मैथिली साहित्य : मैथिली भाषेला १९६५ मध्ये साहित्य अकादेमीने भारताची सतरावी साहित्यिक भाषा म्हणून मान्यता दिली आहे. मैथिली साहित्याचा इतिहास हा राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाशी निगडित असलेला पहावयास मिळतो. या साहित्याच्या इतिहासाचे सामान्यपणे तीन भाग पडतात :

(१) प्रारंभ काळ (७०० ते १६००)

(२) मध्य काळ (१६०० ते १८६०) आणि

(३) आधुनिक काळ (१८६० पासून पुढे). 

(१) प्रारंभ काळ : मैथिली भाषेतील प्राचीन साहित्य बौद्ध व तांत्रिकांच्या उपदेशाच्या रूपात मिळते. हे साहित्य दोहा व चर्यागीतांच्या स्वरूपात आहे. चौऱ्याऐशी सिद्धांनी लिहिलेली चर्यागीते विक्रमशीला विद्यापीठात उपलब्ध आहेत. यातील भाषा समजण्यास कठीण आहे. त्यात मिथिलेच्या पूर्वेकडील बोलीचा वापर केला आहे. दहाव्या शतकातील कर्णाट राजाने सार्वभौमत्वाबरोबर संस्कृतची परंपराही टिकवली. मैथिली संगीत परंपराही त्याने निर्माण केली.

या परंपरेतील ⇨ विद्यापती हे श्रेष्ठ कवी होत. राजा शिवसिंहाने त्यांना आश्रय दिला होता. विद्यापतींना ‘मैथिली कोकीळ’ म्हणून गौरविले जाते. जयदेवांच्या गीतगोविंद परंपरेतील कविता विद्यापतींनी रचली. त्यांच्या हजारो पदांतून कृष्णप्रेमाची संगीतधारा प्रवाहित झालेली पहावयास सापडते. विद्यापतींच्याही आधी ज्योतिरीश्वर ठाकुर हे कवी होऊन गेले. त्यांचा वर्णन-रत्नाकर हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. सात कल्लोळांत (भागांत) हा विभागलेला आहे. हा ग्रंथ काव्यपरंपरा दर्शविणारा, विद्यापतींचा मार्गदर्शकही असावा असे मानले जाते. त्यांच्या धूर्त-समागम या शुद्ध प्रहसनातील गीतेही महत्त्वाची आहेत. यावर जयदेवांच्या गीतगोविंदचा प्रभाव आहे.

विद्यापतींच्या समकालीन कवींमध्ये अमृतकर, हरपती, चंद्रकला, विष्णुपुरी, भानु, यशोधर, गजसिंह, कविराज, दशावधान, भीषम हे उल्लेखनीय कवी होत.

महाराज कंस नारायण (सु. १५२७) यांच्या दरबारी गोविंद नावाचा कृष्णभक्त कवी होता. त्याने संस्कृतमधील काव्यप्रकाशावर काव्यप्र दीप नावाची टीका लिहिली आहे. याखेरीज विद्यापतींच्या परंपरेत महिनाथ ठाकुर, लोचन झा, गोविंददास झा, रामदास झा, उमापती उपाध्याय, भानुनाथ झा, हर्षनाथ झा, चंदनाथ झा हे कवी झाले. नेपाळमधील सिंह नरसिंह, भूपतींद्र मल्ल, जगत्प्रकाश मल्ल हे विद्यापतींच्या ‘शिव-शक्ती’ पदांचे अनुकरण करणारे कवी होत.

या काळात साहित्यामध्ये भावगीत हा प्रकार प्रभावी होता असे दिसते. कवितेतील छंदांमुळे येणारी तालबद्धतेची ६०० वर्षांची परंपरा मोडून विद्यापतींनी भावगीतात सुस्वरता स्थापित केली. विद्यापतींमुळे मैथिलीचा प्रभाव बंगाल, आसाम, त्रिपुरा, ओरिसापर्यंत पोहचला उत्तर भारत नाटक आणि भावगीताने प्रभावित झाला. रवींद्रनाथ टागोरही विद्यापतींमुळे प्रभावित झालेले दिसतात.

(२) मध्य काळ : कला व साहित्याच्या विकासास आवश्यक तेवढी शांतता या काळात नव्हती. मुसलमानांच्या आक्रमणामुळे मिथिलेमध्ये अराजक माजले होते. ऑइनवार वंशाचा आश्रय संपल्यावर कवी, संगीतज्ञ नेपाळच्या दरबारी गेले. तेथल्या मल्ल राजाला कविता, नाटकाची हौस असल्यामुळे मध्य काळातली जी बरीच साहित्यनिर्मिती नेपाळात झाली, त्यात नाटकाचा वाटा प्रमुख होता. प्रारंभी संस्कृत नाटकांतून केवळ गीतेच मैथीली तून लिहिली गेली पण पुढे संपूर्ण नाटक मैथिलीत लिहिले गेले. ही नाटके दरबारात खुल्या नाट्यगृहात आणि दिवसा सादर केली जात. सामान्यतया ही नाटके पौराणिक कथांवर आधारलेली असत.

