कर्नाटकातील दक्षिणेचे होयसळ व उत्तरेचे यादव यांच्या आपसातील झगड्यांमुळे ह्या दोन्ही सत्ता दुर्बळ झाल्या. तेराव्या शतकापासून मुसलमानांच्या धाडींमुळे कर्नाटक हैराण झाला. परंतु सुदैवाने चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस ⇨ विद्यारण्याच्या प्रेरणेने विजयानगरचे साम्राज्य प्रस्थापित झाले. त्याच्या छत्राखाली सर्वच धर्ममतांची व पंथांची अभिवृद्धी झाली आणि साहित्यकलांचाही सर्वांगीण  विकास झाला.

या काळातील साहित्याला मुख्य प्रेरणा धर्मापासूनच मिळाली. देशातील धार्मिक प्रभावाने साहित्यातही आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. काव्याचे प्रयोजन, आशय, अभिव्यक्ती, भाषा इत्यादींबाबत नवी दृष्टी निर्माण होऊन साहित्य लोकाभिमुख बनले. या काळातील जुन्या कन्नड भाषेचे नव्या कन्नड भाषेत रूपांतर होत गेले. शैली अधिक लालित्यपूर्ण आणि प्रसन्न बनली. व्याकरणाचे नियम शिथिल झाले. भाषेतील कृत्रिमपणा जाऊन ती सुबोध बनली. त्याबरोबरच या काळातील साहित्याच्या आशयात अर्थपूर्णता आणि गांभीर्यही दिसून येऊ लागले.

बसवकाळ हा साहित्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा आहे. साहित्यक्षेत्रात कुठलीही एकच एक परंपरा व प्रवाह दिसून येत नाही. अनेक भिन्न परंपरा व प्रवाह हे या काळाचे वैशिष्ट्य आहे. त्यांतील प्रमुख प्रवाह हा वीरशैव कवींचा होय. भक्ती हा ह्या काळातील प्रधान काव्यरस आहे. ठिकठिकाणी अद्‌भुतालाही अवसर मिळाला आहे. या काळातील कन्नड काव्याला नव्या स्वतंत्र छंदांचे अधिष्ठान लाभले. ‘रगळे’, ‘षट्पदी’, ‘वचन’ हे कन्नड काव्याचे प्रमुख छंद बनले. अभ्यासाच्या सोयीसाठी काव्यातील रचनाप्रकारांनुसार वचनकारकवी, क्रांतीकवी आणि मार्गकवी असे या काळातील कवींचे तीन प्रमुख वर्ग मानले जातात.

वचनकारकवी : शिवशरणांची (वीरशैव संतांची) वचने ही बसवकाळाची महत्त्वाची देणगी होय. वचनसाहित्य हे एकाएकी उदयास आले नाही. देवर दासिमय्य याच्या उपलब्ध वचनांत त्याच्या आधीच्या वचनकारांचे उल्लेख आढळतात. डोहर कक्क आणि मादर चेन्न हे देवर दासिमय्याच्याही अगोदरचे कवी असून, त्यांची वचने मात्र उपलब्ध नाहीत. शंकर दासिमय्य हा देवर दासिमय्याचा समकालीन आहे. त्याची काही वचने उपलब्ध आहेत. वचनकारांची एकूण संख्या खूप मोठी आहे. या काळातील स्त्रियांनीदेखील श्रेष्ठ प्रतीची वचने रचलेली आहेत. समाजाच्या विविध पातळ्यांवरील, वेगवेगळ्या व्यवसायांतील आणि जातिजमातींमधील लोकांनी – परीट, कोळी, कुंभार, साळी, बेडर (शिकारी जात) इ. – या काळातील कन्नड वचनसाहित्य समृद्ध केले आहे.


ही वचने आशयाच्या आणि शैलीच्या नावीन्याने नटलेली आहेत. ह्या वचनांची भाषा बोलीभाषेप्रमाणे असून, ती सुबोध आहे. वचने भावानुकूल अशा लयीने नादमधुर बनली आहेत. त्यांत नीतिबोध असला, तरी तो रसहानिकारक नाही, उच्च आध्यात्मिक अनुभवांची स्पष्ट आणि कलात्मक अभिव्यक्ती त्यांत आहे. प्रत्येक वचनकाराने आपल्या वचनांच्या शेवटी आपल्या इष्टदेवतेचे नाव मुद्रिका म्हणून वापरले आहे. उदाहरण म्हणून दोन वचनांचा स्वैर मराठी अनुवाद पुढे दिलेला आहे :

“ही भूमी तुमची कृपा ( तुम्ही दिलेले दान)

पिके तुमची कृपा, हा मंद वाहणारा वारा तुमची कृपा,

या तुमच्या कृपेचा उपभोग घेऊन इतरांची स्तुती करणाऱ्या

कुत्र्यांविषयी काय मी बोलावे, रामनाथा!”

‘रामनाथ ’ ही देवर दासिमय्याची मुद्रिका. त्याची वचने या मुद्रिकेने

ओळखता येतात. त्याचप्रमाणे –

“पर्वताला थंडी वाजली तर त्यावर पांघरणार काय ?

भक्त पुन्हा इहसुखात गुंतला तर त्याची तुलना कशाशी

करणार गुहेश्वरा ?”

‘गुहेश्वर ’ ही मुद्रिका प्रभुदेवाने (अल्लमप्रभूने) घेतलेली आहे.

अल्लमप्रभू (सु. ११५०) हा सर्वश्रेष्ठ वचनकार समजला जातो. त्याने वीरशैवांसहित सर्व संप्रदायांच्या अवगुणांवर निष्ठुरपणे टीका केली आहे. प्रभुदेवाची शैली विजेसारखी गतिमान व तेजस्वी आहे. त्याच्या वचनांमध्ये त्याच्या ज्ञानसिद्ध, संप्रदायातीत, स्वैर आणि विशाल व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब उमटले आहे. [Ž→अल्लमप्रभु]. अनेक वर्षे राज्यपद भोगल्यानंतर सकलेश मादरस (सु. ११५०) यास वैराग्य प्राप्त झाले. त्याच्या वचनांत आत्मपरीक्षण, स्पष्टोक्ती, भक्तीची उत्कटता, नम्रता, विरक्ती इ. गुणविशेष आढळून येतात.

बसवेश्वर (११३१–११६७) किंवा बसवण्ण हा कारण-पुरुष होय. भक्ती हा त्याच्या काव्याचा मुख्य गुण. त्याची वचने म्हणजे आध्यात्मिक भावगीतेच होत. त्याच्या वचनांत समाजाच्या दोषांवर आणि उणिवांवर निर्भीड टीका असून नवसमाजव्यवस्थेच्या सूत्रांचे प्रतिपादनही आहे. बसवेश्वराची मुद्रिका ‘कूडलसंगमदेव ’ ही आहे.

“नको अपहरण, नको हत्या करणे, रागावणे नको, इतरांविषयी तिटकारा वाटणे नको, नको आत्मप्रौढी, नको परनिंदा, हीच अंतरंग शुद्धी आणि हीच बहिरंग शुद्धी, आपल्या कूडलसंगमदेवाला तोषविण्याचा हाच एक उपाय!”

हे वचन म्हणजे त्याने सांगितलेली सदाचार-स्मृतीच होय. बसवण्णाची बोधप्रद वचने लालित्यपूर्ण व शैलीदार आहेत. [→Ž बसव].

अक्कमहादेवीची (सु. ११६०) वचने अगाध अशी भक्ती, परिपूर्ण वैराग्य आणि सखोल अनुभव यांनी संपन्न झाली आहेत. तिचे इष्टदैवत चेन्न मल्लिकार्जुन हे होय. अक्कमहादेवीने आपल्या वचनांत प्रापंचिक जीवनातील उदाहरणे आणि सर्वपरिचित म्हणीच वापरल्या आहेत. तिच्या वचनांत भावगीतांचा अवीट गोडवा आहे. उदा.,

“डोंगरमाथ्यावर घर करून रानटी जनावरांना भिऊन कसे चालेल ? सागरकिनारी घर बांधून लाटांना भिऊन कसे चालेल ? भर बाजारात घर करून (अर्वाच्य) शब्दांना लाजून कसे चालेल ? चेन्नमल्लिकार्जुनदेवा, या जगात जन्माला आल्यावर स्तुती अगर निंदा वाट्याला आल्यास राग येऊन देता समाधानाने राहायला हवे ”.

योगांगत्रिविधि नावाचा एक तात्त्विक स्वरूपाचा काव्यग्रंथही तिने रचला आहे. [Ž→ अक्कमहादेवी]. याच सुमारास मुक्तायक्क, महदेवियम्म, लक्कम इ. वचनकर्त्या स्त्रिया होऊन गेल्या. चेन्नबसवण्ण (सु. ११६०) हा बसवण्णाचा भाचा असून तो महाज्ञानी होता. त्याची वचने वीरशैव पंथाची जणू आधारतत्त्वेच आहेत. ‘कूडलचेन्नसंगय्य ’ ही चेन्नबसवण्णाची मुद्रिका आहे. करणहसुगे, मंत्रगोप्य, मिश्रगोप्य इ. रचनाही त्याने केल्या आहेत.वचनांतून आलेल्या स्वतःच्या अभिप्रायांना तो आगमवाक्यांचा आधारही ठिकठिकाणी देतो. त्यांच्या वचनांत अन्य मते किंवा अन्य दैवते यांविषयी सहिष्णुता दिसून येत नाही आणि एकंदरीत वाड्‍मयीन गुणवत्ताही कमी आहे. [→Ž चेन्नबसव]. सिद्धरामय्य (सु. ११६०) हा ज्ञानी, भक्त आणि योगीहोता. त्याचा जन्म सोलापूर येथे झाला. तिथेच हा लहानाचा मोठा झाला. सोलापुरात त्याने एक तलाव बांधून त्यामध्ये स्वतःसाठी एकसमाधिस्थान बांधले आणि नंतर तिथेच तो समाधिस्थ झाला. ‘कपिलसिद्ध मल्लिकार्जुन ’ ही याची मुद्रिका आहे. मिश्रस्तोत्रत्रिविधी,बसवस्तोत्रत्रिविधि आणि अष्टावरणस्तोत्रत्रिविधि या त्याच्या काव्यरचना आहेत. त्याची रचना सहजसुंदर आणि रूपकात्मक आहे. गहन विषयांचेसुगम रीतीने निरूपण करणे, हे त्याचे वैशिष्ट्य होय. त्याच्या वचनांतील लहानलहान वाक्येसुद्धा भावनेने ओथंबलेली आहेत. उदा.,

“नदीचे पाणी गेले सागराकडे सागराचे पाणी येई ना नदीकडे. मी गेलो बा (शिव) लिंगाकडे (शिव) लिंग बा येईना मजकडे. पुत्र रागावलातरी पिता रागावणार नाही. मी रागावलो, तरी तू नाही रे रागावणार, कपिलसिद्ध मल्लिनाथा!”

