मणिपुरी साहित्य : मणिपुरी किंवा मेईथेई ही ईशान्य भारतातील मणिपूर राज्याची प्रमुख भाषा [⟶ मणिपुरी (मेईथेई) भाषा] . १९८१ च्या जनगणनेप्रमाणे मणिपूरची लोकसंख्या १४,११,३७५ आहे. मणिपुरी सामान्य भाषा म्हणून सर्वत्र बोलली जाते, सर्वांना समजते. शासकीय कामकाज तसेच माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणाचे माध्यम मणिपुरीचाच उपयोग केला जातो. मणिपुरीभाषिक आसाम, त्रिपुरा, बंगाल व ब्रह्मदेशातही आढळतात. तिबेटो – ब्रह्मी भाषाकुलात मणिपुरीचे विशिष्ट स्थान आहे. मणिपूर राज्यात बहुसंख्य लोक हिंदुधर्मीयच पण वैष्णवमतानुयायी आहेत.

मणिपुरीची स्वतःची लिपी होती, आता तिचा वापर फक्त काही पंडितांपुरता मर्यादित आहे. अठराव्या शतकात असमिया – बंगाली लिपी उपयोगात आल्यावर जुनी लिपी नामशेष झाली.

कालदृष्ट्या मणिपुरी साहित्यपरंपरा बरीच प्रचीन आहे. जुन्या कोरीव लेखांतून कवितेच्या रूपात एक प्रार्थना लिहिलेली आढळते. या लेखाचा काळ इ. स. पू. आठवे शतक मानला जातो. अशा प्राचीन लेखांतून इ. स. पू. ७९९ पूर्वीच्या गद्यरचना मिळतात. या काळातील इतर साहित्य नष्ट झाले असावे. इ.स.चे सोळावे आणि सतरावे शतक हा मणिपुरी साहित्याच्या पुनर्जागृतीचा काळ समजला जातो. लिखित साहित्यरचना या काळात अधिक झाली. असमिया व बंगाली लिपी उपयोगात येऊ लागल्यावर (स्वीकारल्यावर) ‘गरीब – नवाज’ च्या अमदानीत (अठराव्या शतकात) लोक संस्कृत व बंगाली भाषांतून लिहू लागले. परंतु हा उपक्रम फार काळ चालला नाही. विसाव्या शतकाच्या आरंभी लोक पुन्हा मातृभाषेतून लिहू लागले. या काळातील प्रमुख लेखक म्हणून रेव्हरंड पेटिग्रू, विन्स, रामसुंदर राय, मकरसिंह, मुनलसिंह, जतीश्वरसिंह, हाओदिजाम चैतन्यसिंह इत्यादींचा उल्लेख अवश्य केला पाहिजे. यापैकी पहिले तीन लेखक मणिपुरी नाहीत. मणिपुरी साहित्याला उत्तेजन देणारे हे आंदोलन छुदाचन्दसिंहाच्या राजवटीत त्याच्याच आश्रयाने (१८९१ ते १९४१) झाले.

मणिपुरीत प्रकाशित झालेला पहिला ग्रंथ म्हणजे मणिपुरेर इतिहास (म. मणिपूरचा इतिहास) हा असून तो १८९० मध्ये मणिपूरच्या ‘पोलिटिकल एजन्ट’ द्वारा प्रकाशित झाला.

