मेंढी : मेंढी हा पोकळ शिंगे असलेला, रवंथ करणारा, समखुरी प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला गणातील बोव्हिडी कुलाच्या कॅप्रिनी या उपकुलातील प्राणी आहे. जगाच्या कृषी अर्थशास्त्रामध्ये ह्याला महत्त्वाचे स्थान आहे. मुख्यत्वे लोकर व मांस आणि काही प्रमाणात दुधाच्या उत्पादनासाठी मेंढ्या पाळल्या जातात. समशीतोष्ण प्रदेशातील कमी पाऊस असलेल्या भागातील जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) मेंढ्यांना अनुकूल असते. उंच डोंगराळ प्रदेशातील खुरटे गवत व रसाळ तण खाऊन मेंढी आपली उपजीविका उत्तम तऱ्हेने करू शकते. आकारमान, वजन, लोकर व शिंगे यांवरून त्यांचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. काही प्रकारांत नर व मादी दोहोंनाही शिंगे असतात. माद्यांची शिंगे नरापेक्षा बहुधा लहान असतात. काहींमध्ये फक्त नरांनाच शिंगे असतात, तर आणखी काही प्रकारांत ती दोघांनाही नसतात. नरांची शिंगे कोणीय असून त्यांवर आडवे कंगोरे असतात त्यांचा रंग हिरवट किंवा तपकिरी असतो. सकृत्‌दर्शनी काही प्रकारच्या मेंढ्या शेळ्यांसारख्या दिसतात, त्यांच्यातील फरक चटकन लक्षात येत नाही.

उत्पत्ती व इतिहास : इतर सर्व पाळीव प्राण्यांप्रमाणे मेंढी हा प्राणी सुरुवातीस रानटी स्थितीत होता. मानवाने नवाश्म युगामध्ये (इ.स.पू. ९००० ते ८००० वर्षे) इतर प्राण्यांबरोबर मेंढी हा प्राणी माणसाळवला असावा. मध्यपूर्वेपासून ते आयर्लंडमधील दलदलीच्या भागापर्यंतच्या प्रदेशातील मानवाच्या अस्तित्वाच्या इतर खाणाखुणांबरोबर मेंढ्यांची हाडे सापडली आहेत. ॲग्रिकल्चरल ओरिजिन्स अँड डिस्‌पर्सल्स या ग्रंथामध्ये कार्ल ओसॉयर यांनी मेंढ्यांच्या माणसाळण्याचा काळ माणूस शेती करून राहू लागलेल्या नवाश्म युगातील मानवाच्या काळाशी संबंधित असल्याचे व नैर्ऋत्य आशियामध्ये त्या माणसाळल्या गेल्या असाव्यात, असे प्रतिपादन केले आहे. लिओपोल्ड ॲडॅमट्झ या ऑस्ट्रियन संशोधकांच्या मते वलयाकार (वेढा असलेली) शिंगे असलेल्या माणसाळलेल्या मेंढ्यांची उत्पत्ती पंजाब ते बलुचिस्तान या भागातील उरियल प्रकारातील ओव्हिस विग्नाय या रानटी मेंढ्यापासून झाली असावी. ताम्रयुगामध्ये यूरोपात ओ. एरिस स्टुडेराय हा मेंढ्यांचा जाडजूड वलयाकार शिंगे असलेला नवीन प्रकार अस्तित्वात आला. जे.यू. ड्यूर्स्ट या स्वीडिश आनुवंशिकीशास्त्रज्ञांच्या मतानुसार हा प्रकार सार्डिनियामधील डोंगराळ प्रदेशातील ओ. म्युसिमॉन ह्या रानटी मेंढ्यांपासून उत्पन्न झाला असावा. ओ. म्युसिमॉन मेंढ्यांचा सार्डिनियातील माणसाळलेल्या मेंढ्यांशी फलदायी संयोग होऊ शकतो, हे थोरले प्लीनी (इ.स. २३ ते ७९) यांच्या वेळेपासून माहीत आहे. मेंढ्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आणि पश्चिम आशिया हे समजले जाते. अर्वाचीन पाळीव मेंढ्यांची उत्पत्ती कशी झाली याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नसली, तरी इराण, अफगाणिस्तान व तिबेट येथील उरियल (ओ. विग्नाय), दक्षिण पूर्व यूरोपमधील ओ. म्यूसिमॉन आणि मध्य आशिया या हिमालयाच्या भागातील ⇨ आर्गली (ओ. ॲमॉन) या रानटी मेंढ्यांपासून झाली असावी, असे दिसते.

मेष म्हणजे मेंढा हे अग्नीचे वाहन आहे, असा उल्लेख वैदिक वाङ्‌मयात अनेक ठिकाणी आहे. यज्ञामध्ये मेंढ्याच्या मांसाचे हवन करण्यात येत असल्याबद्दलचा उल्लेख वैदिक मंत्रामध्ये आढळतो. राजनिघंटु (इ.स. १०७५) या ग्रंथामध्ये मेंढ्याचे मांस थंड व रुचकर पण पचनास जड असते, असे लिहिले आहे. बायबलमध्ये इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा मेंढीचा उल्लेख अधिक ठिकाणी आहे. निरनिराळ्या धर्माच्या पुरातन इतिहासाच्या संदर्भात बळी देण्यासाठी मेंढा या प्राण्याचा उल्लेख सर्वत्र आढळतो. ही बळी देण्याची प्रथा अद्यापही चालू आहे.

मध्ययुगामध्ये मध्यम व लांब धाग्याची लोकर व मांस यांकरिता इंग्लंडमधील मेंढ्या प्रसिद्ध होत्या, तर तलम धाग्याची लोकर असलेल्या मेरिनो मेंढ्याबद्दल स्पेन हा देश विख्यात होता. हे दोन देश मेंढ्यांचे मांस व लोकर या बाबतींत आघाडीवर होते. सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांमध्ये मेंढ्या आयात करण्यात आल्या आणि तेथील जलवायुमान व चराऊ कुरणे यांच्या अनुकूलतेमुळे मेंढीपालनाचा धंदा वाढीस लागला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये मेंढीपालनाचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. याची कारणेही तेथील जलवायुमान आणि चराऊ कुरणांची उपलब्धता हीच होती. तथापि १९५० नंतर अमेरिकेतील मेंढ्यांच्या संख्येत घट होऊ लागली. याचे कारण अधिक किफायतशीर असलेल्या दुग्धोत्पादनाच्या व गुरांच्या मांसोत्पादनाच्या धंद्याकडे तेथील लोकांचे लक्ष गेले, हे होय. तेथे मेंढ्यांची संख्या १९४७ मध्ये ५·५ कोटी होती १९७० मध्ये २·५ कोटींवर आली. याच काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व यूरोपातील यूगोस्लाव्हिया, बल्गेरिया, रूमानिया, पोलंड, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी व पूर्व जर्मनी या देशांमध्ये लोकरीची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने मेंढ्यांच्या प्रजननाकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले. या देशांतील मेंढ्यांपासून मध्यम प्रतीची गालिच्याची लोकर मिळत असे, तर यूगोस्लाव्हिया, रूमानिया, बल्गेरिया व चेकोस्लोव्हाकिया या देशांमधील २५% दुग्धोत्पादन मेंढ्यांपासून मिळत असे. यांतील काही देशांमध्ये शेतीचे एकत्रीकरण करण्यात आले व मेंढीपालन सहकारी पद्धतीने करण्यात येऊ लागले. बल्गेरियातील स्टारा झागॉरा, रूमानियातील तुर्कांना व त्सिगाई, यूगोस्लाव्हियातील झॅकेल इ. स्थानिक जातींशी रशियन ॲस्कानियन, स्टाव्हरोपोल या मेरिनो मेंढ्यांच्या जातींचा संकर करून बल्गेरियामध्ये थ्रॅसियन मेरिनो, रूमानियामध्ये स्पान्सा व पोलंडमध्ये लोविक्का या वार्षिक ५·५ ते ७·५ किग्रॅ. तलम लोकर देणाऱ्या मेंढ्याच्या जाती निर्माण करण्यात आल्या आहेत.

रानटी मेंढ्यांच्या जाती : अद्यापही जगाच्या पाठीवर रानटी मेंढ्यांचे अस्तित्व दिसून येते. तुर्कस्तानलगतच्या पामीर पठारावरील ४,९०० मी. उंचीवर मार्को पोलो या यूरोपीय प्रवाशांना तेराव्या शतकात रानटी मेंढ्यांचे कळप आढळले होते व पुढे त्यांच्याच नावाने ही जात ओ. पोली म्हणून ओळखली जाऊ लागली. या जातीतील नरांची शिंगे मोठी व पसरट असून शिंगांची टोके डोक्यापासून दूर राहतात. इतर रानटी जातींच्या शिंगांच्या अरुंद वळणामुळे टोके डोक्याजवळ राहतात. ओ. कारेलिनी हा याच मेंढ्यांचा एक प्रकार तिएनशान डोंगरांच्या रांगामध्ये आढळून येतो. या दोन्ही प्रकारच्या मेंढ्या आकारमानाने थोराड आहेत पण अल्ताई पर्वत श्रेणीत आढळणाऱ्या ओ. ॲमॉन या आर्गली मेंढ्या सध्या अस्तित्वात असलेल्या रानटी मेंढ्यांपैकी सर्वांत धिप्पाड असून त्यांची उंची १·३ मी.व वजन १३५ किग्रॅ. असते. यांचा एक प्रकार लडाख व तिबेटमध्ये, दुसरा पूर्व मंगोलियामध्ये व तिसरा गोबीच्या वाळवंटामध्ये आढळून येतो. आर्गली गटातील सर्वात लहान रानटी मेंढ्या अफगाणिस्तान, पंजाब व लडाखमधील डोंगराळ भागामध्ये उरियल, उरिन किंवा शापू म्हणून ओळखल्या जातात. या पर्शियन किंवा आर्मेनियन (ओ. ओरिएंटॅलिस) आणि सार्डिनियन किंवा कॉर्सिकन (ओ. म्युसिमॉन) मेंढ्यांसारख्या दिसतात. याशिवाय तिबेटमध्ये १० ते ५० च्या कळपात आढळणाऱ्या भराल (स्यूडॉइस नेयॉर) या हिमालयातील निळ्या मेंढ्या म्हणून ओळखल्या जातात.


आफ्रिकेमध्ये उत्तरेपासून पूर्वेकडे सूदानपर्यंत पसरलेल्या डोंगरांच्या रांगांमध्ये रानटी मेंढ्यांचा एकच प्रकार उदाद किंवा औदाद (ॲमोट्रॅगस लेरव्हिया) म्हणून ओळखला जातो. या मेंढ्यांना डोळ्याखालील ग्रंथी असत नाहीत व त्यांची शिंगे शेळीप्रमाणे गुळगुळीत असतात.

रशियामधील पूर्व सायबीरियाच्या भागामध्ये व लगतच्या स्टॅनोव्हाय पर्वतराजीमध्ये ओ. बोरीलिसओ. निव्हिकोला हे रानटी मेंढ्यांचे दोन प्रकार आढळतात. या मेंढ्यांचे उत्तर अमेरिकेतील डोंगराळ भागात आढळणाऱ्या रानटी मेंढ्यांशी बरेच साम्य आहे. अमेरिकेतील या रानटी मेंढ्यांना मोठ्या शिंगांच्या (बिग हॉर्न) म्हणून ओळखतात. त्यांच्या डोळ्याखाली ग्रंथी नसते, तसेच वयस्क नराच्या शिंगाचा पुढील भाग सपाट असतो. यामुळे आर्गली मेंढ्यांहून त्या निराळ्या आहेत, हे लक्षात येते.

अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या भागातील याच प्रकारातील मेंढ्या रंगाने खाकी असून त्यांच्या पुठ्‌ठ्याचा रंग पांढरा असतो. स्टिकीन नदीच्या आसपासच्या ब्रिटिश कोलंबियातील मेंढ्यांचा रंग काळा असतो, तर अलास्कामधील याच जातीच्या रानटी मेंढ्या पांढऱ्या असतात व त्या डाल मेंढ्या म्हणून ओळखल्या जातात.

वर्गीकरण : शरीरांची ठेवण, विशेषतः शेपटीची लांबी व तीत साठणारी चरबी, तसेच लोकरीची प्रत यांच्यावर आधारित असे पाळीव मेंढ्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यानुसार खालील प्रमुख वर्ग मानले जातात.

(१) उत्तम प्रतीची तलम लोकर देणाऱ्या मेंढ्या : उदा., मेरिनो, रॅम्ब्युलेट इत्यादी.

(२) मध्यम प्रतीची तलम लोकर देणाऱ्या मेंढ्या : ह्या मेंढ्यांतही दोन प्रकार आहेत (अ) काळ्या किंवा लांबट तोंडाच्या मेंढ्या उदा., साऊथडाऊन, सफोक, ऑक्सफर्ड  इत्यादी. (आ) पांढऱ्या तोंडाच्या डॉर्सेट हॉर्न, रायलँड इत्यादी.