आदय्य हा द्वारकेहून कन्नडदेशी आला, असा इतिहास आहे. त्याने ‘सौराष्ट्रद सोमेश्वर ’ ( सौराष्ट्राचा सोमेश्वर) मुद्रिकेने आपली वचने लिहिली. या काळी हडपद अप्पण्ण (अप्पण्णा न्हावी), मडिवाळ, माचय्य (माचय्या परीट), सोड्डळ बाचरस, बहुरूपी जाडय्य, मोळिगे मारय्य,मेदार केतय्य, कोल शांतय्य, इ. इतर वचनकार होऊन गेले.

‘बेडगिन वचनगळु ’ म्हणजे डौलदार वचने. हा वचनांचाच एक प्रकार आहे. वरवर पहाता ही वचने असंबद्ध वाटतात कारण त्यांत सांकेतिकभाषा वापरलेली असते. उदा.,

“विस्तवाच्या डोंगरावर मी एक लाखेचा खांब पाहिला. लाखेच्या खांबावर एक हंस पाहिला. खांब जळून गेला जेव्हा हंस उडाला होता ”. यावचनाचा अर्थ असा –

“ज्ञानशिखरावर अशाश्वत असे शरीर आहे. शरीरभावना नष्ट झाली, की आत्मा परमात्म्यात लीन होईल ”.

विस्तवाचा डोंगर म्हणजे ज्ञान, लाखेचा खांब म्हणजे शरीर आणि हंस म्हणजे आत्मा. अशी वचने लिहिणाऱ्यांत अल्लमप्रभू हा अग्रगण्य होता.


क्रांतिकवी : कन्नड काव्यात नवा प्रवाह निर्माण करण्याचे श्रेय ð हरिहर (सु. ११६५) याला द्यावे लागते. हा द्वारसमुद्राच्या होयसळघराण्याचा राजा नरसिंह बल्लाळ याच्याकडे करणिक म्हणून होता. नंतर तो ही नोकरी सोडून हंपीला परत आला आणि विरूपाक्षाच्या पूजेततल्लीन झाला. हा भक्तिमार्गी कवी. रगळे या छंदात त्याने शेकडो लहानमोठी काव्ये रचली आहेत. त्यांतून त्याने गायिलेली शिवशरणांची चरित्रेअत्यंत हृद्य आहेत. बसवराज देव रगळे आणि नंबियण्णन रगळे ही त्याने लिहिलेली खंडकाव्ये होत. त्याचप्रमाणे काही ‘शतक ’ काव्ये आणिगिरिजाकल्याण नावाचे चंपूशैलीतील काव्यही त्याने लिहिले. पंपाशतक, रक्षाशतक, मुडिगेय अष्टक ह्या त्याच्या इतर रचना होत. ð राघवांक (सु.१२२५) हा हरिहर याचा भाचा होय. याने षट्पदी छंदात काव्यरचना केली. हरिश्चंद्र काव्य, वीरेश चरिते, सिद्धराम चरित्र, सोमनाथ चरिते हेराघवांकाचे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांपैकी हरिश्चंद्र काव्य श्रेष्ठ ठरते. त्यात त्याने ‘हर हेच सत्य, सत्य हेच हर ’, हे तत्त्व काव्यात्मक शैलीने मांडलेआहे. सिद्धराम चरित्र या ग्रंथात भूतदया आणि निष्काम सेवेची महती त्याने वर्णन केली आहे. राघवांकाची शैली नाट्यात्मक आहे. षट्पदी रचनेचापरमोत्कर्ष साधणारा म्हणून राघवांक ओळखला जातो.

या कालखंडातील इतर वीरशैव कवी म्हणजे केरेय पद्मरस (सु. १२००), पाल्कुरिके सोमनाथ (सु. १२००), सोमराज (सु. १२२५), केरेयपद्मरसाचा मुलगा कुमार पद्मरस, भीमकवी (सु. १४००), पद्मणांक (सु. १४००) इ. होत. संस्कृतात सानंद चरित्राचे लेखन करणारा केरेय पद्मरसयाने कन्नडमध्ये दीक्षाबोधे नावाचा छोटा ग्रंथ रचला आहे. यात वीरशैव दीक्षाविधीचे, गुरुशिष्यसंवादरूपाने निरूपण केले आहे. कुमार पद्मरस यानेआपल्या पित्याच्या सानंद चरित्र या संस्कृत ग्रंथाचे कन्नडमध्ये रूपांतर केले. पाल्कुरिके सोमनाथ याने तेलुगू भाषेत बसवपुराण लिहिले. रगळेगळु,वचनगळु, आणि शीलसंपादने ह्या त्याच्या कन्नड कृती होत. सोमराज याने शृंगारसार किंवा उद्‌भटकाव्य या पंथीय परंपरेच्या चंपूकाव्यात उद्‌भटाचेचरित्र सांगितले आहे. भीमकवीने पाल्कुरिके सोमनाथ याच्या तेलुगू बसवपुराणाचे कन्नडमध्ये भाषांतर केले आहे. हे भाषांतर ‘भामिनी षट्पदी ’ याछंदात आहे. त्यात आठ भाग (आश्वास) आणि एकसष्ट संधी (प्रकरणे) समाविष्ट आहेत. त्यात भीमकवीच्या सहज व कलात्मक वर्णनशैलीचे दर्शनघडते. पद्मणांकाचे पद्मराजपुराण हे काव्य ‘वार्धकषट्पदी ’त आहे. त्यात केरेय पद्मरस या त्याच्या एका पूर्वजाचे चरित्र आले आहे.

मार्गकवी : या कालखंडातील जैनकवी मात्र हरिहर-राघवांकाच्या क्रांतिमार्गाने गेले नाहीत. त्यांनी पंपाची चंपूशैलीच चालू ठेवली. या काळातील जैनकवी असे : नेमिचंद्र (सु. १२००), अग्गळ (सु. १२००), आचण्ण (सु. १२००), बंधुवर्मा (सु. १२००), पार्श्वपंडित(सु. १२२५), जन्न (सु. १२२५), दुसरा गुणवर्म (सु. १२२५), कमलभव (सु. १२२५), आंडय्य (सु. १२२५), मल्लिकार्जुन (सु. १२५०),महाबलकवी (सु. १२५०), केशिराज (सु. १२७५), कुमुदेंदू (सु. १२७५), मधुर (सु. १४००) इत्यादी. ð नेमिचंद्राने लीलावति प्रबंध आणिनेमिनाथपुराण ही दोन चंपूकाव्ये रचली. लीलावति प्रबंधात भारतीय परंपरेतील एका प्रणयरम्य कथेचा शृंगारपूर्ण आविष्कार आहे. त्यामागे सुबंधूच्यावासवदत्तेची प्रेरणा आहे. अनेक विसंगत विषय व पाल्हाळिक वर्णने यांमुळे त्यात रसहानी झाली आहे. नेमिनाथपुराणात जैन परंपरेनुसार हरिवंश-कुरुवंशाचे चरित्र वर्णन केले असून, त्याचा फक्त कंसवधापर्यंतचाच भाग (आठ भाग) उपलब्ध आहे. त्यातील सर्व पात्रे जीवंत वाटतात. वसुदेवआणि कृष्ण यांसारख्या अलौकिक व्यक्तीही लौकिकातील जीवंत माणसांसारख्या वाटतात. कवीची निरीक्षणशक्ती आणि कल्पनेची झेप असाधारणआहे. अग्गळ याने चंद्रप्रभपुराण नावाच्या चंपूकाव्यात चंद्रप्रभ तीर्थंकरांचे चरित्र सांगितले आहे. आचण्ण याने वर्धमान जिनाची कथा वर्धमानपुराण याचंपूकाव्यात वर्णिलेली आहे. श्रीपदाशीले नावाच्या छोट्या काव्यात पंचपरमेष्टी, अर्हत, सिद्ध इत्यादींचा नाममहिमा त्याने वर्णिला आहे. बंधुवर्म्याच्याहरिवंशाभ्युदय या चंपूकाव्याची शैली सुबोध कन्नड शब्दांनी युक्त असून प्रसन्न आहे. जीवसंबोधने हे त्याचे दुसरे काव्य. त्यात जैन धर्माचेप्रतिपादन आहे. पार्श्वपंडिताच्या पार्श्वनाथपुराण या ग्रंथात तेरावा तीर्थंकर पार्श्वनाथ याचे चरित्र आले आहे. यशोधरचरिते आणि अनंतनाथपुराण यादोन काव्यांमुळे ð जन्न याची कन्नड साहित्यात ख्याती आहे. यशोधर चरिते या काव्यात हिंसेचा दुष्परिणाम व अहिंसेचे आणि भूतदयेचे महत्त्वस्पष्ट करणाऱ्या जैन धर्माच्या गोष्टी अंतर्भूत आहेत. ह्या काव्यात जन्न याने काव्य आणि धर्म यांचा उत्कृष्ट समन्वय साधला आहे.अनंतनाथपुराणात चौदाव्या तीर्थंकराचे चरित्र असून, ते चंपूकाव्याच्या शैलीत आहे. दुसऱ्या गुणवर्म्याने पुष्पदंत या नवव्या तीर्थंकराचे चरित्रपुष्पदंतपुराण या चंपूकाव्यात वर्णन केले आहे. कमलभवाने शांतिनाथाचे चरित्र शांतेश्वरपुराणात सांगितले आहे. आंडय्याने कब्बिगर काव (कवि-मदन) नावाचे काव्य रचले आहे. एकही संस्कृत शब्द न वापरता केवळ कन्नड शब्दांचा वापर करून काव्य लिहिणारा ‘वीर व्रती ’ म्हणून कमलभवप्रख्यात आहे. आशयाचे नावीन्य, आकर्षक कथनशैली आणि भाषावैभव यांनी आंडय्याचे काव्य प्रशंसनीय झाले आहे. मल्लिकार्जुन हा केशिराजनावाच्या कन्नड वैयाकरण्याचा पिता होय. याने आपल्या सूक्तिसुधार्णव या संकलनात कन्नड साहित्यातील सुंदर पद्यांचे विषयानुसार वर्गीकरण केलेआहे. त्यात एकोणीस भाग (आश्वास) आहेत. यांव्यतिरिक्त कुमुदेंदू, महाबल आणि मधुरकवी यांनी अनुक्रमे जैनरामायण, नेमिनाथ तीर्थंकराचेचरित्र असलेले नेमिनाथपुराण आणि पंधराव्या तीर्थंकराचे चरित्र असलेले धर्मनाथपुराण हे ग्रंथ लिहिले आहेत. याच कालखंडात बोप्पण पंडित,बाहुबली पंडित, आयतवर्म, नागराज इ. जैनकवीही होऊन गेले.