मणिपुरीच्या आधुनिक साहित्याची सुरुवात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होते. मणिपुरी लेखकांच्या रचना बहुधा राजकीय संदर्भातच पाहिल्या जातात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मणिपूरलाही राजांशी संघर्ष करावा लागला. जेव्हा राजांपासून सुटका झाली, तेव्हा त्यांच्या अनुभवाला हळूहळू येऊ लागले, की हे स्वातंत्र्य त्यांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य नव्हते. केवळ मालक बदलले. आता स्वातंत्र्य कसे मिळवायचे यासाठी आंदोलन सुरू झाले. भारताचे स्वातंत्र्य, राजांपासून मुक्ती, नंतर केंद्रशासित राज्य, मग स्वतंत्र राज्य अशा अवस्थेला येईपर्यंत लोकांना अनेक आंदोलन करावी लागली. राजकीय अस्थैर्य आणि वैचारिक गोंधळ तसेच आर्थिक प्रश्न यांमुळे प्रारंभीचा उत्साह आणि रोमँटिक स्वप्न रंजन यांची जागा क्रोध, खिन्नता आणि वैफल्य यांनी घेतली व या सगळ्यातून एक वेगळेच वातावरण निर्माण झाले. हा प्रतीक्षेचा काळ होता. प्रत्येक काळाच्या काही गरजा असतात, समस्या असतात. मनुष्य काही सांगायला किंवा ऐकायला नाइलाजाने तयार असतो. स्वातंत्र्यानंतर या शांत वातावरणाचा भंग झाला. सहजसुलभ अशा आर्थिक साधनांमुळे जीवनाच्या नैतिक मूल्यांची घसरण झाली. शब्दांचे अर्थ बदलले. जीवनात भ्रष्टाचार आला. राजकारणी पोकळपणे व हास्यास्पदपणे वागू लागले. वाङ्म्याचे स्वरूप बदलले. सहाव्या दशकाच्या प्रारंभी हिंसाचार सुरू झाला. त्याचे आधुनिक स्वरूप नाट्यप्रयोगांतून व्यक्त होऊ लागले. प्रतिकात्म रूपात पात्रे आरडाओरडा करू लागली, अर्थहीन शब्द बोलू लागली. वडील मुलावर, पत्नीा पतीवर ओरडते. हे सर्व ऐकून श्रोत्यांचे कान किटले.   

कविता : मणिपूरमध्ये तरूण नवकवी व नाटककार समाजातील आपल्या भूमिकेविषयी विशेष जागरूक आहेत. सामाजिक व आध्यात्मिक स्थितीचा अंदाज घेण्यासाठी त्यांच्या रचनांचा मागोवा घ्यायला हवा. समाजाचे वास्तव चित्रण या रचनांद्वारा होते मग समाज त्याचा स्वीकार करो वा न करो. नीलकांतसिंह या तरूण कवीने आपल्या ‘मणिपुर’ नावाच्या कवितेत एका गोंधळलेल्या मनःस्थितीतील मातेची कल्पना केली आहे.तो म्हणतो –

“मार्ग कुठे आहे

 उक्ती व कृती यांचा मेळ नाही.

 लक्ष्य व मार्ग यांमध्ये सेतू नाही

 स्वतःचे अस्तित्व आदर्शापासून उंचावर आहे.

 हे मणिपूर माते ! हे तूंच विचारतेस ना?”

कवी स्वतःच स्वतःचे सांत्वन करून घेतो, की एक दिवस मुले आपल्या मातेला ओळखतील जसे सोन्याची अंगठी पाहून दुष्यंताने शकुंतलेला ओळखले. कवी विचारतो, ‘काय लोकांनी आज मातेला ओळखले आहे का?’ ‘अजून नाही’, असे तो स्वतःच उत्तर देतो. छल्लसिने कदइदानो इबनी (१९७१, म. शी. चला तुम्ही व मी जाऊया) या कवितांसग्रहात कवी सोमोरेंद्र याने आपल्या एका स्वच्छंदतावादी कवितेत पहाटेचे स्वागत केले आहे परंतु १९४७ मध्ये हा कवी निराश, असमर्थ झाला होता. तो किती कटू झाला ते खालील ओळींवरून समजते –


“एका छोट्या चोराला

 सहा मोठ्या चोरांनी पकडले.

 छोट्या चोराने आपले प्राण गमावले

 जेव्हा त्याला छत्तीस चोरांनी

पायांनी तुडवले

 आणि चाळीस चोरांनी तुकडे तुकडे केले.”

कवीने आपल्या सुंदर कल्पना आणि उत्कृष्ट शब्दरचनेने वाचकांच्या मनाला भुरळ घातली आहे.

