कवटी: प्राण्यांच्या डोक्याच्या सांगाड्याला कवटी असे म्हणतात. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये ‘कवटी असलेले’ व ‘कवटी नसलेले’ असे दोन प्रकार आहेत.

सस्तन प्राणी, पक्षी सरीसृप (सरपटणाऱ्या) व उभयचर (पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या) प्राण्यांमध्ये कवटी ही हाडांची बनलेली असून त्या सर्वांच्या कवटीची सर्वसाधारण रचना सारखीच असते. तपशील व कवटीतील विविध अस्थींचे आकार यांमध्ये मात्र फरक दिसतो. सस्तन प्राण्यांमध्ये खालचा जबडा बराच सुटा असून त्याचा वरच्या जबड्याशी सांधा असल्यामुळे तो वर खाली होऊ शकतो. माशांच्या कवटीच्या रचनेत पुष्कळच फरक दिसून येतो. पुष्कळ माशांचा वरचा जबडा कवटीला सैलसर जोडलेला असतो. प्राथमिक अवस्थेतील (उदा., लँप्रे, हॅगफिश) पृष्ठवंशीय प्राण्यांना जबडाच नसतो.

कवटी ही हाडांची किंवा कूर्चेची (मजबूत व लवचिक पेशीसमूहांची) बनलेली असून ती पेटीसारखी बंद असल्यामुळे तीतील मेंदूला बाह्य आघातापासून संरक्षण मिळते. कवटीच्या मागील भागामध्ये तिचा पृष्ठवंशाशी संधी झालेला असतो. पुढच्या बाजूला मध्यभागी नाक, त्याच्या दोन्ही बाजूंस डोळे आणि तिच्या दोन्ही बाजूंना कान यांच्यासाठी विवरे असतात. अगदी अप्रगत स्थितीतील प्राण्यांच्या कवटीमुळे या महत्त्वाच्या तंत्रिका (मज्जातंतुयुक्त) भागांना संरक्षण मिळत असल्यामुळे त्यांच्या कवटीला तंत्रिका-कवटी असे म्हणतात. यापेक्षा अधिक प्रगत माशांमध्ये व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये पृष्ठवंशाच्या पहिल्या तीन किंवा चार कशेरूंचे (मणक्यांचे) एकीकरण झालेले असून ते कशेरू कवटीचाच भाग असल्यासारखे दिसतात. वर्तुळमुखी (सायक्लोस्टोम) प्राणी, मासे व उभयचर प्राण्यांच्या विकसनावस्थेत काही काळ अस्थी व कूर्चात्मक क्लोमचाप (कल्ल्यांची कमान) असतात. जंभमुखी (ग्नाथोस्टोम, जबडा असलेल्या) प्राण्यांमध्ये (उदा., मासे, उभयचर प्राणी) क्लोमांत अस्थिपट्टे असतात. प्रगत पृष्ठवंशी प्राण्यांतही क्लोमांमुळे श्वसन होत नसते तरी तेथेही असे पट्टे दिसतात. जंभमुखी प्राण्यांतही अप्रगत असा वरचा व खालचा जबडा अशा पट्ट्यांनी बनलेला असतो. या क्लोमचापनिर्मित भागापासून पुढे पचन तंत्र (पचन संस्था) व श्वसन तंत्राचीही उत्पत्ती होत असल्यामुळे या भागाला अंतस्त्य कवटी (कोष्टांगीय) असे नाव दिलेले आहे.

पाटील, शि.ज्ञा.

मानवी कवटी : मानवी कवटीमध्ये अनेक अस्थी एकमेकींत करवतीसारख्या दातांनी गुंतविल्यासारख्या असून त्यांच्यामध्ये काहीही चलन होत नाही. या गुंतविलेल्याअस्थिसंधींना शिवण असे नाव असून लहानपणी या शिवणी अस्थिमय झालेल्या नसल्यामुळे त्यांची जागा मऊ लागते. वय जसजसे वाढत जाते तसतशा या शिवणी अस्थिमयहोऊन हाडे एकमेकांस घट्ट बांधली जातात.

खालचा जबडा हे एकच हाड कवटीच्या खाली बसविलेले असून त्याचे कवटीच्या तळाशी दोन सांधे असल्यामुळे त्याची उघडझाप होऊ शकते. कवटीतील खालचाजबडा वगळला तर बाकीच्या अस्थींची मिळून एक मोठी पोकळी तयार झालेली असते, तिलाच करोटी किंवा शिर:संपुट असे नाव असून त्या पोकळीत मेंदू असतो. कवटीमुळेमेंदूला संरक्षण मिळते. कवटीच्या या वरच्या भागात मेंदू व त्यावरील परिमस्तिष्क (मेंदूभोवतालचे पातळ आवरण) व त्याच्या रक्तवाहिन्या, तंत्रिका-ऊतक (समान रचना वकार्य असणाऱ्‍या पेशींच्या समूहाला ऊतक म्हणतात) वगैरे भाग असतो त्याला मस्तिष्क-कंकाल असे नाव असून बाकीच्या म्हणजे चेहऱ्‍याच्या भागाला चर्या-कंकाल असे नावआहे.