भातगाव, काठमांडू व पाटण ही नाटकाची तीन केंद्रे होती. भातगावमध्ये अधिक नाटके लिहिली गेली आणि सादरही केली गेली. जग ज्योतिर्मल्ल, जगत्प्रकाश मल्ल, जितामित्र मल्ल, भूपतींद्र मल्ल व रणजित मल्ल हे पाच प्रसिद्ध नाटककार झाले. रणजित मल्लने सर्वांत अधिक नाटके लिहिली. त्यांतील सतरा नाटके आज उपलब्ध आहेत. काठमांडूचे वंशमणी झा हे प्रसिद्ध नाटककार आणि पाटणमध्ये सिद्धनरसिंहदेव हे प्रसिद्ध कवी व नाटककार होते. ही परंपरा १७६८ मध्ये पृथ्वीनारायण शाहने मल्ल राजांना पराभूत केल्यावर संपुष्टात आली.

मिथिलेत गीतिनाटकासारखीच आणखी एक परंपरा होती. तिला ‘की र्तनिया’ म्हणत. शिव किंवा कृष्णाच्या स्तुतिरूपाने कीर्तन होत असे. उमापती उपाध्याय हे कृष्णापुढे गात-नाचत असत. त्यांनीच ही परंपरा निर्माण केली. बंगाल, आसाममधील ‘यात्रा’ वा ‘जात्रा’ कीर्तन परंपरेवरून हे नाव आले असावे असे म्हणतात. ही नाटके रात्री होत. त्यात सूत्रधार असे. त्याच्या बरोबर नटी व दोन तीन सख्या, नारद, विदूषक ही पात्रे असत. सुरुवातीला फक्त गीतेच मैथिलीत होती नंतर गद्यातही मैथिलीचा वापर होत गेला. गोविंदच्या नळचरितनाटकमधील गीते मैथिलीत आहेत. या खेरीज रामदास झांचे आनंदविजय नाटिका, देवानंदांचे षाहरण, उमापती उपाध्याय यांचे पारिजातहरण, रमापती उपाध्याय यांचे रुक्मि णी परिणय ही नाटके हरिवंशावर आधारित आहेत. या काळात उमापती उपाध्याय विशेष प्रसिद्ध होते. लाल झांच्या गौरीस्वयंवरमध्ये गद्यात व्यवहारातील मैथिली भाषेचा वापर आढळतो. ही एकांकिकेसारखी रचना आहे. गौरी व शिवाच्या विवाहाची कथा त्यात आहे. नंदपतींच्या श्रीकृष्णकेलीमालात संस्कृत प्राकृतचा अत्यल्प उपयोग केला आहे. मैथिली चालीरीतींच्या वर्णनामुळे त्यात मैथिली रंग भरला आहे. विसाव्या शतकापर्यंत अशी नाटके लिहिली गेली. १३२४ ते १६०० हा प्रारंभ काळ १६०० ते १८६० हा भरभराटीचा काळ व १८६० ते १९२० हा ऱ्हासाचा काळ असे कीर्तनिया नाटकांचे तीन भाग केले जातात.


सोळाव्या-सतराव्या शतकांत आसामात मैथिली नाटकाचा एक प्रकार-अंकियानाट-पहावयास मिळतो. हा प्रकार वैष्णव धर्मप्रचाराच्या उद्देशाने निर्माण झाला होता. यात कृष्णाच्या बाललीलांचे वर्णन केले गेले आहे. ही नाटके एक अंकी आहेत. शंकरदेव (१४४९–१५६९) यांनी अनेक अंकियानाट लिहिले पण त्यांपैकी कालिया दमन, राम-विजय, रुक्मि णी हरण, केलि-गोपाल, पत्नी-प्रसाद, पारिजात-हरण ही सहाच उपलब्ध आहेत. माधवदेव (१४८९–१५९६) यांची अर्जुन-भंजन, भोजन-विहार, भूमि लुतिवा, कोतोरा-खेलोवा इ. तसेच गोपाल देव यांचे जन्म–यात्रा, रामचरण ठाकुर यांचे कंस-वध हे प्रसिद्ध अंकियानाट होत.

मैथिली गद्याचा विकास या नाटकांतून तर पहावयास मिळतोच पण याशिवाय दानपत्रे व पत्रांच्या रूपानेही तो सापडतो. यामध्ये मिथिलेतील सामाजिक इतिहास प्रतिबिंबित झालेला दिसतो. दासप्रथेविषयी बरीच माहिती मिळते. यांचे ऐतिहासिक महत्त्व आहे पण त्यात साहित्यि क रूप मिळत नाही. तरीही भाषेच्या विकासाच्या दृष्टीने त्याला महत्त्व आहे.