एन्. बीरेन यांचा कवितासंग्रह तोल्लबा सदुगी वखल् (१९७०, म. शी. बिचाऱ्या जनावरांचे विचार). कवीने प्रत्येक वस्तूला प्रश्न केला आहे. त्याने ईश्वराच्या मृत्युपाठोपाठ माणसाचा मृत्यू पाहिला आहे. त्याच्या कवितेत जाणिवेचा (अभिज्ञा) आक्रोश, बूर्झ्वा – मूल्यांचा पोकळपणा स्पष्टपणे दिसून येतो, तो म्हणतो –

 “मला काही नाव नाही

 माझं कुठे घर नाही

 मी माझी ओळख कशी करून देऊ

 तुम्हाला आणि म्हणून

नका विचारू हा प्रश्नच मला.”

एक तरूण कवी इबोपिशक याने पंचावन्न पानांचा एक छोटासा संग्रह लिहिला आहे. त्याचे नाव अपैब थवई (१९६९, म. शी. उडणारा आत्मा). कवीने दुःखान्त रचनांचा स्वीकार केला आहे. एका वेगळ्याच ढंगाने त्याने या कविता रचल्या आहेत. त्याच्या कवितेतील एका चरणात पारंपरिक मूल्यांचा उद्घोष आहे. तर दुसऱ्या चरणात नैराश्यपूर्णतेचे संसूचन आहे.

आणखी एक प्रसिद्ध कवी राजकुमार मधुवीर हा आहे. त्याचा दोन खंडांत प्रसिद्ध झालेला एक कवितासंग्रह आहे. एक मचु मचुगी अतीय (म. शी. अतिभव्य आकाश) आणि दुसरा कैरब मूर्ती उरग (१९७०, म. शी. फुटलेली प्रतिमा पाहून). हा संग्रह टी. एस्. एलियटच्या प्रेरणेने लिहिला गेला असावा. जीवनातील पोकळी, कंटाळा, अर्थहीनता यातून व्यक्त होते. यातील कविता संपूर्णपणे भावरहित आहेत असे नाही काही अंशी त्यांत रोमँटिकतेचा गंधही दरवळतो आहे. सर्व कवींच्या रचनांचा परिचय येथे करून देणे शक्य नाही. म्हणून मुख्य कवींच्या रचनांचेच केवळ उल्लेख करणे येथे शक्य आहे. उदा., ठा. इबोहल सिंग यांनी रेखा (१९७०) हा कवितासंग्रह लिहिला. के. पद्मयकुमार यांचा थम्वल परेङ्‌ग (कमळाचा हार) हा संग्रह आहे. परंपरानिष्ठ स्वच्छंदतावादी आणि भावनात्मक रचना याही मणिपुरीत होत आहेत पण असे कवी फारसे प्रसिद्ध नाहीत. संस्कृतचे एक विद्वान कलाचंद शास्त्री यांनी वासुदेव महाकाव्य (१९६०) हे खंडकाव्य लिहिले. यात भगवान वासुदेव व गोपी यांची वर्णने आहेत. नीलबीर शास्त्री यांच्या इथक इपोम (१९७२,म. शी. लाटा) या संग्रहात देशभक्ती आणि रहस्यवाद यांचे मिश्रण आहे. या संग्रहाबद्दल त्यांना ‘जामिनीसुंदर गुह सुवर्णपदक’ मिळाले. याशिवाय टोकपम इबोमचा यांचा पूर्णिमा (१९६७), कैन अहिङ्‌ग (विरहाची रात्र), ओसमान मेहरी (१९६४) आणि मोनालिसा (१९६८) इबोहल यांचा थम्मोई पाओदम (१९६६, हृदयाचा आक्रोश) व सुरेंद्रजित यांचा सतनिघबी (उमलण्यास उत्सुक असलेली फुले) इ. संग्रह प्रसिद्ध आहेत.