रुद्रभट्ट (सु. १२००), देवकवी (सु. १२२५), चौंडरस (सु. १३००) इ. या कालखंडातील ब्राह्मण कवी होत. ð रुद्रभट्टाने जगन्नाथ विजयनावाच्या चंपूकाव्यात कृष्णजन्मापासून बाणासुरवधापर्यंतची कथा सांगितली आहे. त्यात एकूण अठरा भाग आहेत. रुद्रभट्टाची शैली प्रगल्भ, प्रसन्नआणि लालित्यपूर्ण आहे. देवकवीने कुसुमावळी नावाच्या चंपूकाव्यात एक काल्पनिक कथा सांगितली आहे. चौंडरस हा पंढरपूरचा. दंडीच्यादशकुमारचरिताचे भाषांतर त्याने कन्नडमध्ये, अभिनव दशकुमारचरिते नावाच्या चंपूकाव्यात केले आहे. त्यात कथानायक हा पंढरपुरास जाऊन विठ्ठलाचे वर्णन करतो, अशी भूमिका आहे.

बसवकाळात काहींनी शास्त्रग्रंथाचीही रचना केली आहे. कविकाम (सु. १२००) याने मुख्यत्वे काव्यरसाचे विवरण करणारा शृंगार रत्नाकर नावाचा लक्षण-ग्रंथ लिहिला. कन्नडमध्ये काव्यरसाचे विवेचन करणारा, हा पहिला ग्रंथ होय. त्यात ‘नवरसव्यावर्णन ’, ‘भावभेदनिर्णय ’, ‘नायक-नायिका विकल्प विस्तर ’ आणि‘सरस्वती संभोग विप्रलंभ विस्तर ’ असे चार परिच्छेद आहेत. केशिराज याने शब्दमणिदपण या ग्रंथात प्रमाणभूत व्याकरणाचे विस्ताराने विवरण केले आहे. त्याचेअनेक ग्रंथ अनुपलब्ध आहेत. प्रबोधचंद्र असा निर्देश केलेली त्याची एक रचना नाटक प्रकारातील असावी.

माघणंदी याने शास्त्रसार समुच्चय आणि पदार्थसार यांवर कन्नड गद्यभाष्ये लिहिली. बाळचंद्र पंडिताने द्रव्यसंग्रह या ग्रंथावर गद्यभाष्य लिहिले आहे. रट्टकवी(सु. १३००) याने रट्टमत या ग्रंथात वर्षाशास्त्रासंबंधी विवेचन केले आहे. पहिला मंगराज (सु. १३५०) याने विषवैद्यकावर खगेंद्रमणि-दर्पण नावाचा ग्रंथ लिहिलाआहे. लोकोपकारार्थ ही रचना केली, असे त्याने म्हटले आहे. त्यात सोळा अध्याय असून शास्त्रीय विषयाचे सुगम विवेचन आढळते. अभिनवचंद्र (सु. १४००) यानेअश्वशास्त्र लिहिले. त्यात सोळा अध्याय असून अश्वलक्षणे, निगा आणि औषधोपचार यांविषयी समग्र विवेचन आले आहे. कविमल्ल याने कामशास्त्रावरमन्मथविजय नावाचा ग्रंथ चंपूकाव्यशैलीत लिहिला आहे.


कुमारव्यासकाळ : (१४०० ते १९००). प्राचीन कन्नड साहित्यात हा कालखंड अनेक दृष्टीने लक्षणीय आहे. राजकीय दृष्टीनेही कर्नाटकाच्या इतिहासात हापाचशे वर्षांचा कालखंड अत्यंत महत्त्वाचा आहे. विजयानगरचे वैभवशाली साम्राज्य या काळात अस्तंगत झाले परंतु या कालखंडाच्या पहिल्या शतकात तेवैभवाच्या शिखरावर होते. त्यावेळी कर्नाटकात आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा सर्व क्षेत्रांत स्थैर्य आणि सुरक्षितता होती. १५६५ मध्ये विजयानगरचापाडाव झाल्यावर कर्नाटकाची राजकीय परंपरा नष्ट झाली एवढेच नव्हे, तर त्याचे राजकीय महत्त्वही कमी झाले. त्यानंतरच्या काळात म्हैसूरच्या राजांच्याआश्रयाखाली दीर्घकाळपर्यंत कन्नड साहित्याचे संवर्धन झाले.

या कालखंडाला ‘संकीर्ण ’ किंवा ‘देशी ’ कालखंड असेही म्हणतात. या काळापर्यंत कन्नडमध्ये काव्यरचना करण्याविषयी उदासीन असणारे, किंवा ती केलीतरी लौकिक आणि शास्त्रीय विषयांवरच करणारे ब्राह्मण कवी, आता उत्साहाने धार्मिक स्वरूपाचे साहित्यही मोठ्या प्रमाणावर निर्माण करू लागले. याकालखंडात काव्यविषय , त्याचा आशय आणि शैली यांत विविधता दिसून येते. छंदांच्या बाबतीत देशी छंदांना अग्रमान मिळाला. चंपूशैलीचा वापर कमी झाला.‘षट्पदी ’ हे या काळातील छंदाचे प्रमुख स्वरूप म्हणता येईल. काव्यरसाच्या दृष्टीने भक्ती हा या काळातील मुख्य रस ठरला. वीररसालाही त्यात चांगला वावआहे.

प्रदीर्घ अशा या कालखंडाचे, विवेचनाच्या सोयीसाठी, ब्राह्मण साहित्य, दास साहित्य, म्हैसूरी राजवटीतील कन्नड साहित्य, जैन साहित्य, वीरशैव साहित्य,शास्त्र साहित्य, जानपद साहित्य तसेच ‘यक्षगान ’ अशा प्रकारांत वर्गीकरण करता येईल.

ब्राह्मणसाहित्य : ð कुमारव्यास (सु. १४००) हा कन्नडकविशिरोमणींपैकी एक. महाभारताच्या पहिल्या दहा पर्वांतील कथाभाग याने ८,००० षट्पदीरचनांतून वर्णन केला. एका षट्पदीत सहा ओळी येतात. कृष्णकथा सामान्यांना विषद करून सांगणे हे कवीचे उद्दिष्ट होते. त्याची भाषाशैली अनन्यसाधारण आहे. टीकाकारांनी त्याला ‘रूपकसम्राट ’ म्हणून गौरविले आहे. कुमारव्यासाने आपल्या काव्यात अनेक मराठी शब्दवापरले आहेत. ऐरावत नावाचे एक लहानसे काव्यही त्याचेच असल्याचे सांगतात. चंद्रात्मज रुद्र नावाच्या मराठी कवीने कुमारव्यासाच्या महाभारताचा मराठीतअनुवाद केला आहे. [Ž कुमारव्यास भारत].

 

कुमारवाल्मीकी (सु. १५००) हा विजयानगरच्या कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. राजाच्या आज्ञेवरून त्याने, कुमारव्यासाने अर्धवट सोडलेलीमहाभारतरचना पूर्ण केली [Ž कुमारवाल्मीकि]. चाटू विठ्ठलनाथाने (सु. १५३०) केलेल्या भागवताच्या कन्नड अनुवादासंबंधी निश्चित पुरावा नाही. नित्यात्मनाथ,विद्यानाथ, सदानंदयोगी, निर्वाणनाथ आणि चाटू विठ्ठलनाथ ह्या पाच नाथपंथी संन्याशांनी हा अनुवाद केला, असे म्हणतात. या काव्यात १२,००० हून अधिकषट्पदी आहेत. यात सुबोध कथनशैली व सुंदर वर्णने आहेत. लक्ष्मीश (सु. १५५०) हा ‘कविचूतवचनचैत्र ’ अशी पदवी मिळालेला कवी, देवपूरच्या लक्ष्मीरमणाचाभक्त होता. संस्कृतातील जैमिनि-भारताचा अनुवाद असलेली कृष्णचरितामृत ही त्याची रचना. तीत पांडवांच्या अश्वमेधाचा कथाभाग निमित्तमात्र असून,कृष्णचरित्रावरच भर आहे. काव्यदृष्टीने त्यातील ‘चंद्रहास-कथा ’ ही श्रेष्ठ दर्जाची आहे. लक्ष्मीशास ‘नादलोल लक्ष्मीश ’ असे यथार्थपणे म्हटले जाते. गोपकवी(सु. १६००) हा विजापुर जिल्ह्यातील ‘बेड भुय्यर ’च्या करणिक कुलातील कवी असून, चित्रभारत, नंदीमाहात्म्य ही त्याचे काव्ये. चित्रभारताविषयी महाराष्ट्रभाषेत म्हणजे मराठीत प्रचलित असलेली कथाच कन्नडमध्ये सांगितली आहे, असे त्याने म्हटले आहे. त्यात ‘चित्रकवित्व ’ पुष्कळ आहे. नंदीमाहात्म्य या काव्यातशैवतीर्थक्षेत्रांचा महिमा वर्णन केला आहे. काव्यदृष्टीने चित्रभारतापेक्षा हे काव्य सरस आहे. नागरस (सु. १६५०) याने भगवद्‌गीतेचा कन्नडमध्ये अनुवाद केला.अनुवाद समर्पक व आदर्शभूत ठरणारा आहे. रंगनाथ (सु. १६७५) याने अनुभवामृत या रचनेत जनसामान्यांना उमजेल अशा रीतीने अद्वैत वेदान्त सांगितला आहे.अत्यंत गहन प्रमेयांचे सुंदर उदाहरणांनी केलेले कलात्मक विवरण त्यात आहे. याचे परत संस्कृतात भाषांतर झाले, हे याचे वैशिष्ट्य. याशिवाय तिरुमलभट्ट,सोमनाथकवी, नरहरी, वेंककवी, बब्बूरू रंग, कोनय्य, हेळवनकट्टेगिरियम्म, तिम्मामात्य, चिदानंदावधूत, वेंकामात्य इ. कवी सतराव्या शतकात होऊन गेले.तिरुमलभट्टाने पद्मपुराणाच्या उत्तरकांडातील ‘शिवगीता ’ कन्नडमध्ये रचली आहे. हा केळदीचा राजा वेंकटप्पनायक याच्या आश्रयाला होता. याच सुमाराससोमनाथकवीने अक्रूर चरिते नावाचे काव्य रचले आहे. त्यात कृष्ण-बलरामाच्या जन्मापासून कंसवधापर्यंतचा कथाभाग आला आहे. प्रल्हादचरित्रेकारनरहरीकवीची कल्पनाशक्ती चांगली असून, शैलीही आकर्षक आहे. वेंककवीने वेंकटेश्वर प्रबंध नावाचे चंपूकाव्य रचले आहे. बब्बूरू रंगाचे अंबिका विजय आणिपरशुरामरामायण हे दोन ग्रंथ आहेत. अंबिका विजय या काव्यात आदिशक्ती अंबिकेने रक्त बीजासुराचा संहार केल्याची गोष्ट आहे. परशुरामरामायणातपरशुरामाचे चरित्र आहे. कोनय्याने कृष्णार्जुनर संगर नावाचे काव्य लिहिले आहे. याला गय चरित्रे असेही नाव आहे. गय नावाच्या गंधर्वामुळे कृष्ण आणि अर्जुनआपसात लढतात व पुढे परमेश्वर प्रकट होऊन युद्ध थांबवतो, असा काव्याचा कथाभाग आहे. हेळवनकट्टेगिरियम्म ह्या कवयित्रीने चंद्रहासन कथे, सीताकल्याण,उद्दालिकन कथे ही काव्ये आणि अनेक पदे रचली आहेत. तिम्मामात्याने रामाभ्युदयकथा कुसुममंजरी नावाचे काव्य रचले. त्याला आनंद रामायण असेही नावआहे. चिदानंदावधूत याने ज्ञानसिंधु व देवीमाहात्म्य ही दोन काव्ये, पंचीकरण हा वचनग्रंथ, तत्त्वचिंतामणि नावाचा गद्यग्रंथ आणि नवचक्रकुलरेखालक्षण हा टीकाग्रंथ अशी रचना केली. बगळांबा स्तोत्र, कामविडंबने आणि चिदानंदर वचन हे त्याच्या इतर स्फुट काव्यरचनेचे संग्रह होत. ज्ञानसिंधु हा अद्वैव वेदान्ताचे विस्तृत विवेचन असलेला त्याचा पद्यग्रंथ आहे. देवीमाहात्म्य हा संस्कृत ग्रंथाचा अनुवाद आहे. वेंकामात्याने रामायण, इंदिराभ्युदय आणि हनुमद्विलास ही कन्नड काव्ये रचली. è मुद्दण (नंदलिके लक्ष्मीनाराणप्प, १९००) हा या काळातील शेवटचा कवी. हा जुन्या आणि नव्या साहित्याच्या संधिकाळाचा प्रतिनिधी आहे. अद्भुतरामायण, रागपट्टाभिषेक आणि रामाश्वमेध ह्या त्याच्या काव्यरचना होत.

