पशुवैद्यक : (पशुविकारविज्ञान). पशुपक्ष्यांचे रोग, त्यांचे निदान, प्रतिबंध व त्यांवरील उपाय यांचा अभ्यास ज्या शास्त्रात करण्यात येतो त्याला पशुवैद्यक किंवा पशुविकारविज्ञान म्हणतात. पशूंचे शारीर (शरीराचा सांगडा,स्नायू व इंद्रिये यांच्या रचनेचा अभ्यास), शरीरक्रियाविज्ञान (शरीराचे कार्य व क्रिया कशा चालतात यांच्या अभ्यासाचे शास्त्र) व विकृतिविज्ञान (रोगामुळे शरीरात होणाऱ्‍या बदलाच्या अभ्यासाचे शास्त्र) या शास्त्रांचा पशुवैद्यकाशी निकटचा संबंध आहे आणि पशुवैद्यकाच्या अभ्यासक्रमात या विषयांचा अंतर्भाव करण्यात येतोच. पशुजन्य मानवी रोग आणि त्यांचा मांस, दूध, अंडी, लोकर इ. पशुपक्ष्यांपासून मिळणाऱ्‍या पदार्थांशी असलेला संबंध व पशुसंवर्धन (पशुसंगोपन, पशुखाद्य व पशुप्रजनन) या विषयांचाही पशुवैद्यकात अंतभार्व करतात. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा व यूरोपमधील काही देशांमध्ये पशुसंवर्धन या विषयाचा पशुवैद्यकात अंतर्भाव करीत नाहीत, तर ते स्वतंत्र शास्त्र म्हणून समजले जाते. जगातील अन्नटंचाईमुळे पशुजन्य पदार्थांचा मानवी आहारात अधिकाधिक वापर होत आहे. त्यामुळे उत्पादनांच्या म्हणजेच आर्थिक दृष्टिकोनातून तसेच सार्वजनिक आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने पशूंच्या रोगांचा सखोल अभ्यास होऊ लागला आहे.

पशूंच्या रोगांसंबंधीची बरीचशी माहिती माणसाळलेल्या पशूंच्यासंबंधीच उपलब्ध आहे. त्यातही गायी-गुरे, डुकरे व कोंबड्या या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्राण्यांसंबंधी अधिक माहिती आहे. प्रस्तुत नोंदीत पशुवैद्यक या विषयाचा सर्वसाधारण आढावा घेण्यात आला आहे. अधिक माहिती त्या त्या पशूच्या जातिवाचक नावाच्या शीर्षकाखाली तसेच पशूंच्या रोगांच्या नावांच्या शीर्षकाखाली दिलेली आहे. उदा., गाय, घोडा, मेंढी, गळसुजी रोग, बुळकांड्या, फऱ्‍या इ. तसेच मानव व पशू यांना समाईक असलेल्या आमांश, इन्फ्ल्यूएंझा, संसर्गजन्य काळपुळी, क्षय,प्लेग इ. रोगांच्या बाबतीत त्या त्या शीर्षकाखाली पशूंच्या रोगांसंबंधीची माहिती स्वतंत्र रीत्या दिलेली आहे. यांशिवाय पशुखाद्य, पशुप्रजनन, पशुसंवर्धन, पाळीव प्राणी, प्राणिजन्य मानवी रोग या संबंधित विषयांवर स्वतंत्र नोंदी आहेत.

इतिहास :अश्मयुगात मानव वन्य श्वापदाप्रमाणे गिरिकंदरात राहत असे व वन्य पशूंपासून आपले रक्षण करण्यासाठी त्याला नेहमीच सावध राहावे लागे. पशुपक्ष्यांचे सूक्ष्म अवलोकन करताना जखमी अथवा आजारी पशुपक्षी आपल्या विकारावर इलाज म्हणून भक्षण करीत असलेल्या अथवा अन्य प्रकारे त्यांनी उपयोगात आणलेल्या वनस्पतींची त्याला माहिती झाली. नंतर स्वतःच्या फायद्यासाठी पशुपक्षी पाळण्यास सुरुवात केल्यावर मानवाने या माहितीचा उपयोग पाळीव पशुपक्ष्यांवर औषधोपचार करण्यात केला आणि अशा प्रकारे पशुवैद्यकशास्त्राचा जन्म झाला .

जगातील इतर देशांच्या मानाने प्राचीन भारतात या शास्त्राची बरीच प्रगती झाली असावी, हे त्या वेळी लिहिलेल्या ग्रंथांवरून दिसून येते. अथर्ववेदात पशूंच्या रोगोपचाराबाबत ऋचा आहेत. यजुर्वेदात इंद्राने वाता गायीच्या पोटातून वासरू बाहेर काढले, असा उल्लेख आहे. दधीच ऋषींनी हे शास्त्र इंद्राकडून हस्तगत केले व अश्विनी-कुमारांना शिकविले. अश्विनीकुमारांचे शिष्य नकुल व सहदेव हे अनुक्रमे अश्ववैद्यक व गोवैद्यक या शास्त्रांत पारंगत होते. यावरून महाभारत काळातही या शास्त्राच्या विविध शाखांत विशेष शिक्षण घेण्याची पद्धत होती असे दिसते.

शालिहोत्र ऋषींनी अश्वआयुर्वेद हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या नावाचा या शास्त्रावर एवढा प्रभाव होता की, भारतात पशुवैद्यकास प्रथम ‘शालोत्री’ असे म्हणण्यात येई. समगयणाक्य मुनींचे पुत्र पालकाप्य यांनी हस्त्यायुर्वेद हा ग्रंथ लिहिला असून त्यात २०,००० श्लोक आहेत. या ग्रंथाचे महारोगस्थान, क्षुद्ररोगस्थान, शल्यस्थान व औषधिविवरण असे चार भाग आहेत. यांशिवाय जयदत्तकृत अश्वचिकित्सा, बृहस्पतिरचित गजलक्षण गोवैद्यकशास्त्र, नकुलाने लिहिलेला अश्वतंत्र इ. ग्रंथ उपलब्ध आहेत. ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथात बळी दिलेल्या पशूची कोणती इंद्रिये कोणत्या देवदेवतांना अर्पण करण्यात येत असत, याबद्दलचा उल्लेख आहे. यावरून पशूंचे शारीर व त्यांचे शवच्छेदन करण्याच्या पद्धतीची सुसंगत माहिती त्या काळीही होती असे दिसते.

