गोट्शेट, योहान ख्रिस्टॉफ : (२ फेब्रुवारी १७००–१२ डिसेंबर १७६६). नव-अभिजाततावादी जर्मन समीक्षक. जन्म केनिग्झबर्ग येथे. केनिग्झबर्ग विद्यापीठात तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र आणि भाषाशास्त्र ह्या विषयांचे शिक्षण घेतले. लष्करात सक्तीने भरती व्हावे लागेल, या भीतीने लाइपसिकला पळाला आणि तेथेच काव्यशास्त्र, तर्कशास्त्र आणि तत्त्वमीमांसा ह्या विषयांचा प्राध्यापक म्हणून काम करू लागला. नव-अभिजाततावादी फ्रेंच साहित्याने त्याची वाङ्‌मयीन अभिरुची घडविली होती आणि त्याचाच आदर्श समोर ठेवून जर्मन साहित्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने Versuch einer Kritischen Dichtkunst (१७३०, इं. शी. अटेंप्ट ॲट अ क्रिटिकल आर्ट ऑफ पोएट्री) हा ग्रंथ त्याने लिहिला. जर्मन नाटकेही नव-अभिजाततावादी तंत्रानेच लिहिली गेली पाहिजेत, असा त्याने आग्रह धरला आणि जोसेफ ॲडिसनच्या केटो   ह्या शोकात्मिकेच्या धर्तीवर आपले Der sterbende Cato (१७३२, इं. शी. द डाइंग केटो) हे नाटकही लिहिले. गोट्शेटच्या प्रभावामुळे जर्मन नाटकांना पूर्वी अभावाने असणारे वाङ्‌मयीन अंग लाभले, तरी फ्रेंच प्रभावापासून अलिप्त असलेल्या खास जर्मन रंगभूमीवरील विकासक्षम अशा अनेक बाबींची त्यामुळे उपेक्षाही झाली. Deutsche Schaubuehne nach der Regeln der alten Griechen und Roemer eingerichtet (सहा खंड, १७४०–४५) ह्या ग्रंथात त्याने प्राचीन ग्रीक-रोमन रंगभूमीवर आधारलेल्या आदर्श जर्मन रंगभूमीची कल्पना मांडली. काही फ्रेंच नाटकांचे जर्मन अनुवादही त्यात संगृहीत आहेत. १७४० नंतर योहान बोडमर व योहान ब्रायटिंगर ह्या स्विस समीक्षकांनी गोट्शेटच्या वाङ्‌मयीन विचारांवर हल्ले करून त्याला निष्प्रभ केले. लाइपसिक येथे तो निधन पावला. 

घारपुरे, न. का.