कथा : मणिपुरी साहित्यात कवितांच्याखेरीज कथांतूनही तत्कालीन वातावरणाचे पडसाद उठलेले आहेत. आर्. के. एलङ्‌गबम या तरूण लेखकाने चिङ्‌गया टामया (म. शी.पहाड आणि घाट) आणि युमगी मोऊ (१९५८, म. शी. सूनबाई) हे कथासंग्रह प्रसिद्ध केले. या संग्रहांत ग्रामीण जीवनातील माधुर्य आणि निष्पापता यांचे दर्शन घडते. यांतील सर्व पात्रे ग्रामीण असून शहरी जीवनाशी मिळतेजुळते घेण्यासाठी जो संघर्ष त्यांच्या वाट्याला येतो त्याचे चित्रण त्यांत आले आहे. नीलबीर शास्त्री यांचा बासंती छरोङ्‌ग (१९६७, म. शी. बसन्तीच्या फुलांचा गुच्छ) हा संग्रह गरिबांविषयीची सहानुभूती व्यक्त करणारा आहे. काही व्यक्तिरेखा उदा., हॉटेलचा नोकर, वेश्या, विधवा यांचे चित्रण तपशीलवार पण सहानुभूतिपूर्ण आहे. आसाममधील काचार जिल्ह्यातील मणिपुरी लेखक कुंजमोहन सिंग यांचा संग्रह चेनखीद्राबा इचेल (१९६५, थांबलेला प्रवाह). त्यात चहाचे मळे, रेल्वे स्टेशन, शहरी जीवनातील भ्रष्टाचार, हृदयशून्यता, तथाकथित सभ्यता या सर्वांवर कठोर टीका आहे. परंतु कथाक्षेत्रात खळबळ उडवून देणारी लेखिका म्हणजे एम्. के. बिनोदिनी देवी. तिच्या नुङ्‌गैरत्त्क चंद्रमुखी (१९६७, खडकातील चंद्रमुखीचे फूल) या संग्रहातून श्रीमंत व गरीब यांच्या दुःखी जीवनाचे अत्यंत रोचक असे चित्रण आढळते. तिच्या कथा सामाजिक स्थितीचे व बदलत्या समाजातील स्त्रीपुरूषसंबंधाचे मार्मिक वर्णन करतात. बीरेन यांनी मध्यमवर्गाच्या जीवनमूल्यांवर टीका केली आहे. आपल्या तीक्ष्ण दृष्टीने त्यांनी समाजातील पोकळपणा व निरर्थकता यांचा वेध घेऊन त्यावर टीका केली आहे. ढासळत्या सामाजिक मूल्यांचेही संसूचन त्यांच्या कथांत आहे. त्यांचा आवडीचा विषय म्हणजे निर्धनतेपोटी निर्माण झालेली तारुण्यातील दिशाहीनता. अन्य कथालेखक एच्. गुनो ह्यांनी फिजाङ्‌ग मरुम्दा (१९६९, पडद्याआड) हा संग्रह प्रसिद्ध केला. ई. दिनमानी यांचा थक्लबी (नशेत मग्न असलेली स्त्री) हा हास्यकथांचा संग्रह.


कादंबरी : मणिपुरी कादंबऱ्यांचे विषयही सामाजिक व राजकीय स्थितीचे चित्रण करणारे आहेत. आधुनिक कादंबरीकार डॉ. कमल व डॉ. चओबा हे विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील स्वच्छंदतावादी परंपरेतील बंगालच्या बंकिमचंद्र चतर्जीचे समकालीन होते. कवी एच्. अनगनघलसिंह यांनी एका नव्या स्वच्छंदतावादी शैलीचा आपल्या कादंबऱ्यांत प्रयोग केला. त्यांची जहेरा कादंबरी १९६० मध्ये प्रसिद्ध झाली असली, तरी वास्तविक ती विसाव्या शतकाच्या चौथ्या दशकातच लिहिली गेली. एक मुसलमान मुलगी जहेरा व हिंदू मुलगा कुग्जो यांच्या प्रेमाची ही दुःखद कथा. खऱ्या प्रेमाची परिणती मीलनात होते असे नाही, तर विरहातही होते हा तिचा कथाविषय. एस्. नोदियाचंद सिंह यांच्या गौरपूर्णिमा (१९६६), देवदन (१९६७), अमरकीर्ति (१९६८) व नोंगपोक चिनखेई थाबी (१९७०) या चार कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. एलङ्‌‌‌गम यांनी मरूप अनी (दोन मित्र) या कादंबरीत दोन अनाथ बालकांची कहाणी सांगितली आहे. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी मणिपूरवर केलेल्या बाँबहल्ल्याची आठवण या कथेने येते. जणू या मुलांच्या डोळ्यातून युद्धकालीन मणिपूरचे दर्शन होते. एच्. गुनो यांनी स्वच्छंदतावादी परंपरेतील भावुकतेने युक्त लेमन (१९६४, कर्ज) आणि खुनदोल (१९६८, देणगी) अशा दोन कादंबऱ्या लिहिल्या. पहिली भावुकतेचे दर्शन घडविणारी, तर दुसरी सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. यात प्रेमाच्या अर्थाबद्दल मूलभूत प्रश्न निर्माण केले आहेत. गुनो यांचीच आणखी एक कादंबरी अरोइबा पाओदम (१९७१, अखेरचा संदेश) ही आहे.