मानवी वैद्यक व पशुवैद्यक यांची वाटचाल एकमेकांबरोबर होत राहिल्यामुळे यांतील कशाची सुरुवात प्रथम झाली हे सांगणे कठीण आहे. पशुवैद्यकाच्या अस्तित्वाचा ऐतिहासिक उल्लेख इ. स. पू. १८०० च्या सुमारास होऊन गेलेल्या हामुराबी या बॅबिलोनियाच्या (हल्लीचा इराक) राजांनी केलेल्या कायद्यात सापडतो. त्यांनी गुरे व गाढवे यांच्यावरील उपचारचा मोबदला ठरवून दिला. तसेच पशुवैद्याच्या निष्काळजीपणामुळे आजारी जनावरास अपाय झाल्यास त्याला शिक्षा करावी, असा दंडक घातला. घोडे व म्हशी यांच्या संबंधीचा एक ग्रंथ इ. स. पू. २५०० मध्ये चिनी भाषेत लिहिला गेला आहे. ईजिप्तमधील काहूनच्या इ. स. पू.१९००) पपायरस पत्रात (पपायरस या वनस्पतीपासून तयार केलेल्या कागदासारख्या साधनावरील लिखाणात) कुत्र्याच्या व बैलाच्या आजारांवरील उपचारांचे वर्णन आहे. तथापि पशूंचे रोग भुताखेतांच्या अवकृपेमुळे होतात असा सार्वत्रिक समज पूर्वी असावा, असे मानण्यास या चित्रलेखामुळे पुष्टी मिळते. ग्रीक लोकांमध्ये प्राचीन काळी हिप्पीॲट्रोई म्हणजे अश्ववैद्य असा एक वर्गच होता. हिपॉक्राटीझ ( इ. स. पू. ४६०–३३७ ), झेनोफान (इ. स. पू. ४३४–३५५)व ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४—३२२ )या ग्रीक लेखकांनी आणि मार्कस केटो (इ. स. पू. २३४–१४९ )व मार्कस व्हारो (इ. स. पू.११६–३४ ) या रोमन लेखकांनी पशूंचे आजार व त्यांवरील उपचार यांसंवंधी लिखाण केले आहे. ॲरिस्टॉटल यांनी घोड्यांना होणाऱ्‍या धनुर्वात व अंतर्गळ या रोगांची लक्षणे व कुत्र्यांच्या पिसाळण्यासंबंधी बारकाईने अवलोकन करून त्या रोगांची लक्षणे व तो पसरण्याची कारणे, यांची वर्णने नमूद करून ठेवली आहेत. गेलेन (इ. स. १३०–२०१) या ग्रीक वैद्यांनी पशूंच्या शरीरक्रियाविज्ञानासंबंधी लेखन केले. बायझँटाइन काळातील पूर्वेकडील रोमन साम्राज्यात अनेक निष्णात पशुवैद्य होते. यांपैकी ॲपसारटस (इ. स.३३०) यांनी पशुवैद्यकासंबंधी मौलिक लिखाण केले आहे, म्हणून त्यांना पशुवैद्यकाचे आद्य प्रणेते म्हणतात. फ्लेव्हिअस व्हिजीशिअस (इ. स. ४५०) या रोमन पशुवैद्यांनी आपल्या Artis Veterinariaeया पशुवैद्यकीय ग्रंथात देवदेवतांच्या रोषामुळे पशूंमध्ये सांसर्गिक रोगाच्या साथी येतात, या रूढ समजुतीवर टीका केली. व पशुवैद्यांना समाजात असलेल्या गौण दर्जाबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी निरोगी पशूस आजारी पशूपासून दूर ठेवण्याची आवश्यकता पटवून दिली. यानंतर इ. स. १५९८ मध्ये कार्लो रुइनी यांनी Anatomia del cavalloहा घोड्याच्या शारीरविज्ञानावर एक प्रबंध लिहिला. या प्रबंधात पशूंच्या रोगराईवर एक प्रकरण लिहिले आहे. मध्यंतरीच्या १,००० वर्षांत पशुवैद्यकावर काही महत्त्वाचे लिखाण झाल्याचे दिसत नाही . याचे मुख्य कारण असे दिसते की, रोमन सैन्यामध्ये नालबंद म्हणून नेमलेले अशिक्षित लोक पशुवैद्याचे काम करू लागल्याने या धंद्याकडे तुच्छतेने पाहण्यात येऊ लागले. अठराव्या शतकात यूरोपमध्ये जनावरांच्या रोगांच्या भयंकर साथी आल्या व अगणित पशू मृत्युमुखी पडले. त्यामुळे यूरोपच्या अर्थव्यवस्थेस मोठाच धक्का बसला व पोपसकट सर्व देशांच्या राजांचे या विषयाकडे लक्ष गेले. खुद्द पोपनी आपले वैद्य लान्सिसी यांना पशुरोगांचा अभ्यास करण्याची आज्ञा केली व पुन्हा एकदा सुशिक्षित लोक या शास्त्राकडे आकर्षिले गेले.


भारतामध्ये वेदोत्तरकालात गोधन, घोडदळ, हत्तिदळ यांच्या महत्त्वामुळे पशुवैद्यकाकडे राजांचे पूर्ण लक्ष होते. या दळांतील पशूंच्या शुश्रूषेसाठी शासकीय पशुवैद्यक विभागाची स्थापना करण्यात येऊ लागली. चंद्रगुप्तांच्या राज्यातील (इ. स. पू. ? ते ३००) या विभागाचे वर्णन कौटिल्यांच्या अर्थशास्त्रात आढळते. सम्राट अशोकांनी (इ. स. पू. ३०३? ते २३२?) जनावरांसाठी पांजरपोळ उघडल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. नवव्या शतकात लिहिलेल्या शुक्रनीति या ग्रंथात पशुविकारविज्ञानासंबंधी माहिती आहे. तंजावरचे राजे सरफोजी यांच्या आश्रयाखाली अश्ववैद्यक व हस्तिवैद्यक यांवर मराठीतून ग्रंथ लिहिले गेले. हे ग्रंथ तंजावर येथील ‘सरस्वती महाल’ या ग्रंथालयात जतन करून ठेवले आहेत.

