दीनकृष्ण दास : (सु. १६५०–सु. १७२५). प्रसिद्ध ओडिया कवी. त्याच्या नावावर असलेल्या विविध प्रकारच्या ग्रंथांवरून दीनकृष्ण दास नावाचे एकाहून अधिक कवी होऊन गेले असावेत, असे काही अभ्यासक मानतात.

दीनकृष्ण दास हा ओरिसाचा एक लोकप्रिय कवी आहे. त्याचा जन्म उत्तर ओरिसात सुवर्णरेखा नदीच्या काठी असलेल्या जलेश्वर (जि. बालेश्वर) गावी झाला. वडिलांचे नाव मधुसूदन. ओरिसावरील अनेक इस्लामी आक्रमणे त्याने प्रत्यक्ष पाहिली. पुरी येथील जगन्नाथाचा तो भक्त होता. मध्यमवयीन असताना त्याला कुष्ठरोग जडला पण त्याने जगन्नाथापुढे स्वरचित आर्तत्राण चौतीसाचा नित्यपाठ केल्याने त्याचा कुष्ठरोग बरा झाल्याचे सांगतात. रोगपीडित व दारिद्र्यपीडित असूनही त्याने इतर कवींप्रमाणे राजकृपा संपादण्याचा प्रयत्न केला नाही. आपली काव्यरचना राजाच्या नावावर देण्यास त्याने नकार दिल्यामुळे त्याला कारावास भोगावा लागला. त्याने आपले उत्तरायुष्य पुरी येथे जगन्नाथाच्या उपासनेत व्यतीत केले. तो सदाचरणी, नीतिमान व निर्भिड होता. स्वतःस तो ⇨ पंचरखा कवींचा अनुयायी मानीत असे. ज्ञानमिश्र भक्तीवर त्याचा विश्वास होता. तंत्र, मंत्र, भोग, धर्म, नीती, अलंकारशास्त्र, सामुद्रिक, वैद्यक, संगीत इ. विषयांचे त्याला चांगले ज्ञान असल्याचे दिसते.

रसकल्लोल, रसविनोद, जगमोहन छंद, नामरत्नगीता, प्रस्तावसिंधु, नावकेलि, अलंकार बोलि, आर्तत्राण चौतीसा इ. त्याचे काव्यग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्याचा रसकल्लोल ग्रंथ त्यातील नादमधुर पदावलीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पदावलीची तुलना गीतगोविंदातील पदावलीशी केली जाते. त्याच्या रसविनोदप्रस्तावसिंधु या ग्रंथात नीतिबोध आहे. त्याचा आर्तत्राण चौतीसा हा ग्रंथ लहान असला, तरी तो ओरिसात अत्यंत लोकप्रिय असून लोकांच्या नित्यपठनातही आहे. दीनकृष्णाची शैली प्रासादिक, रसाळ व साधीसरळ आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)