या काळातील सुरुवातीच्या कवितेवर विद्यापतींचा खूपच प्रभाव होता तसेच संस्कृतचाही पगडा होता. नंतरच्या काळात हरिवंश, भागवत व पुराणांचा प्रभाव होता. दीर्घकाव्य-महाकाव्याच्या रूपाने हा प्रभाव पहावयास मिळतो. कीर्तनिया नाटक दीर्घकाव्याचेच रूप होते. यानंतरच्या काळात व्रज भाषेचा प्रभाव पडल्यामुळे दानलीला, नागलीला, तीर्थावली, ⇨ सूरदास, ⇨ तुलसीदासांची भजने यांचा प्रभाव दिसतो. या काळातील प्रमुख कवी लोचन, भूपतींद्र, गोविंददास, नंदपती, मनबोध, कर्णश्याम, हर्षनाथ हे होत. या काळातील वैष्णव संत कवी साहेब रामदास यांची पदावली प्रसिद्ध आहे.

(३) आधुनिक काळ : या काळात मिथिलेतील जीवनात बदल घडू लागला. पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार, रेल्वे, तार यांचे जाळे, छापखाने इत्यादींमुळे बदलाला गती मिळाली, मिथिला महासभा, मिथिला शिक्षित समाज, मिथिला संमेलन यांसारख्या संस्था निर्माण होऊन नवजागृती होऊ लागली. भाषेच्या अभ्यासाला, संशोधन कार्यालाही गती मिळाली.

वृत्तपत्रे व नियतकालिके : आधुनिक काळातील गद्याची गरज वृत्तपत्रांनी भागवली. मिथिला-हित-साधना (१९०५), मिथिला मिहिर (१९०८), मिथीला प्रभा (१९२४), मिथिला-प्रभाकर (१९३०), मिथिला-बंधु (१९३५), मिथिला-युवक (१९३८), जीवन-प्रभा (१९४०) ही वृत्तपत्रे प्रकाशित झाली. या शिवाय श्री मैथिली मिथिला मोद, भारती, विभूती व मिथिला साहित्य पत्र यासारखी त्रैमासिकेही निघाली. ही वृत्तपत्रे व नियतकालिके अल्पजीवी ठरली. पण त्यांतून झालेल्या लिखाणातूनच मैथिली गद्याने आकार घेतला. उमेश मिश्र, रमानाथ झा, दीनबंधू झा यांनी मैथिली भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली. स्वातंत्र्योत्तर काळात मिथिला मिहिरवैदेही ही प्रमुख पत्रे बनली.

मैथिली साहित्यामध्ये जी आधुनिकता आली त्यामध्ये बंगालचे विद्वान म. प. ⇨ हरप्रसाद शास्त्री, ⇨ प्रबोधचंद्र बागची, ⇨ सुनीतीकुमार चतर्जी, ⇨ नगेंद्रनाथ गुप्त, खगेंद्रनाथ मित्र प्रभृतींचा फार मोठा वाटा आहे.

काव्य : कवितेमध्ये जुने काव्यप्रकार हाताळले गेले. मनोबोधांच्या कृष्णजन्म (१८८०) पासून मैथिलीत काव्य लिहिले जाऊ लागले. संस्कृतमधील महाकाव्यांचे अनुवाद प्रकाशित झाले. त्यात चंद झा यांचे रामायण (१८९८) महत्त्वाचे मानले जाते. लालदासांचे रामेश्वर रामा (१९१४) हे सीतेची महती दाखविणारे आहे. याशिवाय रघुनंदनदासांचे सुभद्राहरण, बदरीनाथ झा कविशेखर यांचे एकावली परिणय, अच्युतानंद दत्तांचे कृष्ण चरित्र, तंत्रनाथ झांचे कीचकवध, गौरीशंकर झांनी मायकेल मधुसूदन दत्तांच्या मेघनाथवध यांचे केलेल भाषांतर अशी महत्त्वाची निर्मिती आहे. पुराणकथांच्या आधारे बरीच खंडकाव्येही लिहिली गेली. त्यात मथुरानंद चौधरींचे कृषक (१९४६), व्यासांचे संन्यासी (१९४८), चौधरींचे पतन (१९६९) ही प्रसिद्ध काव्ये होत.

गंगेश गुंजनांचे मुक्त छंदावरील हम एक मिथ्या परिचय हे उल्लेखनीय काव्य आहे. लोकगीते आणि पाश्चात्य गीतांच्या आधारेही गीते लिहिली गेली. चंद झा, हरखनाथ, जीवन झा, आनंद झा हे महत्त्वाचे गीतकार होत.

