राय, अन्नदाशंकर : (१५ मार्च १९०४– ). आधुनिक ओडिया-बंगाली कवी, कादंबरीकार आणि निबंधकार. जन्म पूर्वीच्या ओरिसातील धेनकानाल ह्या संस्थानात. अन्नदाशंकरांचे वडील लीलामय हे पूर्व बंगालमधून ओरिसात आले आणि त्यांनी धेनकानाल संस्थानच्या राजाकडे नोकरी केली. कटक, पाटणा व लंडन येथे अन्नदाशंकरांचे शिक्षण झाले. ते बी. ए (१९२५), आय्. सी. एस्. झाले. नंतर ते ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिस’ मध्ये (१९२९ – ५१) रुजू झाले. त्यांची मातृभाषा बंगाली होती तथापि त्यांनी सुरुवातीस ओडियातून आणि नंतर बंगालीतून लेखन केले. साहित्य अकादेमीचेही ते सदस्य होते. त्यांच्य एकूण ग्रंथांची संख्या ८० च्या वर भरते. १९६२ मध्ये त्यांच्या जपाने ह्या बंगाली प्रवासवर्णन-ग्रंथास साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला.

अन्नदाशंकरांनी कटक व पाटणा येथे शिकत असतानाच ओडियात कविता, कादंबरी व निबंधलेखनास सुरुवात केली. त्यांचे यातील काही लेखन त्या काळी प्रख्यात असलेल्या उत्कल साहित्य ह्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. ‘सबुज दल’ (सबुज म्हणजे हिरवा) या नावाने तरुण व पुरोगामी विचारांच्या सहा-सात लेखकांचा जो गट त्या काळी प्रसिद्ध होता, त्याचे नेतृत्व अन्नदाशंकरांकडेच होते. कटक येथील ‘रॅव्हनशा’ महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या व साहित्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा गट स्थापन केला आणि नवसाहित्याच्या प्रेरणेतून आपले लिखाण केले. ह्या गटाच्या सबुज कविता (१९३१) नावाने प्रसिद्ध झालेल्या पहिल्या संकलनात अन्नदाशंकरांच्या कवितांना विशेष महत्त्वाचे स्थानही प्राप्त झाले. नागरी सेवेच्या प्रशिक्षणासाठी १९२९ मध्ये अन्नदाशंकर इंग्लंडला गेले, तेव्हा त्यांनी त्यांच्या ह्या प्रवासाचे वृत्त मातृभाषा बंगालीतून लिहिले आणि ओडियातील लेखनास यानंतर कायमचा पूर्णविराम देऊन ते बंगालीतून लिहू लागले. बंगालीतील काव्य, कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, निबंध इ. प्रकारांत विपुल व दर्जेदार लेखन करून त्यांनी बंगाली साहित्यास महत्त्वपूर्ण योगदान केले.

सबुज कवितामधील त्यांच्या कविता महत्त्वपूर्ण आहेत. त्यांची त्यातील ‘कमल बिलासिर बिदाय’ ही कविता आजही ओडियात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. तिच्यातील प्रतीकात्मकता लक्षणीय आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावरील मनाचा संघर्ष तीत कलात्मकतेने टिपला आहे. आजही त्यांच्या कविता ओरिसातील प्रत्येक सुशिक्षिताच्या जिभेवर घोळतात. त्यांचे कवितालेखन अल्प असले, तरी गुणवत्तेच्या दृष्टीने ते ओडिया साहित्याचा बहुमोल ठेवा आहे.

बासंती (१९४३) ही अन्नदाशंकरांची कादंबरी ओडियातील एक नवा प्रयोग असून तिने ओडिया कादंबरीस नवी दिशा दिली. समाजातील कुप्रवृत्तींचे, दुर्बलांच्या समस्यांचे तीत प्रथमच अत्यंत वास्तव व प्रभावी चित्रण त्यांनी केले आहे.

त्यांच्या बंगालीतील उल्लेखनीय कृती अशा : काव्य –राखी (१९२९), एक्टी बसंत (१९३२), कालेर शासन (१९३३), कामना पंचविंशति (१९३४), नूतन राधा (१९४२), उड्‌कि धानेर मुड्‌कि (१९४२) कादंबरी –सत्यासत्य (६ खंडांत-१९३२-४२), आगुन निये खेला (१९३०), पुतुल निये खेला (१९३३), ना (१९५१), रत्न ओ श्रीमती (२ खंडांत –१९५५ –५६) कथा –प्रकृतिर परिहास (१९३४), मनपवन (१९४६), यौवनज्वाला (१९५०), कामिनी कांचन (१९५४) निबंध –तारुण्य (१९२८), आम्रा (१९३७), जीवनशिल्पी (१९४१), इशारा (१९४३), जीवनकाठी (१९४९), प्रत्यय (१९५१), आधुनिकता (१९५३) प्रवासवर्णन व चरित्र –पथे प्रवासे (१९३१), यूरोपर चिठी (१९४३), देश काल पात्र (१९४९), जपाने, पहाडी (आत्मकथा – १९४७) इत्यादी.

आधुनिक ओडिया व बंगाली साहित्यात अन्नदाशंकरांचे स्थान महत्त्वपूर्ण मानले जाते.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)