कोळी – १ : आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघातील ॲरॅक्निडा वर्गाच्या ॲरॅनीइडा या गणात सगळ्या कोळ्यांचा समावेश होतो. कोळी जगाच्या सर्व भागांत आढळतात. ५,७०० मी. उंचीवर आणि अतिशय खोल खाणीतही ते सापडतात. कित्येक कोळी अर्धसमुद्री आहेत व एक जाती गोड्या पाण्यात आढळते. कोळ्याच्या सु. ६०,००० च्या वर जाती आहेत.

आ. १. कोळी

कोळ्याची लांबी १ मिमी. पासून ९ सेंमी. पर्यंत असते. शिरोवक्ष (डोके आणि छाती यांच्या एकीकरणाने बनलेला भाग) आणि उदर असे शरीराचे दोन भाग असून बारीक कमरेने ते जोडलेले असतात. शिरोवक्षावर पुढच्या बाजूला आठ डोळे असतात. बहुसंख्य कोळ्यांत पुस्तक-फुफ्फुसांची (पुस्तकाच्या पानांप्रमाणे एकावर एक ठेवलेल्या पातळ पटलिकांनी बनलेल्या व एका चिरेने बाहेर उघडणाऱ्‍या फुफ्फुसांची) एक जोडी व श्वासनलिकांची एक जोडी अशी दोन प्रकारची श्वसनांगे (श्वसनेंद्रिये) असतात. विषग्रंथी शिरोवक्षामध्ये किंवा कीलिसेऱ्यांच्या (ॲरॅक्निड प्राण्यांच्या नखर वा नख्या असलेल्या पुढच्या उपांगांच्या) बुडामध्ये असून विषवाहिन्यांची छिद्रे कीलिसेऱ्‍यांच्या टोकांवर उघडतात. कीलीसेरा आणि स्पर्शक (संवेदी उपांगे) यांची एकेक जोडी आणि पायांच्या चार जोड्या असतात.

 

 

 

आ. २. कोळ्याची तनित्रे

कोळ्यांचे एक असामान्य लक्षण म्हणजे त्यांना असणारी तनित्रे (रेशमाचे धागे तयार करण्याकरिता असाणारी इंद्रिये) होत. ही नलिकांच्या स्वरूपाची व उदराच्या मागच्या टोकाशी असतात. यांच्या दोन किंवा तीन जोड्या असतात. उदरातील ग्रंथींच्या स्रावामुळे उत्पन्न होणाऱ्‍या पिच्छिल (गिळगिळीत) पदार्थांपासून तनित्रांच्या साहाय्याने कोळी रेशमी धागा तयार करतात. सगळेच कोळी या धाग्यापासून भक्ष्य पकडण्याची जाळी विणीत नाहीत. फारच थोडे कोळी अशी जाळी विणतात.या धाग्याचे इतर अनेक उपयोग ते करतात. जाळ्यात अडकलेल्या भक्ष्याला याच धाग्यांनी ते जखडून बांधतात. काही जाती रेशमी घरांत किंवा या धाग्याचे अस्तर लावलेल्या घरांत राहतात. अंडी ठेवण्याकरिता या धाग्यांचेच कोष बनविलेले असतात. शीतसुप्ती (हिवाळ्यात येणारी गुंगी) आणि कात टाकणे या दोन्ही क्रिया या धाग्यापासून बनविलेल्या रेशमी संपुटातच (डबीतच) घडून येतात.

सामान्यतः कीटक हे कोळ्याचे भक्ष्य होय. तथापि, काही मोठे कोळी लहान पक्ष्यांना पकडू शकतात. कोळी आपले भक्ष्य निरनिराळ्या मार्गांनी मिळवितात. लांडगा-कोळी (वुल्फ स्पायडर) भक्ष्याचा पाठलाग करून त्याला पकडतो. उड्या मारणाऱ्‍या कोळ्यांचे डोळे फार मोठे असून दृष्टीही फार तीक्ष्ण असते. ते भक्ष्याच्या अंगावर नेमकी उडी घेऊन त्याला पकडतात. काही कोळी जाळे विणून त्यात आपले भक्ष्य पकडतात. विषारी कीलिसेऱ्‍यांनी भोसकून भक्ष्याला ठार केल्यानंतर त्याच्या अंगातला रस कोळी हळूहळू शोषून घेतो.

कोळ्यांच्या शरीरावर व अवयवांवर असलेले केस त्यांची स्पर्शेंद्रिये होत. यांपैकी काही श्रवणेंद्रियांचे कार्य करतात असा समज आहे.

आ. ३. पिल्ले पाठीवर असलेली कोळ्याची मादी.

बहुतेक कोळी कमीअधिक प्रमाणात विषारी असतात. त्यांच्या विषाचा माणसावर फारसा परिणाम होत नाही, पण लॅट्रोडेक्टस  वंशातले सगळे कोळी अतिशय जहरी असल्यामुळे माणसाच्या दृष्टीने फार भयंकर होत. या वंशातल्या ‘ब्लॅक विडो’या कोळ्याच्या दंशाने अमेरिकेत दरवर्षी काही माणसे मरतात.

कोळ्यांमध्ये नर व मादी हा भेद असतो. मादी प्रायः नरापेक्षा मोठी असते. नराच्या स्पर्शकांचा प्रवेशी अंग (मैथुनाकरिता असणारे नराचे इंद्रिय) म्हणून उपयोग होतो. वयात आलेल्या नराच्या स्पर्शकांच्या शेवटच्या खंडावर एक फुगवटा तयार होतो. त्यात असलेल्या एका नागमोडी नलिकेत तो शुक्राणू साठवून ठेवतो. यानंतर मादीला शोधून काढून प्रियाराधनाने तिचे मन वळवून मैथुनाच्या वेळी साठवून ठेवलेले शुक्राणू तिच्या जननरंध्रात सोडतो. मैथुनानंतर नर पळून जातो. तो जर मादीच्या तडाख्यात सापडला, तर ती त्याला खाऊन टाकते.

धाग्याचे लहानसे घरटे किंवा कोष तयार करून मादी त्यात अंडी घालते. काही जातींच्या माद्या हा कोष पाठीवर किंवा पोटावर बाळगतात. काही जातींच्या माद्यांच्या तनित्रातील नलिकांना हे कोष चिकटलेले असतात. साधारणपणे पंधरा दिवसांनी अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात. काही दिवस ती कोषातच राहतात. काही जातींच्या कोळ्यांत ती मोठी होईपर्यंत मादीच्या पाठीवर राहतात आणि कात टाकून ती मोठी होतात.

कोळी अन्नाशिवाय पुष्कळ दिवस जगू शकतात. त्यांना शरीरात पुष्कळ अन्न साठवून ठेवता येते. अन्नाशिवाय तीस महिने जगल्याची काही कोळ्यांची उदाहरणे आहेत.

पहा : ॲरॅक्निडा टॅरँट्युला.

गर्दे, वा. रा.