यदुनाथ झा यांनी संपादित केलेल्या मैथिली गीतांजली व शामानंद झा यांच्या मैथिली संदेश संग्रहावरून मैथिली कवितेतील नवीन वळण स्पष्ट जाणवते. लोकजागृती व राष्ट्रप्रेमाची भावना ह्या कवितेने जागृत केली. चंद झा, जीवन झा, पद्मनाथ झा यांची परंपरा आनंद झा यांच्यामध्येही आढळते. चिनी आक्रमण तसेच बांगला देश निर्मितीच्या वेळी लिहिल्या गेलेल्या कवितांतही हीच परंपरा अखंडपणे व स्पष्ट दिसते.

आधुनिक मैथिली कविता इंग्रजी, हिंदी, बंगालीचा प्रभाव घेऊन विकसित झाली. १९४० ते ६० च्या दरम्यान मैथिलीत दोन प्रकारची कविता लिहिली गेली. एकीने जीवनावरचा विश्वास दाखविला आणि देशभक्ती, लोकगीते व मिथिलेतील पूर, दुष्काळ, रोगराई, अज्ञान, दारिद्र्याचे दर्शन घडविले तर दुसरीने जीवनातील संघर्ष, पिळवणुकीचे चित्रण केले. ‘यात्रीं’ च्या पत्रहीन नग्न गाछ या कवितासंग्रहाला १९६८ चा साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला. पुढे राजकमल यांनी स्वरगंधामध्ये बदलते जीवन दाखवले. कोणत्याही वादात वा विचारधारेत न अडकता माणसाचे अंतरंग त्यांनी प्रकट करून दाखविले. राजकमल यांची परंपरा सोमदेव, रामानंद रेणू, भीमनाथ झा व जीवकांत यांनी चालविली. अगदी अलीकडील कवींमध्ये ‘नचिकेत’ यांचे नाव घेतले जाते. त्यांचे कवयोवदन्ति  (१९६६) व अमृतस्य पृत्र : (१९७०) हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांत आधुनिक मनुष्य व त्याचे प्रश्न समर्थपणे मांडलेले दिसतात.


कादंबरी व कथा : कादंबरी व कथेच्या क्षेत्रात सुरुवातीला अनुवाद केले गेले. परमेश्वर झांच्या सीमंतिनी आख्याइकाचा उल्लेख येथे आवश्यक आहे. रास बिहारीलाल दास, जनार्दन झा, भोला झा, पुण्यानंद यांच्याही कृती प्रसिद्ध झाल्या. हरिमोहन झा यांच्या कन्यादान, द्विरागमन, खट्‌टरककाकतरंग, प्रणम्य देवता, रंगशाला चर्चरी या कादंबऱ्या फार गाजल्या. खट्टरकाका हे त्यांचे स्वतंत्र व प्रसिद्ध पात्र आहे. व्यंग आणि विनोद ही त्यांची प्रेरणा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळावर त्यांची छाप पहावयास मिळते.

स्वातंत्र्योत्तर काळावर मात्र वैद्यनाथ मिश्र उर्फ ‘नागार्जुन’ वा ‘यात्रीं’चा प्रभाव दिसतो. त्यांच्या पारो, नवतुरिया, रतिकान्तक पितिआइन या प्रसिद्ध कादंबऱ्या होत. हिंदीमध्ये त्यांचे साहित्य ‘नागार्जुन’ ह्या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. मिथिलेतील शेतकी, मजूर, मध्यम वर्गाच्या जीवनातील आशा-निराशा, संघर्षाचे सुंदर चित्रण त्यांनी केले आहे. रतिकान्तक पितिआइनमध्ये विकृत सामंती संस्कार आणि जीवन रेखाटले आहे. नवतुरियामध्ये मैथिली समाजातील घृणास्पद परंपरेवर प्रकाश टाकला आहे. मैथिली ब्राह्म णांमध्ये वृद्धांबरोबर लहान मुलींचे विवाह होतात. यात मुलीचे नातलग पैसे कमवतात. हा विषय घेऊन कादंबरीत एक म्हातारा चौदा वर्षांच्या मुलीबरोबर पाचवा विवाह करू इच्छिताना दिसतो आणि गावातील तरुण वर्ग त्याचा विरोध करतो. हिंदीमध्ये हीच कादंबरी नयी पौध (१९५३) नावाने प्रकाशित झाली आहे. आपल्या कादंबऱ्यांत भाषेचा आगळा प्रयोग त्यांनी केलेला दिसतो. त्यांनी सहरसा, पूर्णिया, मोघीर, दरभंगा, भागलपूर, मुझफरपूर येथील विभिन्न बोलींचा आपल्या लेखनात उपयोग आहे.