(३)लांब धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्या :ह्यातील एक प्रकारच्या मेंढ्या लांब व चमकदार लोकर देणाऱ्या आहेत. उदा.,कॉटस् वोल्ड,लिंकन इत्यादी.

ह्यातील दुसऱ्या प्रकारच्या मेंढ्यांवर चकाकी कमी असते. या प्रकारात बॉर्डर लायसेस्टर,रोमनी मार्श,शेव्हिएट,मेंढ्यांत मोडतात.

(४) लांब व जाड धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्या : ह्यामध्येही दोन प्रकार आहेत (अ) सुधारित मेंढ्या : स्कॉटिश ब्लॅक फेस इत्यादी. (आ) अजूनही आद्य अवस्थेत असलेल्या मेंढ्या ह्या मेंढ्यांचे तीन उपप्रकार आहेत. (आ) पातळ शेपटीच्या मेंढ्या : उदा., नव्हाजो (अमेरिकन), झॅकेल (यूरोप), यूरा (स्पेन), तिबेट (आशिया). (आ) चरबीयुक्त शेपटीच्या मेंढ्या : यांचेही परत दोन उपउपप्रकार आहेत. (१) चरबरीत लोकर देणाऱ्या : आशिया खंडातील बऱ्याचशा मेंढ्या. (२) फर देणाऱ्या :काराकुल जातीच्या मेंढ्या. (आ) चरबीयुक्त पुष्ट पुठ्‌ठ्याच्या मेंढ्या : ह्या मेंढ्याच्या प्रकारात कझक, दुम्बा इ. जातीच्या मेंढ्या मोडतात.

वरील चार मुख्य प्रकारच्या मेंढ्यांच्या जाती आहेत (उत्तम प्रतीची लोकर देणाऱ्या, मध्यम प्रतीची लोकर देणाऱ्या, लांब धाग्याची लोकर देणाऱ्या व जाड धाग्यांची लोकर देणाऱ्या). ह्याशिवाय लांब धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्यांचा उत्तम प्रतीची लोकर देणाऱ्या मेंढ्यांशी संयोग करून संकरित मेंढ्यांचा एक नवीन वर्गच तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये कॉरिडेल, पोलवर्थ, कोलंबिया, पनामा, कॉरमो इ. जातींच्या मेंढ्या येतात.

काही मेंढ्यांच्या अंगावर लोकर अजिबात नसते. त्यांचा उपयोग फक्त मांस उत्पादनासाठीच होतो.  भारतात नेल्लोर, बन्नूर ह्या जातींच्या मेंढ्या मांसासाठी म्हणूनच पाळतात. पर्शियन जातीच्या मेंढ्या ह्या प्रकारात मोडतात. काही मेंढ्याचा उपयोग दूध उत्पादनासाठी करतात. ईस्ट फ्रेझियन, पेलविन, झॅकेल या मेंढ्या ह्या प्रकारात मोडतात.

सर्वसामान्य माहिती : हरिणाप्रमाणे मेंढ्यांच्या डोळ्याच्या खालच्या बाजूस कातड्याखाली एक ग्रंथी असते व तिचा स्त्राव बाहेर येण्यासाठी एक छिद्र असते. बऱ्याच जातींमध्ये ती अल्पविकसित असते, तर काहींमध्ये ती अस्तित्वातही नसते. खुराच्या बेचक्यात पिशवीसारखी एक ग्रंथी असून तिच्यातून उग्र वास असलेला तेलकट पदार्थ स्त्रवत राहातो. चालताना गवताला किंवा वाटेवरील दगडाला हा स्त्राव लागतो. मेंढ्यांचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्यामुहे स्त्रावाच्या वासावरून आसपासच्या इतर मेंढ्यांची त्यांना चाहूल लागते. काही मेंढ्यांच्या गळ्यावर पुढच्या बाजूस केसांचा झुबका दिसून येतो पण त्यांना दाढी नसते. शेळ्यांप्रमाणे मेंढ्यांच्या शरीराला उग्र वास येत नाही. मेंढ्यांना वरच्या जबड्यात पुढील बाजूस कृंतक दंत (कुरतडण्याच्या कामी उपयोगी पडणारे पटाशीसारखे दात) नसतात. त्या ठिकाणी उपास्थींचा (कूर्चांचा) जाड पुठ्‌ठ्यासारखा भाग असतो. खालच्या जबड्यात पुढील बाजूस आठ कृंतक दंत असतात. खालच्या जबड्यातील कृंतक व वरच्या जबड्यातील पुठ्‌ठ्यासारखा भाग यामध्ये गवत धरून डोक्याला हिसके देऊन ते तोडले जाते. खालच्या व वरच्या जबड्यात प्रत्येक बाजूस सहा सहा दाढा असतात. मेंढ्यांना ओठांची पुष्कळच स्वैर हालचाल करता येत असल्यामुळे हवे तेच नेमके खुडून जमिनीलगत चरता येते. इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांप्रमाणे मेंढ्यांचे पोट चार कप्प्यांचे असते. दुपारचा थोडा विश्रांतीचा वेळ सोडल्यास त्या दिवसभर चरत असतात. त्यांचे जवळ जवळ अर्धे आयुष्य चरण्यात जाते.

मेंढ्याच्या त्वचेची जाडी २ मिमी. असते. व तीत कमीधिक प्रमाणात रंगद्रव्य असते. त्वचेमध्ये धर्म ग्रंथी, त्वक्‌-स्नेह ग्रंथी (तेलकट पदार्थ स्त्रवणाऱ्या ग्रंथी), लोम व लोकर उगविणारे तंतुपुटक असतात व त्यांची एक विशिष्ट रचना सर्वसाधारणपणे अस्तित्वात असते. जन्माच्या वेळी जे पुटक अस्तित्वात असतात त्यांना मूलपुटक म्हणतात. प्रत्येक पुटकाशी एकेक त्वक्-स्नेह ग्रंथी, धर्म ग्रंथी व अरेखित स्नायू (उभे तंतू असलेला अनैच्छिक स्नायू) संलग्न असतात. दुय्यम पुटक नंतर तयार होतात व त्यांच्याशी फक्त एक त्वक्-स्नेह ग्रंथी संलग्न असते. मूलपुटक तीन तीनच्या समूहामध्ये असतात व त्याबरोबर काही दुय्यम तंतुपुटक असतात. हे तंतू निरनिराळ्या जातीनुसार कमी अधिक असतात व त्यांची संख्या द. चौ. सेंमी. मध्ये ७७५ ते ९,३०० असू शकते. बहुतेक मेंढ्यांच्या अंगावर लोकर असते परंतु काही जातींच्या मेंढ्यांच्या अंगावर आखूड केस असतात, तर आणखी काहींच्या अंगावर लोकर व केस यांचे मिश्रण असते.

लोकरीचा धागा बहुतांशी अविद्राव्य (न विरघळणाऱ्या) ⇨ केराटिनाचा बनलेला असतो. धाग्याचा व्यास १० ते ७० मायक्रोमीटर (१ मायक्रोमीटर = १० मी) असतो व मेंढ्यांच्या अंगावर एक वर्ष वाढलेल्या धाग्याची लांबी २·५ ते १५ सेंमी. किंवा थोडी अधिक असते. धाग्याचा व्यास व लांबी यांचा मेंढ्यांची जात, पोषण व पर्यावरण यांचा अन्योन्य संबंध आहे. धाग्याचा एका सेंमी. लांबीमध्ये १ ते १० किंवा थोड्या अधिक मळसूत्री वळ्या दिसून येतात. या वळ्यांमुळे धाग्याला लवचिकपणा येतो. मेंढ्यांची लोकर जर कापली नाही, तर आयुष्यभर ती ठराविक प्रमाणात वाढत असते.


मेंढ्या जात्याच भित्र्या असतात. त्यातल्या त्यात धीट मेंढीच्या पाठीमागे जाण्याची व कळपात राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते. सामान्यतः त्यांना बुद्धी कमी असते, असे मानले जाते तथापि हवामानासंबंधीची त्यांना चांगली जाण असते, असे दिसून येते. त्यांची आयुर्मर्यादा ७ ते १० वर्षे असते पण २० वर्षेपर्यंत जगल्याची उदाहरणे आहेत. सपाटीपेक्षा उंच पठारावर चरणे त्यांना अधिक आवडते.

मेंढीपालन : प्राचीन काळी मेंढ्यांची पैदास व जोपासना कशी केली जात असे याबद्दलची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पंधराव्या शतकापासूनची यांसंबंधीची माहिती मिळते.

उत्तर व दक्षिण गोलार्धाच्या २० ते ६० अक्षांशामधील देशांमध्ये मेंढीपालन मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. बहुतांशी लोकरीसाठी तर काही देशांत प्रामुख्याने दुधासाठी व आणखी काही देशांत मांसासाठी त्या पाळल्या जातात. अठराव्या शतकापर्यंत उ. गोलार्धामध्ये स्पेन, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स व इटली या देशांत मेंढीपालन प्रगतावस्थेत होते. औद्यागिक क्षेत्रात आघाडीवर येण्यापूर्वी हे देश केवळ मेंढ्या व त्यांपासून मिळणाऱ्या  लोकरीच्या उत्पादनावर संपन्न झाले होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस द. गोलार्धात, यूरग्वाय, अर्जेंटिना, द. अफ्रिका प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मेंढ्या पाळण्यात येऊ लागल्या. ऑस्ट्रेलियामध्ये १८५० मध्ये मेंढ्यांची संख्या १ कोटी ७० लाख होती, तर १८९० च्या सुमारास ती १० कोटींच्या आसपास झाली.

यूरोप व भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांतील मिश्र अर्थव्यवस्थेमुळे, मांस, लोकर व दूध यांच्या उत्पादनाकरिता कॉर्सिकन आणि सार्डिनियन मेंढ्या पाळल्या जातात. मध्य व द. यूरोपामध्ये– जर्मनीमध्ये ईस्ट फ्रिझियन, बल्गेरियामध्ये पेलबिन आणि स्टारा झागॉरा व बाल्कन देशांमध्ये झॅकेल या जातींच्या मेंढ्या दुग्धोत्पादनासाठी पाळतात. इराणमधील दुग्धोत्पादनातील २५% दूध मेंढीचे आहे. तेथील बलुची मेंढ्या एका दुग्धकालात सरासरीने ५० किग्रॅ. तर लेबाननमधील आवास्सी मेंढ्या भरपूर खाद्य दिल्यावर १९० दिवसांत २०० किग्रॅ. दूध देतात. इराकमधील अर्धेअधिक दुग्धोत्पादन मेंढीचे आहे. इराणमधील बलुची, सँडजबी व मोघानी या मेंढ्यांच्या दुधामधील चरबीचे प्रमाण अनुक्रमे सरासरीने ६·२१%, ६ ·४७% आणि ५·६९% इतके आहे.

मध्यपूर्वेकडील भाग, प. आशियातील वाळवंटी प्रदेश, मंगोलिया, चीन व भारतीय उपखंडातील भागामध्ये मेंढ्यांच्या अनेक जाती आणि उपजाती पाळण्यात येतात व त्यांच्यापासून प्रायः गालिचे व कांबळी (घोंगड्या) यांना उपयुक्त असलेल्या लोकरीचे उत्पादन होते. यांशिवाय अफगाणिस्तान व इराणमध्ये मांसोत्पादनासाठी दुम्बा आणि मध्य आशियामध्ये फरसाठी काराकुल जातीच्या मेंढ्या पाळण्यात येतात.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या १९८२ सालच्या अंदाजाप्रमाणे जगातील मेंढ्यांची संख्या ११५·७ कोटीच्या आसपास असून त्यांपैकी १/३ मेंढ्या द. गोलार्धात आहेत. भारतामध्ये ४·१७ कोटी मेंढ्या असून संख्येच्या दृष्टीने जगामध्ये भारताचा सहावा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना व द. आफ्रिका प्रजासत्ताक या देशांतील संख्या भारतापेक्षा अधिक आहे. भारतामधील जवळजवळ निम्म्या  मेंढ्या आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांत मिळून आहेत. महाराष्ट्रातील मेंढ्यांची संख्या २१ लाखांच्या आसपास आहे.

चराऊ रानांची विपुलता व समशीतोष्ण जलवायुमान मेंढीपालनाचा अनुकूल असते. तथापि अंगावरील लोकरीमुळे आपल्या शरीराच्या तापमानाचे नियंत्रण त्या चांगल्या तऱ्हेने करू शकतात, म्हणून उष्ण जलवायुमानालाही त्या तोंड देऊ शकतात. त्यांचे नेहमीचे तापमान ३९° से. असले, तरी ३७° ते ४१° से. इतका फेरबदल त्यात असून शकतो. शरीरातील उष्णता मुख्यत्वे श्वसनावाटे बाहेर टाकली जाते तरी पण मेंढ्यांना काही प्रमाणात घाम येतो. मकरवृत्ताच्या उत्तरेकडील ऑस्ट्रेलियाच्या भागात सरासरी पर्जन्यमान ४२ सेंमी.पेक्षा कमी आहे व त्या ठिकाणी नुसत्या झाडाझुडपांच्या चराईवर मेरिनो जातीच्या मेंढ्या आपली उपजीविका चांगल्या तऱ्हेने करू शकतात.

