षडक्षर देव : (सतरावे शतक). मध्ययुगीन वीरशैव कन्नड कवी. कर्नाटकमधील दगनुरू (मळवल्ली तालुका) येथे जन्म. बालपणापासूनच त्याची धार्मिक वृत्ती दिसून येते. वयाच्या अकराव्या वर्षापासूनच त्याने काव्यरचनेस सुरूवात केली. संस्कृत व कन्नड अशा दोन्ही भाषांवर त्याचे प्रभुत्व होते व या दोन्ही भाषांमध्ये त्याने काव्यरचना केली. त्याच्या कन्नड काव्यगंथांमध्ये राजशेखर विलास (१६५७), वृषभेंदुविजय (१६७१) व शबरशंकर विलास या ⇨ चंपूकाव्यां चा समावेश होतो. चंपूकाव्य-प्रकाराचे पुनरूज्जीवन घडवून आणण्यात त्याचा वाटा मोठा होता. कविकर्णरसायन, वीरभद्रौदारणनिलांबिका स्तोत्र या त्याच्या संस्कृत काव्यरचना होत. प्रतिभा व पांडित्य यांचा संगम त्याच्या काव्यात आढळतो. वृषभेंदुविजय हे बसवेश्वराच्या चरित्रावर आधारित महाकाव्य असून, त्याचे ४२ सर्ग व ४,००० श्लोक आहेत. षडक्षर देवाच्या विद्वत्तेचे व कविप्रतिभेचे प्रगल्भ दर्शन त्यातून घडत असल्याने ते त्याचे सर्वोत्कृष्ट काव्य गणले जाते. राजशेखर विलास हे त्याचे सर्वांत प्रसिद्ध चंपूकाव्य असून, पंचाक्षरी मंत्राची महती त्यात वर्णिली आहे. षट्पदीशिवाय बहुतेक सर्व वृत्ते त्यात आढळतात. यात सत्येंद्र चोल राजाच्या न्यायनिष्ठुरपणाची कथा असून तो आपल्याकडून घडलेल्या अपघाती प्राणहत्येपायी स्वतः देहान्त शिक्षा स्वीकारतो. त्यामुळे त्याचा परममित्र मितवचन आत्महत्या करतो आणि त्याची आई व पत्नीही प्राणत्यागास तयार होतात तथापि भगवान शंकर त्यांना या विचारापासून परावृत्त करतो, मृतांचे पुनरूज्जीवन करतो व सत्येंद्र चोलास सद्‌गती देतो. हा कथाभाग या काव्यात आला आहे. शृंगार, करूण व भक्ती या रसांना त्यात प्राधान्य आहे. शबरशंकर विलास या काव्यात किरातार्जुनीय युद्ध व शिवलीला यांचे वर्णन तसेच शंकराने अर्जुनाला पाशुपतास्त्र दिल्याचा कथाभाग एकूण पाच सर्गांत वर्णिला आहे. षडक्षर देवाच्या संस्कृत काव्यरचनाही कन्नडप्रमाणेच भक्तिप्रधान असून त्या वीरशैव पंथाच्या प्रसारार्थ रचल्या आहेत तथापि या संस्कृत काव्यांमध्ये उत्स्फूर्ततेपेक्षा काव्यरचनेचे प्रयासच जास्त आढळतात.

सतराव्या शतकातील वीरशैव पंथीय चंपूकवींमध्ये षडक्षर देव हा श्रेष्ठ मानला जातो. दगनुरू मठाचा वीरशैव अधिपती स्वामी चिक्कवीर देशिक हा षडक्षराचा गुरू होय. षडक्षर देव हा येळंदूर मठाचा अधिपती होता. तिथेच त्याचे देहावसान झाले.

इनामदार, श्री. दे.