मनींदरनाथ चौधरी ‘राजकमल’ यांच्यावर यात्रींचा प्रभाव दिसतो. आदिकथा (१९५८) ही त्यांची कादंबरी गाजली. यात्रींप्रमाणे राजकमल हे हिंदीतही प्रसिद्ध आहेत. वास्तवातील विकृतींचे चित्रण त्यांनी केले आहे. मध्यमवर्गाची वैशिष्ट्ये व वैगुण्ये त्यांनी दाखविली आहेत. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांचे फारच थोडे साहित्य आपणास प्राप्त झाले आहे.

मायानंदांनी सामान्यांच्या जीवनातले काव्यात्मक क्षण टिपले आहेत. बिहारी-पात पत्थर, खोटा ओ सिदई या त्यांच्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्या होत. यावरूनच पुढे धीरेंद्रांनी वाटचाल केली. मोरुकवाकाडो-कोइला या त्यांच्या कादंबऱ्या होत. ललितांची पृथ्वीपुत्र ही याच परंपरेतील कादंबरी आहे. तीत खेड्यातील गरिबांच्या जीवनाचे चित्रण सापडते. रामानंद रेणूंची दूध-फूल ही कादंबरी खालच्या जातीतील विधवेची करुण कथा आहे. ती आपल्या मुलासाठी पुनर्विवाह करत नाही. पण मुलगा दूर जातो. संन्याशाला ती आपला मुलगा मानते, तो अस्पृश्य निघतो. शेवटी तिला मुलगा मिळतो व ती मुलाला व संन्याशालाही आपलाच मानते.

याशिवाय चंद्रनाथ मिश्र-‘अमरां’ची वीरकन्या (१९५०) व बिदागरी (१९६३), शैलेंद्रमोहन झांची प्रतिमा (१९५१), बद्रीनारायणदासांची चंद्रकला, विनोदांची नयनमणी, बिंदेश्वर मंडलांची बाटक मेट जीनगीक गेठ, कुँवरकांतांची सेहेंता या विविध अनुभवांनी समृद्ध अशा कादंबऱ्या आहेत. हरिमोहन झांची विनोदाची परंपरा रूपकांतांच्या मोमक नाकमध्ये दिसते.

नवीन पिढीतील मोठा लेखक म्हणून जीवकांतांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या दू कुहेसक बात (१९६८) व पानिपत (१९६९) या यशस्वी कादंबऱ्या होत. पानिपतमध्ये अपयशी तरुण, ज्याला चारी बाजूने निराशा घेरते अशा व्यक्तीचे चित्रण केले आहे. टू कुहेसक बातमध्ये आजच्या अशा स्त्री-पुरुषांचे चित्रण आहे, की जे निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा निर्णय घेतानाच कचरतात. आशय पूर्वीचाच असला, तरी अभिव्यक्तीमध्ये नावीन्य आहे. अग्निबाण ही त्यांची अलीकडची कादंबरी मिथिलेचे समर्थ चित्रण करणारी आहे. ती भूक, निराशा, बेकारीचे प्रतीक आहे. प्रभासकुमार चौधरींच्या युग पुरुषमध्ये हेच प्रश्न नव्या पद्धतीने मांडलेत. या शिवाय रामकिसन झा, सोमदेव, राजमोहन झा, कुमार इंद्रानंद सिंह, ब्रजकिशोर वर्मा, डॉ. वी. झा, कपिल, रामदेव, गगेश गुंजन इत्यादींनी मैथिली कादंबरी समृद्ध केली आहे. उपेंद्रनाथ झा यांच्या दू पत्र या कादंबरीस १९७० चा साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला.