दास साहित्य : या काळात द्वैत मताचे अनुयायी असलेले शेकडो हरिदास कवी होऊन गेले. त्यांचे साहित्य दास साहित्य अथवा भक्तिवाङ्मय या नावाने ओळखले जाते. द्वैत मताच्या प्रचारासाठी त्यांनी हजारो ‘कीर्तने’ रचली आहेत. याशिवाय ‘उगाभोग’, ‘सुळादी’ ह्या साहित्यप्रकारांतही त्यांची रचना आढळते. लोकाभिमुखता हे दास साहित्याचे एक प्रमुख लक्षण आहे. हरिदासांनी भक्तिधर्माला आपल्या जीवनाचे इतिकर्तव्य मानले. नीतिधर्म आणि मानवता यांवर त्यांनी भर दिला. दासांनी आपल्या काव्यात केवळ देशी छंदच वापरले. त्यांच्या कीर्तनांना भावगीतांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कीर्तन हे रागतालांनी युक्त असते. शेवटी कीर्तनकर्त्याच्या इष्टदेवतेचे नाव असते. हरिदास हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त होत. त्यांच्यातील अनेकांच्या कीर्तनांच्या शेवटी विट्ठलाचा निर्देश येतो. ही कीर्तने त्यांतील सहजसुंदर गेयतेने लोकप्रिय झालेली आहेत. सुळादी या साहित्यप्रकारात वचनसाहित्यातील गद्यसौंदर्य आणि कीर्तनातील लय या दोहोंचा मिलाफ आढळतो. सुळादी यात लहानलहान सात ‘प्रबंध’ (खंड) असतात आणि प्रत्येक प्रबंधाला स्वतंत्र ताल असतो. सुळादी ही लयप्रधान रचना असते तर उगाभोग ही स्वरप्रधान रचना असते. दास साहित्यात ‘वृत्तनाम’, ‘सुव्वालि’, ‘गुंड क्रिये’, ‘दंडक’, ‘सांगत्य’, ‘रगळे’, ‘षट्पदी’, ‘जानपद’ या छंदांचा उपयोग केलेला आहे. दास साहित्यावर वचनसाहित्याचा बराच प्रभाव पडलेला आहे, असे विद्वानांचे मत आहे.

दास साहित्याचा उगम बसवकाळात झाला असला, तरी त्याचा विशेष विकास कुमारव्यासांच्या काळात झाला. नरहरितीर्थ (सु. १३००) हा ओरिसात गजपती राजाच्या पदरी मोठा अधिकारी होता. त्याचे पूर्वाश्रमीचे नाव स्वामिशास्त्री. त्याने द्वैत मताचा स्वीकार केल्यानंतर è मध्वाचार्यांकडून संन्सासदीक्षा घेतली आणि ‘नरहरितीर्थ’ हे नाव धारण केले. त्याची दोनच कीर्तने उपलब्ध आहेत. श्रीपादराय (सु. १५००) हाही संन्यासी होता. त्याने संस्कृतात काही ‘उद्ग्रंथ’ आणि कन्नडमध्ये कीर्तने रचली आहेत. ‘भ्रमरगीते’, ‘वेणुगीते’ आणि ‘गोपीगीते’ ही त्याची कीर्तने विशेष प्रसिद्ध आहेत. ‘रंगविट्ठल’ ही त्याची मुद्रिका. व्यासतीर्थ (१४४६-१५३९) हा श्रीपादरायाचा शिष्य. तो अत्यंत विद्वान होता.


कृष्णदेवराय या राजाचा तो गुरू. संस्कृतात दर्जेदार ग्रंथ आणि कन्नडमध्ये शेकडो कीर्तने त्याने रचली आहेत. त्यांत त्याच्या भक्तीची उत्कटता, लोकाभिमुखता आणि सुंदर रूपके हे गुणविशेष आढळतात. त्याने ‘वृत्तनाम’ या छंदात प्रासादिक शैलीने भगवद्गीतेचा संक्षिप्त अनुवाद केला आहे. ‘श्रीकृष्ण’ ही त्याची मुद्रिका. è पुरंदरदास (१४८०-१५६४) हा सर्व हरिदासांमध्ये श्रेष्ठ समजला जातो. श्रीमंत कुळात जन्माला येऊनही पुढे स्वेच्छेने सर्वस्वाचा त्याग करून तो हरिदास बनला. हा महान भक्त आणि संगीतज्ञ होता. याने हजारो कीर्तने रचली आणि अनेक सुळादी व उगाभोग प्रकारांतील रचना केल्या. त्याच्या कीर्तनांत नाममहिमा, गुरुमाहात्म्य, कृष्णलीलावर्णन, समाजप्रबोधन इ. विषयांचे निरूपण आहे. प्रसिद्ध संगीतज्ञ è त्यागराजाने पुरंदरापासून स्फूर्ती घेतली. पुरंदरदासाच्या कीर्तनांत दैनंदिन जीवनातील अनेक सुंदर दृष्टांत आढळतात. è कनकदास (१५०९-१६०७) याने हरिभक्तिसार, रामधान्यचरित्रे, नळचरित्रे, मोहनतरंगिणी इ. काव्ये रचली आहेत. रामधान्यचरित्रे ही त्याची अपूर्व कृती. देव हा गरिबांचा कैवारी आहे, हा त्यातील सूर आहे. रागी (गरिबांचा आहार) व तांदूळ (श्रीमंतांचा आहार) यांच्या वाद होऊन रागीचा जय झाला. रामाने रागीला राघव हे स्वतःचे नाव दिले, ही रामधान्यचरित्रेची कथावस्तू. हरिभक्तिसारात भक्ताची प्रार्थना आहे. कनकदासाने कीर्तनेही रचली आहेत. त्यांत ‘एकांतभक्ती’ व ‘नीतिधर्म’ यांचा उपदेश आहे. ‘कागिनेलेयादिकेशव’ ही त्याची मुद्रिका. वादिराज (१४८०-१६००) हा उडुपी पीठाच्या अष्टमठांपैकी सोदे या मठाचा यती (संन्यासी) होता, तसेच तो महापंडितही होता. त्याच्या अनेक कृती संस्कृतात आहेत. ‘हयवदन’ या मुद्रिकेने कन्नड मध्येही त्याने शेकडो कीर्तने रचली. यांशिवाय वैकुंठवर्णने, स्वप्नगद्य, लक्ष्मिय शोभाने या त्याच्या इतर रचना. मध्वाचार्यांच्या महाभारत-तात्पर्य-निर्णय या संस्कृत ग्रंथावर त्याने कन्नडमध्ये टीका लिहिली आहे. या सुमारासच वैष्णव मताच्या वैकुंठदासाने ‘वैकुंठ केशव’ या मुद्रिकेने अनेक कीर्तने रचली. पुरंदरदासाच्या मुलांनीही हरिदास बनून अनेक कीर्तने रचली.

सोळाव्या शतकानंतर हरिदासांचा प्रभाव क्षीण होत गेल्याचे दिसते. ‘मंत्रालयद रायरू’ म्हणून ख्याती पावलेल्या राघवेंद्रतीर्थ याचे ‘वेणुगोपाल’ या मुद्रिकेने रचलेले एक लोकप्रिय कीर्तन उपलब्ध आहे. नंतरच्या काळात प्रसन्नवेंकटदास (१६८०), विजयदास (१६८७-१७५५), गोपालदास (१७२२-१७६५), जगन्नाथदास (१७२७-१८०९) इ. हरिदासांनी कन्नड भाषेत विपुल रचना केली. अठराव्या शतकातच मोहनदास, प्राणेशदास इ. हरिदासांनी दास साहित्य समृद्ध केले. महिपतीदास हा याच काळातला. प्रसन्नवेंकटदासाने पुष्कळ कीर्तने रचली, तसेच भागवतातील दशमस्कंधाचा कन्नड अनुवादही केला आहे. ‘प्रसन्नवेंकट’ ही याची मुद्रिका. विजयदासाने ‘विजयविठ्ठल’ या मुद्रिकेने कीर्तने रचली आहेत. याचे सुळादीप्रकारचे साहित्य व कीर्तने अर्थपूर्ण व भावपूर्ण आहेत. ‘जगन्नाथविठ्ठल’ या मुद्रिकेने कीर्तने रचणार्‍या जगन्नाथदासाने हरिकथामृतसार नावाचे, द्वैत मताचा पुरस्कार करणारे तात्त्विक काव्यही लिहिले. तत्त्वसुव्वालि हे त्याचे दुसरे काव्यही लोकप्रिय आहे. त्याची कीर्तनेही त्यांतील चिंतनशीलता व गेयता या गुणांनी लोकप्रिय झाली आहेत.

म्हैसूरी राजवटीतील कन्नड साहित्य : सतराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या कालखंडाची व्याप्ती आहे. १६१० साली श्रीरंगपटण येथे राज्याभिषेक होऊन स्वतंत्र झालेला राजा ओडेय हा ‘ओडेयर’ या वंशाचा आद्य प्रवर्तक. तिरुमलार्य नावाच्या त्याच्या सेनापतीने वर्णवृत्तांत हे काव्य लिहिले. चामराज ओडेय (कार. १६१७-१६२७) याने चामराजोक्तिविलास व मणिप्रकाश हे दोन गद्यग्रंथ लिहिले, असे मानले जाते. यांपैकी पहिला वाल्मिकि रामायणाचा कन्नड गद्यानुवाद व दुसरा स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडाचा गद्यानुवाद आहे. कंठीरव नरसराज (कार. १६३८-१६५९) याच्या आश्रयाला राहिलेल्या गोविंदवैद्याने कंठीरव नरसराजविजय हे चरित्रात्मक काव्य लिहिले. चिक्कदेवराजाची कारकीर्द (१६७१-१७०४) महत्त्वाची मानली जाते. त्याच्या आश्रयाला तिरुमलार्य, सिंगचार्य, चिक्कुपाध्याय, शृंगारम्म, होन्नम्म, वेणुगोपालवर प्रसाद, तिम्मकवी, मल्लिकार्जुन, चिदानंद कवी, मल्लरस इ. कवी होते. चिक्कदेवराजाने चिक्कदेवराज बिन्नप गीतगोपाल, भारत, भागवत, शेषधर्म इ.