कादंबरीकार टी. इबोमचा यांच्या मोङ्‌गफाम (थडगे) आणि मङ्‌गलैबक (१९७०, स्वप्‍नभूमी) या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. इबोहलसिंह यांनी आपल्या इमन ईबु मङ्‌गहनबनी (१९५१, मला बिघडवणारी माझी आई) आणि इदी ओक्तविनी (१९५३, मी वेश्या आहे) या दोन कादंबऱ्यांतून मणिपुरी मध्यमवर्गात खळबळ उडवून दिली. तारूण्य व रोमान्स यांच्या सूडाची प्रतिक्रिया त्यांतून व्यक्त केली आहे. टी. थोइबी देवी ह्या एकमेव मणिपुरी स्त्री कादंबरीकार. आपल्या कादंबरीत जीवन, प्रेम इ. विषयांकडे अतिशय सहज व शांतपणे पहाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्या म्हणतात ‘आयुष्य हे शांत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहासारखे असावे. आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे’. त्यांच्या तीन कादंबऱ्या आहेत. राधो (१९६५), नुङ्‌गश्चि इचेल (१९६५, प्रेमाचा प्रवाह) व चिङ्‌गद सत्‌न इङ्‌गेल्लै (१९७१, पहाडावरील एक फूल). समीक्षकांनी त्यांच्या कादंबऱ्यांची दखल घेऊन त्यांना योग्य स्थान दिले नाही. लोईतोङ्ग बम पच यांच्या कादंबऱ्या इयाद बेगम (१९६७) व न तथीब अहल अम (१९६९, एक म्हातारा बहिरा) ह्या होत. लेखक उत्साहाने जीवनाला सामोरा जातो. त्यांची दुसरी कादंबरी चित्रपटासारखी आहे. तिच्यातील सगळ्या घटना एका रात्रीत घडतात. याच लेखकाची आणखी एक कादंबरी इम्फाल अमासुङ्‌ग मागी इसिङ्‌ग नुङ्‌गशितकी वारी (१९७२, इम्फाल व तिच्या ऋतुमानासंबंधीच्या कथा). या कादंबरीकारांव्यतिरिक्त आणखीही काही नवे – जुने कादंबरीकार आहेत.

नाटक : मणिपुरीतील नाटके ही बहुधा नाटकमंडळींनी रंगभूमीवर सादर करण्यासाठीच लिहिली जातात आणि फारच थोडी नाटके प्रकाशित होतात. इंफाळमध्ये कमीत कमी दहा नाटकमंडळ्या आहेत तसेच लहान मोठ्या गावांतून इतर जवळ जवळ चाळीस नाटकमंडळ्या आहेत. अनगनघल यांच्या थाई थिङ्‌ग कोनु (१९६५) आणि मोइराङ्‌ग थोईबी (एक राजकुमारी व सामान्य माणूस यांच्या दिव्य प्रेमावर आधारित) या नाटकांनी लोकांना आनंद व उत्साह दिला. मणिपूरच्या प्राचीन संस्कृतीचा नाटकांतून मागोवा घेणाऱ्या युगाचा प्रारंभ झाला. या प्रकारच्या प्रसिद्ध नाटककारांत बोरमानी, ललितसिंह, थनिनसिंह, एम्. रामचरन, एस्. कृष्णमोहन सिंह आणि हओबाम तोम्बा यांची नावे उल्लेखनीय आहेत. एम्. बीरमंगोलसिंह हे स्वतः उत्तम नट, लेखक व दिग्दर्शक आहेत. त्यांनी जवळजवळ तीस नाटके लिहिली आहेत. जी. सी. टोङ्‌गबा यांचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. ते सामाजिक मूल्ये व रूढीनुसार चालत आलेले आदर्श यांवर हल्ला चढवून समाजीतील थोतांडांचे उघडे नागडे दर्शन घडवतात. स्वातंत्र्यासाठी त्यांचे हे बंड आहे. ए. सोमोरेंद्र सिंह यांनी आपल्या नाटकांतून जुन्या – नव्या मूल्यांचा संघर्ष सादर केला आहे. बादल सरकार यांच्या प्रभावातूनही काही प्रयोगात्मक नाटके मणिपुरीत लिहिली गेली. काही तरूण कलाकारही या क्षेत्रात यायला उत्सुक आहेत.