कादंबरीपेक्षा कथेच्या क्षेत्रात विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात चांगला विकास झालेला पहावयास मिळतो. गुणात्मक दृष्ट्या व लोकप्रियतेच्या दृष्टीने कादंबरीपेक्षा कथा पुढे गेलेली दिसते. मैथिली पत्रिकांतून तिची वाढ होत गेली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस श्रीकृष्ण ठाकुर यांच्या चंद्रभागा (१८८५), वैद्यनाथ मिश्र-‘विद्यासिंधु’ यांचा कथासंग्रह तसेच विनोदी कथांचा गप्पा सप्पाका खरीहान हा संग्रह होय. कालिकुमार दास यांचे भीषण अन्याय (१९२३), कामिनीका जीवन (१९२७), कमला (१९२९), गंगास्नान (१९२९), अदला का बदला (१९३०) हे उल्लेखनीय संग्रह होत. याशिवाय लक्ष्मीपतिसिंह, गुणवंतलालदास, हरिनंदन ठाकुर ‘सरोज’ यांच्याही कथा याच काळातल्या होत. कालिकुमारदास व ‘सरोज’ यांनी सामाजिक जीवनातले दोष दाखवले व निरागस प्रेमाची कथाही लिहिली. १९३० च्या आसपास उदयाला आलेल्या कथाकारांमध्ये सामाजिक जाणीव, जीवनाच्या प्रश्नांची चांगली समज व कथेच्या स्वरूपाचे आकलन अधिक होते. के. एन्. ठाकुर, यदुनंदन झा, परमानंद दत्त, भुवनेश्वरसिंह, अल्लख निरंजन हे महत्त्वाचे कथाकार होते. १९४० नंतरच्या पिढीत प्रबोधनारायण चौधरी, सुरेंद्र झा, हरिमोहन झा, भीमेश्वरसिंह, नरेंद्रकुमार, उपेंद्र झा-‘व्यास’, योगानंद झा ही नावे पुढे आली. हरिमोहन झा यांच्या कथांत चांगला विनोद आहे. बाकीच्यांनी आपल्या काळाचे दर्जेदार चित्रण केले आहे. ‘व्यास’ यांनी कथेसाठी जे नवे तंत्र अवलंबिले त्याचा प्रभाव आजच्या कथाकारांवरही पहावयास मिळतो. श्रीमती शांभवी देवी, अन्नपूर्णा, लक्ष्मीवती देवींसारख्या लेखिकांनीही कथा लिहिल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक प्रश्नाविषयी-विशेषतः विवाहासंबंधी-लिहिले गेले आहे. नंतर मुली शिकू लागल्याने निर्माण झालेले प्रश्न, पाश्चात्त्य-पौर्वात्य संस्कृतींतील संघर्ष, गरीब-श्रीमंतांमधील संघर्ष असे विविध विषय स्वातंत्र्यानंतर कथेत आले. उपेंद्रनाथ झांनी कथेला नवीन वळण दिले. त्यांचा पथ हेरती राधा (१९६३) हा प्रसिद्ध कथासंग्रह आहे. राज मोहन झा, रामदेव झा, मायानंद मिश्र (मांग का लोटा, १९५१), ललित (प्रतिनिधी, १९६४), राजकमल (ल्लक पाग, १९६८), रामानंद रेणू (कचोट, १९६९, त्रिकोण, १९७४), हंसराज (सतरंज, १९७१), प्रभासकुमार चौधरी, गंगेश गुंजन हे महत्त्वपूर्ण कथाकार होत. प्रभास व गंगेश आधुनिक कथेचे आधारस्तंभ मानले जातात. जीवकांतांची कथा (एकसरी थारही कदम्ब तर रे, १९७२) यांत्रिक युगातील माणसाच्या आयुष्यात येणारे गंभीर एकाकीपण चित्रित करताना दिसते. रामदेव झांच्या कथांत शब्दचित्रे आढळतात. रूपकान्त ठाकुरांनी विनोदी कथा लिहिली. धीरेश्वर झांनी खेड्यातील जीवन रेखाटले आहे. राधाकृष्ण – ‘बहेद’, सोमदेव, धुमकेतू, मधुकर गंगाधर, मार्कंडेय इत्यादींनी मैथिली कथेचे दालन समृद्ध केले आहे. 


लेखकांच्या घेतलेल्या चरित्रात्मक मुलाखती तसेच तत्त्वज्ञानात्मक लिखाणही मैथिलीत झालेले आहे.

निबंध : सुरुवातीला मैथिली निबंध हा उपदेशपर होता. म. म. मुरलीधर झा हे प्रसिद्ध निबंधकार होत. त्यांची शैली अद्वितीय गणली जाते. त्यांच्या शैलीचे अनुसरण करणाऱ्यांनीही सामाजिक प्रश्नच मांडलेले दिसतात. भाषण, अग्रलेख अथवा संभाषणपद्धतीने विचार मांडले गेले. भाषणाच्या रूपाने ज्यांनी निबंध लिहिले, त्यांत दरभंगाचे महाराज रामेश्वर सिंह, रामभद्र झा, कुमार गंगानंद सिन्हा, प्रमथनाथ मिश्र, राजपंडित बलदेव मिश्र आदींचा उल्लेख करावा लागेल. अग्रलेखाच्या रूपाने मुरलीधर झा, अनुप मिश्र, जनार्दन झा, कपिलेश्वर झा-‘शास्त्री’, सुरेंद्र झा-‘सुमन’, उपेंद्रनाथ झा, भुवनेश्वरसिंह-‘भुवन’ यांचा व एकालाप अथवा संवादाच्या रूपाने मुरलीधर झा, चंद्रशेखर झा, केदारनाथ झा व जीवनाथ राय यांच्या लेखनाचा उल्लेख आवश्यक आहे. मिथिला महासभेच्या दहा कलमी कार्यक्रमाने प्रेरित होऊन बरेच लेखन या काळात झालेले दिसते. भाषा व साहित्याच्या विकासाच्या दृष्टीनेही विचार मांडलेले दिसतात. निबंधाच्या तुलनेने मैथिलीत प्रवासवर्णने मात्र फारच कमी आहेत.

