गळगनाथ: (५ जानेवारी १८६९–२२ एप्रिल १९४२). प्रसिद्ध कन्नड कांदबरीकार. त्यांचे संपूर्ण नाव वेंकटेश तिरको कुलकर्णी असले, तरी ते कन्नड साहित्यात ‘गळगनाथ’ नावानेच विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म गळगनाथ (जि. धारवाड) येथे झाला.

गळगनाथ

धारवाडच्या अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये असतानाच त्यांनी कांदबरीलेखन सुरू केले. उत्तर कर्नाटकाचा भाग पूर्वीच्या मुंबई इलाख्यात होता. त्यामुळे तेथील सुशिक्षितांचा मराठी भाषेशी घनिष्ठ संबंध होता. मराठी साहित्यातील कांदबरी हा वाङ्‍मयप्रकार त्या नावासह कर्नाटकात लोकप्रिय झाला, तो मुख्यतः गळगनाथांनी केलेल्या मराठी कांदबऱ्यांच्या कन्नड भाषांतरामुळे किंवा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरांनी लिहिलेल्या स्वतंत्र कांदबऱ्यांमुळेच, असे म्हणता येईल. प्रबुद्ध पद्मनयने  (१८९८) या त्यांच्या पहिल्याच कांदबरीला ‘कर्नाटक विद्यावर्धक संघा’चे पारितोषिक मिळाले. चारपाच ठिकाणी अध्यापनाच्या निमित्ताने भ्रमंती झाल्यावर त्यातून निवृत्त होऊन, अगेडी येथे गळगनाथांनी स्वतःचे गुरुकुल स्थापन केले. संस्कृत पाठशाळा, कांदबरीलेखन आणि सद्‍बोध चंद्रिके  या नियतकालिकाचे प्रकाशन, यांना त्यांनी स्वतःस वाहून घेतले. बारा वर्षांनंतर काही कारणामुळे त्यांना अगेडी सोडावे लागले. त्यानंतर हावेरी येथे त्यांनी पाठशाळा स्थापन केली व द्‍गुरू  नावाचे नियतकालिक सुरू केले. आयुष्याच्या अखेरीअखेरीस कर्ज फेडण्यासाठी दारोदार स्वतःची पुस्तके त्यांना विकावी लागली.

प्रारंभापासून त्यांच्यावर लोकमान्य टिळक यांच्या केसरीचा आणि हरी नारायण आपटे यांच्या करमणूकचा बराच प्रभाव होता. ह. ना. आपटे यांच्या कांदबऱ्या कन्नडमध्ये अनुवादित करून त्यांनी कन्नड जनतेला वाचनाची गोडी लावली. हरिभाऊंच्या गड आला पण सिंह गेला, उषःकाल आणि वज्राघात ह्या कांदबऱ्यांचे त्यांनी केलेले कन्नड अनुवाद अनुक्रमे कमलकुमारी (१९१०), ईश्वरीसूत्र (१९१३) आणि कन्नडीगर कर्मकथे (१९१६) हे होत. त्यांनी लिहिलेल्या प्रबुंद्ध पद्मनयने व्यतिरिक्तच्या महत्त्वपूर्ण स्वतंत्र कांदबऱ्या कुमुदिनी (१९१३), माधवकरूणाविलास (१९१३), सत्त्वसार (१९१५) इ. होत. त्यांच्या स्वतंत्र अनुवादित कांदबऱ्यांची एकूण संख्या साठाच्या घरात जाते. यांशिवाय महाभारताची सोळा पर्वे आणि अध्यात्म रामायण हे त्यांचे गद्य साहित्य अजून अप्रकाशित आहे.

कन्नड जनतेमध्ये वाचनाभिरुची वाढवून, आपल्या कांदबऱ्यांच्या द्वारे त्यांनी सांस्कृतिक जागृतीचे कार्य केले. कन्नड कांदबरीचा भक्कम पाया घालण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. बंगलोर येथे ते निधन पावले.

वर्टी, आनंद