दुर्गसिंह : (अकरावे शतक). हा चालुक्य राजा जगदेकमल्ल द्वितीय जयसिंह (१०१८–४२) याचा सेनापती आणि राजकवी होता. सय्याडी (किसुकाडुनाड) येथील एका स्मार्त (शिव आणि विष्णू या दोन्ही दैवतांची उपासना करणाऱ्या) ब्राह्मण कुटुंबात याचा जन्म झाला. याने पंचतत्र  हा एकमेव ग्रंथ रचल्याचे आढळते. विष्णुशर्मारचित संस्कृत पंचतंत्राहून हे वेगळे असून वसुभागभट्ट याने गुणाढ्याच्या बृहत्कथेतील काही कथांचा समावेश करून रचलेल्या संस्कृत पंचतंत्रावर आधारलेले आहे. म्हैसूरचे सुविख्यात वैदिक आणि प्राच्यविद्या–संशोधक ए. वेंकटसुब्बय्या यांनी दुर्गसिंहाचे कन्नड चंपूतील पंचतंत्र  सर्वप्रथम प्रकाशात आणले. यावर अजूनही संशोधन होत असून वरदराज हुइलगोळ यांच्या या विषयावरील प्रबंधास शिवाजी विद्यापीठाने डॉक्टरेटची पदवी दिली आहे. अकराव्या शतकात कन्नड साहित्यावर जैन मताचे वर्चस्व असल्याने दुर्गसिंहाचे पंचतंत्र  जैन नीतिशास्त्रावर आधारलेले आहे तथापि दुर्गसिंह स्मार्तसंप्रदाय मानणारा होता, हे त्याने बांधविलेल्या हरिहरांच्या देवस्थानावरून स्पष्ट होते. मार्ग–देसी या मिश्र शैलीतील या चंपूचा बराच भाग गद्यात आहे. एका स्मार्त ब्राह्मणाचे जैनमतपर पंचतंत्र  म्हणून दुर्गसिंहाच्या या चंपूला कन्नड साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे.

मळगी, से. रा. (क.) कायकिणी, गौरीश (म.)