काव्ये रचली अशी समजूत आहे. गीतगोपालात सुंदर कीर्तने आहेत. तिरुमलार्याने अप्रतिम वीरचरित व चिक्कदेवराजविजय ही दोन चरित्रात्मक काव्ये लिहिली. चिक्कदेवराज वंशावळी नावाचा गद्यग्रंथही त्याने लिहिला आहे. चिक्कुपाध्यायाने वैविध्यपूर्ण असे सु. तीस महाग्रंथ लिहिले. सिंगरार्य याने हर्षाच्या (सु. ६४८) रत्नावलि या संस्कृत नाटकाचे मित्रविंदा गोविंद या नावाने कन्नड भाषांतर केले आहे. कन्नड भाषेतील सध्या उपलब्ध झालेले हे पहिले नाटक होय. होन्नम्म ही चिक्कदेवराजाच्या दासींपैकी एक. हदिबदेय धर्म (पतिव्रतेचा धर्म) ही तिची रचना. म्हैसूरचे राज्य हैदर अलीच्या (१७२२-८२) सत्तेखाली (१७५९-१७८२) आले. त्यामुळे १८०० पर्यंत कन्नड साहित्याची प्रगती मंदावली. मुम्मडी कृष्णराजाच्या काळी साहित्याला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त झाली. मुम्मडी कृष्णराजाने पुष्कळ संस्कृत नाटकांचे कन्नडमध्ये गद्यानुवाद केले. रामायणादींचेही अनुवाद त्याने केले. तसेच बत्तीस पुत्तळिय कते, वेताळपंचविंशति, शुकसप्तति इ. कन्नड अनुवाद मूळ संस्कृत ग्रंथांवरून त्याने केले. त्याच्या आश्रितांपैकी केंपुनारायण आणि अळिय लिंगराज हे प्रमुख होत. केंपुनारायणाने मुद्रमंजूष या गद्यकृतीत चाणक्याची संपूर्ण कथा सांगितली आहे. त्याची शैली सुंदर आहे. अळिय लिंगराजाने पन्नासावर ग्रंथ रचले. चामराजाच्या आश्रितांपैकी बसप्पशास्त्री ऊर्फ अभिनव कालिदास (१८४३-१८९१) हा प्रख्यात नाटककार होता. त्याने अनेक संस्कृत नाटकांचे कन्नडीकरण केले आहे. ऑथेल्लो नाटकाचेही कन्नड भाषांतर शरसेने चरिते या नावाने त्याने केले.

जैन साहित्य : या कालखंडातील जैनकवींपैकी भास्कर (१४२५), कल्याणकीर्ती (१४४०), विजयण्ण (१४५०), तेरकणांबी बोम्मरस (१४८५), शिशुमायण (१५००), तिसरा मंगरस (१५१०), अभिनववादी विद्यानंद (१५००), साळव (१५५०), रत्नाकरवर्णी (१५६०), देवचंद्र (१८००) इ. कवी प्रसिद्ध आहेत. भास्कराचे जीवंधरचरिते, कल्याणकीर्तीचे ज्ञानचंद्राभ्युदय इ. काव्ये विजयण्णाचे द्वादशानुप्रेक्षे हे काव्य तेरकणांबी बोम्मरसाच्या सनत्कुमार चरिते व जीवंधरसांगत्य ह्या कृती शिशुमायणाच्या अंजगाचरिके व त्रिपुरदहन सांगत्य ह्या कृती आणि तिसरा मंगरस याच्या जयनृपकाव्य, नेमिजिनेश संगति इ. रचना विशेष उल्लेखनीय आहेत. è रत्नाकरवर्णी याने भरतेश वैभव हे महाकाव्य रचले. यात आदितीर्थंकराचा पुत्र भरत याची कथा आहे. हा पंप, हरिहर व कुमारव्यास यांच्या तोडीचा महाकवी होता. त्याची भाषा सोपी, छंदयोजना समर्पक आणि शैली सोज्वळ व प्रसन्न आहे. अपराजितेश्वर शतक, त्रिलोक शतक आणि रत्नाकराधीश्वर शतक ह्या त्याच्या इतर रचना. या काळातील जैनकवींनी बदलत्या परिस्थितीस अनुसरून नवे विषय निवडले व ‘अच्चगन्नड’ (शुद्ध कन्नड) छांदांत त्यांचे वर्णन केले.

वीरशैव साहित्य : वचनसाहित्याची रचना व संकलन, त्यावरील टीका-टीपणे, पंथीय तत्त्वांचे प्रतिपादन, पुराणरचना, आध्यात्मिक पदरचना इ. प्रकार वीरशैवांनी या काळात हाताळले. तोंटद सिद्धेश्वर (१४७०), स्वतंत्र सिद्धलिंगेश्वर (१४८०), गुम्मळापुरद सिद्धलिंगेश्वर (१४८०), घनलिंग (१४८०), षण्मुखस्वामी (१७००) इ. या काळातील प्रमुख वचनकार होत. महालिंगदेवाने (१४२५) बसवादी शरणांची वचने निवडून एकोत्तरशतस्थल नावाचा संग्रह प्रसिद्ध केला. शिवाय प्रभुदेवर वचनाख्यान नावाचा एक टीकाग्रंथही त्याने लिहिला. कुमार बंकनाथ (१४३०), जक्कणार्य (१४३०) इत्यादींनी आपला गुरू महालिंगदेव याचे कार्य पुढे चालविले. गुब्बिय मल्लण (१४७५) याने गणभाष्यरत्नमाले या ग्रंथात वचनांचा संग्रह करून, त्यावर भाष्य लिहिले. वचनसंग्रहाचा अत्यंत उच्च दर्जाचा नमुना म्हणजे शून्यसंपादने होय. त्याचे संकलन रूळुरू सिद्धवीरणाचार्याचे आहे.


शेकडो वीरशैव कवींनी लिहिलेल्या समग्र साहित्याचा आढावा साहित्यप्रकारांनुसार थोडक्यात घेता येईल. वीरशैव पंथासंबंधी विविध स्वरूपाचे ग्रंथ निर्माण झाले. मग्गेय मायिदेव (१४३०), आनंद बसवलिंग शिवयोगी, गुरुबसव (१४३०), विरतमहलिंग देव, निजगुण शिवयोगी (१५००) इत्यादींचे सांप्रदायिक स्वरूपाचे साहित्य प्रख्यात आहे. यांच्यातील निजगुण शिवयोगी या श्रेष्ठ कवीने ‘शंभुलिंग’ या उपनामाने अनेक ग्रंथ रचले कैवल्यपद्धति, परमानुभवबोधे, परमार्थगीत, अनुभवसार, अखत्तुभूवर त्रिपदि, परमार्थ प्रकाशिके, विवेक चिंतामणि ह्या त्याच्या उल्लेखनीय रचना होत. यांतील शेवटच्या दोन्ही रचना गद्यात आहेत. मुप्पिन षडक्षरी याने तात्त्विक पण लालित्यपूर्ण स्वरूपाची पदे रचिली. त्यांचा संग्रह सुबोधसार या नावाने प्रसिद्ध आहे. सर्षभूषण याने बोधपर भक्तिगीते रचिली. लक्कण्ण दंडेश (१४२५) याचा शिवतत्त्व चिंतामणि हा ग्रंथ म्हणजे वीरशैवमताचा विश्वकोशच आहे. मग्गेय मायिदेवाचे शतकत्रय, चंद्रकवीचे गुरुमूर्तिशंकरशतक, वीरभद्रराजाचे पंचशतक, सिरिनामधेयाचे मल्लेश्वरशतक, चेन्नमल्लिकार्जुनाचे शिवमहिमाशतक, शंकरदेवाचे शंकरशतक व शांतवृषभेशाचे अनुभवशतक हे या काळातील महत्त्वपूर्ण शतकसाहित्य होय. त्यांत भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा उपदेश असून ‘षट्स्थल सिद्धांता’ चे विवरण आहे.

या काळातील वीरशैव कवींनी अनेक चरित्रात्मक काव्ये रचिली. पुरातन व तत्कालीन शरण (शैव संत) हे या काव्याचे कथानायक आहेत.  चामरस (१४३०), बोम्मरस (१४५०), नीलकंठाचार्य (१४८८), चतुर्मुख बोम्मरस (१५००), सिंगिराज (१५००), गुब्बिय मल्लिणार्य (१४१३), चेरमांक (१५१६), वीरभद्रकवी (१५३०), गुरुलिंगविभू (१५५०), किक्केरियाराध्य नंजुंड (१५५०), विरक्त तोंटदार्य (१५६०), शांतेश (१५६१), अदृश्य कवी (१५८०), विरूपाक्ष पंडित (१५८४) व सिद्धनंजेश (१६५०) हे प्रसिद्ध पुराणकार कवी होत. त्यांपैकी è चामरसाने अल्लमप्रभूचे जीवनचरित्र प्रभुलिंगलीले या नावाने रचले. तेलुगू, तमिळ, कानडी, मराठी आणि संस्कृत या भाषांतून त्याची भाषांतरे झाली आहेत. याचे मराठीतील भाषांतर ब्रह्मदासाने लीलाविश्वंभर या नावाने केले आहे. अस्खलित धावती शैली व रूपकांचा सहजाविष्कार यांबाबतीत चामरसाचे कौशल्य दिसून येते. è विरूपाक्ष पंडिताने चेन्नबसवपुराण लिहिले आहे. यात चेन्नबसवेश्वराचे चरित्र आहे. या काव्यास विद्वानांनी ‘वीरशैवांचा विश्वकोश’ म्हणून गौरविले आहे. यात पांडित्य व कवित्व यांची प्रचीती येते. तथापि बसवराज देवरगळे व प्रभुलिंगलीले अशी कलादृष्ट्या सरस उतरलेली शैव पुराणे अपवादात्मकच होत. या कालखंडातील ब्राह्मण, जैन आणि वीरशैव पुराणसाहित्यात काव्यगुणांपेक्षा पंथीय विचारसरणीच्या प्रतिपादनालाच अधिक महत्त्व दिलेले दिसते. नंजुंड कवीच्या कुमाररामकथे या काव्यात कुमाररामाने दाखविलेल्या शौर्य-सच्चारित्र्यासंबंधीच्या लौकिक कथेचे वीररसपूर्ण वर्णन आढळते.