नाटक न एकांकिका : विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कीर्तनिया नाटक परंपरा फार प्रसिद्ध होती. पं. हरकनाथ झा, विश्वनाथ झा, राजपंडित बलदेव मिश्र यांनी पौराणिक कथांवर नाटके लिहिली. नेपाळमध्ये काठमांडूजवळ पाटणमध्ये आजही ‘कार्तिक नाच’ या नावाने ही परंपरा चालू आहे.

पंडित जीवन झांनी उपदेशपर नाटके लिहिली. आनंद झा, महावीर झा यांनी रामाच्या जीवनावर नाटके लिहिली. इशनाथ झांचे चीनीका लड्‌डू हे नाटक फार गाजले. त्रिलोकनाथ मिश्र, दामोदर झा, ऋद्धिनाथ झा, गणानाथ झा यांच्यावर संस्कृत नाटकांचा प्रभाव होता. १९५० ते १९६० मध्ये तृप्तिनारायणलाल, गणानाथ झा, महेंद्र झा, बाबूसाहेब चौधरी यांनी आपल्या नाटकांतून सामाजिक वाईट चालींचे व निरर्थकपणाचे चित्रण केले आहे. विधवाविवाह, हुंड्याचा प्रश्न इ. प्रश्न त्यांनी हाताळले आहेत.

याशिवाय अनुवाद, अनुकरण व बंगाली नाटकांचे रूपांतर करून मैथिली नाटक समृद्ध करण्याचे प्रयत्नही झाले. या प्रयत्नांतून कालिदास, इब्सेन, छबिनाथ बंदोपाध्याय यांची नाटके मैथिलीत आली. स्वातंत्र्योत्तर काळात ऐतिहासिक नाटके लिहिली जाऊ लागली. विद्यापतींच्या जीवनावर सहा नाटके लिहिली गेली. या अनुकरणाच्या प्रयत्नातून आधुनिक नाट्यतंत्र आत्मसात केले गेले. नेपाळतील ’कीर्तनिया’ नाट्य परंपरेचाही या दृष्टीने उपयोग करून घेता येण्यासारखा आहे.

कांचीनाथ झा, चंद्रनाथ मिश्रांसारखे लेखक एकांकिका लिहू लागले आहेत. रंगभूमीवर एकांकिका अधिक यशस्वी होत असलेल्या दिसतात. गोविंद झांनी एकांकिकांद्वारा काही गंभीर विषय हाताळलेले दिसतात. गंगानंद सिन्हांच्या जीवन संघर्ष मध्ये आधुनिक जीवनचित्रण आढळते.

समीक्षा : मैथिली साहित्यामध्ये समीक्षेचे एक वेगळे दालन पहावयास मिळते. एका बाजूने यामध्ये समीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सिद्धांतांची मांडणी झालेली, तर दुसरीकडे या सिद्धांतांच्या आधारे साहित्याचे विवेचनही केलेली दिसते. सिद्धांतांच्या दृष्टीने विचार करत असता मैथिलीत स्वतंत्र व नवीन सिद्धांतमांडणी झालेली आढळत नाही. बहुतेक पंडितांनी साहित्याच्या रचनेचा, उद्देशाचा किंवा हेतूचा विचार करताना संस्कृत किंवा पाश्चात्त्यांचा आधार घेतलेला दिसतो. संस्कृतची समृद्ध परंपरा असल्यामुळे संस्कृत सिद्धांतांचा पगडा या पंडितांवर प्रभावी असलेला दिसतो. साहित्यदर्पण, काव्यप्रकाश इ. प्रसिद्ध ग्रंथांचा विशेष प्रभाव आहे. सीताराम झांचा अलंकारदर्पण, दामोदर झांचा अलंकार कमलाकार, वेदान्त झांचा अलंकृतिबोध यांसारखे अलंकारग्रंथ मैथिलीत आहेत तथापि रामचंद्र मिश्रांचा चंद्राभरण हा अलंकारग्रंथ महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ऋद्विनाथ झांचा शब्दशक्तित्रिवेणिका हा अप्रकाशित ग्रंथही महत्त्वाचा आहे. संस्कृतच्या आधारावर चालता येणार नाही, या जाणिवेतून कांचीनाथ झा-’किरण’ यांनी लिहिलेला आलोचना एक दृष्टिकोण हा निबंध महत्त्वाचा आहे.

