जगन्नाथदास–१ : (सु. १४८७–सु.१५५०). प्राचीन ओडिया साहित्यात ⇨पंचसखा  नावाने प्रख्यात असलेल्या वैष्णव कविपंचकातील दुसरा कवी. जन्म जगन्नाथपुरी येथे. माता व पिता अनुक्रमे पद्मावती व भगवानदास. जातीने ब्राह्मण. भगवानदास हे व्यवसायाने पुराणिक (पुराणपंडा) होते. वयाच्या सोळाव्या वर्षीच जगन्नाथदास घरदार सोडून गेले व वयाच्या अठराव्या वर्षी ⇨ चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी बनले. वयाच्या चोविसाव्या वर्षापर्यंत ते चैतन्यांच्या सहवासात होते. नंतर योगसाधना करून त्यांनी अलौकिक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. ते आजन्म ब्रह्मचारी असावेत, असे दिसते. ते संस्कृतचे गाढे पंडित होते. जगन्नाथदासांच्या व चैतन्यांच्या संबंधांबाबत नंतरच्या वैष्णव साहित्यात अनेक कथा, आख्यायिका व उल्लेख आलेले आढळतात. चैतन्यांनी ‘अति बडी’ (महावैष्णव) म्हणून जगन्नाथदासांचा गौरव केला होता. तेव्हापासून लोकही त्यांना ‘अतिबड जगन्नाथ’ म्हणून ओळखत. जगन्नाथदासांचा वैष्णव पंथही ‘अतिबडी पंथ’ म्हणून ओळखला जातो. त्यांनी स्थापन केलेला सतलहरी मठ आजही ओरिसात विद्यमान आहे. पुरी येथे त्यांची समाधी आहे.

जगन्नाथदासांनी रचिलेल्या ओडिया भागवतामुळे त्यांची कीर्ती अजरामर झाली. हा भागवत  ग्रंथ मूळ संस्कृत भागवतावर आधारलेला असला, तरी जगन्नाथदासांच्या ओडिया भाषेवरील असामान्य प्रभुत्वामुळे, प्रतिभेमुळे तसेच त्यांच्या उदात्त व जातिपंथभेदातीत दृष्टिकोनामुळे ओरिसातील सर्वच समाजांतील लोकांत अत्यंत लोकप्रिय झाला. मूळ संस्कृत भागवताचा तो शब्दशः अनुवाद नाही. विष्णु, पद्म, ब्रम्हवैवर्तादी पुराणांतील निवडक भाग त्यांनी रंजकतेसाठी त्यात अंतर्भूत केला आहे. जगन्नाथदासांची नैतिक शिकवण त्या काळास अनुरूप आहे. ह्या भागवतातील वचने ओरिसातील आबालवृद्धांच्या जिभेवर असून त्यांचा ते अनेक प्रसंगी सुभाषितांसारखा उपयोग करतात. लोकांना नैतिक शिक्षणाचे पाठ देणारा एक थोर गुरू म्हणून जगन्नाथदासांना आदरांजली वाहताना प्रख्यात विद्वान बी.सी. मजुमदार यांनी म्हटले आहे, की ‘जगन्नाथदासांचे’ ओरिसाच्या लोकांवर अनेक उपकार आहेत. कारण त्यांनी आपल्या भागवत  ग्रंथातील नैतिक विचारांनी लाखो लोकांचे जीवन प्रत्यक्ष घडविले आहे व आजही ते त्यामुळे घडविले जात आहे, यात संशय नाही.’

जगन्नाथदास एक महान आध्यात्मिक कवी होते. त्यांनी उत्कृष्ट गीतेही रचिली आहेत. तात्त्विक विचार व्यक्त करण्यासाठी माध्यम म्हणून त्यांनीच सर्वप्रथम ओडिया गद्याचा समर्थपणे वापर केला. गुप्तभागवत, दीक्षासंवाद, अर्थकोइली, पाखंड-दलन, मनशिक्षा, भागवतसार, तुलभिणा, गीतामान चंद्रिका  इ. लहानमोठे ग्रंथही त्यांनी रचले आहेत.

नंतरच्या लेखकांवर त्यांचा फार मोठा प्रभाव पडला. अठराव्या शतकात होऊन गेलेल्या दिवाकरदास कवीने त्यांचे एक चरित्र लिहिले आहे. प्राचीन ओडिया साहित्यातील एक उत्कृष्ट चरित्रग्रंथ म्हणून त्याचा उल्लेख केला जातो.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म)