वीरशैव कवींपैकी चंद्रकवी (१४३०), सुरंगकवी (१५००), प्रभुग, वीरभद्रराज, सदाशिव योगी, षडक्षर देव इत्यादींनी चंपूकाव्ये लिहिली. काव्यदृष्टी, काव्यविषय, रसपरिपोष इ. बाबतींत या सर्वांनी हरिहर ह्या कवीचाच मार्ग अनुसरला. या काळातील वीरशैवपंथीय चंपूकवींपैकी è षडक्षर देव हा श्रेष्ठ मानला जातो. प्रतिभा आणि प्रज्ञा यांचे दर्शन षडक्षर देवाच्या काव्यात घडते. राजशेखर विलास, शबरशंकर विलास आणि वृषभेंदुविजय ही त्याची तीन चंपूकाव्ये आहेत. पंचाक्षरी मंत्राचा महिमा विशर करणार्‍या राजशेखर विलास या त्याच्या काव्यात शृंगार, करुण आणि भक्ती या रसांना प्राधान्य आहे. शबरशंकर विलास या काव्यात किरातार्जुनीय युद्ध आणि शिवलीलेचे वर्णन आहे. वृषभेंदुविजयात बसवेश्वराचे चरित्र आहे.

सर्वज्ञ (१७००) हा समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध आहे. अनुभव हा त्याचा वेद आणि जीवन ही त्याची पाठशाळा होती. ‘त्रिपदी’ छंदात त्याने हजारो मुक्तके रचली आहेत. त्यांत समाजातील गुणदोषांचे मर्मभेदक चित्रण पहावयास मिळते. उदा., सर्वज्ञाची ही त्रिपदी पाहता येईल.

“जातिहीनर मनेय ज्योति ता हीनवे

जातिविजातियेनबेड देवनोलिदातने

जात सर्वज्ञ।“

अर्थ : जातिविहीनांच्या घरातली ज्योत हीन आहे काय? जातिविजातींच्या गप्पा नको (कारण) देव ज्याला प्रसन्न झाला, तोच खरा जातीचा. सर्वज्ञ (म्हणे).

नीतिबोध आणि अनुभवाचे खडे बोल व्यक्त करणारी ‘कंद-पदे’ (कन्नड छंदविशेष) कन्नडमध्ये अनेक आहेत परंतु त्यांच्या कर्त्याविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही.

शास्त्र साहित्य : या काळात साळव, भट्टकलंक (१६०४), गुणचंद्र (१६५०), तिरुमलार्य (१७००) इत्यादींनी व्याकरण, छंद-शास्त्र, अलंकार, काव्यरस वगैरे विषयांवर शास्त्रीय स्वरूपाची ग्रंथरचना केली. साळवाने रसरत्नाकर, शारदाविलास हे दोन ग्रंथ लिहिले. त्यांपैकी शारदाविलासात ध्वनितत्त्वाचे विवेचन आहे. भट्टकलंकाने कन्नड व्याकरणाविषयी संस्कृत भाषेत शब्दानुशासन नावाचा पांडित्यपूर्ण असा विस्तृत ग्रंथ लिहिला. गुणचंद्राने छंदस्सार हा छंदोग्रंथ लिहिला. यात कन्नड भाषेतील इतर कोणत्याही छंदोग्रंथात न आढळणार्‍या आणि कन्नड छंदाचा प्राण ठरलेल्या तालांचे विवेचन आहे. तिरुमलार्य याने अप्रतिमवीर चरित नावाचा अलंकारग्रंथ लिहिला आहे. अळिय लिंगराज यानेही नरपतिचरिते हा अलंकारग्रंथ रचिला आहे. बोम्मरस याने चतुरास्य नावाचा शब्दकोश रचला, तसेच विरक्त तोंटदार्य याचाही कर्णाटक शब्दमंजरि नावाचा शब्दकोश आहे संगीतशास्त्रावरही संगीतरत्नाकर हा छोटा ग्रंथ कन्नडमध्ये उपलब्ध आहे तथापि त्याचा कर्ता अज्ञात आहे. तो सु. १७५० मध्ये रचिला असावा.

म्हैसूर येथील चामराजाच्या दरबारातील रामचंद्र याने शालिहोत्राच्या अश्वविद्येचे कन्नड भाषांतर केले आहे. चामराजाचा दुसरा एक आश्रित पद्मण पंडित याने चामराजीय या ग्रंथात अश्वविद्येचे विस्तृत प्रतिपादन केले आहे. कंठीरव नरसराज याच्या आश्रयाला असलेल्या भास्कराने बेहार गणित (व्यवहार गणित) हा गणितग्रंथ लिहिला. बालवैद्य चलुव (१७३०) याने भास्कराचार्यांच्या लीलावति या संस्कृत ग्रंथाचे कन्नडीकरण केले, तसेच रत्नशास्त्रही रचले. वीरराज (१७२०) याने वैद्यसंहिता सारार्णव नावाचा वैद्यकग्रंथ रचला. तिसरा मंगरस याने कन्नडीमध्ये सूपशास्त्र (पाकशास्त्र) लिहिले. कल्लरस (१४५०) याने मल्लिकार्जुन विजय या ग्रंथात कामशास्त्राचे विवेचन केले आहे. अभिनववादी विद्यानंद याचा काव्यसार हा ग्रंथ संकलनात्मक आहे.


जानपद साहित्य तसेच ‘यक्षगान’ : यक्षगान हे संगीत-नृत्य-प्रधान आणि विनोदी संवादाने नटलेले कन्नड लोकनाट्य असून यातील संगीत-नृत्याला शास्त्रीय बैठक आहे. म्हणून हा प्रकार मराठी लोकनाट्याहून सर्वस्वी वेगळा आहे. ‘गरति हाडुगळु’ (गरतीची पदे), ‘गोविन हाडु’ (गाईचे गाणे), ‘मानवमी पद’ (महानवमीचे पद), ‘कोलाटद पदगळु’ (टिपरीची पदे), ‘जोगुळगळु’ (अंगाई गीते) इ. असंख्य लोकगीते कन्नड भाषेत आहेत. सतराव्या शतकापूर्वीच्या यक्षगानरचना अद्याप उपलब्ध नाहीत. यक्षगानात पौराणिक कथांप्रमाणेच ऐतिहासिक कथाही आढळतात. पार्ती सुब्ब (१८००) याने अनेक यक्षगानांची रचना केली आहे.

आधुनिक काळ : (१९००-१९७२). या कालखंडातील सुरुवातीच्या पन्नास वर्षांच्या दीर्घ काळातील प्रमुख प्रेरणा म्हणजे कर्नाटकाच्या अस्मितेची जाणीव आणि भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ह्या होत. कन्नड साहित्याला या काळात इंग्रजी साहित्यापासूनही प्रेरणा मिळाली. लघुकथा, कादंबरी, नाटके, निबंध, काव्य इ. साहित्यप्रकार कन्नडमध्ये दृढमूल झाले. या काळातील कन्नड साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे लेखकांच्या अंगी भिनलेली व्यापक जीवननिष्ठा होय. त्यामुळे कन्नड साहित्य लोकाभिमुख झाले. एका विशिष्ट धर्माचे अगर मताचे संकुचित उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता साहित्यिकांनी अखिल कन्नड जनतेकरिता आपली साहित्यनिर्मिती केली.

स्थूलमानाने १९०० ते १९७२ या कालखंडातील कन्नड साहित्यात तीन वेळा परिवर्तन घडून आल्याचे दिसते. परिवर्तनाचा पहिला टप्पा १९०० ते १९४० पर्यंतच्या काळातील मानता येईल. या कालखंडाला ‘नवोदय युग’ असे यथार्थपणे म्हटले जाते. साहित्य हे समाजाभिमुख असावे व सर्वसामान्य व्यक्तीच्या सुखदुःखांच्या चित्रणाद्वारे सामाजिक पुनर्रचनेस साहित्याने मदत करावी, अशा ध्येयाने प्रेरित झालेला ‘प्रगतिशील काळ’ १९४० ते १९५० पर्यंतचा होता. आधुनकि कन्नड साहित्यातील हा परिवर्तनाचा दुसरा टप्पा. तिसर्‍या परिवर्तनाचा टप्पा १९५० पासून पुढे सुरू होतो. त्याला ‘नव्य-युग’ (नवयुग) म्हटले जाते. ह्या तीन टप्प्यांत निर्माण झालेल्या कन्नड साहित्याचा स्थूल आढावा पुढील साहित्यप्रकारांनुसार देणे सोयीचे ठरेल.

काव्य : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस होसगन्नडमधील कवितेचा उदय झाला. अनुवाद आणि स्वतंत्र भावगीतांच्या रचनेस एन्‌. जी. नरसिंहाचार, हट्टि यंगडी नारायणराव व पंजे मंगेशराव यांनी सुरुवात केली होती. नवकन्नड काव्याचा राजमार्ग खुला करणारे कवी म्हणून बी. एम्‌. श्रीकंठय्यांचा (१८८६-१९४६) उल्लेख करता येईल. एम्‌. गोविंद पै, साली रामचंद्रराव, डी. व्ही. गुंडप्प (१८८९ – ), के. व्ही. पुट्टप्प ऊर्फ ‘कुवेंपु’, è द. रा. बेंद्रे, पु. ति. नरसिंहाचार्य (१९०५ – ), राजरत्नम्‌ (१९०६ – ), मास्ती वेंकटेश अयंगार ऊर्फ ‘श्रीनिवास’ (१८९१ – ), रं. श्री. मुगळी ऊर्फ ‘रसिकरंग’ (१९०६ – ), एस्‌. व्ही. परमेश्वरभट्ट, कडेंगोड्लू (१९०४ –   ) इ. ह्या काळातील महत्त्वाचे कन्नड कवी होत. भावगीत लेखनात कुवेंपु यांनी मोलाची भर घातली. त्यांच्या भावगीतींत निसर्ग, प्रेम, अध्यात्म, राजकारण इ. अनेक विषय आले आहेत. त्यांचे कोळलु, नविलु, पांचजन्य हे भावगीतसंग्रह श्रेष्ठ प्रतीचे ठरले आहेत. चित्रांगदा हे खंडकाव्य आणि श्रीरामायणदर्शनम्‌ हे महाकाव्यही त्यांनी रचले आहे. द. रा. बेंद्रे यांनी ‘अंबिकातनयदत्त’ या टोपणनावाने लिहिलेल्या गरि, नादलीले, उय्यालें, नाकुतंति, मर्यादे ह्या रचना विशेष उल्लेखनीय होत.