आर्थिक महत्त्व :निरनिराळ्या रोगांना बळी पडत असलेल्या पशूंची संख्या लक्षात घेतल्यास पशुवैद्यकाचे आर्थिक महत्त्व सहज लक्षात येते. अमेरिकेच्या सयुक्त संस्थानांसारख्या पुढारलेल्या देशांत रोगांनी मरण पावलेल्या पशूंमुळे दरवर्षी २ अब्ज डॉलरचे नुकसान होते व हा आकडा एकंदर पशुधनाच्या १०% किंमतीइतका असावा. यातील ५०% नुकसान जीवोपजीवींमुळे (दुसऱ्‍या जीवांवर स्वतःचे पोषण करणाऱ्‍या जीवांमुळे) होणाऱ्‍या रोगांमुळे व या ना त्या कारणाने गायीमध्ये निर्माण होणाऱ्‍या गर्भधारणेच्या असमर्थतेमुळे होते, तर २५% कोंबड्यांचे रोग, गायीमधील स्तनशोथ व ब्रूसेलोसिस या रोगांमुळे होते. अलर्क रोगामुळे (पिसाळ रोगामूळे) मृत्युमुखी पडणाऱ्‍या जनावरांची संख्या मोठी नसली, तरी या रोगाच्या प्रतिबंधासाठी होणारा खर्च बराच मोठा आहे.

भारतामध्ये शेतीची बहुतांशी कामे अद्याप जनावरांकरवी होत आहेत. एका अंदाजाप्रमाणे या कामाचे मूल्य ३ ते ५ हजार कोटी रु. असावे. मात्र रोगराईमुळे जनावरे निकामी झाल्यामुळे होणाऱ्‍या नुकसानीचा अंदाज करणे अवघड आहे. तरीसुद्धा गायी-गुरांच्या बुळकांड्या व लाळरोग या दोनच रोगांमुळे होणारी हानी १९६० सालापर्यंत प्रतिवर्षी ७० कोटी रुपयांच्या आसपास असे. कोंबड्यांच्या रोगामुळे प्रतिबर्षी ५० लक्ष रुपयांचे नुकसान होत असावे, असा अंदाज आहे. शेळ्यामेंढ्या, घोडे व इतर जनावरांच्या रोगराईमुळे होणारे नुकसान जमेस धरले,  तर पशूंच्या रोगांमुळे होणाऱ्‍या एकंदर नुकसानीचा आकडा खचितच लक्षणीय आहे.

पशुवैद्यकात चिकित्सेपेक्षा प्रतिबंधक उपाययोजनेस अधिक महत्त्व आहे. गायी-गुरांतील बुळकांड्या, लाळरोग, गळसुजी रोग, फऱ्‍या रोग, सांसर्गिक काळपुळी मेंढयांच्या देवी व आंत्रविषबाधा कोंबड्यांच्या देवी व मानमोडी रोग डुकरातील ताप इ. पशूंच्या अनेक रोगांवर प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. योग्य वेळी या लसींचा वापर, आजारी जनावरावरील उपचार, पशुरोग संशोधन इ. अनेक बाजूंनी पशुवैद्यक आर्थिक नुकसानीला आळा घालण्यास उपयुक्त ठरत आहे.

शिक्षण :यूरोपमध्ये अठराव्या शतकात आलेल्या भयंकर साथींच्या वेळी पशुरोगांचे अचूक निदान करून शास्त्रशुद्ध उपचार करणाऱ्‍या पशुवैद्यांची गरज भासू लागली. उपलब्ध पशुवैद्य रोमन सैन्यातील अशिक्षित नालबंद असल्यामुळे त्यांचे उपचार शास्त्रीय ज्ञानाऐवजी अनुभवावर आधारित होते. शास्त्रशुद्ध ज्ञान असलेले पशुवैद्य तयार करण्यासाठी क्लोद बूर्झला यांनी फ्रान्समधील लिआँ येथे जगातील पहिले आधुनिक पशुवैद्यक विद्यालय १७६१ मध्ये स्थापन केले. त्या पाठोपाठ १७६५ मध्ये मेझोझाल्फॉर या पॅरिसच्या उपनगरमध्ये दुसरे पशुवैद्यक विद्यालय काढण्यात आले. पुढील पन्नास वर्षांत बर्लिन, कोपनहेगन, लंडन (१७९२) इ. यूरोपमधील बहुतेक प्रमुख शहरांमध्ये पशुवैद्यक विद्यालये स्थापन झाली. अमेरिकेत विद्यापीठाशी संलग्न असलेले पहिले पशुवैद्यक विद्यालय आयोवा येथे १८७९ मध्ये स्थापण्यात आले. त्याआधी काही खासगी विद्यालये अस्तित्वात होती. कॅनडामध्ये आँटॅरिओ (१८६२) व माँट्रिऑल (१८९४) येथे अशी दोन महाविद्यालये स्थापन करण्यात आली. युगांडा, द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, फिलिपीन्स इ. अनेक देशांत अशीच पशुवैद्यक विद्यालये काढण्यात येऊन विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीपर्यंत जगामध्ये १८० विद्यालये अस्तित्वात आली. अमेरिका व युरोपमधील विद्यालये डी. व्ही. एम्. (डॉक्टर ऑफ व्हेटरिनरी मेडिसिन) ही पदवी देतात. युनायटेड किंग्डममधील पशुवैद्यक विद्यालये विद्यार्थ्यांना पदवी देत नाहीत. त्यांना रॉयल कॉलेज ऑफ व्हेटरिनरी सर्जन्सचे सभासदत्व देण्यात येते व एम्. आर् . सी. व्ही. एस्. ( मेंबर ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ व्हेटरिनरी सर्जन्स ) ही आद्याक्षरे त्याच्या नावापुढे लावण्याची परवानगी असते.