पश्चिम राजस्थानातील दुर्जल प्रदेशामध्ये उन्हाळ्यातील कमाल तापमान ४२° से. इतके असते. तेथील मारवाडी व माग्रा जातींच्या मेंढ्यांच्या एका अभ्यासावरून या मेंढ्यांना आठवड्यातून फक्त दोनदाच पिण्याचे पाणी दिले, तरी त्यांच्या वजनामध्ये अगर उत्पादन व प्रजनन कार्यक्षमतेवर काहीही विपरित परिणाम झाल्याचे आढळून आले नाही. तसेच हिवाळ्यामध्ये सलग १३ दिवसांपर्यंत पाणी मिळाले नाही, तर त्या तग धरून राहतात.

जगातील मेंढ्यांच्या लोकरीचे उत्पादन १९८२ साली २८·५६ लक्ष टन झाले व त्यातील ४२% मेरिनो जातीच्या मेंढ्यांचे होते संकरित मेरिनो व इंग्लंडमधील लोकर देणाऱ्या मेंढ्यांपासून मिळणारी लोकर ३८%, तर २०% गालिच्याची लोकर होती [→ लोकर]. ऑस्ट्रलियामध्ये जगातील संख्येच्या १/६ मेंढ्या आहेत पण लोकरीचे उत्पादन जगातील उत्पादनाच्या १/३ आहे. द. आफ्रिकेतील मेंढ्यांची संख्या जगाच्या ४% व उत्पादनही जगातील उत्पादनाच्या ४% आहे, तर भारतातील संख्या जवळजवळ ४% पण उत्पादन मात्र १·४% आहे (३७,००० टन).

भारतामध्ये हिमालयाच्या आसपासच्या जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतील समशीतोष्ण जलवायुमान व कमीअधिक उंचीवरील चराऊ राने यांमुळे तेथे मेंढीपालनाचा धंदा चांगल्या तऱ्हेने होतो. भारतीय मेंढीपासून सरासरीने वर्षाला ०·८ ते ० ·९ किग्रॅ. लोकर मिळते.

कोष्टक क्र.१विदेशी व भारतातील मेंढीची तुलना.
भारतीय मेंढी विदेशी मेंढी
लोकरीचे उत्पादन

(प्रती वर्ष/ प्रती मेंढी)

१– १·५ किग्रॅ. ४– ५ किग्रॅ.
शरीराचे वजन

(प्रती मेंढी)

२०– २५ किग्रॅ ४०– ५० किग्रॅ.
मांसाचे उत्पादन

(प्रती मेंढी)

१०– १२ किग्रॅ २०– २५ किग्रॅ.
लोकर विकण्यापासून फायदा

(प्रती वर्ष/ प्रती मेंढी)

१०– १५ रु. १२०– १२५ रु.
मांस विकण्यापासून फायदा १४०– १७० रु. २८०– ३५० रु.

मेरिनो, रॅम्ब्युलेट यांसारख्या विदेशी जातींच्या मेंढ्यांपासून सरासरीने ५ ते ७ किग्रॅ. लोकर मिळते. द. भारतातील मेंढ्या प्रामुख्याने मांसोत्पादनासाठी पाळल्या जातात. त्यांचे सरासरी वजन ३० किग्रॅ. च्या आसपास असते. विदेशी मांसोत्पादक मेंढ्यांचे याच्या तिप्पट असते. मेंढ्यांपासून मिळणाऱ्या मांसाचे १९८२ मध्ये ६२·४४ लक्ष टन जागतिक उत्पादन झाले व त्यापैकी भारतामध्ये १·२७ लक्ष टन झाले. द. भारतातील या मांसोत्पादक जातींची (नेल्लोर, बन्नूर व दख्खनी) लोकर केसाळ असते पण त्यांची कातडी जगामध्ये उत्कृष्ट समजली जातात. घट्ट विणीची कणीदार पोत असलेली ही कातडी मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात. उत्तम प्रतीची लोकर देणाऱ्या विदेशी मेंढ्यांच्या कातड्याची प्रत चांगली असत नाही. त्यांच्या कातड्यामध्ये अधिक चरबी असल्यामुळे ती विसविशीत व कमजोर असतात. भारतामधून निर्यात होणाऱ्या मेंढ्यांच्या कातड्यांपैकी ९०% कातडी द. भारतातून निर्यात होतात [→ चर्मोद्योग]. जगातील मेंढ्यांच्या कातड्याचे उत्पादन १९८२मध्ये अंदाजे १३ लाख टन झाले, तर भारतात ३७,००० टन झाले.


भारतातील मेंढ्यांची संख्या ४·१७ कोटी आहे व त्यादृष्टीने भारताचा क्रमांक सहावा लागतो. उत्पादनाच्या दृष्टीने ह्याच मेंढ्या जगाच्या तुलनेत १·४% आहेत हे जरी सकृतदर्शनी तोकडे वाटले, तरी ही तुलना करताना इतरही गोष्टीचा विचार अवश्य करावयास हवा. सबंध ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येइतकी असून ऑस्ट्रेलियाचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे. याशिवाय गाय, बैल, म्हशी इ. पशूंची संख्यादेखील तुलनेने खूप कमी आहे. ह्या मर्यादा लक्षात घेता, देशी मेंढ्यांपासून मिळणारे कोष्टक क्र. २ मध्ये दिलेले उत्पन्न लक्षणीय आहे, असे म्हणावे लागेल.

कोष्टक क्र.२भारतातील एकूण मेंढ्यांची संख्या व त्यांपासून मिळणारे उत्पन्न.
मेंढ्यांची संख्या ४·१७कोटी
लोकरीचे उत्पादन ३·४५कोटी किग्रॅ. प्रती वर्ष
मांसाचे उत्पादन १०·००कोटी किग्रॅ. प्रती वर्ष
कातड्याचे उत्पादन १·५५कोटी कातडी प्रती वर्ष
परकीय चलनाची उपलब्धी १०८कोटी रुपये(गालिच्याच्या निर्यातीमुळे)
मेंढ्यांपासून देशाच्या उत्पादनात पडणारी भर १४० कोटी रुपये

मेंढ्यांच्या जाती : रानटी मेंढ्यांपासून उत्पन्न झालेल्या माणसाळलेल्या मेंढ्यांच्या अनेक जाती जगामध्ये अस्तित्वात आहेत. विविध आनुवंशिक गुणांचे संचय असलेल्या या जातींपासून मानवाची गरज, विशिष्ट पर्यावरणात तग धरून राहण्याची क्षमता, मांस, दूध व लोकर यांबाबतींतील त्यांची उत्पादनक्षमता यांचा अभ्यास करून शास्त्रीय दृष्टीने प्रजनन करून बऱ्याच विदेशी जाती निर्माण केल्या गेल्या आहेत. जगामध्ये अशा एकूण २०० च्यावर जाती अस्तित्वात आल्या आहेत. यांतील बऱ्याच स्थानिक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. सु. ३० विदेशी जाती जागतिक महत्त्वाच्या आहेत. त्यांतील काही प्रसिद्ध जाती, तसेच महत्त्वाच्या भारतीय जातींची माहिती येथे दिली आहे.

भारतीय मेंढ्यांच्या जाती : स्थूलमानाने भारतामध्ये मेंढ्यांचे चार प्रकार आढळतात व वर्णनाच्या सोईसाठी भारताचे चार भाग कल्पिले आहेत. हिमालयाच्या आसपासचा, उत्तर, दक्षिण व पूर्व भारत हे ते भाग होत.

पहिला म्हणजे हिमालयाच्या जवळचा समशीतोष्ण जलवायुमान असलेल्या जम्मू व काश्मीर राज्य, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशातील भाग, पंजाब या राज्यांचा मिळून झालेला भाग. या भागातील मेंढ्यांची लोकर लांब धाग्याची, मऊ व तलमसर आहे. त्यातल्या त्यात उत्तम प्रतीची लोकर व लोकरीखाली अंगालगत असणारी मऊ फर असलेल्या मेंढ्या २,४०० ते ३,६०० मी. उंचीवरील डोंगराळ भागात आढळून येतात. मेंढ्यांची संख्या ५२ लाखाच्या आसपास असून त्यांच्यापासून वर्षाला ४,५०० टनाच्या आसपास लोकरीचे उत्पादन होते. पूंछ, करनाह, भाकरवाल, भादरवाह व रामपूरबशीर ह्या या भागातील प्रसिद्ध जाती आहेत.

पूंछ : पूंछ भागात आढळणाऱ्या या जातीच्या मेंढ्या थोराड आणि आखूड कानाच्या असून रंगाने पांढऱ्या असतात. शेपटी आखूड असून तिचा बुंधा जाड असतो. यातील बहुसंख्य मेंढ्यांना शिंगे नसतात. उन्हाळ्यात चराऊ रानामधील गवत खाऊन व हिवाळ्यात बंदिस्त मेंढवाड्यामध्ये खाद्य देऊन त्या वाढविल्या जातात. वर्षातून दोन किंवा तीन कातरणींमध्ये एका मेंढीपासून सरासरीने १·६ किग्रॅ. लोकर मिळते.

करनाह : काश्मीरमध्ये १,२०० ते ४,६०० मी. उंचीवरील करनाह भागात या जातीच्या मेंढ्या आढळतात व केल हे त्यांचे माहेरघर आहे. या जातीतील मेंढ्यांचे नाक उठावदार असून शिंगे मोठी व वळलेली असतात. वर्षाला दोन कातरणींत ० ·९ ते १·३ किग्रॅ. उत्तम प्रतीची तलम पण आखूड धाग्याची लोकर यांच्यापासून मिळते.

भाकरवाल : काश्मीरमध्ये डोंगराळ भागात व पीर पंजालच्या पर्वतराजीवरील पठारावर या जातीच्या मेंढ्या आढळतात. त्या काटक आणि थोराड असून त्यांचे कळप स्थानांतर करीत काश्मीर दरीमध्ये लिद्दार, पहलगामपर्यंत पोहोचतात. काही उपजातींच्या मेंढ्यांच्या शेपटीवर बरीच चरबी साठलेली असते. यांचे कान लांब, रुंद व लोंबते असून त्यांच्या डोळ्यांच्या व तोंडाच्या भोवती विटकरी रंगाचे वलय असते. वर्षातून एका मेंढीपासून तीन कातरणींमध्ये सरासरीने १· ६ किग्रॅ. जाड धाग्याची रंगीत लोकर मिळते. स्थानिक लोक तिचा जाडीभरडी ब्लँकेटे बनविण्यासाठी उपयोग करतात.

भादरवाह (गद्‌दी) : जम्मूमधील किश्तवार व भद्रवाह भागांत या मेंढ्या आढळतात. या जातीच्या नरांना शिंगे असतात पण माद्यांना नसतात. यांचा रंग पांढरा असतो व चेहऱ्यावर तपकिरी रंगाचे केस असतात. हिवाळ्यामध्ये यांचे कळप कुलू व कांग्रा खोऱ्यांमध्ये राहतात, तर उन्हाळ्यात पीर पंजालच्या सर्वांत उंच टेकड्यांवर चराईसाठी जातात. वर्षातून तीन कातरणींमध्ये सरासरीने एका मेंढीपासून १ ·१३ किग्रॅ. तलम, तजेलदार लोकर मिळते. यातील काही धारीवाल लोकर गिरणीमध्ये उपयोगात आणली जाते. लोकरीखालील अंगालगतच्या मऊ फरचा उपयोग अधिक किंमतीच्या कुलू शाली व ब्लँकेटे करण्यासाठी होतो.

रामपूरबशीर : हिमालयाच्या पायथ्याशी सर्व दूर आढळणारी ही मेंढ्यांची प्रसिद्ध जात आहे. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून त्‌यांची शिंगे मागे वळून पुन्हा खाली वळलेली असतात. कान मोठे असून शेपटी बारीक व आखूड असते. यांचे कळप उन्हाळ्यात तिबेटच्या सीमेपर्यंत चरत जातात व पुन्हा यमुना, टॉन्स व सतलज दरीतील शिवालिक टेकड्यांमध्ये परततात. डेहराडून जिल्ह्याच्या चक्राता भागात या जातीच्या मेंढ्यांचे काही प्रकार आढळतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १·३६ ते १· ८ किग्रॅ. चांगल्या प्रतीची लोकर मिळते. तिबेटच्या सीमेवर शेळ्यांबरोबर या मेंढ्या सामानाची ने-आण करण्यासाठी वापरतात.