कन्नड नवकाव्य १९५० नंतर जरी विशेष विकसित झाले असले, तरी नवकाव्याची सुरुवात मात्र १९३६ साली पंजावर सदाशिवराय आणि वि. कृ. गोकाक ऊर्फ ‘विनायम’ (१९०९ -) या कवींपासून झाली, असे मानल जाते. नवकवींमध्ये è गोपाल कृष्ण अडिग (१९१८ – ) हे अग्रगण्य ठरतात. चंडेमद्दळे (१९५४), भूमिगीत (१९५९) आढळतात. वर्धमान (१९७२) हे त्यांचे महत्त्वाचे काव्यसंग्रह आहेत. विनायकांच्या काव्यसंग्रहातील बाळदेगुलदल्लि, उगम, द्यावा पृथिवि, इंदिल्लनाळे हे काव्यसंग्रह उल्लेखनीय आहेत. नवकवींमध्ये के. एस्‌. नरसिंहस्वामी (शिलालते, मनेयंदमनेगे), गंगाधन चित्ताल (हरिवनीरिदु), रामचंद्र शर्मा (एळु सुत्तिन कोटे, हेसरगत्ते  – १९७२), ए. के. रामानुजन्‌ (होक्कुळल्लि हुविल्ल – १९७०) व पी. लंकेश (बिच्‌चु) ह्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. चंद्रशेखर पाटील, सिद्धलिंग पट्टणशेट्टी, यू. आर. अनंतमूर्ती, चेन्नय्य, एच्‌. एम्‌. दोड्डरंगेगौड, चंद्रशेखर कंबार, निस्सार अहमद, सुब्राय चोक्काडी, पूर्णचंद्र तेजस्वी, श्रीकृष्ण आलनहळ्ळी इ. नवकाव्याच्या परंपरेतील दुसर्‍या पिढीचे कवी होत. जी. एस्‌. शिवरुद्रप्प (१९२६ – ) आणि चेन्नवरी कणवी (१९२८ – ) हे दोघे स्वच्छंदतावादाकडून नवकाव्याकडे वळलेले थोर कवी आहेत. कथा-कादंबरी क्षेत्रांत विपुल लेखन करणार्‍या स्त्रीलेखिका आढळतात तथापि काव्यक्षेत्रात मात्र कवयित्रींचे प्रमाण कमी आढळते. जयदेवीताई लिगाडे (जयगीत, सिद्धरामपुराण) व पार्वतीदेवी हेगडे (वेणिपुष्प) ह्या दोन कवयित्रींचा उल्लेख करता येईल.

कादंबरी : बी. वेंकटाचार्य यांनी बंगाली कादंबर्‍यांच्या कन्नड अनुवादाने कन्नड कादंबरीवाङ्मयाची सुरुवात केली. कन्नडमधील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणजे रेंट्ल वेंकट सुब्बराव यांची केसरी विलास (१८९५) ही होय. गुल्वाडी वेंकटराय (१८४४-१९१३) यांच्या इंदिराबाई अथवा सद्धर्मविजय (१८८९), भागीरथी आणि सीमंतिनी बोळार बाबूराव यांची वाग्देवि (१९०५) गळगनाथ (१८६९-१९४२) यांची प्रबुद्धपद्मनयने (१८९८) इ. कादंबर्‍या, लोकप्रिय झाल्या असल्या, तरी ‘कादंबरी’ हे अभिधान यथार्थपणे लागू पडेल, अशी पहिली कन्नड कादंबरी म्हणजे एम्‌. एस्‌. पुट्टण्ण यांची माडिद्दुण्णो महाराय (१९१४) ही होय. त्यावेळचे इतर महत्त्वाचे कादंबरीकार म्हणजे गळगनाथ, वासुदेवाचार्य केरूर (१८६६-१९२१) इ. होत. è गळगनाथांना हरी नारायण आपटे यांच्याकडून स्फूर्ती लाभली. त्यांनी हरिभाऊंच्या गड आला पण सिंह गेला या कादंबरीचा अनुवाद कमल कुमारी (१९१०) या नावाने केला. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात असलेले साहित्याचे महत्त्वपूर्ण स्थान गळगनाथांनी ओळखले होते. निद्रिस्त जनतेला जागे करण्याकरिता त्यांनी अनेक ऐतिहासिक कादंबर्‍या रचल्या. त्यांतील कथानके राजपूत, मराठे आणि विजयानगरचे साम्राज्य यांविषयीची आहेत. è वासुदेवाचार्य केरूर यांची इंदिरे (१९०८) ही सामाजिक कादंबरी होय. तीत विधवाविवाह, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य इं. प्रश्न त्यांनी हाताळले आहेत. औरंगजेब आणि यदुमहाराज ह्या त्यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक कादंबर्‍या आहेत. याच सुमारास श्रीमती तिरुमलम्म यांनीही अनेक चांगल्या कादंबर्‍या लिहिल्या आहेत.

१९२० ते १९३० ह्या काळास कन्नड कादंबरीचे युग म्हटले जाते. मंत्रतंत्राच्या बाबतीत या काळातील कन्नड कादंबरीत नावीन्य आले. या काळातील प्रमुख कादंबरीकार म्हणून è के. व्ही. पुट्टप्प (१९०४), शिवराम कारंत (१९०२ –  ), अ. न. कृष्णराव, आनंद कंद (१९०० –  ), रं. श्री. मुगळी, कडेंगोड्लू, आद्य रंगाचार्य ऊर्फ ‘श्रीरंग’ (१९०४ – ), मिर्जी अण्णाराय, è देवुडू, श्रीनिवास (१८९० –  ), गोरूर रामस्वामी अयंगार (१९०४ – ), ‘विनायक’ इत्यादींचा उल्लेख करता येईल. कुवेंपू यांच्या कानुरु सुब्बम्म हेग्गडिति (१९३६) आणि मळेकळल्लि मदुमगळु या दोन दीर्घ कादंबर्‍या श्रेष्ठ प्रतीच्या मानल्या जातात. शिवराम कारंत यांनी आतापर्यंत सु. चौतीस कादंबर्‍या लिहिल्या. कारंत हे एक विकसनशील कादंबरीकार होत. त्यांच्या कथानकांतील वैविध्य आणि तंत्र कौतुकास्पद आहे. त्यांच्या चोमन दुडि (१९३३), मरळि मण्णिगे (१९४२), औदार्यद उरुळल्लि, अळिद मेले (१९६०) इ. कादंबर्‍या उल्लेखनीय होत. कारंत यांनी पण लक्ष्यात कोण घेतो? या हरिभाऊंच्या कादंबरीचा कन्नड अनुवादही केला आहे. [è कारंत, कोट शिवराम]. è अ. न. कृष्णराव (१९०८-१९७१) हे लोकप्रिय कादंबरीकार असून पुरोगामी साहित्याच्या चळवळीचे प्रवर्तक होते. त्यांच्या संध्याराग, नटसार्वभौम इ. कादंबर्‍या उल्लेखनीय आहेत. कन्नडमध्ये ऐतिहासिक आणि राजकीय कादंबर्‍याही निर्माण झाल्या. अ. न. कृष्णराव-परंपरेतील त. रा. सुब्बराव, बसवराज कट्टीमनी (१९१९ –  ), कृष्णमूर्ती पुराणिक (१९१३ – ), निरंजन (१९२३ –  ), बीची ऊर्फ भीमसेन रायसम्‌ (१९१३ –  ) हे महत्त्वाचे कादंबरीकार आहेत.


स्वातंत्र्योत्तर काळात कन्नडमध्ये विपुल कादंबरीलेखन झाले. काम्यू, काफ्‌का इ. यूरोपीय कादंबरीकारांच्या प्रभावामुळे त्यात नवे प्रवाहही निर्माण झाले. यशवंत चित्ताल (मुरु दारिगळु), शांतिनाथ देसाई (मुक्ति, विक्षेप – १९७२), यू. आर्‌. अनंतमूर्ती (संस्कार), गिरी (गति-स्थिति – १९७१), लंकेश (बिरुकु), कुसुमाकर (नाल्कनेय आयाम), पूर्णचंद्र तेजस्वी (स्वरूप) इत्यादींच्या कादंबर्‍या दर्जेदार मानल्या जातात. एस्‌. एल्‌. भैरप्प यांच्या वंशवृक्ष, नायिनेरळु, धर्मश्री इ. कादंबर्‍यांनाही उच्च स्थान लाभले आहे. कादंबरीलेखिकांमध्ये त्रिवेणी, अनुपमा निरंजन (१९३४ – ), वाय्‌. व्ही इंदिराबाई, एम्‌. के. इंदिरा, मल्लिका इ. प्रसिद्ध आहेत.

कथा : कन्नडमधील सुरुवातीचे कथाकार म्हणजे एम्‌. एन्‌. कामत, è पंजे मंगेशराव, वासुदेवाचार्य केरूर इ. होत. कन्नड कथाकारांमध्ये श्रीनिवासांना अग्रस्थान आहे. वैपुल्य, वैचित्र्य, गुणवत्ता इ. बाबतींत श्रीनिवासांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्याचप्रमाणे कुवेंपू, पु. ति. न. (पु. ति. नरसिंहाचार्य), आनंद, आनंदकंद, के. गोपाल-कृष्णराय, द. रा. बेंद्रे, अ. न. कृष्णराव, त. रा. सुब्बराव इ. कथाकारही उल्लेखनीय होत. कन्नड कथेत स्वातंत्र्योत्तर काळात परिवर्तन घडून तिने नवकथेचे वळण घेतले. रामचंद्र शर्मा, यू. आर्‌. अनंतमूर्ती, के. सदाशिव, पी. लंकेश, शांतिनाथ देसाई, यशवंत चित्ताल व पूर्णचंद्र तेजस्वी हे ख्यातनाम नवकथाकार होत.

नाटक : विषमविवाहाची शोकांतिका ही कथावस्तू असलेले इग्गप्प हेग्गडेय प्रहसन (१८८७) हे कन्नडमधील पहिले सामाजिक नाटक होय. सामाजिक प्रश्न मांडणार्‍या नाटकांची परंपरा निर्माण करण्याचे श्रेय टी. पी. कैलासम्‌ (१८८२-१९४६) व श्रीरंग यांना दिले जाते. या दोघांनी अनेक नाटके लिहिली आहेत. श्रीरंग [è आद्य रंगाचार्य] हे आजही दर्जेदार नाट्यलेखन करीत आहेत. या दोघांनीही आपल्या नाटकांतून गंभीर सामाजिक समस्या हाताळल्या आहेत. विषादमिश्रित व्यंग्यदर्शन व विडंबन हे दोघांच्याही नाट्यलेखनात प्रभावी ठरले आहे. è टी. पी. कैलासम्‌ (वैद्यन व्याधि, होम्‌रुलू, हुत्तदल्लि हुत्त, टोळ्ळु गट्टि, कीचक) श्रीरंग (हरिजन्वार, शोकचक्र, केळुजनमेजय, शतायु गतायु, रंगभारत) द. रा. बेंद्रे (उद्धार, होससंसार) शिवराम कारंत (मुक्तद्वार, गर्भगुडि, बित्तिद बळे) कुवेंपू (रक्ताक्षि, जलगार) श्रीनिवास (शिवछत्रपति, मंजुळा, तिरुपाणि, राकन कोटे) इ. नाटककार विशेष उल्लेखनीय होत.

