नवीन’ – बालकृष्ण शर्मा : (८ डिसेंबर १८९७–२९ एप्रिल १९६०). आधुनिक काळातील प्रसिद्ध हिंदी कवी. जन्म ग्वाल्हेरजवळील भयाना नावाच्या गावी. त्यांचे आईवडील वैष्णव मताचे होते. शिक्षण शाजपूर, उज्जैन व कानपूर येथे. १९२० मध्ये उज्जैनला बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला असताना राष्ट्रीय असहकारिता चळवळीच्या प्रेरणेने त्यांनी शिक्षण सोडले आणि क्रियाशील राजकारणात भाग घेतला. हिंदीला राज्यभाषा म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. १९५५ मध्ये स्थापना झालेल्या राजभाषा आयोगाचेही ते सदस्य होते. १९५२–६० पर्यंत ते भारतीय संसदेचे सदस्यही होते. घटनापरिषदेचेही ते एक सदस्य होते. मुख्यतः राजकारणातच ते मग्न असल्यामुळे त्यांनी केलेले काव्यलेखन योग्य वेळी प्रकाशित होऊ शकले नाही. त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा परिणाम त्यांच्या काव्यशैलीवरही झाला आणि वक्तृत्वगुण त्यांच्या शैलीत शिरला. प्रताप प्रभा या पत्रांचे प्रमुख संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. ते उत्कृष्ट वक्ते होते.

उर्मिला या १९३४ मध्ये पूर्ण केलेल्या ६ सर्गांच्या काव्याचे प्रकाशन १९५७ मध्ये झाले. उपेक्षित उर्मिलेविषयी द्विवेदी युगीन शैलीत (इतिवृत्तात्मक) लिहिलेल्या या काव्याचा रसिकांवर प्रभाव पडणे शक्य नव्हते. कुंकम हा त्यांचा काव्यसंग्रह १९३६ मध्ये प्रकाशित झाला. यात प्रखर राष्ट्रीय भावना व उत्कट प्रणयभावना व्यक्त झाली आहे. १९५१ मध्ये रश्मिरेखाअपलक आणि १९५२ मध्ये क्वासि हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या प्रणयोन्मत्त, विरहार्त आणि आवेशपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब रश्मिरेखेत पडले आहे, तर क्वासिअपलकमध्ये त्यांचे बालपणीचे वैष्णव-संस्कार उफाळून आलेले असून भक्ती व अध्यात्म यांकडे झुकलेला त्यांचा कल त्यांत स्पष्ट होतो. छायावादी युगात काव्यरचना करीत असतानाही त्या छायावादी प्रभावापासून ते मुक्त राहिले आहेत. विनोबा व भूदान यांविषयीही त्यांनी कविता लिहिल्या (विनोबास्तवन, १९५५). कोमलता आणि कठोरता, शृंगार आणि वीर, प्रणायोन्माद आणि अध्यात्म ही परस्परविरोधी जीवनांगे त्यांच्या काव्यात प्रकटली आहेत. आयुष्यभर सक्रिय राजकारणात गुंतल्यामुळे अभिव्यक्ती निर्दोष करण्याकडे त्यांना वेळ व लक्ष देता आले नाही. त्यांची प्राणार्पण (खंडकाव्य) तसेच इतर काही कविता अद्याप अप्रकाशित आहे. त्यांची निवडक कविता हम विषपायी जनम के या संग्रहात १९६५ साली प्रकाशित केली गेली आहे.

बांदिवडेकर, चंद्रकांत