भारतामध्ये इ. स. पू. सातव्या शतकात शालिहोत्र नावाचे जे विद्वान पशुवैद्य होऊन गेले ते आपल्या विद्यार्थ्यांना रोगचिकित्सा, शल्यशास्त्र, विषबाधा, वाजीकरण इ. विषय शिकवीत असत. पशुवैद्यकाचा व्यवसाय करणाऱ्‍यांना शालोत्री म्हणून संबोधण्यात येई व त्यांचे शिक्षण खाजगी रीत्या पारंपरिक पद्धतीनेच होई असे दिसते. ईस्ट इंडिया कंपनीने घोडदळ व वाहतूक या कामांसाठी घोड्यांचे प्रजनन (पैदास) सुरू केले पण रोगराईमुळे त्यात व्यत्यय येई. त्यामुळे कंपनीने टॉमस मोअरक्राफ्ट नावाच्या पाश्चिमात्य पशुवैद्यांस बोलावून घेतले. इंग्रजी अमदानीच्या सुरुवातीच्या काळात पाश्चिमात्य  पशुवैद्य मुख्यत्वे घोडदळाच्या उपयोगासाठी येत राहिले. त्यांना मदतनीस तयार करण्याच्या दृष्टीने १८७७ मध्ये लाहोर येथे एक विद्यालय स्थापन करण्यात येऊन तेथे उर्दू भाषेतून पशुवैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला गेला. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्‍यांना शालोत्री असेच संबोधण्यात येऊ लागले. या शालोत्री पशुवैद्यांचा घोडदळातील दर्जा दुय्यम असे.

इंग्रजीतून अद्ययावत पशुवैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले महाविद्यालय मुंबई येथे १८८६ मध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर लवकरच अशी महाविद्यालये कलकत्ता व मद्रास येथे सुरू झाली आणि लाहोर येथील विद्यालयातील शिक्षणाचे माध्यम इंग्रजी भाषा हे झाले. ही महाविद्यालये राज्यशासित होती  व त्या त्या शासनाने नेमलेले परीक्षा मंडळ परीक्षा घेत असे. ही व्यवस्था जवळजवळ १९४० पर्यंत चालू  होती. त्यानंतर ही महाविद्यालये त्या त्या भागातील विद्यापीठाशी संलग्न करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्येक राज्यात सर्वसाधारणपणे एक पशुवैद्यक महाविद्यालय स्थापन करण्यात आले. यानंतर १९६० च्या सुमारास काही राज्यांतून कृषी विद्यापिठांची स्थापना करण्यात आल्यावर ही महाविद्यालये त्या त्या कृषी विद्यापिठाशी संलग्न झाली. महाराष्ट्रात तीन पशुवैद्यक महाविद्यालये त्या त्या कृषी विद्यापीठाशी संलग्न झाली. महाराष्ट्रात तीन पशूवैद्यक महाविद्यालये असून ती मुंबई, नागपूर व परभणी येथे आहेत आणि अनुक्रमे कोकण कृषि विद्यापीठ, दापोली पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला व मराठावाडा कृषि विद्यापीठ, परभणी या विद्यापीठांशी ती संलग्न आहेत. भारतामध्ये पशुवैद्यक महाविद्यालयांयी संख्या १९७३ मध्ये २१ होती. या महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी लागणाऱ्‍या पात्रतेमध्ये वेळोवेळी बरेच वदल होत गेले परंतु अलीकडे इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चरल रिसर्च या केंद्रशासित संस्थेच्या प्रेरणेने भारतातील सर्व पशुवैद्यक महाविद्यालयांतील शिक्षणक्रमामध्ये, तसेच त्यांत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता यांमध्ये एकवाक्यता आणण्यात आली आहे. शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना या महाविद्यालयात प्रवेश मिळतो व शिक्षणक्रम ५ वर्षांचा आहे. या महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्‍या विद्यार्थ्यांना बी. व्ही. एस्सी. अँड ए. एच्. (बॅचलर ऑफ व्हेटरिनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी ) ही पदवी मिळते. बहुतेक सर्व पशुवैद्यक महाविद्यालयांतून पदव्युत्तर शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. तसेच केंद्रशासनाच्या इझ्झतनगर (उत्तर प्रदेश) येथील इंडियन व्हेटरिनरी रिसर्च इन्टिट्यूटमध्ये पशुवैद्यकाच्या विविध अंगोपांगांवर पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. या सर्व महाविद्यालयांतील शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. जगातील पशुवैद्यक महाविद्यालयांची संख्या १९६१ च्या सुमारास १७५ होती.


अभ्यासक्रम :मानवी वैद्यकाच्या विविध शाखांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय प्रगती होत आहे आणि त्या शास्त्राचा पशुवैद्यकाशी अगदी निकटचा संबंध असल्यामुळे पशुवैद्यकाच्या अभ्यासक्रमामध्येही नवीन विषयांचा अंतर्भाव केला जात आहे. पशूंचे श्वसन तंत्र ( संस्था), पचन तंत्र, तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था), रुधिराभिसरण तंत्र इत्यादींचे मनुष्यातील या तंत्रांशी बरेच साम्य असल्यामुळे पशुवैद्यकामधील औषधचिकित्सा व शस्त्रक्रियाविज्ञान या विषयांच्या अभ्यासासाठी मानवी वैद्यकातील माहिती आधारभूत धरली जाते. तसे पाहिले तर मानवी वैद्यक आणि पशुवैद्यक यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण नेहमीच चालू असते.