ह्या नाट्यसाहित्यात पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक असे विषयानुसारी प्रकार असून, त्यात संगीतिका, एकांकिका, आकाशवाणीसाठी लिहिलेल्या श्रुतिका इत्यादींचाही अंतर्भाव होतो. या सर्वच प्रकारांत दर्जेदार निर्मिती सातत्याने होत आहे. प्रभावी संगीतिकांची रचना करून शिवराम कारंत व पु. ति. नरसिंहाचार्य यांनी ह्या प्रकारात मौलिक भर घातली आहे. पु. ति. नरसिंहाचार्य यांच्या अहल्ये व गोकुळ निर्गमन या संगीतिका श्रेष्ठ मानल्या जातात.

पर्वतवाणी, क्षीरसागर इत्यादींनी सुंदर प्रहसने रचली आहेत. अलीकडे कन्नडमध्ये नाट्यलेखनाचे नवनवीन प्रयोग होत आहेत. गिरीश कार्नाड (ययाति, तुघलक, हयवदन) चंद्रशेखर कंबार (ऋष्यशृंग) व पी. लंकेश (एळु नाटकगळु) यांनी नाट्यलेखनात विविध प्रयोग करून मोलाची भर घातली. व्यस्ततावादी अथवा मृषानाट्याचीही सुरुवात कन्नडमध्ये झाली आहे. चंद्रशेखर पाटील, न. रत्न, चंद्रकांत कुसनूर इत्यादींची नाटके या दृष्टीने उल्लेखनीय होत. अलीकडे बालरंगभूमीकरताही नाटके लिहिली जाते आहेत. होयिसळ (अगिलिन मगळु) जी. सदाशिवय्य (सौंपिन सागर) कुवेंपू (मोडण्णन तम्म)

के. राजराय (बाबरन पाठ, अम्म) बी. व्ही. कारंत (पंजरशाले) यांचा या दृष्टीने उल्लेख करता येईल.

चरित्र, आत्मचरित्र, निबंध, प्रवासवर्णन, गौरवग्रंथ, वैज्ञानिक साहित्य, वैचारिक साहित्य, तत्त्वज्ञानपर लेखन, साहित्यसमीक्षा अशा विविध अंगांनी कन्नड गद्याचा विकास होत आहे. त्यातील काही ठळक कृतींचा उल्लेख करावा लागेल. च. वासुदेवय्यकृत छत्रपति शिवाजी, डी. व्ही. गुंडप्पा यांचे गोपालकृष्ण गोखले व रंगाचार्लु, कुवेंपूलिखित रामकृष्ण व विवेकानंद, देजगौकृत कुवेंपु ही चरित्रे उल्लेखनीय होत. भारतीय व परकीय महापुरुषांची स्वतंत्र व अनुवादित कन्नड चरित्रे पुष्कळ आहेत. श्रीनिवास (भाव – तीन खंड, १९६८-६९) शिवराम कारंत (हच्चु मनस्सिन हत्तु मुखगळु) देजगौ (होराटद बदुकु – १९६८) जी. पी. राजरत्नम्‌ (हत्तु वरुष – १९३९) श्रीरंग (नन्न नाट्य नेनपुगळु) इत्यादींची आत्मचरित्रे उल्लेखनीय आहेत. म. गांधी, पं. नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद इत्यादींची आत्मचरित्रेही कन्नडमध्ये अनुवादित झाली असून, ती लोकप्रिय ठरली आहेत. टॉलस्टॉय, डार्विन इत्यादींची आत्मचरित्रे कन्नडमध्ये अनुवादित झालेली आहेत.

बंकिमचंद्रांच्या बंगाली निबंधाच्या अनुवादाने (बी. वेंकटाचार्य – लोकरहस्य – १८९८) कन्नड साहित्यात निबंध-वाङ्मयाची सुरुवात झाली. तथापि त्याचा विकास मात्र अगदी अलीकडे झाला आहे. ना. कस्तूरी (उपाय वेदान्त) ए. एन्‌. मूर्तिराव (हगलुगनसुगळु, अलेयुष मन) व्ही. सीतारामय्य (बेळुदिंगळु – १९५९) पु. ति. नरसिंहाचार्य (ईचलु मरद केळगे – १९४९) कुवेंपू (मलेनाडिन चित्रगळु) राकू (गाळिपट – १९६०) हा. मा. नायक (नम्म मनेय दीप) हे प्रमुख निबंधकार आहेत. प्रवासवर्णनात शिवराम कारंत (अबूविंद बरामक्के, अपूर्व पश्चिम) रा. शि. ऊर्फ बी. शिवराम (कोरवंजिय पडुवणयात्रे) कृष्णानंद कामत (नानू अमेरिकेगे होगिद्दे) दिनकर देसाई (नाकंड पडुषण) यांची प्रवासवर्णने महत्त्वाची आहेत. वैज्ञानिक साहित्यात शिवराम कारंतांचे नाव विसरता येणार नाही. विज्ञान प्रपंच नावाच्या विज्ञानविषयक विश्वकोशाचे चार खंड त्यांनी प्रकाशित केले आहेत. आर्‌. एल्‌. नरसिंहय्य यांनी विज्ञानविषयक अनेक ग्रंथ लिहिले आहेत. वैचारिक साहित्याच्या बाबतीतही महत्त्वाची भर पडत आहे. कर्नाटकातील तिन्ही विद्यापीठांतून याविषयी पुष्कळ प्रगती झाली आहे. त्यांच्या वतीने विज्ञानाला वाहिलेली नियतकलिके प्रसिद्ध होत आहेत. वैचारिक साहित्याच्या व संशोधनाच्या बाबतीत शं. बा. जोशी यांनी बहुमोल कार्य केले आहे.

बी. एम्‌. श्रीकंठय्या, श्रीनिवास, द. रा. बेंद्रे, डी. व्ही. गुंडप्पा, ती. न. श्रीकंठय्य, टी. एस्‌. वेंकण्णय्य, ए. आर्‌. कृष्णशास्त्री, एस्‌. व्ही. रंगण्ण, कुवेंपू, रं. श्री. मुगळी यांनी दर्जेदार साहित्यसमीक्षा केली आहे. एस्‌. व्ही. रंगण्ण यांनी शोकात्मिकेवर एक बृहद्ग्रंथ लिहिला आहे. नवसाहित्याच्या रचनेबरोबरच त्याची समीक्षाही निर्माण झाली. वि. कृ. गोकाक, देजगौ, गोपालकृष्ण अडिग, कीर्तिनाथ कुर्तकोटी, यू. आर्‌. अनंतमूर्ती, सुब्राय चोक्काडी, एम्‌. जी. कृष्णमूर्ती, जी. एस्‌. आमूर इत्यादींची विधायक साहित्यसमीक्षा कन्नड साहित्याला उपकारक ठरली आहे. आर्‌. सी. हिरेमठ, एम्‌. चिदानंद इत्यादींनी प्राचीन साहित्यकृतींची समीक्षा केली आहे. प्राचीन ग्रंथांची सुधारलेली अगर नवी सटीप आवृत्ती काढणे, त्यांचा संग्रह प्रसिद्ध करणे इ. स्वरूपाचे लेखनही सतत चालू आहे. हे काम आता शास्त्रशुद्ध रीतीने होत आहे. गौरवग्रंथांना कन्नड साहित्यात विशिष्ट स्थान लाभले आहे. संभावने (बी. एम्‌. श्रीकंठय्या यांच्याविषयी), पंजेयवर नेनपिगागी (पंजे मंगेशराव यांच्या स्मरणार्थ), श्रद्धांजलि, कर्नाटक दर्शन अभिवंदने, ओसगे, बागिन, उपायन, गंगोत्रि, दीविगे, कारंत प्रपंच, श्रीनिवास (१९७२) हे प्रमुख गौरवग्रंथ आहेत. कन्नड साहित्यसमीक्षेबाबत नियतकालिकेही महत्त्वाचे कार्य करीत आहेत. प्रबुद्धकर्णाटक (१९१९), संक्रमण (१९६५), साक्षि (१९६७), समन्वय, साधने (१९७२), कर्नाटक भारती, विज्ञानभारती, मन्वंतर ही दर्जेदार कन्नड नियतकालिके आहेत. भाषाशास्त्राच्या बाबतीत एच्‌. एस्‌. बिलिगिरी, के. शंकरभट्ट, प्र. गो. कुलकरणी इत्यादींचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. कन्नडमध्ये विश्वकोश आणि मुलांकरिता ज्ञानकोश प्रसिद्ध होत आहेत. कन्नड शब्दसंपदेचा बृहद्कोश तयार होत असून, आतापर्यंत त्याचे दोन खंड प्रसिद्ध झाले आहेत.


सामान्य जनता, विद्वज्जन, शासन आणि विद्यापीठे आपल्या सर्व शक्तिनिशी कन्नड भाषा-साहित्याच्या अभिवृद्धीसाठी जिद्दीने व एकोप्याने परिश्रम करीत आहेत. म्हणून आजच्या कालखंडास कन्नड साहित्याचे सुवर्णयुग म्हणता येईल.

म्हैसूर विद्यापीठाने अलीकडे प्रसिद्ध केलेल्या कन्नड ग्रंथसूचि (खंड पहिला) याच्या आधारे म्हणावयाचे झाल्यास इ. स. १८१७-१९६८ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या कन्नड ग्रंथांची संख्या ३,५०,००० इतकी आहे. ज्या ग्रंथांची नावे ज्ञात आहेत, परंतु ते ग्रंथ उपलब्ध नाहीत अशा ग्रंथांची संख्या सु. १०,००० आहे. प्रसिद्ध झालेले वैज्ञानिक ग्रंथ १,१४९ आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत यांची संख्या आणखी वाढली आहे.

कन्नड भाषा-साहित्याच्या अभिवृद्धीसाठी ठिकठिकाणी अनेक संघ व संस्था कार्य करीत आहेत. त्यांपैकी ‘कर्नाटक विद्यावर्धक संघ’ (१८९०), ‘ कन्नड साहितय परिषत्तु’ (१९१५) व ‘कन्नड संशोधने संस्थे’ (१९३९) या विशेष महत्त्वाच्या संस्था होत.

संदर्भ : 1. Hukkerikar, R. S. Ed. Karnataka Darsana, Bombay, 1955.

2. Mugali, R. S. The Heritage of Karnataka, Bangalore, 1946.

3. Narasimhacharya, R. A. History of Kannada Literature, Mysore, 1940.

4. Rice, E. P. Kanarese Literature, Calcutta, 1921.

5. Srikanthayya, T. N. Kannada Literature, Bombay, 1946.

६.दिवेकर, गु.व्यं.कानडीसाहित्यपरिचय, मुंबई, १९७१.

७.मुगळी, रं.श्री. अनु.सिद्धगोपाल, कन्नडसाहित्यकाइतिहास, दिल्ली, १९७१.

८.रेड्डी, जी.सुंदर, दक्षिणभाषाएँऔरउनकासाहित्य, लखनौ, १९६७.

दिवाणजी, व. अ. (क.) कुलकर्णी, मा. गु. (म.)