गोपीनाथ महांती

महांति, गोपीनाथ : (२० एप्रिल १९१४ — ). ज्ञानपीठ पुरस्कारविजेते प्रख्यात ओडिया कादंबरीकार. जन्म कटक जिल्ह्यातील सिधुआ नदीकाठी वसलेल्या नागबली या खेड्यात. गोपीनाथ बारा वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शालेय शिक्षण सोनेपूर येथे. पाटणा येथून १९३० मध्ये ते दुसरा क्रमांक मिळवून मॅट्रिक झाले. नंतर १९३६ मध्ये कटक येथील रॅव्हनशा महाविद्यालयातून इंग्रजी साहित्य वा विषय घेऊन व विशेष गुणवत्ता प्राप्त करून ते एम्. ए. झाले. आय्. सी. एस्. किंवा प्राध्यापक होण्याची त्यांची इच्छा होती; तथापि आर्थिक स्थितीमुळे त्यांना ओरिसाच्या प्रशासनातील केवळ १०० रु. पगाराची नोकरी स्वीकारणे भाग पडले (१९३८). नंतर त्यांनी प्रशासनातील विविध पदांवर काम केले आणि १९६९ मध्ये ते उच्चपदस्थ अधिकारी म्हणून निवृत्त झाले. ओरिसाच्या आदिवासी समस्यांचे ते तज्ञ मानले जातात. साहित्य अकादेमीचे ते सदस्य होते. १९५५ मध्ये त्यांच्या अमृतर संतान कादंबरीस साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला. १९७० मध्ये ‘सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार’; १९७४ मध्ये ‘ज्ञानपीठ पुरस्कार’; १९७६ मध्ये सन्मान्य डी. लिट्. व १९८१ मध्ये ‘पद्मभूषण’ हे बहुमान त्यांना प्राप्त झाले. लोकप्रिय ओडिया कादंबरीकार ⇨ कान्हुचरण महांती हे गोपीनाथांचे वडील बंधू.

गोपीनाथांचा लेखक म्हणून जडणघडणीचा १९३०−४० हा काळ म्हणावा लागेल. त्यांच्यावर तीन प्रमुख प्रभाव ठळकपणे दिसून येतात : (१) मार्क्स व रशियन क्रांती, (२) फ्रॉइडचे मनोविश्लेषण आणि (३) गांधीजी व राष्ट्रीय चळवळ. या कालखंडात त्यांनी विपुल व सखोल असे वाचन केले. गॉर्की व रॉमँ रॉलां हे त्यांचे आवडते लेखक. नोकरीनिमित्त ओरिसामध्ये ते विविध ठिकाणी होते व त्यानिमित्ताने त्यांना तेथील जनजीवनाचा जवळून अनुभव आला. हा अनुभव पुढे त्यांच्या कादंबरीलेखनास खूपच उपकारक ठरला.

सुरुवातीस त्यांनी कथा, नाटकादी इतर वाङ्मयप्रकार हाताळून पाहिले. पारंपरिक स्वच्छंदतावादी अभिरुचीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. स्वत्वाचा सतत शोध घेऊन ओडिया साहित्याची क्षितिजे विस्तारण्याचा व ओडिया साहित्यास अधिक अर्थपूर्ण स्थान प्राप्त करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

त्यांनी लेखनास १९३६ पासून सुरुवात केली. मनगहिरर चास (१९३८) ही पहिली कादंबरी. १९३८ पासून तो आजतागायत ते सातत्याने व मोठ्या निष्ठेने दर्जेदार कादंबरीलेखन करीत आहेत. नोकरीनिमित्त खेडोपाडी तसेच आदिवासी विभागांतही त्यांना काम करावे लागेल. गोरगरीब, आदिवासी आणि पददलित वर्गांबाबत त्यांच्या मनात अपार सहानुभूती, कणव व प्रेम होते. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी नेहमीच ह्या उपेक्षित वर्गांची बाजू घेतली. सधन व राजकीय सत्ताधाऱ्यांकडून त्यामुळे त्यांना बराच त्रासही सहन करावा लागला.

गोपीनाथांनी विपुल लेखन केले. २१ कादंबऱ्या, २ चरित्रे, ८ लघुकथासंग्रह, २ नाटके, १ निबंधसंग्रह आणि आदिवासी भाषांवरील ६ चिकित्सक ग्रंथ एवढी त्यांची ग्रंथसंपदा आहे; तथापि एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणूनच ते विशेष विख्यात आहेत.

त्यांच्या कादंबऱ्या तीन प्रमुख वर्गांत विभागता येतील : (१) कोरापुट ह्या आदिवासी जिल्ह्यात नोकरी करीत असताना मुख्यत्वे आदिवासींवर लिहिलेल्या कादंबऱ्या. यात दादि बुधा, परजा, अमृतर संतान, सिब भाई, अपहंच इत्यादी. (२) दुसऱ्या वर्गात शहरी जीवनावरील कादंबऱ्या येतात. यात शहरातील काही वर्ग तसेच काही विशिष्ट जाती, उच्च आणि कनिष्ठ वर्ग, सुशिक्षित व अशिक्षित इत्यादींचे चित्रण येते. हरिजन, सरत बाबुन्क गली, राहुर छाया, रपन मति, दानापानि, लयबिलय इ. कादंबऱ्या या वर्गात येतात. (३) तिसऱ्या वर्गात वास्तिविक मातिमताल ही एकच प्रदीर्घ कादंबरी येते. ओरिसातील ग्रामीण जीवनावरील ही कादंबरी एक गद्य महाकाव्यच म्हणता येईल. परजा, अमृतर संतान आणि मातिमताल या तिन्ही कादंबऱ्यांत ओरिसातील आदिवासींचे, खेड्याचे चित्रण आहे. शहरी जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या संख्येने अधिक असल्या, तरी त्या ग्रामीण व आदिवासी जीवनावरील महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांच्या तुलनेने गौणच म्हणाव्या लागतील.