राजस्थान, गुजरात, पंजाब व उत्तर प्रदेशाचा सपाटीचा भाग व मध्य प्रदेशाचा लगतचा भाग धरून कल्पिलेल्या उत्तर विभागातील मेंढ्यांची संख्या १· २३ कोटीच्या आसपास आहे आणि त्यांच्यापासून अदमासे भारतातील लोकरीच्या उत्पादनाच्या ६३% (२०,२०० टन) लोकर मिळते. गालिचे बनविण्यासाठी ही उपयुक्त असून तीतील ११–१२ हजार टन निर्यात केली जाते. या भागातील कोरडी हवा, हिवाळ्यातील थंडी, अपुरी चराऊ राने व मधूनमधून उद्‌भवणारी दुष्काळी परिस्थिती यांना समर्थपणे तोंड देऊ शकणाऱ्या चार प्रमुख जाती या भागात आढळतात.


लोही : डोक्याचा तपकिरी रंग, उठावदार उंचावलेले नाकाचे हाड (रोमन नोज), मऊ व लांबसडक कान ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. यांच्या चेहऱ्यावर लोकर नसते. ल्यालपूर, झांग व मंगमरी या पाकिस्तानातील जिल्ह्यांत या जातीच्या जातिवंतर मेंढ्या आढळतात. तथापि या जातीतील काही प्रकार राजस्थान व गुजरातमध्ये आहेत. लोकर, मांस व दूध या तीनही प्रकारचे उत्पादन या जातीच्या मेंढ्यांपासून मिळते. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १·८ किग्रॅ. जाड, लांब धाग्याची लोकर व दररोज ३·६ लिटरपर्यंत दूध मिळू शकते. राजस्थानमध्ये या जातीच्या मेंढ्यांच्या उपजातींना निरनिराळी नावे आहेत. जोधपूर व जैसलमीर जिल्ह्यांत जैसलमीरी जयपूर, टोंक व सवाईमाधवपूर जिल्ह्यांत मालपुरी उदयपूर जिल्ह्यांत सोनाडी अशी नावे आहेत तर गुजरातमधील बडोदे जिल्ह्यात या मेंढ्या चारोथ्री या नावाने ओळखल्या जातात.

बिकानेरी : पूर्वीच्या बिकानेर संस्थानातील भाग व त्या लगतच्या उ. प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील भागात या जातीच्या मेंढ्या प्रामुख्याने आढळतात. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून त्यांचे डोके लहान असते व कान सुरळीसारखे असतात. भारतातील सर्वांत जास्त प्रमाणात लोकर देणारी ही मेंढ्यांची जात आहे. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १ ·८ ते ४ किग्रॅ. लोकर मिळते. भाग्रा, चोकला किंवा शेरबवटी व नाली या उपजातीही या भागात आढळतात. चोकला या राजस्थानमधील उपजातीपासून चांगल्या प्रतीची गालिचे करण्याला उपयुक्त लोकर मिळते.

मारवाडी : या जातीच्या मेंढ्यांपासून पांढरी, केसमिश्रित, जाडीभरडी गालिच्याची लोकर मिळते. काळ्या रंगाचा चेहरा, लांब पाय व उठावदार नाक ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. या मेंढ्यांना गळ्याखाली गलूली आढळतात. जोधपूर व जयपूर भागांत या मेढ्या आढळत असल्या, तरी भटक्या जातींनी पाळलेले या जातीच्या मेंढ्यांचे कळप उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच उत्तर महाराष्ट्रात दूरवर येतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला ०·९ ते १ ·८ किग्रॅ. लोकर मिळते.

कच्छी : उत्तर गुजरात व सौराष्ट्राच्या वाळवंटी प्रदेशात या जातीच्या मेंढ्या आढळतात. काळसर बदामी रंगाच्या या मेंढ्या चणीने लहान पण बांधेसूद असतात. यामुळे त्यांच्यापासून बऱ्यापैकी मांस उपलब्ध होते. विविध प्रकारची लोकर या जातीच्या मेंढ्यांपासून मिळते व तिचा उपयोग लष्करामध्ये लागणाऱ्या फेल्टच्या कपड्यासाठी करतात.

काठेवाडी : काठेवाड व त्याच्या लगतचा कच्छचा भाग, दक्षिणराजस्थान व उत्तर गुजरात व भागांतील मेंढ्यांची ही जात आहे. मेंढ्या मध्यम बांध्याच्या, पांढऱ्या रंगाच्या पण चेहरा व पाय यांवर काळे अगर तपकिरी रंगाचे केस असतात. सरासरीने प्रत्येक मेंढीपासून वर्षाला दीड किग्रॅ. जाड व लांब धाग्याची लोकर मिळते.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व केरळ या राज्यांच्या मिळून कल्पिलेल्या दक्षिण भागात २ ·२६ कोटी मेंढ्या आहेत. यांतील पूर्वेकडील भागातील १ ·०२ कोटी मेंढ्यांपासून जवळ जवळ अजिबात लोकर मिळत नाही, त्या मांसोत्पादनासाठी पाळल्या जातात. उरलेल्या मेंढ्यांपासून १०,७०० टन जाडीभरडी करड्या रंगाची लोकर मिळते. दख्खनी व नेल्लोर या प्रमुख जाती या भागांत आढळतात.

दख्खनी : राजस्थानातील लोकर देणाऱ्या मेंढ्या आणि आंध्र प्रदेश व तमिळनाडूमधील केसाळ मेंढ्या यांच्या संकरापासून ही मेंढ्यांची जात निपजलेली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात व कर्नाटक राज्याच्या काही भागांत या मेंढ्या आढळतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला सरासरीने ४५० ग्रॅ. लोकर मिळते व ती काळ्या व करड्या रंगाची आणि केसाळ असते. तिचा कांबळी करण्यासाठी उपयोग करतात. या मेंढ्या मुख्यत्वे मांसासाठी पाळल्या जातात. निकृष्ट चराऊ रानावर या मेंढ्या आपली उपजीविका करू शकतात.

नेल्लोर : या जातीच्या मेंढ्या भारतातील सर्वांत उंच मेंढ्या आहेत. लांबोळा चेहरा, लांब कान व सर्वांगावर दाट पण आखूड केस यामुळे या शेळीसारख्या दिसतात. नराला पीळदार शिंगे असतात, तर मादीच्या डोक्याला मध्यभागी उंचवटा असतो. यांचा रंग पिवळट तांबूस हरिणासारखा असून शेपटी आखूड असते. शेपटीच्या टोकाला केसांचा झुबका असतो. सामान्यपणे जंगली भाग, नद्यांची पात्रे, डोंगरांचे उतार व पीक काढलेली शेते या ठिकाणी मिळेल त्या खाद्यावर या मेंढ्या आपली उपजीविका करू शकतात. मंड्या, यलाग व तेंगुरी हे या जातीच्या मेंढ्यांचे प्रकार आहेत. या मेंढ्यांपासून जवळ जवळ काहीही मिळत नाही. मात्र मांसोत्पादनासाठी या जाती प्रसिद्ध आहेत. बन्नूर ही कर्नाटकातील आणखी एक जात मांसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

बिहार, ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्यांचा मिळून कल्पिलेल्या पूर्व विभागामध्ये मेंढीपालनाचा धंदा फारसा केला जात नाही. येथील हवेमध्ये आर्द्रता व उष्णता, तसेच पावसाचे मानही बरेच असल्यामुळे या भागात मेंढ्यांच्या नाव घेण्यासारख्या जाती नाहीत. या भागातील मेंढ्यांची संख्या ३० लाख असून त्यांच्यापासून ९०,६०० किग्रॅ. जाडीभरडी लोकर मिळते. तिचा उपयोग प्रायः कांबळी बनविण्यासाठी करतात. प्रत्येक मेंढीपासून सरासरीने ११० ते २२५ ग्रॅ. लोकर मिळते.

विदेशी मेंढ्यांच्या जाती : मेरिना : ही मूळची स्पेनमधील जात असून अतिशय तलम लोकरीच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. बाराव्या शतकापासून ही जात अस्तित्वात आहे. मूर लोकांनी ती स्पेनमध्ये आयात केली असावी. समशीतोष्ण जलवायुमान असलेल्या रुक्ष प्रदेशात स्थानांतर करीत जगण्याची क्षमता या जातीच्या मेंढ्यांच्या अंगी असल्यामुळे जगातील कित्येक देशांमध्ये या जातीचा प्रसार झाला आहे. त्या त्या देशात या जातीच्या मेंढ्यांचे अनेक विभेद निर्माण झाले. उदा., ऑस्ट्रेलियन मेरिनो, रशियन मेरिनो, अमेरिकन मेरिनो इत्यादी. या जातींच्या नरांना शिंगे असतात, माद्यांना ती नसतात. डोके व पाय यांवरही भरपूर व दाट लोकर असते. या मेंढ्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या असून त्यांच्या लोकरीचे धागे बारीक व लवचिक असतात. कातड्यातील तैल ग्रंथीमधून पुष्कळ चरबी या धाग्यामध्ये मिसळली गेल्यामुळे लोकर कुरळी, मऊ, तलम व तजेलदार असते. वरच्या बाजूच्या चरबीवर धूळ साचून एक काळपट आवरण तयार होते व त्यामुळे आतील स्वच्छ पांढरी लोकर आयतीच सुरक्षित राहते. मानेवर जाडजूड वळ्या असलेल्या नेग्रेटी मेरिनो या मेंढ्यांपासून एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्लिश मेरिनो ही जात इंग्लंडमध्ये तयार करण्यात आली. एका मेंढीपासून वर्षाला ५ ते ७ किग्रॅ. लोकर मिळते. या जातीच्या मेंढ्यांच्या संकरापासून निपजलेल्या प्रजेची लोकरही उत्कृष्ट दर्जाची असते.

रॅम्ब्युलेट :फ्रान्सच्या सोळाव्या लूई या राजाच्या रॅम्ब्युलेट येथील मेंढवाड्यावर स्पेनमधून १७८६ मध्ये व पुन्हा १७९९ मध्ये निवडक मेरिनो जातीच्या मेंढ्या आयात केल्या गेल्या. या मेंढ्यांपासून हिची पैदास करण्यात आली. या मेंढ्यांच्या अंगावर दाट, तलम लोकर भरपूर असते. चेहरा व पाय यांचा रंग पांढरा असून चेहऱ्यावर पुष्कळ लोकर इतकी असते की, त्यामुळे काही मेंढ्यांना आंधळेपणा येण्याचा संभव निर्माण होतो. नराला शिंगे व डोक्यावर मध्यभागी उंचवटा असतो माद्यांना फक्त उंचवटा असतो. या जातीच्या मेंढ्यांच्या लाकरीबरोबरच त्यांचे मांसोत्पादन वाढविण्याचे प्रयत्न जर्मन मेंढपाळांनी केले. उत्तर अमेरिकेत या जातीच्या मेंढ्या १८४० मध्ये प्रथमतः आयात केल्या गेल्या व पश्चिम किनाऱ्यावरील प्रांतात निवड पद्धतीने प्रजनन करून त्यांचे संगोपन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.


चेव्हिऑट : मध्यम प्रतीची लोकर उत्पादन करणाऱ्या ह्या मेंढ्यांच्या जातीची स्कॉटलंडमध्ये पैदास करण्यात आली. यांच्या चेहऱ्याचा रंग पांढरा असून डोके, कान आणि पायावर कोपराखाली व ढोपराखाली लोकर नसते, त्यामुळे त्या डौलदार दिसतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला २·५ते ३·५ किग्रॅ. लोकर मिळते. लिंकन जातीच्या मेंढ्यांशी संकर प्रजनन करून मांसोत्पादनासाठी संकरित प्रजा उपयोगात आणतात.

साऊथ डाऊन : इंग्लंडमध्ये सर्वप्रथम अस्तित्वात आलेली ससेक्स टेकड्यांतील ही मेंढ्यांची जात बांध्याने लहान आहे. त्यांच्या चेहऱ्याचा रंग फिकट तपकिरी असून त्यांना शिंगे नसतात. एका मेंढीपासून वर्षाला २ ते ३ किग्रॅ. उत्कृष्ट प्रतीची पांढरी पण आखूड धाग्याची लोकर मिळते.

इंग्लिश लायस्टर : रॉबर्ट बेकवेल या शास्त्रज्ञांनी १७५५ मध्ये स्थानिक मेंढ्यांपासून निवड पद्धतीने प्रजनन करून ह्या जातीची इंग्लंडमध्ये पैदास केली. चेहरा व पाय यांवर लोकर नसते. सर्वांगावर पिळ्यासारखी झुबकेदार लोकर असते. ही लोकर जाड व लांब धाग्याची असते.

रोमनी मार्श :जाड व लांब धाग्याची लोकर देणाऱ्या इंग्लंडमधील केंट परगण्यातील मेंढ्यांची ही जात आहे. या मेंढ्या काटक असून त्यांच्या अंगावर दाट लोकर असते. द. अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या प्रदेशांत या जातीच्या मेंढ्या मोठ्या प्रमाणावर पाळतात. नर व मादी यांच्या डोक्यावर मध्यभागी उंचवटा असतो.