मस्तिष्क-कंकाल : मस्तिष्क-कंकालाच्या पुढच्या बाजूस कपालास्थी असते. कपाळ व त्याच्या वरचा व बाजूंचा भाग या अस्थीचा बनलेला असतो. थोडे मागे व दोन्ही बाजूंस कपालास्थीला दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी एक अशा दोन अस्थी असून त्यांना पार्श्वास्थी असे नाव आहे. या दोन पार्श्वास्थींचा कपालास्थीशी जो संयोग होतो त्याला दक्षिणोत्तर सीवनी (शिवण) असे नाव आहे. पुढच्या बाजूस कपालास्थी, दोन्ही बाजूंस दोन

पार्श्वास्थी व मागील पश्चकपालास्थी यांच्या आतल्या खोलगट भागांची मिळून जी घुमटाकार पोकळी तयार झालेली असते तिच्यात मेंदू आणि त्याची आवरणे असतात. प्रत्येक पार्श्वास्थीच्या खालच्या बाजूला असलेल्या अस्थींना शंखास्थी असे नाव असून या शंखास्थीमध्येच मध्य व अंत:कर्ण असतात.


कपालास्थीच्या मागे व कवटीच्या तळाशी असलेल्या अस्थीला जतुकास्थी असे नाव असून तिचा मध्य भाग मध्यरेषेत व त्या भागापासून दोन्ही बाजूंना पंखाकार असे दोन भाग असतात. त्यांना जतुकास्थिपक्ष असे म्हणतात. या जतुकास्थीच्या पुढे कपालास्थी व मागे पार्श्वास्थी असून त्या दोहोंमध्ये ती पाचर मारल्यासारखी असते. मेंदू ज्या पेटीत असतो त्या पेटीच्या तळामध्ये तीन खोलगट विभाग किंवा कोटरे दिसतात. पुढच्या कोटराला अग्रकोटर, मधल्याला मध्यकटोर व मागल्याला पश्चकोटर अशी नावे असून या तीन कोटरांत मिळून मस्तिष्क (मेंदू), मस्तिष्क-मेरू सेतू (मेंदू व मज्जारज्जू जोडणारा भाग) व निमस्तिष्क (लहान मेंदू) हे तंत्रिका तंत्राचे विभाग असतात. अग्रमस्तिष्क कोटराच्या दोन्ही बाजूंस मेंदूकरिता खोलगट असा भाग असून त्या भागाच्या खालीच डोळ्याची खोबण असते. त्या खोबणीच्यावर आणि अग्रकोटराच्या तळाशी कपालास्थीचा पश्चगामी पातळ असा भाग असतो. अग्रकोटराच्या मध्यरेषेत नेत्रछतांच्या (डोळ्यांच्या खोबणींच्या छतांच्या) आतल्या बाजूस नासाकोटरांच्या (नाकाशी संबंधित असलेल्या कवटीतील पोकळ्यांच्या) वर जाळीसारखी भोके असलेली अस्थी असते. तिला तितवास्थी म्हणतात. त्या अस्थीमधील भोकांतून नासातंत्रिकेच्या शाखा नाकामधून वर मस्तिष्काकडे जातात. या शाखा गंधवाहक असून त्यांच्यामुळे नासाश्लेष्मामध्ये (नाकातील बुळबुळीत आवरणामध्ये) उत्पन्न झालेल्या गंधवाहक संवेदना मस्तिष्काकडे जातात. त्याच्यामागे असलेला जतुकास्थीचा मुख्य भाग खोगिराच्या आकाराचा असल्यामुळे त्याला ‘पल्याण’ असे म्हणतात. पल्याणाच्या खोलगट भागात ⇨पोष ग्रंथी असते.

अग्रकोटराच्या मागेच मध्यकोटर असून ते मध्यभागी निमुळते व दोन्ही बाजूंस पसरट असते. या भागाच्या मध्य रेषेत पश्चास्थी, दोन्ही बाजूंस तळाशी शंखास्थी व तिचा पसरट भाग आणि बाजूच्या भागांत पार्श्वास्थी असतात.

मध्यकोटराच्या मागे पश्चकोटर असून ते बहुधा सर्व पश्चास्थीने बनलेले असते. त्याच्या मध्यभागी बृहत्‌ रंध्र असून त्यातून मेरूरज्जू (मज्जारज्जू) मेंदूपासून खाली कण्यात उतरतो. पश्चास्थीचा पुढचा भाग व जतुकास्थीचा मागचा भाग हे या बृहत्‌ रंध्राच्या पुढे एकमेकांस जोडलेले असतात. कवटीच्या तळाशी अनेक छिद्रे असून त्यांतून तंत्रिका, रक्तवाहिन्या मेंदूकडून व मेंदूकडे जातात.