पाळीव पशूंचे शारीर आणि शरीरक्रियाविज्ञान जीवरसायनशास्त्र (सजीवांमध्ये तयार होणाऱ्‍या पदार्थांचे रसायनशास्त्र), जीवोपजीवनविज्ञान (दुसऱ्‍या जीवावर जगणाऱ्‍या जीवांच्या अभ्यासाचे शास्त्र), पोषणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र,शस्त्रक्रियाविज्ञान, उपरुग्णवैद्यक (रुग्णशय्येजवळ राहून रोगलक्षणे अभ्यासण्याचे शास्त्र) या विषयांचा पशुवैद्यकाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. यांशिवाय प्रतिबंधक वैद्यक, प्रतिरक्षाविज्ञान व औषधिविज्ञान हे विषयही पशुवैद्यकामध्ये शिकविले जातात. सांसर्गिक रोगांच्या संदर्भात प्रतिबंधक वैद्यकला पशुवैद्यकामध्ये असाधारण महत्त्व आहे. कारण काही वेळा चिकित्सेचा खर्च आर्थिक दृष्ट्या तोट्याचा ठरण्याचा संभव असतो. शिवाय यांतील काही रोगांचा सार्वजनिक आरोग्याशी जवळचा संबंध पोहोचतो. रोगनिदान करण्याच्या कामी पशुवैद्याला निरीक्षणात्मक लक्षणांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे उपरुग्ण अभ्यास महत्त्वाचा ठरतो. रक्त, मलमूत्र, शरीरातील इतर स्त्राव व ऊतक कोशिका (समान रचना व कार्य असणाऱ्‍या कोशिकांच्या–पेशींच्या–समूहातील कोशिका) यांच्या सूक्ष्मदर्शकाने केलेल्या परीक्षेची रोगनिदानास मदत होते. यामुळे अशा प्रस्थापित परीक्षांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव आहे. या व्यतिरिक्त जनावराला काबूत ठेवण्याच्या पद्धती, शुद्धिहरण तंत्र, नालबंदी इ. गौण विषयांचाही पशुवैद्यकात समावेश आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून पशुप्रजननाच्या अभ्यासास उपयुक्त अशा आनुवंशिकी, मादीरोगविज्ञान आणि पुंस्त्वविद्या (पौरुषत्वाशी संबंधित असलेल्या नराताल इंद्रियांचा व त्यांच्या रोगांचा अभ्यास) या विषयांचाही अलीकडे पशुवैद्यकाच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केला आहे. दिवसेंदिवस पशुवैद्यकातील अभ्यासामध्ये अनेक विषयांचा अंतर्भाव होत असल्यामुळे त्यांतील काही विषयांचा अभ्यास सुसूत्रपणे, खोलवर करून विशिष्टीकरणाकडे पशुवैद्यांचा कल होऊ लागला आहे.

पशुविकार :मनुष्यप्राण्याप्रमाणे पशूंना सांसर्गिक आणि दैहिक विकार होतात. पशूंच्या संसर्गजन्य रोगांना प्राधान्य का देण्यात येते हे वर आलेच आहे. दैहिक विकारांमुळे एखादेच जनावर दगावेल, याउलट संसर्गजन्य रोगाच्या साथीमुळे थोड्या अवधीत अनेक जनावरे मृत्युमुखी पडल्यामुळे बरेच आर्थिक नुकसान सोसावे लागते. सूक्ष्मजंतू, व्हायरस, प्रोटोझोआ (आदिजीव), कवकांचे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचे) प्रकार व परोपजीवी यांमुळे सांसर्गिक रोग होतात. या रोगकारकांचा पशूंच्या शरीरात प्रवेश झाल्यावर त्यांचे प्रजनन होऊन त्यांची अगणित वाढ होते व शरीरक्रियांमध्ये अडथळा उत्पन्न होऊन रोगोद‌्भव होतो. काही सूक्ष्मजंतूंची वाढ होत असताना जंतुविषे तयार होतात व त्यांच्या परिणामामुळे रोगोद‌्भव होतो व जनावर काही तासांतच दगावते. उदा., गायी-गुरांतील सांसर्गिक काळपुळी, फऱ्‍या रोग किंवा मेंढ्यांतील आंत्रविषबाधा. व्हायरसांमुळे होणाऱ्‍या रोगांमध्ये कुत्र्यातील अलर्क, गायी-गुरांतील बुळकांड्या, डुकरांमधील ताप, कोंबड्यांचा मानमोडी रोग इ. विकारांचा समावेश आहे. रोगकारक सूक्ष्मजंतू व व्हायरस आजारी जनावराच्या श्वासोच्छ्वासातून, मलमूत्रातून बाहेर पडतात व त्यामुळे दूषित झालेला चारापाणी किंवा अन्य मार्गाने निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. याकरिता आजारी जनावर निरोगी जनावरापासून अलग ठेवणे जरूर असते प्रोटोझोआमुळे होणारे रोगही याच पद्धतीने होतात. शिवाय रोगकारक प्रोटोझोआ चावा घेणाऱ्‍या गोचिड्या, डास इ . प्राण्यांमार्फत निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश मिळवितात. हे प्राणी प्रथम आजारी जनावराचे रक्त शोषून घेतात त्या वेळी रक्तातील प्रोटोझोआ आपोआप त्यांच्या शरीरात जातात व निरोगी जनावरांना चावा घेते वेळी लाळेमार्फत निरोगी जनावराच्या शरीरात टोचले जातात. परोपजीवींमुळे सर्वच पशूंमध्ये रोग उद‌्भवतात. तथापि मेंढ्यांमध्ये अशा रोगांचे प्रमाण बरेच आहे. सामान्यपणे परोपजीवींची अंडी पशूंच्या शरीरात खाद्यावाटे प्रवेश मिळवितात. काही परोपजीवींच्या जीवन चक्रातील विशिष्ट अवस्था मध्यम पोषकामार्फत पशूंच्या शरीरात प्रवेशून रोग उत्पन्न करतात. उदा., खंडितकायी-कृमीमुळे गायी-गुरांत होणारा नाकातील मांसल फोड [मध्यस्थ पोषक गोगलगाय आहे⟶ खंडितकायी-कृमिरोग]. काही परोपजीवींचे जीवनचक्र गुंतागुंतीचे असल्यामुळे त्यांपासून होणाऱ्‍या रोगांचा प्रतिबंधही तितकाच जिकिरीचा आहे. पशूंचे दैहिक आजार बहुधा चयापचयातील (सजीवाच्या शरीरात सतत घडणाऱ्‍या भौतिक व रासायनिक क्रियांतील) बिघाडामुळे अथवा खाद्यपदार्थांतील काही आवश्यक पोषक घटकांच्या न्यूनतेमुळे निर्माण होणाऱ्‍या शरीरक्रियांतील दोषामुळे उद‌्भवतात, तर काही आजर आनुवंशिक असतात. यांशिवाय जखमा, दुखापती, स्नायू लचकणे, हाड मोडणे यांसारखे आजार पशूंना वारंवार होत असतात. या सर्व आजारांवरील उपचार व प्रतिबंध यांचा पशुवैद्यकात समावेश होतो.