परजा (१९४६) मध्ये कोरापुट जिल्ह्यातील एका लहान व गरीब अशा आदिवासी समूहातील एका कुटुंबाचे चित्रण केले असून निरागस व दुष्ट अशा शक्तींतील संघर्ष तीत रंगविला आहे. तीत शेवटी निरागसतेचा पराभव दाखवलेला आहे. अमृतर संतानचा आवाका व्यापक असून तिची रचनाही अधिक जटिल आहे. तिच्यातही एक आदिवासी कुटुंब आणि खेडेगाव यावरच कथानक केंद्रित केले आहे. तीतही निरागसता आणि दुष्टता यांतील संघर्ष रंगवला आहे पण या दोन्ही शक्ती येथे तुल्यबल अशा चित्रित केल्या आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कार मातिमताल ही प्रदीर्घ (सु. ३,२०,०० शब्द) कादंबरी असून तिच्या लेखनात गोपीनाथांना सु. १० वर्षांचा कालावधी लागला. ओरिसा ग्रामजीवनाचे हे गद्य महाकाव्य असून यापूर्वी ओडियात इतकी श्रेष्ठ आणि भाषिक सौंदर्याने नटलेली कादंबरी लिहिली गेली नाही. रबी हा तिचा बी. ए. झालेला नायक असून तो नोकरीच्या शोधात शहरात जातो. तेथे मित्राकडे थांबतो पण त्याच रात्री त्याचा नोकरी करण्याचा विचार बदलून तो परत आपल्या खेड्यात येतो. त्यांच्या वडिलांस ते आवडत नाही तरीही रबीचा निर्णय बदलत नाही. तो आपले सबंध खेडे हे एका व्यापक कुटुंबात परिवर्तित करण्याचा सतत प्रयत्न करतो. केवळ खेड्याचा कुटुंब म्हणून चेहरा-मोहरा बदलवण्यातच नव्हे, तर खेड्याच्या आचारविचारांतही परिवर्तन घडवून आणण्याची तो पराकाष्ठा करतो. या प्रयत्नात तो कितपत यशस्वी होतो हे सांगणे कठीण आहे; आणि कादंबरीच्या शेवटीही याबाबत मौनच पाळले आहे. तथापि या परिवर्तनप्रक्रियेत ओरिसातील ग्रामजीवन, त्यातील पारंपरिक मूलभूतता, जोम, बदल, माणसातील दुबळेपणा यांचे अतिशय प्रभावी व वास्तव असे एकात्म चित्रण एका व्यापक सर्वकषतेच्या संदर्भात केलेले दिसून येते. रबीच्या विवाहावरून त्याच्या वडिलांशी त्याचा खटका उडतो. दोन पिढ्यांतील अंतराचा, दोन मूल्यव्यवस्थांचा–एक परंपरेने बद्ध व अपरिवर्तनशील, तर दुसरी परंपरेतील चांगले तेवढे साररूपाने स्वीकरणारी व लवचिक–संघर्ष कलात्मक ताकदीने तीत चित्रित केला आहे. वरवर पाहता रबीचे वडील ताठर वाटतात; पण हळूहळू त्यांचे अंतःसत्त्व लय पावताना दिसते. निसर्गक्रमानुसार जुनी झाडे हळूहळू जीर्ण होऊन नष्ट होतात व त्यांची जागा नवे लसलसते कोंब वृद्धिंगत होऊन घेतात. याचेच अतिशय सूचक व प्रतीकरुप चित्रण वडील व मुलगा यांच्या नात्यात स्पष्टपणे येथे जाणवते. या कादंबरीतील पुराचे वर्णनही अतिशय समर्पक आहे. पूर आपल्या रौद्र रूपाने माणसाला केविलपणा व निराधार करतो. मातिमतालमधील पुराच्या संदर्भातून माणसातील उत्कृष्ट गुणांचे दर्शन लेखताने घडविले आहे. श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून जाणवणाऱ्या व्यापक दृष्टीने, सखोलतेचे आणि मानवी अस्तित्वाचे मूलभूत घटक येणारे बारीकसारीक तपशील तसेच जीवनातील छाया-प्रकाश यांचे असंख्य तपशील या सर्वांतून प्रतिबिंबित होणाऱ्या शहाणपणाचे दर्शन या कादंबरीतून घडते. ओडिया साहित्यात या कादंबरीचे व गोपीनाथांचे स्थान चिरंतन असेच आहे.

दास, कुंजबिहारी; मिश्र, नरेंद्र (इं.); सुर्वे, भा. ग. (म.)