कवटीचा वरचा व बाहेरचा भाग अंडाकृती असून त्याच्यावर तीन शिवणी दिसतात. पुढच्या बाजूस दक्षिणोत्तर शिवण असून तिच्यामुळे पार्श्वास्थी व कपालास्थीचा संधी झालेला असतो. ह्या शिवणीचा मध्य भाग जन्माच्या वेळी मऊ व बिलबिलीत असून त्यालाच टाळू असे म्हणतात. ह्या टाळूचा भाग पुढे अस्थिमय होऊन एक ते दीड वर्षामध्ये टणक होतो. मध्यरेषेत अशीच शिवण असून तिला मध्यसीवनी असे म्हणतात. या शिवणीमुळे दोन्ही बाजूंच्या पार्श्वास्थींचा संधी होतो. त्या शिवणीच्या मागे इंग्रजी V च्या उलट आकाराची कोणात्मक शिवण असून तिला शिखासीवनी असे म्हणतात. या शिवणीमुळे दोन्ही पार्श्वास्थी व पश्चास्थी यांचा संधी झालेला असतो.


चर्या-कंकाल : कवटीच्या पुढच्या भागांची चर्या किंवा चेहरा बनतो. या भागात वरच्या बाजूस कपालास्थी असून त्याच्या खाली मध्यरेषेत नासास्थी व दोन्ही बाजूंस नेत्रविवरे असतात. नेत्रविवरांच्या मध्य भित्तीत अश्रुग्रंथी अस्थी असून त्या विवरांचे बाहेरची तोंड साधारणपणे चतुष्कोणी असून आत निमुळते होत गेलेले असते. या नेत्रविवराच्या मागे व तळाशी जतुकास्थीचा बृहत्‌- व लघु-पक्ष असून पुढच्या बाजूस तळाशी जंभास्थीची पार्श्वपट्टिका असते. येथे वर व खाली फट असून तीतून तंत्रिका जातात. नासास्थीच्या मध्यभागी मध्यरेषेत उभा पडदा असतो, तो तितवास्थीच्या उभ्या पट्ट्याने बनलेला असून त्याच्यामुळे दोन नाकपुड्यांच्या मधील पडदा तयार होतो. पडद्याचा पुढचा भाग उपास्थीचा (कूर्चेचा) बनलेला असतो. नाकपुड्यांच्या पार्श्वभित्ती जंभास्थीच्या बनलेल्या असून त्यांनाच चिकटून एकाखाली एक असे पातळ अस्थि-पापुद्रे चिकटलेले असतात, त्यांना उपरी, मध्य व अधर अस्थिकवचे असे म्हणतात. या पातळ अस्थीवर जाड असा श्लेष्मस्तर असून त्यामुळे श्वासाबरोबर आत घेतली जाणारी हवा गरम होऊन मगच फुप्फुसात जाते. जंभास्थीच्या नाकाच्या पार्श्व बाजूस असलेल्या घट्ट अस्थीत पोकळी असून तिला जंभ कुहर असे नाव आहे. अशीच पोकळी कपालास्थी, तितवास्थी व शंखास्थीच्या पश्चभागातील स्तनाभ (स्तनाच्या आकाराच्या) प्रवर्धात (विस्तारात) असते. जंभास्थीच्या खालच्या कडेवर प्रत्येक बाजूस आठ असे एकूण सोळा दात असतात. जंभास्थीच्या चेहऱ्‍याच्या पार्श्व बाजूस त्याचा कपोलास्थीशी (गालाच्या हाडाशी) संधी झालेला असून कपोलास्थीचा एक प्रवर्ध मागे जातो व त्याच्याशी शंखास्थीच्या पुढे येणाऱ्‍या प्रवर्धाचा संधी होतो. या दोन प्रवर्धांमुळे गालाचे हाड तयार होते. या हाडाच्या खालून शंखास्थीपासून निघालेला शंखस्नायू खालच्या जबड्याच्या अस्थीपर्यंत जातो. त्या स्नायूच्या आकुंचनाने तोंड मिटते.

कवटीच्या तळामध्ये पुढच्या बाजूस दात जिच्यात असतात ती जंभास्थीची कड व तिच्या मागे तालु- अस्थीची पट्टी असते. या पट्टीमुळेच कठीण तालू झालेली असून तिच्या मागच्या बाजूस मऊ व स्नायुयुक्त अशी मृदुतालू असते. त्या अस्थींच्या मागे मध्यभागी नांगराच्या फाळाच्या आकाराची अगदी पातळ अशी अस्थी असून तीमुळे दोन नाकपुड्या स्वतंत्र दिसतात. त्यामागे जतुकास्थी असून तिच्या मागे पश्चास्थी व बाजूला शंखास्थीचा चपटा भाग असतो.

ढमढेरे, वा.रा. पाटील, शि.ज्ञा.