सार्वजनिक आरोग्य :सार्वजनिक आरोग्यरक्षणाच्या संदर्भात पशुवैद्यकाचे कार्य महत्त्वाचे आहे. पशूपासून मनुष्यप्राण्यास होणाऱ्‍या रोगांची अधिक माहिती होऊन त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पशू व मनुुष्य यांच्या एकमेकांना होणाऱ्‍या रोगांची संख्या सध्या १०० च्या वर आहे [⟶ प्राणिजन्य मानवी रोग]. क्षय, ब्रूसेलोसिस, अलर्क रोग, सांसर्गिक काळपुळी, सिटॅकोसिस, क्यू फीव्हर, साल‌्मोनेलोसिस हे त्यांतील महत्त्वाचे आजार आहेत. यांतील काही आजार पशुजन्य खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे उद‌्भवतात. त्यामुळे अशा खाद्यपदार्थांची पशुवैद्यकीय तपासणी ही महत्त्वाची बाब ठरते. या रोगांचे प्रमाण विकसनशील व अविकसित देशांमध्ये बरेच आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये क्षयी गायीचे कच्चे (निरसे) दूध प्याल्याने मनुष्यामध्ये होणाऱ्‍या क्षयरोगाचे प्रमाण बरेच असे. अमेरिकेमध्ये १९०१ च्या सुमारास गायींच्या कळपात क्षयरोगाचे प्रमाण ४ ते ५० % पर्यंत होते. गायीमधील क्षयरोग ओळखण्याची चाचणी पद्धत शोधून काढण्यात आल्या नंतर अमेरिकन पशुवैद्यांनी चाचणी परीक्षा करून रोगी गायी मारून टाकून या रोगाला प्रतिबंध करण्यात स्पृहणीय यश मिळविले आहे. ही मोहीम १९१७ मध्ये सुरू झाली व १९४१ पर्यंत तेथील गायींमधील क्षयरोगाचे संपूर्णतः निर्मूलन झाले आहे. गायी-गुरे व डुकरे यांपासून मनुष्यांना होणाऱ्‍या ब्रूसेलोसिस या रोगाच्या बाबतीत अमेरिकन पशुवैद्यांनी अशीच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतामध्ये या दोन रोगांच्या बाबतीत बहुतेक राज्यांमधून प्रतिदर्शीय सर्वेक्षण (नमुना चाचणी) करण्यात आले आहे. तथापि गायीच्या कत्तलीस असलेल्या जनमानसातील  विरोधामुळे देशव्यापी निर्मूलन योजना हाती घेणे शक्य झालेले नाही. अमेरिका, राष्ट्रकुलातील देश, तसेच यूरोप खंडातील बहुतेक देशांमध्ये दूध, मांस इ. पशुजन्य पदार्थांची पशुवैद्याकरवी तपासणी केली जाते [⟶ गाय खाटीकखाना].


शौकाकरिता पाळलेल्या कुत्री, मांजरे, पोपट व इतर पक्षी या प्राण्यांपासून मनुष्यांना बरेच रोग होतात. अशा प्राण्यांची संख्या अमेरिकेत ७ कोटी, तर ब्रिटनमध्ये ३ कोटींच्या आसपास आहे. कुत्र्यापासून होणाऱ्‍या अलर्क या रोगाचा अशा रोगांमध्ये पहिला क्रमांक लागेल. अविकसित देशांमध्ये या रोगाचे प्रमाण बरेच आहे. अमेरिकेत कुत्र्यांची संख्या २ कोटीच्या आसपास असूनही प्रतिबंधक लसीच्या वापरामुळे वर्षाकाठी फक्त २ कुत्री पिसाळतात. या प्राण्यांपासून मनुष्यात होणारे सिटॅकोसिस, लेप्टोस्पायरोसिस व हायडॅटिड रोग हे महत्त्वाचे आहेत. दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल  डिसिझेस या संस्थेमध्ये पशुजन्य मानवी रोगांवरील संशोधनाचे कार्य चालू आहे.

पशुवैद्यकीय व्यवसाय :पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी संपादन करणाऱ्‍याला पशुवैद्यकीय व्यवसाय करता येतो. काही देशांमध्ये अशा पदवीधरांना शासनाकडून अगर त्यांनी नेमलेल्या मंडळाकडून परवाना घेऊन अगर नोंदणी करून मगच व्यवसाय सुरू करता येतो. अमेरिकेत असे परवाने देण्यासाठी निरनिराळ्या राज्यांची स्वतंत्र राज्यमंडळे १९५० पर्यंत अस्तित्वात होती परंतु त्यानंतर या राज्यमंडळांच्या जागी एक राष्ट्रीय मंडळ स्थापन करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये असा परवाना देण्याचे काम रॉयल कॉलेज ऑफ व्हेटरिनरी सर्जन्स या संस्थेकडे सोपविले आहे. भारतामध्ये काही राज्यांत पशुवैद्यकांच्या नोंदणीसाठी पशुवैद्यकीय मंडळे राज्य शासनांच्या कायद्यान्वये स्थापन करण्यात आली आहेत. महाराष्ट्रामध्ये असे मंडळ आहे.

पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटन, अमेरिका व कॅनडा या देशांमध्ये शेतीची आणि वाहतुकीची कामे बहुतांशी यंत्रांच्या साहाय्याने होऊ लागल्यामुळे या व्यवसायाची पीछेहाट झाली व पशुवैद्यांच्या संख्येमध्ये बरीच घट झाली. याचे कारण या वेळी पशुवैद्यांच्या व्यवसायाचे मुख्य क्षेत्र घोडा या प्राण्यापुरते मर्यादित होते. ग्रामीण भागातील पशुवैद्य गायी-गुरे, डुकरे, मेंढ्या व कोंबड्या या प्राण्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा व्यवसाय करीत. हळूहळू शहरात राहणारे पशुवैद्य शर्यतीचे घोडे, कुत्री, मांजरे, पोपट व इतर पक्षी यांच्या रोगराईकडे अधिक लक्ष देऊ लागले. पशुवैद्यांचे त्यांच्या व्यवसायाच्या क्षेत्रावरून (१) मोठ्या (गाय, घोडा, डुक्कर, मेंढी इ.) पशूंच्या आरोग्यरक्षणाचे काम करणारे आणि (२) लहान (कुत्रा, मांजर, पोपट इ.) प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे, असे दोन वर्ग मानले जाऊ लागले.

पाश्चात्त्य देशांमध्ये अलीकडे पदवी घेतलेल्या पशुवैद्यांपैकी फार तर ५०% पदवीधर खासगी व्यवसायाकडे वळतात, तर बाकीचे नोकरीचा पेशा पत्करतात, असे दिसून येत आहे. तरीसुद्धा खासगी व्यवसाय करणाऱ्‍यांना त्या देशांमध्ये अजूनही चांगला वाव आहे. इतकेच नव्हे तर एका जातीच्या प्राण्यासंबंधी अगर विषयासंबंधी विशेष अध्ययन करून व्यवसायाचे क्षेत्र तेवढ्यापुरतेच मर्यादित ठेवण्याकडे खाजगी पशुवैद्यांचा कल दिसून येत आहे.

प्राणिसंग्रहालयातील पशूंच्या रोगाबाबत अद्याप बरीच उदासीनता दिसून येते. कित्येक वेळा अशा संग्रहालयातील प्राणी आजारी असल्याचे लक्षात येण्याआधीच पिंजऱ्‍यात मरून पडलेले आढळतात. हाडे सांधणे, मोठ्या जखमेमुळे त्वचेला टाके घालणे यांसारखी कामे शुद्धिहारके देऊनच करावी लागतात. औषधी उपाययोजना पिण्याच्या पाण्यातून अगर खाद्यपदार्थांमध्ये मिसळून करावी लागते. प्राणिसंग्रहालयांमध्ये  काम करणाऱ्‍या पशुवैद्यांची संख्या अत्यल्प आहे.

भारतामध्ये खासगी व्यवसाय करणारे फारच थोडे पशुवैद्य आहेत व ते बहुतांशी मोठ्या शहरांमध्ये व्यवसाय करतात. त्यांचे कार्यक्षेत्र शर्यतीचे घोडे, घरगुती पाळीव प्राणी आणि शहरालगतच्या दुग्धशाळा यांपुरते मर्यादित आहे. बहुसंख्य पशुवैद्य राज्य अगर केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये असून त्यांचे कार्यक्षेत्र पशुवैद्यकीय रुग्णालये, पशुरोग अन्वेषण (संशोधन) संस्था, लष्कर, शासकीय पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था इ. आहे. महानगरपालिकांच्या अखत्यारीतील खाटीकखाने, प्राणिसंग्रहालये या ठिकाणी काही पशुवैद्य नोकरी करतात. या व्यवसायाचे क्षेत्र अलीकडे व्यापक होत आहे. खाजगी व सहकारी क्षेत्रांतील दुग्धशाळा, पशुखाद्य तयार करण्याचे कारखाने, कोंबड्या सोलण्याचे आणि डुकरांच्या मांसोत्पादनासाठी उभारलेले कारखाने, औषधी कारखाने, भारतीय कृषि उद्योग प्रतिष्ठान यांसारख्या संस्था, कोंबड्यांच्या वाड्या इ. ठिकाणी पशुवैद्यांना नोकरीचे क्षेत्र उपलब्ध होत आहे.

जगातील पशुवैद्यांची एकूण संख्या १९६१ च्या सुमारास १,७५,००० च्या आसपास होती. यांपैकी सर्वांत अधिक पशुवैद्य रशियामध्ये (४२,०००) व त्या खालोखाल अमेरिका (२०,०००) व जपान (१८,०००) या देशांमध्ये होते. जपानमधील बहुसंख्य पशुवैद्यांचे शिक्षण पशुवैद्यकीय शिक्षणावर भर असलेल्या माध्यमिक शाळांमधून शालान्त परीक्षेपर्यंतच झालेले असते व फारच थोडे यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेले असतात. भारतामधील पशुवैद्यांची संख्या ३,५०० च्या आसपास आहे व संख्येच्या बाबतीत भारताचा १० वा क्रमांक लागतो. मात्र गायी-गुरे, म्हशी, शेळ्या यांची संख्या जगातील कुठल्याही देशापेक्षा भारतात अधिक आहे. चिनमध्ये पशूंची संख्या बरीच आहे आणि डुकरांची तर जगात सर्वांत अधिक आहे. असे असूनही तिथे फक्त दोन पशूवैद्यकीय विद्यालये आहेत. याउलट जपानचा पशुवैद्यकांच्या संख्येच्या बाबतीत जगात तिसरा क्रमांक असून पशूंच्या संखेच्या बाबतीत मात्र विसाच्याही खाली आहे.