कॉरिडेल : मध्यम प्रतीची लोकर देणाऱ्या मेंढ्यांच्या ह्या जातीची पैदास न्यूझीलंडमध्ये लिंकन जातीचे मेंढे व मेरिनो जातीच्या मेंढ्या यांच्या संकर प्रजननाने करण्यात आली. या जातीच्या मेंढ्यांचा चेहरा पांढरा असून त्यांना शिंगे नसतात. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून लोकर व मांस यांसाठी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेमध्ये पाळण्यात येतात. लिंकन व मेरिनो यांच्याच संकरातून ऑस्ट्रेलियामध्ये (व्हिक्टोरिया) १८८० च्या सुमारास तयार करण्यात आलेली दुसरी  जात म्हणजे पोलवर्थ ही आहे. या मेंढ्या थोराड असून ऑस्ट्रेलियाच्या अतिथंड व जास्त पाऊस असलेल्या भागात पाळल्या जातात.

लिंकन : लांब पण जाड धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्यांची ही जात इंग्लंडमधील स्थानिक जात आहे. या जातीच्या मेंढ्यांना शिंगे नसतात पण डोक्यावर मध्यभागी लोकरीचा झुबका असतो. अंगावरही झुबकेदार लोकर असते. ही जात मांसोत्पादनासाठी प्रसिद्ध असली, तरी प्रत्येक मेंढीपासून ५ ते ७ किग्रॅ. लोकर मिळते.

काराकुल : मध्य आशियातील उझबेकिस्तान व अफगाणिस्तान येथील ही मूळची मेंढ्यांची जात आहे. उत्कृष्ट मऊ तजेलदार फरबद्दल ही जात प्रसिद्ध आहे. नवजात कोकराचा रंग काळा असतो. एक ते तीन दिवसांची कोकरे मारून त्यांची कातडी फर धंद्यासाठी विकली जातात. पर्शियन लँबस्किन म्हणून ही प्रसिद्ध आहेत. रशिया, आफ्रिका व अमेरिका या प्रदेशांमध्ये काराकुल मेंढ्या कोकरांच्या कुरळ्या फरकरिता पाळण्यात येतात. रशियामधून या जातीच्या शुद्ध बीजाच्या मेंढ्यांची आयात भारतामध्ये अलीकडे करण्यात आली आहे. राजस्थानमधील थर वाळवंटाच्या प्रदेशात लोकरीसाठी त्यांची पैदास सुरू करण्यात आली आहे. तेथील जलवायुमान या मेंढ्यांना अनुकूल असल्यामुळे हे पैदाशीचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे दिसून आले. मौल्यवान लँबस्किन खेरीज प्रत्येक मेंढीपासून वर्षाला ३ ते ३ ·५ किग्रॅ. लोकर, तसेच २० ते २५ किग्रॅ. मांस मिळू शकते. मात्र अद्याप फर कातडीच्या उत्पादनाकडे लक्ष देण्यात आलेले नाही [→ फर–२]. यांशिवाय पेलविन, सेव्हलिव्हो, स्टारा झागॉरा या बल्गेरियातील मेंढ्यांच्या जाती मुख्यत्वे दुग्धोत्पादनासाठी पाळल्या जातात.

मेंढ्यांची सुधारणा : विविध जननिक गुणधर्म समुच्चय (आनुवंशिकतेतून येणारे गुणधर्म) असलेल्या अनेक जातींच्या मेंढ्या जगामध्ये अस्तित्वात असताना स्ववंशीय संयोग अगर अंतःप्रजनन (निकटचा संबंध किवा जवळचे नाते असलेल्या प्राण्यांच्या लैंगिक संबंधातून होणारे प्रजोत्पादन) या पद्धतींचा उपयोग करून आपले कळप सुधारण्याचा फारसा प्रयत्न पूर्वीच्या मेंढपाळांनी केल्याचे दिसून येत नाही. विसाव्या शतकामध्ये मात्र यांचा, तसेच निवड पद्धतीचे आडाखे व संततीची कार्यक्षमता यांचा अभ्यास करून मेंढ्यांच्या सुधारित जाती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. तशातच ⇨ कृत्रिम वीर्यसेचन व मेंढ्यांना माजावर आणण्यासाठी स्टेरॉइड औषधांचा उपयोग होऊ लागल्यामुळे प्रजननाचे तंत्रच बदलून गेल्याचे दिसते. आनुवंशिक गुणधर्म प्रदान करण्यात मादीपेक्षा नराचा वाटा अधिक असतो, असेही निदर्शनास आले. याचा फायदा घेऊन मध्यपूर्वेकडील व भारतातील स्थानिक मेंढ्यांशी संयोग करण्यासाठी मेरिनो नरांचा वापर करून निर्माण झालेल्या संकरित प्रजेच्या लोकरीची प्रत व उत्पादन वाढविण्यात बरेच यश आलेले दिसते. निवड पद्धत वापरून प्रजनन केल्यावर काराकुल जातीच्या मेंढ्यांच्या फरच्या कुरळेपणाची लांबी कमी करण्यात यश आले. मेंढ्यांचे वजन व त्यांच्या अंगावरील त्वचेच्या वळ्या यांचा मांसाची प्रत व उत्पादन आणि लोकरीच्या धाग्यांची लांबी यांच्याशी संबंध आहे, असे निदर्शनास आले आहे. या व अशा अनेक संशोधनात्मक निष्कर्षाचा इष्ट परिणाम होऊन मेंढ्यांच्या कित्येक जातींमध्ये लोकरीची प्रत व उत्पादन आणि मांसोत्पादन यांमध्ये लक्षणीय प्रगती करता आलेली आहे. या अनुषंगाने मेंढ्यांचे खाद्य, संगोपन इ. अनेक बाबींकडेही लक्ष पुरविण्यात आले. अमेरिकेमध्ये डबॉइस, आयडा आणि फोर्ट विंगेट येथे, तसेच इतर देशांमध्येही संशोधन केंद्रे काढण्यात आली आहेत.

भारतामध्ये मेंढ्यांच्या लोकरीची प्रत व उत्पादन यांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन मेरिनो, अमेरिकन रॅम्ब्युलेट, रशियातील स्टॅव्हरोपोलेस्की, पोलवर्थ व काराकुल इ. विदेशी जातींचे नर आयात करून शासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत. काश्मीरमध्ये बनिहाल व दाचिगाव, हिमाचल प्रदेशामध्ये सरहान, उत्तर प्रदेशात पिंपळकोटी, राजस्थानमध्ये जयपूरजवळ अविकनगर व तमिळनाडूमध्ये उटकमंड येथील संशोधन केंद्रांमध्ये असे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये पुणे येथे मेरिनो व रॅम्ब्युलेट महूद आणि रांजणी येथे कॉरिडेल या जातींच्या मेंढ्या आयात करून दख्खनी मेंढ्यांशी संकर प्रजननाने नवीन विभेद निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. यांशिवाय हिस्सार येथे १९६९ मध्ये आणि अगदी अलीकडे ममिडीपल्ली (आंध्र प्रदेश), चल्लाकेरी (कर्नाटक), डकसम (जम्मू व काश्मीर), भैंसोरा (उत्तर प्रदेश) व फतेपूर (राजस्थान) येथे केंद्र शासनाच्या मदतीने मेंढ्यांची मोठ्या प्रमाणावर पैदास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. ह्या ठिकाणी आयात केलेल्या विदेशी नरांचा स्थानिक मेंढ्यांशी संकर करण्यात येतो. येणाऱ्या संकरित प्रजेचे वाटप शेतकऱ्यांत केले जाते.

मेंढ्यांच्या मांसल जातींची उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने दक्षिण भारतातील मंड्या व नेल्लोर आणि उत्तर भारतातील बिकानेरी, नाली व लोही या मांसल जातींमध्ये संकर प्रजननाचे तसेच साऊथ डाऊन, रोमनी मार्श, कॉरिडेल आणि डॉर्सेट डाऊन या विदेशी मांसल मेंढयांच्या जातींचा मंड्या, नेल्लोर व बिकानेरी या भारतीय जातींच्या मेंढ्यांबरोबर संकर प्रजननाचे नवे विभेद तयार करण्याचे प्रयत्न चालू आहे.


संगोपन :मेंढ्यांच्या संगोपनाच्या पद्धती देशकाल परिस्थिती, मेंढ्यांची संख्या, जलवायुमान, चराऊ रानांची उपलब्धता यांवर अवलंबून असतात. चराऊ रानातील खुरटे गवत, लहान लुसलुशीत रसाळ तण, वाळवंटी प्रदेशात उपलब्ध होणाऱ्या  कोवळ्या वनस्पती, डोंगर पठारावरील व पर्वतराजींच्या उतारावर उगवणारे उंच न वाढणारे गवत, बाभळीच्या जातीच्या झाडांच्या शेंगा यांवर मेंढ्या आपली उपजीविका चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यांच्या खाद्यात १० ते १५% प्रथिनांची जरूरी असते व ती अशा चाऱ्यामधून मिळते. प्रजननासाठी व मांसोत्पादनासाठी वापरात आणावयाच्या मेंढ्यांव्यतिरिक्त इतरांना नेहमीकरिता खुराक देण्याची जरूरी नसते. मेंढ्यांच्या खुराकाला भरडा म्हणतात. मका, हरभरा, ज्वारी ही भरडलेली धान्ये, गव्हाचा भुस्सा, भुईमुगाची पेंड यांतील उपलब्ध खाद्यपदार्थ योग्य प्रमाणात मिसळून भरडा तयार करतात. मांसोत्पादनासाठी पाळलेल्या कोकरांना मेंढीला पिणे बंद झाल्यावर भरडा सुरू करतात. धान्य २ भाग, गव्हाचा भुस्सा १ भाग, पेंड १ भाग यांचे मिश्रण १०० ते ४५० ग्रॅ. वयाप्रमाणे देतात. कोकराला रोज ५ ते ७ ग्रॅ. मीठ देण्याची जरूरी असते. गाभण मेंढीला रोजी २०० ते २५० ग्रॅ. भरडा गर्भपोषणासाठी देणे जरूर आहे. प्रजननासाठी वापरल्या जाणाऱ्या मेंढ्यांस रोजी २०० ते ४५० ग्रॅ. भरडा देतात. कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, तांबे व कोबाल्ट या खनिज द्रव्यांची जरूरी असते व चाऱ्यातून ही उपलब्ध होतात. खाद्यामध्ये अस्थिपिष्टाचा समावेश केल्यास काही खनिजे उपलब्ध होऊ शकतात. मेढ्यांना अ,ड,ई या जीवनसत्त्वांची जरूरी असते व काही वेळा ती खाद्यातून पुरवावी लागतात. ‘अ’ जीवनसत्त्व हिरव्या चाऱ्यातून व ‘ड’ जीवनसत्त्व सूर्यप्रकाशातून मिळते. ब व क जीवनसत्त्वे मेंढ्या आपल्या शरीरात तयार करू शकतात. एका मेंढीला रोज ७ लिटर पाणी लागते. चरण्याच्या जागेपासून पाणी पिण्यासाठी त्यांना हिवाळ्यात ४ ते ५ किमी. व उन्हाळ्यात ३ किमी.पेक्षा जास्त चालावे लागू नये, अशी व्यवस्था असणे जरूर असते. बर्फ व अती पाऊस असलेल्या किंवा कडक थंडीच्या प्रदेशातून तात्पुरते स्थलांतर करून मेंढ्यांचे कळप फिरते ठेवून त्यांचे पोषण करणे ही बऱ्याच देशांमधून रूढ असलेली संगोपन पद्धती आहे.

कोकरू जन्मल्यावर मेंढीने त्याला चाटल्यावर ते कोरडे होऊन १ ते २ तासांत उठून मेंढीला पिऊ लागते. व्याल्यानंतर २ ते ४ तासांमध्ये वार टाकली जाते. कोकराला चीक पिऊ देणे आवश्यक असते. मेंढीमध्ये मातृभाव कमी असतो त्यामुळे मेंढपाळाला कोकराची काळजी घेणे आवश्यक असते. मेंढी नीट पाजते किंवा नाही याकडे लक्ष पुरवावे लागते. कोकरू ४ ते ४· ५ महिन्यांचे होईपर्यंत मेंढीला पिते. जरी २ ते ३ आठवड्यांचे झाल्यावर चरण्याला सुरुवात केली, तरी ५ ते ८ आठवड्यांचे होईपर्यंत ते फारसे खाद्य खाऊ शकत नाही. याच वेळी त्याची लोकर कातरण्याइतकी लांब होते. पहिल्या कातरणीच्या लोकरीला जावळी लोकर म्हणतात. यापुढे वर्षातून एकदा, दोनदा व काही जातींमध्ये तीन वेळा कातरणी करतात. हात कातरणीने एक मनुष्य एका दिवसात ४० ते ६० मेंढ्यांची लोकर कातरू शकतो, तर यांत्रिक कात्रीने तो २०० ते २५० मेंढ्यांची लोकर कातरतो.

