प्रहराज, गोपालचंद्र : (? १८७५–१६ मे १९४५). आधुनिक ओडिया साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक व कोशकार. त्यांचा जन्म कटक जिल्ह्यातील सिद्धेश्वरपूर येथे एका जमीनदार कुटुंबात झाला. कटक येथे शिक्षण पूर्ण केल्यावर ते १९१६ पर्यंत पुरी येथे सरकारी वकील म्हणून नोकरीत होते तथापि त्यांनी राष्ट्रीय आंदोलनात सहभागी होण्यासाठी ही नोकरी सोडली व कटक येथेच त्यांनी स्वतंत्र वकिली व्यवसाय सुरू केला. म. गांधीप्रणीत राष्ट्रीय आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि सामाजिक सुधारणांसाठीही सक्रिय प्रयत्न केले. साहित्याला वाहिलेल्या उत्कल साहित्य ह्या प्रसिद्ध मासिकाचे संपादक ⇨ विश्वनाथ कार (१८६४ – १९३४) हे त्यांचे मित्र होते आणि त्यांच्याच प्रेरणेने गोपालचंद्र ह्या मासिकातून अनेक वर्षे प्रासंगिक स्वरूपाचे व उपरोधप्रचुर लेखन करीत. त्यापैकी काही लेखनातील ताजेपणा व गुणवत्ता आजही नजरेत भरते. भागवत तुंगीरे संध्या (१९०३), नानांक बस्तानी, बाइमहांती पंजी (१९१३) या ग्रंथांत त्यांचे काही लेख व ललित निबंध संगृहीत आहेत. बाइमहांती पंजी ही काल्पनिक व्यक्तिरेखा परंपरागत माणसाची प्रतिनिधी असून ती आधुनिक रीतिरिवाजांवर संधी मिळेल तेव्हा औपरोधिकपणे टीका करताना आढळते. त्यांची ही व्यक्तिरेखा ओडिया साहित्यात चिरंतन झाली आहे.

उत्तरायुष्यात त्यांनी पूर्णचंद्र ओडिया भाषाकोश (७ खंड, १९३१–४०) रचला. यात दोन लक्ष ओडिया शब्द, त्यांचे अर्थ, विविध उपयोग व त्यांचे इंग्रजी, हिंदी आणि बंगाली समानार्थक शब्द दिलेले आहेत. धो रे बाया धो (१९१०) हे अंगाईगीतांचे व उत्कल कहाणी (१९४६) हे लोककथांचे संकलनही त्यांनी केले. त्यांचे हे कार्य मूलभूत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी ओडिया म्हणी व वाक्प्रचारांचाही कोश (धग-ढमाळी वचन, २ खंड, १९२६) पीतांबरी देवी यांच्यासमवेत तयार केला. त्यांचे उपरोधप्रचुर गद्यलेखन विशेष आकर्षक व दर्जेदार असून ⇨ फकीरमोहन सेनापती (१८४७–१९१८) यांचे ते ओडिया गद्यलेखनातील वाङ्‌मयीन वारस मानले जातात.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र, (इं.) कर्णे, निशा (म.)