पशूंच्या संख्येच्या मानाने भारतात  पशुवैद्यांची संख्या फारच अपुरी आहे. १९२८ च्या कृषीसंबंधीच्या रॉयल कमिशनच्या शिफारसीनुसार दर १०,००० पशूंमागे किमान १ पशुवैद्य असावा, असे ठरविण्यात आले होते. पशुवैद्यांची गरज अल्पांशाने भरून काढण्यासाठी शालान्त शिक्षणानंतर दोन वर्षांचा पशुवैद्यकविषयीचा शिक्षणक्रम जवळजवळ सर्व राज्यांत सुरू करण्यात आला. हे शिक्षण घेतलेल्या व्यक्ती पशुवैद्याच्या हाताखाली पशुधन पर्यवेक्षक म्हणून मुख्यत्वे जनावरे टोचणे, प्रथमोपचार यांसारखी कामे करतात.

पाश्चात्त्य देशांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया पशुवैद्यकाचे शिक्षण बऱ्‍याच वर्षांपासून घेत आहेत. भारतात १९५० पूर्वी अपवादात्मक एखादीच स्त्री पशुवैद्यकाचे शिक्षण घेत असे. यानंतर मात्र स्त्रियांनी या क्षेत्रात पदार्पण केले आहे असे दिसते.

शासकीय सहभाग :बहुतेक सर्व देशांमध्ये काही सांसर्गिक रोगांचा प्रसार व त्यांमुळे होणारी हानी टाळण्याच्या दृष्टीने कायदे करण्यात आले आहेत. उदा., भारतामध्ये सांसर्गिक काळपुळी या रोगाने मेलेले जनावर खोलवर पुरलेच पाहिजे असा दंडक आहे. याशिवाय रोगाच्या साथीच्या वेळी जरूर पडल्यास एखाद्या भागातून दुसरीकडे होणारी जनावरांची वाहतूक बंद करणे, आजारी जनावराबाबत योग्य अधिकाऱ्‍याकडे माहिती पुरविणे व सक्तीने जनावरे टोचणे अशी तात्पुरती बंधने स्थानिक अधिकारी कायद्याने सक्तीची करतात. अमेरिकेच्या शासनाने गायीमधील क्षय व ब्रूसेलोसिस या रोगांविरूद्ध मोहिमा काढून रोगनिर्मूलनाच्या दिशेने यशस्वी प्रयत्न केले, हे वर आलेच आहे. भारताच्या केंद्र शासनाने १९५६ मध्ये एक योजना आखून बुळकांड्या रोगाच्या निर्मूलनाची देशव्यापी मोहीम सुरू केली. या योजनेनुसार देशातील सर्व रोगग्रहणशील (रोगग्राहक) जनावरे बुळकांड्या प्रतिबंधक लसीने टोचण्यात आली आहेत. या योजनेमुळे अद्याप रोगनिर्मूलन झाले नसले, तरी रोग प्रतिबंध बऱ्‍याच प्रमाणात यशस्वी होऊन प्रतिवर्षी होणारे लाखो रुपयांचे नुकसान टळले आहे [⟶ बुळकांड्या].

विशेषीकरण :मानवी वैद्यकाच्या पावलावर पाऊल ठेवून पशुवैद्यकामध्ये शस्त्रक्रियाविज्ञान, मादीरोगविज्ञान, विकृतिविज्ञान, त्वक्रोगविज्ञान या शाखांमध्ये विशेषीकरण रूढ होत आहे. शस्त्रक्रियेमध्ये शुद्धिहारकांचा वापर व रक्ताधान (शरीरात रक्त भरणे), औषधी उपाय योजनेपूर्वीच्या प्रयोगशाळेतील तपासण्या, मादीरोगविज्ञानातील वंध्यत्वावरील उपाय योजनेमध्ये हॉर्मोनांचा वापर, कृत्रिम वीर्यसेचन इ. आधुनिक तंत्रांची पशुवैद्यकामध्ये भर पडत आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पशूंच्या सांसर्गिक रोगांचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागला आहे. पाश्चात्त्य देशांप्रमाणे विवक्षित विषयांमध्ये उदा., पशुरोग अन्वेषण, पशुखाद्य, मादीरोगविज्ञान तसेच  कोंबड्या, डुकरे, मेंढ्या यांचे शास्त्रीय प्रजनन यांपैकी एखादे क्षेत्र निवडून त्यात विशेषज्ञता मिळविण्याकडे भारतीय पशुवैद्यांचा कल दिसून येत आहे. दिवसेंदिवस पशुवैद्यकामध्ये प्रयोगनिष्ठ माहिती इतकी उपलव्ध होत आहे की, या माहितीचा समाजाला फायदा मिळण्यासाठी असे विशेषीकरण अपरिहार्य आहे.

संघटना व नियतकालिके :बहुतेक सर्व देशांत पशुवैद्यांच्या व्यावसायिक संघटना आहेत व त्यांचे उद्देश व्यवसाय अधिक प्रगत आणि उपयुक्त करणे तसेच पशुवैद्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हा आहे. बहुतेक संघटना त्या त्या देशाचे नाव असलेली उदा., अमेरिकन व्हेटरिनरी जर्नल, ब्रिटिश व्हेटरिनरी जर्नल यांसारखी नियतकालिके चालवितात. भारतामध्ये बहुतेक राज्यांमध्ये पशुवैद्यांच्या राज्यव्यापी संघटना असून यांशिवाय एक मध्यवर्ती संघटना इंडियन व्हेटरिनरी मेडिकल असोसिएशन या नावाने ५० वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात असून मद्रास येथे तिचे कार्यालय आहे. ही संघटना इंडियन व्हेटरिनरी जर्नल नावाचे पशुवैद्यकासंबंधीचे द्बैमासिक चालविते. याशिवाय केंद्रशासनामार्फत इंडियन जर्नल ऑफ ॲनिमल हजबंडरी अँड व्हेटरिनरी सायन्स नावाचे नियतकालिक चालविले जाते.

संदर्भ :1. Blood, D. C. Henderson, S. A. Veterinary Medicine, London, 1973.

     2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, Supplement Livestock (including poultry), New Delhi,1970.

     3. Smithcors, J. F. Evolution of Veterinary Art, London, 1958.

पुरोहित, बा. ल. दीक्षित, श्री. गं.