अलीकडे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांना उंदराच्या लाळ ग्रंथीमधून बाह्यत्वचा वृद्धिकारक प्रथिनाचे नि:सारण करून त्याचे मेंढीला अंतःक्षेपण (इंजेक्शन) केल्यावर लोकर गळून नुसत्या हाताने ओढून ती पूर्णपणे काढता येते, असे दिसून आले आहे. जैव कातरण पद्धती अद्याप प्रयोगावस्थेत आहे.

मोठ्या प्रमाणावर मेंढ्या पाळणाऱ्या काही पुढारलेल्या देशांतही मेंढ्या उघड्यावरच राहतात. अती थंडीवाऱ्यापासून संरक्षण होइल एवढाच निवारा केव्हा केव्हा उपलब्ध करून देतात. शीत कटिबंधात मात्र हिवाळ्यातील कड थंडीपासून बचाव होण्यासाठी बंदिस्त मेंढवाडे उभारतात व तिथेच आधी साठविलेले वाळलेले गवत व मुरघास यांवर त्यांचे पोषण करतात. अगदी अलीकडे कडक हिवाळ्यात भाजीपाला उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या पॉलिथिनाच्या पादपगृहाच्या (तापमान व हवेतील आर्द्रता यांचे नियंत्रण करणाऱ्या रचनेच्या) धर्तीवर बोगद्याच्या आकाराची पॉलिथिनाची घरे मेंढ्यांसाठी बनविण्यात आली आहेत.

भारतामध्ये मेंढी पालनाचा धंदा बहुतांशी भटक्या जमातींचे धनगर लोक करतात. ते सर्वसाधारणपणे ४० ते ६० मेंढ्यांचे कळप पाळतात. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या थंड व डोंगराळ प्रदेशातील मेंढपाळ उन्हाळ्यात आपल्या मेंढ्या हिमालयातील २,५०० ते ४,००० मी. उंचीवरील शिखरपठारावर चराईसाठी नेतात. बर्फ जसजसा वितळतो तसतसा तेथील जमिनीवर चांगला पौष्टिक चारा उगवतो. हिवाळ्यात सपाटीवरील प्रदेशात परतून तेथील चराऊ रानावर मेंढ्यांची उपजीविका करतात. सपाट प्रदेशातील मेंढपाळ शेतामध्ये पिके असतात त्या वेळी जवळपासच्या डोंगरावरील खुरटे गवत व तण यांवर आपल्या मेंढ्या पोसतात. पिके निघाल्यावर शेतातील उरलेसुरले खुंट, तण व गवत खाण्यासाठी शेतातून मेंढ्यांचा मुक्काम करीत फिरत राहतात. शेतात मुक्काम असतो तेव्हा तेथे लेंडीखत आपोआप पडते. याला शेतात ‘मेंढ्या बसविणे’ असे म्हणतात. महाराष्ट्रात ही प्रथा सर्वत्र आढळते व याबद्दल मेंढपाळांना मोबदला मिळतो. मेंढ्या पाळणाऱ्या भटक्या जमातीच्या धनगर लोकांना या धंद्याच्या विकासासाठी साहाय्य देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मेष विकास महामंडळ १९७९ मध्ये स्थापन केले आहे.

प्रजनन : विदेशी मेंढ्यांच्या बाबतीत त्यांचे वयात येणे त्या त्या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या मेंढ्यांच्या सरासरी वजनाच्या ४० ते ६०% वजन होण्यावर अवलंबून आहे, वयाशी त्याचा संबंध फारसा नसावा पण सर्वसाधारणपणे या मेंढ्या ५ ते १० महिन्यांच्या झाल्यावर वयात येतात. प्रथम माजावर येतात. तथापि मेंढी २ वर्षांची झाल्यावर व मेंढा १८ ते २० महिन्यांचा झाल्यावरच प्रजननासाठी वापरतात.

मेंढ्यांचे प्रजनन मोसमी असते. मोसमाच्या सुरुवातीच्या दिवसांत कळपामध्ये वळू मेंढा सोडल्यास व दोन आठवडे आधी मेंढ्यांच्या खाण्यामध्ये खुराक सुरू केल्यास त्या लवकर माजावर येतात. याला इंग्रजीमध्ये ‘फ्लशिंग’ म्हणतात. फ्लशिंगसाठी २०० ते २५० ग्रॅ. मका, जव व ज्वारी यांपैकी एक धान्य दिल्यास चालते. याशिवाय प्रगत देशांमध्ये प्रोजेस्टेरॉनासारख्या स्टेरॉइड औषधांचा वापर करून मेंढ्यांना विशिष्ट वेळी माजावर आणण्यात येते व कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीने अनेक मेंढ्या एकाच वेळी गाभण राहतील अशी व्यवस्था करतात. यामुळे एकाच वयाच्या कोकरांचे मोठाले कळप तयार झाल्याकारणाने त्यांचे संगोपन व व्यवस्थापन सोईचे आणि किफायतशीर होते. प्रजननासाठी उपयोगात आणावयाच्या माद्यांना भरपूर दूध असणे हे कोकरांचे पोषण होण्याच्या दृष्टीने जरूरीचे असते. भारतामध्ये मेंढ्या माजावर येण्याचे तीन मोसम आहेत. उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्याच्या सुरुवातीस (जून-जुलै) ६० ते ८०%, उन्हाळ्यात (मार्च-एप्रिल) १५ ते २०% आणि हिवाळ्यात (ऑक्टोबर-नोव्हेंबर) उरलेल्या माद्या माजावर येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस माजावर आलेल्या मेंढ्या गाभण राहून ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये वितात. या वेळी माद्यांना चराऊ रानात भरपूर चारा उपलब्ध असल्याने दूध भरपूर येऊन कोकरांचे पोषण चांगले होते.


मेंढीचा ऋतुकाल २० ते ४० तास (सरासरीने ३० तास) राहतो. ऋतुकालाच्या अखेरीला अंडमोचन (अंडपुटक फुटून त्यातील पक्व अंडे बाहेर पडण्याची क्रिया) होते. ऋतुमान १७ ते १९ दिवसांचे असते व गर्भावधी १४२ ते १५२ दिवसांचा असतो. बहुधा एका वेळी एकच कोकरू जन्मते परंतु काही जातींत जुळी व क्वचित तिळी होऊ शकतात. पाच ते सहा कोकरे जन्मल्याची नोंद आहे. कॉमनवेल्थ सांयटिफिक अँड इंडिस्ट्रियल रिसर्च या संस्थेमध्ये झालेल्या संशोधनातून ‘फेकंडीन’ नावाचे रसायन शोधून काढण्यात आले आहे. याचे अंतःक्षेपण केल्यास अंडमोचनाच्या वेळी अनेक अंड्यांचे मोचन होऊन जुळी होण्याचे प्रमाण वाढून २०% अधिक कोकरांची पैदास झाल्याचे दिसून आले आहे. विण्याच्या वेळी मेंढ्यांना निवारा व आडोसा देणे जरूरीचे असते. सहसा मेंढपाळाने मदत करण्याची जरूरी पडत नाही. व्याल्यानंतर एक ते दोन दिवसांत मेंढी पुन्हा माजावर येते पण यावेळी अंडमोचन होत नाही. माजावर आलेली मेंढी मेंढ्याच्या मदतीशिवाय ओळखणे कठीण असते. मेंढा कळपात सोडल्यावर वासामुळे तो ती ओळखू शकतो. कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीमध्ये मेंढ्याच्या साहाय्यानेच माजावर आलेली मेंढी ओळखून वीर्यसेचन करण्यात येते. ऑस्ट्रेलिया, रशिया, इंग्लंड इ. पुढारलेल्या देशांत कृत्रिम वीर्यसेचन पद्धत मोठ्या प्रमाणावर अवलंबिली जाते. भारतामध्ये मेंढ्यांच्या बाबतीत ही पद्धत अद्याप काही प्रस्थापित प्रजनन केंद्रापुरतीच मर्यादित आहे तथापि हळूहळू या पद्धतीचा प्रसार होऊ लागला आहे. नैसर्गिक पद्धतीमध्ये एक मेंढा ३० ते ४० माद्यांसाठी पाळण्याची पद्धत आहे. मेंढा प्रजननक्षम आहे किंवा नाही हे ओळखणे सोपे नाही.  यासाठी त्याने संयोग केलेल्या माद्यांवर लक्ष ठेवूनच ते समजू शकते. मोठ्या कळपामध्ये कोणत्या मेंढ्याने कोणत्या मेंढीशी संयोग केला हे समजण्यासाठी मेंढ्याच्या छातीच्या पुढील भागास ओला रंग लावतात. मेंढा दर दिवशी ५·५ अब्ज शुक्राणूंचे उत्पादन करू शकतो. त्यांच्या संयोगक्षमतेमध्ये बराच फरक आढळून येतो. काही मेंढे १० तासांहून एकदा संयोग करू शकतात, तर काही प्रत्येक तासाला करू शकतात. चांगल्या प्रतीच्या रेताच्या प्रत्येक मिलि. मध्ये २ अब्ज शुक्राणू असतात.

अलीकडे बनविलेल्या श्राव्यातील उपकरणाने [→ श्राव्यातील ध्वनिकी] मेंढी गाभण आहे किंवा नाही हे तपासाण्याची सोय झाली आहे. या उपकरणाच्या साहाय्याने ६० दिवसांची गाभण मेंढी १००% अचूक ओळखता येते. तसेच ⇨ हॉर्मोनांच्या साहाय्याने गर्भारपणाचे निदान करण्याची पद्धत व्यवहारामध्ये येत आहे आणि यामध्ये १८ दिवसांची गाभण मेंढी ओळखता येते.

जननिक अभियांत्रिकीतील [→ रेणवीय जीवविज्ञान] कौशल्याचा वापर करून अगदी अलीकडे भ्रूण हाताळण्याचे तंत्र साध्य केले गेले आहे. जर्मन प्रजासत्ताक संघ राज्यातील गीसेन विद्यापीठामध्ये माइनेके टिलमन या स्त्री पशुवैद्यांनी अतिसूक्ष्म शस्त्रक्रियेने शेळीच्या निषेचित (फलित) अंड्यामधील कोशिकांची (पेशीची) मेंढीच्या निषेचित अंड्यातील कोशिकांशी जुळणी करून त्या भ्रूणाचे एका मेरिना मेंढीच्या गर्भाशयात प्रतिरोपण केले. गर्भाची पूर्ण वाढ होऊन मेंढीप्रमाणे शिंगे व हनुवटीखाली शेळीप्रमाणे दाढी असलेला चेहरा, तसेच काही भागावर शेळीप्रमाणे दाढी असलेला चेहरा, तसेच काही भागावर शेळीप्रमाणे केस व काही भागावर मेंढीप्रमाणे लोकर असलेले करडू/ कोकरू जन्माला आले. हा प्राणी खऱ्या अर्थाने खेचरासारखा संकरित प्राणी नव्हे. खेचराच्या प्रत्येक कोशिकेमध्ये गाढव व घोडा यांचे जीन (आनुवंशिक लक्षणांची एकके) असतात. या प्राण्याच्या मात्र काही कोशिका मेंढीच्या व काही शेळीच्या असतात. असा हा विचित्रोतकी (एकापेक्षा अधिक निषेचित अंड्यांपासून निर्माण झालेल्या कोशिकांचे मिश्रण असलेला) प्राणी निर्माण करण्याचा जगातील पहिला यशस्वी प्रयत्न आहे. केंब्रिज येथील इन्स्टिटयूट ऑफ ॲनिमल फिजिऑलॉजी या संस्थेतील शास्त्रज्ञांच्या अशाच प्रयोगातून जन्मलेला विचित्रोतकी फेब्रुवारी १९८४ मध्ये १८ महिन्यांचा झालेला होता. एका अर्थाने या प्राण्याला दोन मातापिता असतात, हा विशेष होय. मेंढी आणि शेळी यांच्या नावातील इंग्रजी अक्षरांवरून या प्राण्याला जीप (Geep) असे संबोधले आहे.

मेंढ्यांपासून मिळणारे उत्पन्न : मेंढ्यांपासून लोकर, मांस, कातडी व खत हे पदार्थ मुख्यत्वे मिळतात. मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीसंबंधीची माहिती ‘लोकर’ या नोंदीत दिलेली आहे. लोकरीच्या जोडीला त्यांच्यापासून मांसही मिळते. साधारणपणे जास्त लोकर देणाऱ्या मेंढ्यांत मांसाचे प्रमाण कमी, तर कमी लोकर देणाऱ्यांमध्ये ते जास्त असते. भारतातील निरनिराळ्या राज्यांतील खाटिकखान्यात सु. पन्नास लाख मेंढ्यांची दर वर्षी कत्तल होते व त्यांपासून सु. १·५८ लाख टन मांस मिळते. [→ मांस उद्योग]. भारतातील मेंढ्यांच्या कातड्याचे उत्पादन दर वर्षी सु १·५५ कोटी कातडी इतके आहे. यांपैकी सु. चौदा लाख कातडी राजस्थानातून मिळतात. त्यांपासून पाकिटे, हातपिशव्या, बूट, वाद्ये इ. बनवितात. [→ चर्मोद्योग]. शेळ्यांच्या तुलनेत मेंढ्यांपासून दूध जवळजवळ मिळत नाही, असे म्हटले तरी चालेल, काश्मीरमधील पूंछ, पंजाबातील लोही आणि उत्तर गुजरातमधील कच्छी मेंढ्यांपासून इतर मेंढ्यांच्या मानाने खूपच जास्त प्रमाणात दूध मिळते. मेंढीपासून लेंडी खत व मूत्र खत मिळते. एक मेंढी वर्षाला सु. ०·२५ टन खत देते. याकरिता शेतामध्ये मेंढ्या बसविण्याची पद्धत भारतभर रूढ आहे [→ खत].

