लुशाई भाषा : लुशाई, लोशेई, दुल्हिअनकिंवा आता ‘मिझो’ हे नाव ही भाषा, ती बोलणाऱ्या लोकांचे वसतिस्थान आणि ती भाषा बोलणारे लोक या सर्वांना उद्देशून वापरतात. मिझोराम या ईशान्य भारतातील राज्यात मुख्यत्वे मिझो जमातीचे लोक राहतात.

वास्तविक लुशाई म्हणजे काही कुळे आणि उपजाती यांचा मिळून झालेला एक लोकसमूह. त्या त्या उपजातींना आपली स्वत:ची वेगळी भाषा आहे तरीही सामान्यतः लुशाई हीच त्यांची बोलीभाषा समजली जाते.

ब्रह्मी भाषाकुलात आसाममधील भाषांची एक शाखा आहे. त्या शाखेच्या कुकी-चीन समूहापैकी मध्यचीन या उपसमूहात लुशाई ही भाषा अंतर्भूत केली आहे.

साधारणतः तिबेटो-ब्रह्मी आणि विशेषतः लुशाई भाषेच्या शब्दभांडारात वस्तूंचे पोटभेद वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. उदा., लुशाईत एका ‘मुंगी’ शब्दाच्या जागी उपभेदांनुसार वेगवेगळे नऊ शब्द मिळतात, त्याचप्रमाणे ‘टोपली’ च्या जागी कमीतकमी वीस शब्द आढळतात.

लुशाईच्या व्याकरणात लिगंभेदाला स्थान नाही. वनस्पती सोडून इतर जीवसृष्टीमधील लिगंभेद एक किंवा दोन शब्दांत दर्शविला जातो. जसे पुल्लिंगासाठी ‘पा’ (म्हणजे पिता) आणि स्त्रीलिंगासाठी ‘नु’ (म्हणजे माता) या शब्दांचा प्रत्ययवजा उपयोग करतात. उदा., फा-पा(पुत्र), फा-नु(कन्या). पशूंच्या बाबतीत पुल्लिंगासाठी ‘छाल’ किंवा ‘पा’ आणि स्त्रीलिंगासाठी ‘पुइ’ किंवा ‘नु’ हे प्रत्यय म्हणून शब्दाला जोडले जातात.

लुशाईत गणवाचकांचा वापर आढळतो पण याचा वापर तिबेटोबह्मी भाषासमूहातील इतर भाषांपेक्षा (त्रिपुरी, गारो इ.) कमी आहे. 

क्रियापदे ही वचन आणि पुरुष यांप्रमाणे आपली रूपे बदलतात. त्यांना सर्वनामे पूर्वप्रत्ययवजा लागतात. उदा., एकवचनी -‘का’ (मी), ‘इ’ (आपण, तुम्ही), ‘आ’ (तो,ती, हा इत्यादी). बहुवचनी -‘कान’ (आम्ही), ‘इन’ (आपण, तुम्ही), ‘आन’ (ते). वाक्यात प्रथम कर्ता मग कर्म व शेवटी क्रियापद येते. उदा., एड. का-ती (मी केले किंवा म्हटले). एड. इ-ती (तुम्ही केले किंवा म्हटले), एड. आ-ती (त्याने केले किंवा म्हटले).

ह्या तीन वाक्यांत ‘का’, ‘इ’, ‘आ’, हे सार्वनामिक पूर्वप्रत्यय ‘ती’ ह्या क्रियापदाला लागलेले दिसतात. ह्याचप्रमाणे बहुवचनातही क्रियापदापूर्वी असे पूर्वप्रत्यय जोडले जातात. मी तू-इन-ए-मा फा-पा पा-न्हीह आ-ने (शब्दशः माणूस कुणाला पुत्र दोन त्याला-होते). समग्रतः कोण्या एका माणसाचे दोन मुलगे होते.

 

संयुक्त क्रियापदे पुष्कळ आढळतात. पूर्वप्रत्यय ‘जुक’ (खालच्या दिशेने गती), ‘हन’ (वरच्या दिशेने गती), ‘लो’ किंवा ‘रोन’ (केवळ गती), ‘वा’ (समपातळीत गती) अशांसारखे विविध भाव व्यक्त करतात.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. Ill, Part III, Delhi, 1967.

           2. Henderson, Eugenie J. A. “Notes on the Syllable Structure of Lushai”, Bulletin of the School of Oriental and African Studies, 12.

               pp. 713- 25, 1948.

           3. Lorrain, J. Herbert, Dictionary of the Lushai Language, Calcutta, 1940.  

शर्मा, सुहनुराम, (हिं.) रानडे, उषा (म.)