पाश्चात्त्यांच्या आधारावर लेखन करणारे उमानाथ झा, दुर्गानाथ झा, दामोदर झा, भक्तिनाथ सिंग ठाकुर यांनी परंपरागत पाश्चात्त्य सिद्धांत व पाश्चात्त्य लेखकांचा मार्क्सवादी दृष्टिकोन मांडला. जयधारी सिन्हांच्या काव्यमीमांसा (दोन खंड) मध्ये पौर्वात्य व पाश्चात्त्य कल्पनांचा मेळ घालून नव्या पद्धतीने मांडणी केली आहे. सुरुवातीस कवितेला धरून समीक्षा होत होती. आधुनिक काळात नाटकाच्या संदर्भातही ती विकसित झालेली पहावयास मिळते. रघुनंदनदासांची मैथिली नाटक ग्रंथाची प्रस्तावना, यदुनाथ झांची मैथिली गीतांजलीस असेलेली प्रस्तावना व भुवनेश्वरांची आषाढ या काव्यसंग्रहाची भूमिका या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.


साहित्याचे सिद्धांतांच्या आधारे मूल्यमापनही केले गेले. सुरुवातीच्या काळात चंद झा (१८३१–१९०७) यांचे नाव येते. त्यांनी संस्कृतच्या परंपरागत सिद्धांतांचा पाश्चात्त्य ऐतिहासिक पद्धतींचाही आपल्या मूल्यमापनात वापर केला. नंतर म.म. उमेश मिश्रांनी (१८९९–१९६७) साहित्यदर्पणचा अनुवाद केला. याच काळात अमरनाथ झा, कुमार गंगानंद सिन्हा, भोलालालदास, गणपती सिन्हा व भुवनेश्वर सिंह- ’भुवन’ ही नावे समीक्षेत पुढे आली. पुढील काळात रमानाथ झा यांचे नाव प्रामुख्याने येते. प्रबंधसंग्रहनिबंधमाला ही दोन्ही पुस्तके समीक्षेच्या क्षेत्रात महत्त्वाची आहेत. श्रीकृष्ण मिश्र हे महत्त्वाचे नाव आहे. शिवाय राधाकृष्ण चौधरी, कृष्णकांत मिश्र, बालगोविंद झा, हरिनारायण झा, मायानंद मिश्र इ. नावे समीक्षेत महत्त्वाची आहेत. ब्रजकिशोर वर्मा आणि जयगोविंद मिश्रांनी लोकसाहित्याचा सखोल अभ्यास केला आहे.

 

संकीर्ण प्रकार : कवितेमध्ये आधुनिक काळात देशभक्तिपर कविता लिहिली गेली तशीच व्यंग्य आणि विनोदी कविताही लिहिली गेली. हरिमोहन झांची टी-पार्टी आणि घाला झा-क-बिदाईसारखी काव्ये या दृष्टीने पाहण्यासारखी आहेत. दामोदरलाल दासांच्या हमरावीरतामध्ये भित्रेपणाचे वर्णन केलेले सापडते. चंद्रनाथ मिश्र- ‘अमर’ हे एक सफल कवी आहेत. त्यांनी विनोद, कोट्या आणि अतिशयोक्तीच्या साहाय्याने विनोदी काव्यलेखन आहे.

शांभवी देवींनी मिथिलक विदुषी महिला, राजलक्ष्मींनी भागवतप्रकाश, गया यात्रासारख्या गद्य रचना केल्या असल्या, तरी पद्यरचनेतही स्त्रियांचे प्रावीण्य पहावयास सापडते. लक्ष्मीवती देवी, श्यामादेवी, प्रभादेवी, शांतिकुमारी, सुभद्राकुमारी, कामाख्यादेवी, जयंतीदेवी ही नावे या संदर्भात उल्लेखनीय होत.

लहान मुलांसाठी लिहिलेल्या साहित्यात प्रा. कंटक यांच्या तारेगणचा समावेश होता पण असे साहित्य फारसे लिहिले गेलेले नाही.

दुर्गाधर झांचे सांख्यशास्त्र हे भारतीय तत्त्वज्ञानावरील आणि भैरवनाथ झांचे व्यवहार विज्ञान समाजशास्त्रावरील पुस्तक शिवाय रमानाथ झांचे अलयकुलप्रकाश, परमेश्वर झा व मुकुंद झांनी लिहिलेला मिथिलेचा इतिहास, दीनबंधू झांनी लिहिलेले व्याकरण व क्षेदमहरी सिंहांची मनोविज्ञाननिबंध चंद्रिका ही अन्य महत्त्वाची पुस्तके आहेत.

संदर्भ : 1. Mishra, Jayakanta, History of Maithili Literature, New Delhi, 1976.

             2. Srinivasa Iyengar, K. R. Ed. Indian Literature since Independence : A Symposium, New Delhi, 1973.

             ३. झा, दुर्गानाथ-‘श्रीश’, मैथिली साहित्य का इतिहास, दरभंगा, १९६६.

कोटबागे, व्यं. वा.