साहित्यिक निबंध व समीक्षा : मणिपुरी वाङ्मीय साहित्यिक निबंध व समिक्षाग्रंथाच्या दृष्टीने फारसे समृद्ध नाही. कवी ए. मीनकेतन यांनी मेइथेई उपन्यास (१९५०, मणिपुरी कादंबऱ्या) हा समीक्षणात्मक ग्रंथ लिहिला. डॉ. बाबू सिंह, मनीहार सिंह, दिनमानी इ. समीक्षकांची नावे जिथे अशा साहित्याची समीक्षा केली जाते अशा दैनिकांशी किंवा पत्रांशी जोडली जातात. रितु, बाखल (विचार) इ. काही साहित्यिक पत्रांतून प्रकाशित वाङ्मवयाचे समीक्षण वेळोवेळी छापले जाते.

अनुवाद : आजचा समाज अनेक आंतरराष्ट्रीय घटनांशी व साहित्यभांडाराशी निगडित आहे. म्हणून भाषांतरांची गरज अनिवार्य आणि वाढतीही आहे. मणिपुरीत संस्कृत, बंगाली, हिंदी, इंग्रजी इ. भाषांतून कित्येक भाषांतर झाली. टागोर, बंकिमचंद्र चतर्जी, प्रेमचंद, भगवतीचरण वर्मा, जैनेंद्रकुमार आदी लेखकांच्या प्रमुख रचना मणिपुरीत अनुवादित स्वरूपात उपलब्ध आहेत. संस्कृतमधून रामायण, महाभारताचीही मणिपुरीत भाषांतरे झाली आहेत. कलाचंद शास्त्री यांचे नाव संस्कृत पंडितांत प्रमुख आहे. कालिदास, भवभूती, भास, बाणभट्ट यांच्या रचना मणिपुरीत अनुवादित झाल्या आहेत. संस्कृत विद्वानांचे हे कार्य प्रशंसनीय आहे कारण राष्ट्रीय एकीकरणासाठी ते कटिबद्ध आहेत.

मणिपुरी साहित्याचा इतिहास जरी फारसा दीर्घ नसला,तरी उपलब्ध साहित्यही प्रशंसनीय आहे. मणिपुरी भाषकांची – विशेषतः चोखंदळ साहित्यवाचकांची – संख्या फार नाही. पुस्तकांचे प्रकाशन ही एक समस्या आहे. सरकारी अनुदानाशिवाय प्रकाशन करणे कठीण आहे. लेखकांच्या अडचणीसुद्धा अनेक आहेत. इतक्या अडचणी असतानासुद्धा मणिपुरी लेखक आशावादी आहेत. आपण समाजात साहित्यनिर्मितीतून उच्च मानवी मूल्यांची प्रस्थापना करू शकू, असे त्यांना वाटते. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब दिसते तो एक आरसाच आहे. त्यात पाहूनच मनुष्य – समाज मानवी मूल्यांची स्थापना करतो.

संदर्भ : Nilkanthsingh, E. “Manipuri” in K.R. Srinivasa Iyangar Ed. Indian Literature Since Independence: A Symposium, New Delhi, 1973.

शर्मा, सुहनुराम (हिं.) रानडे, उषा (म.)