रोग : मेंढ्यांमधील आजार सहजासहजी ओळखू येत नाहीत. त्या बऱ्याच आजारी झाल्या म्हणजेच आजाराची लक्षणे दिसू लागतात. आपल्या कळपातील मेंढ्या काही प्रमाणात रोगाने मृत्युमुखी पडणारच –ते अनिवार्य आहे –अशीच जगातील सर्व मेंढपाळांची समजूत विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत होती. त्यानंतरच्या २५ वर्षांमध्ये व्हायरसजन्य व सूक्ष्मजंतुजन्य रोगांच्या नियंत्रणाच्या बाबतीत पशुवैद्यकशास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मेंढ्यांचे कित्येक संसर्गजन्य रोग आटोक्यात आले आहेत. कळपामध्ये एकमेकींना बिलगून राहण्याच्या मेंढ्यांच्या सवयीमुळे साथीच्या रोगांचा झपाट्याने फैलाव होतो. ताप, जलद श्वासोच्छ्‌वास, त्वचेवर लाली येणे, अंगावर सूज येणे, शिंका, खोकला व हगवण ही बऱ्याच संसर्गजन्य रोगांत दिसून येणारी सर्वसामान्य लक्षणे आहेत.

भारतामध्ये मेंढ्यांचे संसर्गजन्य रोग पशुस्थानिक (रोगकारक जंतूंच्या अस्तित्वामुळे एखाद्या भागातील जनावरांत उद्‌भवणाऱ्या) स्वरूपात आढळून येतात व त्यामुळे या भागातील मेंढ्या रोगांना मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. मेंढ्यांच्या काही महत्त्वाच्या रोगांची माहिती येथे दिली आहे.

सूक्ष्मजंतुजन्य रोग : क्लॉस्ट्रिडियम प्रजातीतील काही सूक्ष्मजंतूमुळे मेंढ्यांना तीव्र स्वरूपाचे आजार होतात. हे सूक्ष्मजंतू बीजाणुरूप (सूक्ष्मजंतूंचे सुप्तावस्थेतील निरोधक स्वरूप) धारण करणारे, अनॉक्सिजीवी (ऑक्सिजनविरहित वातावरणात वाढणारे) असून शरीरामध्ये मारक स्वरूपाची विषे तयार करतात. यामुळे विषरक्तता (रक्तामध्ये विष भिनणे) होऊन मेंढ्या बऱ्याच प्रमाणावर मृत्युमुखी पडतात.


आंत्रविषबाधा : क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स (वेल्चाय) या सूक्ष्मजंतूंच्या ड प्रकारामुळे जगातील सर्व देशांमध्ये मेंढ्यांना होणारा हा संहारक रोग आहे. दोन वर्षे वयाच्या आतील मेंढ्यांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळतो. खाणे बंद होणे, तोंडातून फेस येणे, आचके देणे, हगवण इ. लक्षणे कोकरामध्ये दिसतात व विषरक्तता होऊन ती २ ते १२ तासांत मरण पावतात. वयस्क मेढ्यांना हा रोग झाल्यास दात खाणे, तोंडावाटे लाळ गळणे, पोटफुगी, चालताना झोक जाणे, गोल गोल फिरणे इ. लक्षणे दिसतात व त्या १२ ते २४ तासांत मरण पावतात. सर्वसामान्यपणे असे दिसून येते की, नेहमी निकृष्ट प्रकारच्या चराऊ रानामध्ये चरणाऱ्या मेंढ्या चांगल्या प्रतीच्या रानामध्ये सोडल्या, तर त्या अधाशीपणाने चरतात. रोगाचे सूक्ष्मजंतू मेंढ्यांच्या आतड्यात बहुधा नेहमी असतात व अशा वेळी ते वाढीस लागतात आणि रोगोद्‌भव होतो. भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये हा रोग आढळून येतो. आजारी मेंढ्यांवर उपचार करण्याइतका अवधी सहसा मिळत नाही. रोगाविरुद्धच्या प्रतिविषाचे (सूक्ष्मजंतुजन्य विषाचा परिणाम नाहीसा करणारे प्रथिन असलेल्या रक्तरसाचे) मोठ्या मात्रेने अंतःक्षेपण केल्यास आजारी मेंढ्या बऱ्या  होऊ शकतात. रोगकारक सूक्ष्मजंतूंच्या विषापासून तयार केलेले विषाभ (जंतुविषातील विषारीपणा नष्ट करून पण प्रतिरक्षेचा गुणधर्म वर्षातून दोनदा कायम राखून तयार केलेली लस) परिणामकारक असून वर्षातून दोनदा टोचल्यास रोगप्रतिबंध होऊ शकतो.

लिबलिबीत वृक्क (मूत्रपिंड) : (पल्पी किडनी). वरील सूक्ष्मजंतूमुळे हा आणखी एक रोगप्रकार ६ ते १६ आठवडे वयाच्या कोकरांमध्ये आढळून येतो. कळपामध्ये एकाएकी एखादे कोकरू मेलेले आढळते. त्यानंतर इतर कोकरांमध्येही फारशी रोगलक्षणे न दिसता ती मरू लागतात. मरणोत्तर तपासणीत वृक्क लिबलिबीत झालेले व त्यावर पांढरे ठिपके दिसून येतात. यकृतातील कोशिकांतून (सूक्ष्म रक्तवाहिन्यांतून) रक्तस्त्राव झाल्यामुळे यकृतावर तांबडे ठिपके दिसून येतात. विण्यापूर्वी दहा दिवस गाभण माद्यांना वर उल्लेखिलेली लस टोचल्यास जन्मणाऱ्या कोकरांना चिकावाटे गेलेल्या प्रतिपिंडामुळे (प्रतिजनाच्या संभाव्य हानिकारक बाह्य पदार्थांच्या संपर्कामुळे रक्तरसात तयार होणाऱ्या विशिष्ट प्रथिनामुळे) परार्जित प्रतिरक्षा (दुसऱ्या जनावरात उत्पन्न झालेली व त्याच्या रक्तापासून मिळणारी रोगप्रतिकारकक्षमता) मिळते व ती ८ ते १२ आठवडे सुरक्षित राहतात.

स्ट्रक व कोकरांना आमांश : वरील सूक्ष्मजंतूंच्या क प्रकारामुळे स्ट्रक व ब प्रकारामुळे कोकरांना आमांश असे आणखी दोन सांसर्गिक रोग मेंढ्यांमध्ये आढळून येतात.

स्ट्रक हा एक ते दोन महिने वयाच्या कोकरांमध्ये इंग्लंडमध्ये वेल्स परगण्यात व अमेरिकेत आढळला आहे. क प्रकारच्या सूक्ष्मजंतूपासून आल्फा व बीटा ही विषे तयार होऊन रोगलक्षणे दिसण्यापूर्वीच मेंढ्या एकाएकी मरून पडलेल्या आढळतात. सूक्ष्मजंतूविरुद्ध तयार केलेले प्रतिविष योग्य मात्रेमध्ये टोचणे हा एकच उपाय या रोगावर आहे. तसेच सूक्ष्मजंतूच्या विषापासून तयार केलेले विषाभ निरोगी कोकरांना टोचल्यास रोगप्रतिबंध होऊ शकतो. प्रतिविषे बहुधा घोड्यामध्ये तयार करतात. त्यामुळे कोकरामध्ये अधिहृषतेची (ॲलर्जीची) लक्षणे दिसण्याचा संभव असतो, हे लक्षात घेणे जरूर आहे. याशिवाय क्लॉस्ट्रिडियम प्रजातीतील क्लॉ. नोव्ही (क्लॉ. इडिमॉशिअन्स) या सूक्ष्मजंतूंच्या ब प्रकारामुळे ब्लॅक डिझीज (संसर्गजन्य ऊतक मृत्ये यकृतशोथ) व क्लॉ. सेप्टिकम या सूक्ष्मजंतूमुळे व रक्तमूत्र हे तीव्र स्वरूपाचे मेंढ्यांचे संसर्गजन्य रोग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूरोप व इंग्लंडमध्ये आढळून आले आहेत. दोन्ही रोगांमध्ये मेंढ्या-कोकरे फारशी रोगलक्षणे दिसण्याआधीच विषबाधा होऊन काही तासांमध्ये मरून पडतात. रोगजंतूपासून तयार केलेली लस अगर रोगजंतुविषापासून तयार केलेले विषाभ टोचल्याने रोगप्रतिबंध होऊ शकतो.

क्षय रोग : मेंढ्यांना सहसा क्षय होत नाही परंतु कोंबड्यांच्या क्षयजंतूमुळे क्षय झाल्याचे क्वचित उदहरणे आहेत. मात्र कॉरिनिबॅक्टिरियम ओव्हिस या सूक्ष्मजंतूमध्ये आभासी क्षय रोग होतो. रोगामुळे शरीरातील ⇨ लसीका ग्रंथीचा शोथ (दाहयुक्त सूज) होऊन त्यांमध्ये कॅल्शियमाचे निक्षेपण (साचणे) होते. खाटिकखान्यामध्ये मांस तपासणीच्या वेळी या रोगामुळे होणाऱ्या विकृती लक्षात घ्याव्या लागतात.

खूरसडा :पायावरील त्वचा व खूर यांच्या संधीपाशी झालेल्या जखमांमधून ॲक्टिनोमायसीज नोडोसस या सूक्ष्मजीवांच्या प्रवेशामुळे मेंढ्यांना होणारा हा रोग आहे. भारतामधील काही राज्यांत बहुधा हिवाळ्यामध्ये हा रोग आढळून येतो. या ठिकाणची त्वचा सुजून तो भाग दुखरा बनतो व मेंढ्या लंगडत चालतात. कधी कधी खूर मऊ पडून ते संपूर्णपणे गळून पडतात. एकाहून अधिक पाय ग्रस्त झाल्यास मेंढ्या गुडघ्यावर खुरडत चालतात. सडलेला खुराचा भाग कापून काढून जंतुनाशक द्रावणाने तो स्वच्छ करून त्यावर जंतुरोधी औषधे लावतात. अलीकडे पेनिसिलीन अथवा स्ट्रेप्टोमायसीन या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांची अंतःक्षेपणे करतात.

व्हायरसजन्य रोग : देवी : सर्व जनावरांना येणाऱ्या देवीपेक्षा मेंढ्यांना येणाऱ्या देवी हा अतिसंहारक रोग आहे. सहा महिन्यांच्या आतील कोकरांना देवी झाल्यास मृत्यूचे प्रमाण ५०% इतके असू शकते. वयस्क मेंढ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असते परंतु लोकरीच्या उत्पादनात घट होते. संसर्गाने रोग प्रसार होतोच परंतु हवेतील धूलिकणांबरोबर श्वसन तंत्रावाटे (श्वसन संस्थेवाटे) व्हायरसाचा शरीरात प्रवेश झाल्याने रोगसंसर्ग होऊन रोगाचा प्रसार होतो. पिटिका (पुटकुळ्या), पुटिका (द्रवयुक्त फोड), पूयिका (पूयुक्त फोड) व खपली अवस्था या देवीच्या फोडाच्या सर्व अवस्था मेंढ्यांच्या देवीच्या फोडामध्ये दिसून येतात. प्रामुख्याने ताप, नाकावाटे, उत्सर्ग, खाणे बंद होणे इ. लक्षणेही दिसून येतात. लोकर नसलेल्या भागावर –जांघेमध्ये, तोंडाभोवती, स्तनावर व स्तनाग्रावर– देवीचे फोड प्रामुख्याने दिसून येतात. शेळीच्या देवीच्या रोगकारक व्हायरसामुळे मेंढ्यांना देवी येतात. रोगकारक व्हायरसाच्या क्षीणन केलेल्या विभेदापासून ऊतक-संवर्धन

तंत्र (कृत्रिम पद्धतीने शरीराबाहेर पेशींची वाढ करून) वापरून बनविलेली लस प्रतिबंधक म्हणून वापरात आले. लस टोचल्यावर दोन आठवड्यांत प्रतिकारशक्ती निर्माण होते व ती ९ ते १२ महिने टिकते.

