दास, गोपबंधु : (९ ऑक्टोबर १८७७–१७ जून १९२८). प्रख्यात ओडिया लेखक, वृत्तपत्रकार, कवी, देशभक्त व समाजसेवक. त्यांचा जन्म पुरी जिल्ह्यांतील सुआंडो नावाच्या गावी एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. मातापिता स्वर्णमयी देवी व दैत्यारी दास. गोपबंधूंच्या जन्मसमयीच स्वर्णमयी देवींचे निधन झाले. त्यांचे पालनपोषण त्यांची आत्या कमला देवींनी केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावीच झाले. नंतर ते पुरी येथून १८९९ मध्ये मॅट्रिक झाले. १९०४ मध्ये ते कटक येथील रेव्हेन्शॉ महाविद्यालयातून पदवी घेऊन एम्. ए. आणि कायद्याच्या अभ्यासासाठी कलकत्त्यास गेले परंतु एम्. ए. न करता कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी कायद्याची बी. एल्. पदवी घेतली (१९०६). नंतर ते पुरी येथे वकिली करू लागले. मध्यंतरी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या पुन्हा विवाह न करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी स्वतःस, सामाजिक व राजकीय कार्यास वाहून घेतले.

गोपबंधु दास

त्यांनी १९०९ मध्ये पुरीजवळील सखीगोपाल येथे माध्यमिक इंग्रजी शाळेची स्थापना केली. ही एक आदर्श शाळा होती व ती ‘सत्यवादी’ वा ‘सखीगोपाल’ वनविद्यालय या नावाने ओळखली जाई. स्वमतप्रचारार्थ त्यांनी सत्यवादी (मासिक) व समाज (साप्ताहिक) ही पत्रे सुरू केली. तत्कालीन उत्कृष्ट असा अध्यापक वर्ग शाळेवर होता. त्यांत स्वतः गोपबंधू, ⇨ पंडित नीलकंठ दास, ⇨  पंडित गोदावरीश मिश्र, पंडित कृपासिंधू मिश्र व आचार्य हरिहर दास ह्या प्रसिद्ध विद्वान व साहित्यिक व्यक्तींचा समावेश होता. हे पाचजण ‘पंचसखा’ नावाने त्या कालखंडात प्रसिद्ध होते. यांच्या लेखनामुळे ओडिया साहित्यात नव्या सत्यवादी युगाचे प्रवर्तन झाले. हे विद्यालय त्या काळी शिक्षणाचे, राजकीय विचारांचे, साहित्याचे, समाजसेवेचे व राष्ट्रीय कार्याचे एक प्रसिद्ध केंद्र बनले होते. १९२१ मध्ये ह्या पाचजणांनी जेव्हा असहकारिता चळवळीत उडी घेतली, तेव्हा हे विद्यालय राष्ट्रीय विद्यालय बनले व शेवटी १९२६ मध्ये इंग्रज सरकारच्या रोषास पात्र ठरून बंद पडले.

गोपबंधू हे कडवे देशभक्त होते. विद्यार्थी असल्यापासूनच १९०३ मध्ये ‘उत्कल संमिलनी’ ह्या राजकीय संस्थेशी ते संबंधित होते व त्यांनी विखुरलेल्या ओडिया भाषिक लोकांना संघटित करण्याचा व एका प्रशासनाखाली आणण्याचा प्रयत्न केला. ते संमिलनीचे अध्यक्ष झाले. असहकारितेची चळवळ सुरू झाल्यावर ते ओरिसा प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी उत्कल संमिलनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन केली. भारतीय राष्ट्रवादाचे ओरिसातील अध्वर्यू म्हणून त्यांचेच नाव घेतले जाते. त्यांनी गांधीजीप्रणीत असहकारितेच्या चळवळीस ओरिसात चालना दिली व काँग्रेस संघटना बळकट केली. १९२१ मध्ये त्यांना समाज ह्या साप्ताहिक पत्रातील लेखाबद्दल अटक झाली. पुन्हा १९२२ मध्ये त्यांना असहकारिता चळवळीत भाग घेतल्याबाबत दोन वर्षांची शिक्षा झाली. हजारीबाग कारागृहात असताना त्यांनी दोन काव्यग्रंथ लिहिले.

कटक येथील रेव्हेन्शॉ महाविद्यालयात त्यांनी कायद्याची (बी. एल्.) व एम्. ए. (इंग्रजी) च्या शिक्षणाची सोय केली. त्यांनी मीठ उत्पादनावरील कर रद्द करण्यासाठी मोठा लढा दिला. ओरिसातील संस्कृत शिक्षणासाठीही त्यांनी संघटना बांधली. ते विधिमंडळाचे सदस्य असताना त्यांनी पूरग्रस्तांसाठी व दुष्काळपीडितांसाठी भरीव सेवाकार्य केले.

त्यांच्या समाजसेवेमुळे लाला लजपतराय यांनी त्यांना ‘सर्व्हंट्स ऑफ द पीपल सोसायटी’ चे सदस्यत्व बहाल केले. १९२६ मध्ये ते सोसायटीचे उपाध्यक्ष झाले. समाज नावाचे साप्ताहिक पत्र १९१९ मध्ये सुरू केले होते. ते प्रथम सखीगोपाल येथून, नंतर १९२५ मध्ये पुरी येथून व १९२७ मध्ये कटकवरून निघत असे. १९३० मध्ये ते दैनिक झाले.

त्यांच्या देशभक्तीचे माध्यम साहित्य होते. काव्य, गद्यलेखन तसेच सत्यवादीसमाज पत्रांतील संपादकीय लेख यांतून त्यांनी लोकजागृती करून देशभक्तीचा पुरस्कार केला. तुरुंगात असताना त्यांनी पद्यात लिहिलेल्या आठवणी काराकबिता (३ री आवृ. १९४६) व बंदिरे आत्मकथा (६ वी आवृ. १९५१) नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून पुराणांच्या धर्तीवर काही काव्यरचना केली. त्यांत गो माहात्म्य (२ री आवृ. १९३८), अबकाशचिंता (१९४२), नचिकेत उपाख्यान (१९४२) यांचा समावेश आहे. कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्यमंदिरावरही त्यांनी एक आदर्शवादी काव्य लिहिले असून ते धर्मपद (५ वी आवृ. १९४६) नावाने प्रसिद्ध झाले. सत्यवादीतील त्यांचे लेखन ते एक सामर्थ्यशाली गद्यलेखक असल्याचा निर्वाळा देते. गांधीजींच्या यंग इंडियातील लेखांशीच गोपबंधूंच्या या लेखांची तुलना करावी लागेल. आचार्य पी. सी. रॉय यांनी त्यांना ‘उत्कलमणि’ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

उत्कृष्ट वक्ते, थोर देशभक्त, समाजसेवक, दूरदृष्टीचे शिक्षणतज्ञ, कवी, आधुनिक ओडिया गद्याचे शिल्पकार व मानवतावादी म्हणून गोपबंधूंचे स्थान ओरिसाच्या इतिहासात व साहित्यात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)