चामरस : (पंधरावे शतक). बसवेश्वरांच्या नंतर सु. तीनशे वर्षांनी वीरशैव (लिंगायत) मताचे पुनरुज्जीवन करण्यात यशस्वी ठरलेला मध्ययुगीन कन्नड कवी. ह्यांच्या जीवनाबाबत फारशी अधिकृत माहिती मिळत नाही. प्रौढदेवराय (कार. १४१९–४६) याच्या काळातील चामरस हा श्रेष्ठ विरक्त व वीरशैव पंथाचा थोर प्रचारक होता. त्याने हरिहर (सु.१२००) याच्या प्रभुदेवर रगळे  ह्या अल्लमप्रभूंच्या जीवनावरील काव्याच्या कथानकात काही बदल करून आपले प्रभुलिंगलीले (सु. १४३०) हे काव्य लिहिले. त्यात त्याने अत्यंत लालित्यपूर्ण शैलीत वीरशैव मताची ओळख करून दिली आहे. चामरस हा प्रख्यात कन्नड महाकवी ⇨कुमारव्यास  याचा समकालीन होता. वीरशैव आणि वैष्णव साहित्यातील ह्या दोघा धुरीणांमधील संघर्ष आणि त्यांचे आपसांतील नाते यांबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत तथापि डॉ. रं. श्री. मुगळी यांच्या मते त्या कपोलकल्पित आहेत.

चामरसाने आपले प्रभुलिंगलीले  हे प्रख्यात महाकाव्य भामिनी षट्‌पदी वृत्तांत रचले. त्यात सु. १,१११ पद्ये आहेत. महान शिवशरण ⇨ अल्लमप्रभू  अथवा प्रभुदेव यांच्या चरित्रावर ते आधारलेले असून त्यात कवीने वीरशैव मताची श्रेष्ठता प्रतिसाद केली आहे. षट्‌स्थल सिद्धांतासारख्या तात्त्विक भागाचेही विवरण त्यात आहे. चामरसाने अल्लमप्रभूंच्या महान कार्याचे आपल्या काव्यात इतक्या मार्मिकपणे व प्रासादिक वाणीने वर्णन केले, की त्यांचे काव्य कन्नड साहित्यात श्रेष्ठ ठरले. नंतरच्या अनेक कवींनी त्यापासून स्फूर्ती घेऊन काव्ये लिहिली व त्याच्या शैलीचे अनुकरण केले. प्रस्तुत महाकाव्यातील अल्लमप्रभूंवर मायादेवीने टाकलेली मोहिनी आणि तिचा त्यांनी केलेला प्रतिकार, गोग्गय्य (गोरक्ष)–अल्लमप्रभू संवाद, सिद्धरामय–अल्लमप्रभू संवाद इ. प्रसंग विशेष सरस आहेत. १६५० मध्ये विरूपाक्ष पंडिताने त्याचा संस्कृतमध्ये तसेच ब्रह्मदास कवीने १७२२ च्या सुमारास त्याचा लीला विश्वंभर  नावाने मराठीत अनुवाद केला. हे अनुवाद प्रभुलिंगलीलेच्या श्रेष्ठत्वाचे द्योतक म्हणावे लागतील.

संदर्भ : सार्दळ, श. धों. संपा. कवि ब्रह्मरासकृत लीलाविश्वंभर, बेळगाव, १९६४.

दिवेकर, गु. व्यं.