निळी जीभ : (ब्ल्यू टंग). व्हायरसामुळे मेंढ्यांना होणारा एक संक्रामक (साथीचा) रोग असून वालुमक्षिका व डास या कीटकांमार्फत याचा प्रसार होतो. आफ्रिकेमधील सर्व देशांत, पाकिस्तान, तुर्कस्तान, भारत व अमेरिकेतील काही राज्यांत हा आढळून आला आहे. पोटाच्या व आतड्याच्या श्लेष्मकलेला (अस्तर त्वचेला) सूज येणे, ताप, नाकावाटे शेंब व रक्तमिश्रित उत्सर्ग, तोंडातून फेसाळ लाळ, जिभेला सूज येऊन ती निळी पडणे ही सर्वसामान्य रोगलक्षणे दिसतात. हतप्रभ केलेल्या व्हायरसाच्या अनेक विभेदांपासून तयार केलेली बहुशक्तिक लस रोगप्रतिबंधक म्हणून वापरात आहे. वर उल्लेखिलेल्या माश्यांचा व डासांचा नाश करणे हे कायमचा प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने जरूर आहे.

इतर व्हायरसजन्य रोग : पूयिकायुक्त त्वचाशोथ व एक्थायमा हे व्हायरसांमुळे होणारे दोन सांसर्गिक रोग मेंढ्यांना होतात. दोन्ही रोगांमध्ये कोकरांमध्ये मृत्यूचे प्रमाण बरेच असते. पहिल्यामध्ये अंगावर केस नसलेल्या जागी त्वचा लाल होऊन तीवर देवीसारखे फोड येतात. या फोडांमध्ये द्रव असत नाही व ते गाठाळ असतात. रोगावर गुणकारी लस उपलब्ध आहे. एक्थायमा (स्टोमॅटायटीस) या रोगामध्ये मेंढ्यांच्या तोंडाभोवती चामखिळीसारखे फोड येतात. हे फोड तोंडाच्या बेचक्यात सुरू होऊन नाक, गाल, डोळे व कानांपर्यंत पसरतात. फोडावर जंतुनाशक औषधी मलम लावतात. फोडातील रोगकारक व्हायरसांपासून बनविलेली लस गुणकारी आहे, असे आढळून आले आहे.


रशियातील किरघिझ ॲकॅडेमीच्या जीवरसायनशास्त्र व शरीरक्रियाविज्ञान संस्थेचे संचालक एंजेल इमॅनोव्ह व त्यांचे सहकारी यांनी ⇨ ऊतकसवंर्धन तंत्र वापरून या लसीपेक्षा अधिक गुणकारी लस तयार करण्यात अलीकडे यश मिळविले आहे.

स्क्रॅपी व लूपिंग इल हे दोन मेंढ्यांच्या तंत्रिका तंत्रामध्ये (मज्जा संस्थेमध्ये) दोष उत्पन्न झाल्यामुळे होणारे व्हायरसजन्य रोग आहेत. स्क्रॅपी हा चिरकारी (दीर्घकालीन) स्वरूपाचा असून मेंढ्या २ ते १२ महिने आजारी राहातात. रोगावर उपचार किंवा प्रतिबंधक उपाय नाही. रोगी किंवा संस्पर्शित (रोगी मेंढ्यांच्या सहवासात असणाऱ्या) मेंढ्या मारून टाकतात. रोग आनुवंशिक असावा असा संशय आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांत हा आढळून येतो. भारतामध्ये उत्तर प्रदेशातील काही भागांत हा आढळून आला आहे.

लूपिंग इल हा तीव्र स्वरूपाचा रोग असून एक्सोडेस रिसिनसऱ्हिफिसेफॅलस ॲपेंडीक्युलस या गोचिड्यांच्या मार्फत रोगकारक व्हायरस मेंढ्यांच्या शरीरात प्रवेश करतो. फक्त स्कॉटलंडमध्ये रोग झाल्याचे आढळून आले आहे. पण रशिया व मध्य यूरोपामध्ये या रोगासारखी लक्षणे दिसणारा आजार मेंढ्यांमध्ये आढळून आला आहे. स्नायूंना कंप सुटणे, क्षोभक अवस्था, हेलकावे देत चालणे ही सर्वसामान्य लक्षणे दोन्ही रोगांत आढळून येतात. पायांना झटके देऊन उचलून उड्या मारल्याप्रमाणे चालणे या लक्षणांवरून लूपिंग इल हे नाव पडले आहे. रोगावर हतप्रभ केलेल्या व्हायरसापासून तयार केलेली लस व रक्तरस दोन्हीही उपलब्ध आहेत. गाभण मेंढ्यांना ही लस टोचल्यास जन्मणाऱ्या कोकरांना परार्जित प्रतिरक्षा मिळते.

परजीवीजन्य रोग : इतर कोणत्याही पाळीव जनावरापेक्षा परजीवींमुळे (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या जीवांमुळे) होणाऱ्या रोगांचे प्रमाण मेंढ्यांमध्ये अधिक आहे. साथीच्या रोगाप्रमाणे थोड्या अवधीत अनेक मेंढ्या मरत नसल्या, तरी अधूनमधून अनेक मेंढ्या मरण पावत असल्यामुळे काही वेळा मेंढ्या पाळणे ही समस्या होत असे. तथापि आता अशा रोगावर प्रतिबंधक उपाय व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत.

प्रोटोझोआ, प्लॅटिहेल्मिंथिस, नेमॅटहेल्मिंथिस या परजीवींमुळे मेंढ्यांमध्ये आजार होतात. प्रोटोझोआ संघातील बदराणू (कॉक्सिडिया) गणातील आयमेरिया आरलाइंगी या परजीवीमुळे मेंढ्यांमध्ये मारक आजार होतो. [→ बदगणुजन्य रोग].

प्लॅटिहेल्मिंथिस संघातील पर्णकृमींमुळे मेंढ्यांमध्ये मारक आजार होतात. त्यातील फॅसिओला जायगँटिकाडिक्रोसीलियम डेंड्रिट्रिकम हे यकृत पर्णकृमी जगातील सर्व देशांतील मेंढ्यांमध्ये आढळून येतात. यामुळे पित्तवाहिनीचा शोथ, यकृत उपवृद्धी (रक्तपुरवठ्यातील व्यत्ययामुळे कार्यशक्ती व आकारमान कमी होणे) व सूत्रण (तंत्वात्मक ऊतक-कोशिकासमूह–जास्त प्रमाणात वाढणे) हे यकृताचे आजार होतात. अशक्तपणा, हगवण, रक्तक्षय व गळ्याखाली शोफ (द्रवयुक्त सूज) ही लक्षणे दिसतात. कार्बन टेट्राक्लोराइड हे औषध या परजीवीवर उपयुक्त आहे. गोगलगाईच्या काही जातींमध्ये (लिम्निया ॲक्युमिनेटा) या परजीवीच्या जीवनचक्रातील काही अवस्थांची वाढ होते. यामुळे गोगलगाईचा नाश हा कृमीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी एक रोगप्रतिबंधक उपाय म्हणून आवश्यक ठरतो.

शंकूच्या आकाराचे पॅराफिस्टोमा जातीतील काही पर्णकृमी मेंढ्यांच्या आतड्यात व शिस्टोसोमा जातीचे त्यांच्या रक्तात आढळतात. पॅराफिस्टोमा जातीच्या पर्णकृमीवरील औषधयोजना यकृत पर्णकृमीप्रमाणे करतात. शिस्टोस्टोमा पर्णकृमीवर अँटिमोसान या औषधाची अंतःक्षेपणे देतात. रवंथ करणाऱ्या जनावरात पट्टकृमीमुळे फारसे आजार होत नाहीत. तथापि मोनिशिया एक्सपान्सा या कृमीमुळे मेंढ्या (विशेषतः कोकरे) आजारी होतात.

नेमॅटहेल्मिंथिस या संघातील नेमॅटोडा वर्गातील हीमाँकस कंटोर्टस हे सुतासारखे दिसणारे कृमी मेंढ्यांच्या लहान व मोठ्या आतड्यांत गाठी उत्पन्न करतात. इसोफॅगोस्टोमम जातीच्या अनेक उपजातींमुळे आतड्यांमध्ये व व्हारस्ट्राँगिलिस न्यूमोनिकस या कृमीमुळे खोकला, फुप्फुसशोथ हे विकार होतात. या महत्त्वाच्या कृमींव्यतिरिक्त आणखी काही जातींचे कृमी मेंढ्यांमध्ये आढळतात आणि त्यांमुळे अशक्तता, रक्तक्षय, हगवण इ. रोगलक्षणे दिसतात.

कीटकजन्य रोग : इस्ट्रस, फॉर्मिया, कॅलिफोरा या व इतर काही प्रजातींच्या माश्यांमुळे मेंढ्यांना आजार होतात. इस्ट्रम ओव्हिस (नेझलबॉट्स) या माश्या मेंढ्यांच्या नाकपुड्यांभोवती घोंघावतात व नाकपुड्यांवर अंडी किंवा डिंभ (अळी अवस्था) घालतात. अळ्या नाकामध्ये वर सरकत जाऊन नाकाच्या हाडातील किंवा ललाटास्थीच्या कोटरात (कपाळाच्या हाडाच्या पोकळीत) शिरतात व तेथे त्यांची वाढ काही आठवड्यांनंतर पूर्ण होते. पर्याक्रमित (पछाडलेल्या) मेंढ्या पाय आपटतात, एकसारख्या शिंकतात, डोक्याला हिसके देतात व बेचैन झाल्यामुळे रोडावतात. शिंकेबरोबर डिंभ जमिनीवर पडतात व तिथे त्यांची कोषावस्था पूर्ण होऊन ३ ते ६ आठवड्यांत माश्यांमध्ये रूपांतर होते. तसेच फॉर्मियाकॅलिफोरा (ब्लो फ्लाय) प्रजातींच्या माश्या आपली अंडी मेंढ्यांच्या जखमांच्या कडांवर घालतात. अंड्यातून बाहेर पडलेले डिंभ लोकरीच्या धाग्याच्या मुळामध्ये शिरून रक्तशोषण करतात. यामुळे त्वचेचा क्षोम होतो व मेंढ्या खाजवतात, अंग घासतात. परिणामी त्या भागावरील लोकर गळून पडते.

गोचिड्यांच्या बहुतेक जाती रक्तपिपासू आहेत व त्यांतील काही मेंढ्यांच्या अंगावर आढळतात. भारतामध्ये ऑर्निथोडोरस लाहोरेन्सिसबूफिलस मायक्रोप्लस या जातींच्या गोचिड्या काश्मीर व वायव्येकडील भागांत आढळतात. गोचिड्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर झाल्यास मेंढ्यांना रक्तक्षय होतो. यांशिवाय लिनोग्नॅथसपेडॅलिस या रक्तपिपासू उवांमुळेही रक्तक्षय व सारकॉप्टीस प्रजातींच्या किडीमुळे त्वचाक्षोभ होऊन लोकर गळून पडते.

माशीप्रतिवारक (ज्यापासून माश्या दूर राहतात असे) रसायन मेंढ्यांच्या नाकाला लावल्याने माश्यांचा त्रास कमी होतो. कार्बनी फॉस्फेट (उदा., बेअर कंपनीचे ३७,३४२ किंवा ३७,३४१) पोटात दिल्याने हा उपद्रव बराच कमी होतो. गोचिड्या, उवा व कीड यांचा उपद्रव कमी करण्यसाठी बेंझीन हेक्झॅक्लोराइड व डायझोन यांसारखी औषधे मुद्दाम बांधण्यात आलेल्या विशिष्ट हौदाच्या पाण्यात योग्य प्रमाणात टाकतात व त्यातून मेंढ्यांना गळ्याइतक्या पाण्यातून चालवतात. या औषधांच्या रासायनिक द्रावणाने लोकर भिजून त्याबरोबर गोचिड्या, उवा व कीड यांचा नाश होतो.

मेंढ्यांना होणाऱ्या नैमित्तिक आजारांमध्ये पोटदुखी, नाळीचा रोग, संधिरोग या आजारांचा समावेश आहे. यांशिवाय काळपुळी (सांसर्गिक), गळसुजी रोग, बुळकांड्या, लाळरोग हे रोगही मेंढ्यांना होतात. या रोगांची माहिती त्या त्या रोगाच्या शीर्षकाच्या स्वतंत्र नोंदीमध्ये पहावी.

पहा : लोकर.

संदर्भ : 1. Blood, D. C. Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1917,

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, Supplement Livestock (including Poultry), New Delhi, 1970.

3. Fraser, A. Stamp, J. T. Sheep Husbandry and Diseases, London, 1969.

4. I. C. A. R. Handbook of Animal Husbandary, New Delhi, 1967.

5. McDowell, R. E. Improvement of Livestock Production in Warm Climates, San Francisco 1972.

6. Miller, C. M. West, G. P. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

ढमाले, शं. पां. दीक्षित, श्री. गं.


ऑस्ट्रेलियन मेरिनो मेंढी ऑस्ट्रेलियन मेरिनो मेंढा रॅम्ब्युलेट मेंढा
रामपूर बशीर मेंढा कॉरिडेल मेंढा रशियन मेरिनो मेंढा
नेलोर मेंढा दख्खनी मेंढा मारवाडी मेंढा