कैलासम्, त्यागराज परमशिव : (२९ जुलै १८८४–२३ नोव्हेंबर १९४६). कन्नड भाषेतील अग्रगण्य नाटककार. ‘कैलासम्’ किंवा ‘कै.’ या नावाने प्रसिद्ध. जन्म म्हैसूर येथे. १९०७ साली मद्रास विद्यापीठाची भूविज्ञानाची पदवी. लंडन येथील ‘रॉयल कॉलेज ऑफ सायन्स’मधून भूविज्ञानातील उच्च पदवी संपादन करून भारतात परत आले (१९१५). म्हैसूर सरकारच्या भूविज्ञान खात्यात काही काळ त्यांनी काम केले परंतु तिथे मन न रमल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि स्वतःस नाट्यलेखनाला वाहून घेतले. लंडनमध्ये यूजीन सँडोच्या सान्निध्यात असल्यामुळे शरीरवर्धन व बलोपासनेचा त्यांना छंद जडला. ते एक उत्तम क्रीडापटूही होते. कैलासम् यांना कन्नडमधील आधुनिक रंगमंचाचे (रंगभूमीचे) जनक म्हणता येईल. त्यांच्या पूर्वीची कन्नड नाटके मराठी नाटकांचे अनुवाद असत किंवा त्यांचे अनुकरण करून लिहिलेली असत. पण कन्नडभाषी सामान्य जनांच्या समस्या सामान्यांच्या भाषेतच रंगमंचावर आणून लोकप्रिय प्रयोग करण्याचे श्रेय कैलासम् यांनाच दिले जाते. सुशिक्षित सामाजात नाट्यकलेला मानाचे स्थान त्यांच्यामुळेच लाभले.

शाब्दिक कोट्या, बुद्धिगम्य विनोद तसेच विडंबन-गीते यांविषयी ते प्रसिद्ध असून त्यांचे अनेक किस्से प्रचलित आहेत. आयुष्यभर ते कलंदर वृत्ताने जगले. त्यांचा चाहतावर्ग व मित्रवर्ग मोठा होता व त्यांनीच त्यांच्याकडून नाटके लिहून घेतली, रंगभूमीवर आणली व पुस्तकरूपाने प्रसिद्धही केली. त्यांच्या काही नाटकांची हस्तलिखिते गहाळ झाली असून काही अप्रकाशित आहेत. १९४५ साली मद्रास येथे भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

त्यांनी लिहिलेल्या नाटकांत टोळ्ळुगट्टि (१९२२), होमे रूले (१९३०), अम्माव्र गंड (१९४३), ताळिकट्टोक्कूलीने (१९४१), सूळे (१९३३), हुत्तदल्लि हुत्त (१९४१), बंडवाळ्‌‌विल्लद बडायि (१९४२) ही विशेष प्रसिद्ध होत. इंग्रजीमध्येही त्यांनी पर्पज (१९४४), लिट्ल लेज अँड फ्लेज (१९३३) ही नाटके लिहिली असून पर्पज हे एकलव्य वा प्रयोजन या नावाने कन्नड, संस्कृत, मराठी, हिंदी व बंगाली या भाषांत अनुवादित झाले आहे. अम्माव्र गंड  हे नाटक तमिळ, तेलुगू व हिंदी भाषांत अनुवादित झाले असून होमे रूले  हे कोकणी व तेलुगूमध्ये अनुवादित झाले आहे. त्यांच्या हयातीत व नंतर त्यांच्याविषयी व त्यांच्या नाटकांविषयी बरीच पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांपैकी कैलास कथन  अथवा गुंडू भंडार मथन  आणि कैलासम् नेनपु (जी. पी. राजरत्नम् – अनुक्रमे १९४५ आणि १९४८), कैलासम् (अ.न. कृष्णराव – १९४७), कैलासम् दर्शन (के.व्ही. सुब्बण्ण संपा. – १९५०), नानु कंड कैलासम् (के. कृष्ण अयंगार – १९४५) ही उल्लेखनीय होत.

उपहासगर्भ विनोदी शैली, इंग्रजीमिश्रित कन्नड, बोलीभाषेचा केलेला समर्पक उपयोग, जिवंत व उठावदार पात्रयोजना व अनेक सामाजिक प्रश्नांवरील निर्भीड प्रतिक्रिया यांमुळे त्यांची नाटके वैशिष्ट्यपूर्ण ठरली असून त्यांत मनोरंजनाबरोबरच सामाजिक उद्‍बोधनही आढळते. बोलीभाषा लेखनात तंतोतंत उतरविताना जोडाक्षरांचा उपयोग करून त्यांनी एक नवा भाषाप्रयोग रूढ केला. ‘कर्नाटक प्रहसनप्रपितामह’ असा त्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो. बंगलोर येथे त्यांचे निधन झाले.

वर्टी, आनंद