पशूप्रजनन : पशूंच्या जनन तंत्राचे (प्रजोत्पादन संस्थेचे) शरीरक्रियाविज्ञान (शरीराचे कार्य व क्रिया कशा चालतात याच्या अभ्यासाचे शास्त्र), आनुवंशिकी व सांख्यिकी (संख्याशास्त्र) या मूलभूत शास्त्रांतील सैद्धांतिक नियमांच्या आधाराने हेतुपूर्वक नियोजनाने पशूंची पैदास करणे याला पशुप्रजनन म्हणतात. नुसती पशूंची संख्या वाढविणे–नव्हे ते निसर्गात होतच असते– याला पशूंप्रजनन म्हणत नाहीत. प्रजननासाठी वापरण्यात येणाऱ्‍या पाळीव पशूंची निवड कशी करतात, कोणत्या नर व मादी यांचा संयोग केला असता इष्टतम आनुवंशिक गुणसमुच्चय असलेली प्रजा जन्माला येईल यांविषयीचे विवेचन प्रस्तुत नोंदीत केले आहे.

सामान्यतः पाळीव पशूंचे प्रजनन आर्थिक उत्पादन (अंडी, मांस इ.) , खेळ, शौक इ., कारणांसाठी करण्यात येते. सर्व जातींच्या पशूंच्या प्रजननाच्या बाबतीत वर उल्लेखिलेल्या शास्त्रातील नियम सारखेच लागू पडतात. प्रजोत्पत्तीची विपुलता, पर्यावरण (परिसर) व आनुवंशिकतेचा परिणाम यांमुळे काही वेळा तपशीलात थोडाफार फरक आढळेल इतकेच.

इतिहास : १२, ००० वर्षांपूर्वी कुत्रा माणसाळविला गेला, तर गुरे, मेंढ्या, डुकरे, शेळ्या हे प्राणी ख्रि. पू. ६, ००० ते २, ००० वर्षे याच्या दरम्यान माणसाळविण्यात आले. सु. ५, ००० वर्षांपूर्वी त्या वेळच्या गरजेनुसार मनुष्याने आकार, रंग या बाबतींत नियोजनपूर्वक प्रजनन करून विशिष्ट गुणधर्म असलेल्या कुत्र्यांच्या जाती निर्माण केल्या. नद्या, पर्वत, अरण्ये व वाळवंट इत्यादींमुळे सलग भूभागाचे  व्यवहारतः पृथक् प्रदेश बनले. अशा पृथक् प्रदेशांतील पशूंच्या—विशेषतः मोठ्या सस्तन प्राण्यांच्या–गटामध्ये हळूहळू त्या परिस्थितीला अनुरूप असणाऱ्या गुणधर्मांची वाढ होत जाऊन समान गुणधर्म  व लक्षणे असणारे समूह तयार होत गेले. ही अभिजातींच्या (अस्सल जातींच्या) निर्मितीची सुरुवात होय. गायी-गुरे, शेळ्यामेंढ्या, डुकरे या मोठ्या सस्तन प्राण्यांच्या बाबतीत मानवाने रंग, बांधा, आकार यांसंबंधीची आवड ठरवून तीनुसार निवड करून विवक्षित मादी व नर यांच्या संयोगाने प्रजननाचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना जसजसे यश येत गेले तसतसे अधिक रेखीवपणा, सारखेपणा असलेले वैशिष्ट्यपूर्ण कळप तयार झाले व विशिष्ट अभिजातींचा उगम झाला. अर्थात अशा अभिजातींच्या निर्मितीच्या वेळी अंतःप्रजननाचा (अगदी जवळच्या नात्यातील पशूंच्या संयोगाचा) अतिरेक झाला. परिणामी पशूंची आयुर्मर्यादा व फलनक्षमता यांवर अनिष्ट परिणाम झाला.

अठराव्या शतकाच्या मध्यापासून मात्र उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पाळीव पशूंचे प्रजनन प्रथमतः ग्रेट ब्रिटनमध्ये सुरू झाले. उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी बाहेरील समूहातील योग्य पशूंची निवड करून, त्यांचा पैदाशीसाठी उपयोग करून अभिजातींची उत्पादनक्षमता वाढविण्यात आली. हे करीत असताना प्रजननकाराच्या मनामध्ये प्रजननाचे उद्दिष्ट स्पष्ट असणे जरूर असते. उदा., गुरांचे प्रजनन दुधाळ गायीसाठी की मांसोत्पादक गुरासाठी, मेंढ्यांचे मांस किंवा लोकर, डुकरांचे वसायुक्त (चरबियुक्त) वा निव्वळ मांसोत्पादक डुकरासाठी, कोंबड्यांचे अंड्यासाठी की मांसासाठी इ. ही निश्चिती करताना पर्यावरण, खाद्याची उपलब्धता व मानवी गरज यांची जास्तीत जास्त सांगड घातली जाते.

आनुवंशिकीचे काही नियम : अभिजाती अशा प्रकारे अस्तित्वात आल्या, तरी एका समूहातील अभिजातींच्या बाबतीतही बऱ्‍याच विशिष्ट गुणधर्मांत फरक असल्याचे आढळून येते. इतकेच नव्हे, तर एका अभिजातीतील एकयुग्मजीय (एकाच अंडापासून तयार झालेल्या) जुळ्याखेरीज अन्य कोणतेही दोन पशू बऱ्‍याच बाबतींत एकसारखे असले, तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे भिन्न असतातच. लैंगिक प्रजोत्पादन होताना मातापितरामध्ये उपलब्ध असणारे निरनिराळे गुणधर्म संततीमध्ये जनुकांच्या (एका पिढीतून पुढच्या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्‍या सुतासारख्या सूक्ष्म घटकांवरील म्हणजे गुणसूत्रांवरील आनुवंशिक लक्षणे निदर्शित करणाऱ्‍या जैव एककांच्या जीन्सच्या) क्रमचयसमचयाने (एकाच्या दुसऱ्‍याशी होणाऱ्‍या बहुविध जोडणीने ) अनेक प्रकारांनी उतरू शकतात. आनुवंशिक गुणधर्म नियंत्रित करणारी जनुके प्रत्येक प्राण्यात जोडीने असतात. यांपैकी एक मातेकडून व एक पित्याकडून प्राप्त झालेले असते परंतु जनुकांच्या जोडीपैकी कोणते जनुक भावी माद्यांच्या अंडात किंवा नरांच्या शुक्राणूत जाईल, हे योगायोगावर अवलंबून आहे. यावरून नुसत्या मातापित्यांच्याच गुणधर्मांचा नव्हे, तर मातुल आजाआजी व पितृक आजाआजी यांच्या किंवा शक्य असल्यास त्यांच्याही मागील पूर्वजांच्या गुणसमुच्चयाचा विचार करणे प्रजननकाराला अपरिहार्य ठरते. प्रजननासाठी वापरावयाच्या पशूंच्या वंशावळीला यामुळेच महत्त्व आहे [⟶ आनुवंशिकी].

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात वंशावळीचे महत्त्व ध्यानी घेऊन प्रजननासाठी वापरण्यात येणाऱ्‍या पशूंच्या शुद्ध बीजाबाबतचा विचार इंग्लंडमध्ये प्रवळ झाला व प्रजननकार आपल्या कळपातील प्रत्येक पशूची वंशावळ काळजीपूर्वक तयार करू  लागला. निरनिराळ्या पशूंच्या विविध अभिजातींच्या प्रजननकारांच्या संघटना स्थापन झाल्या. या संघटनांनी अभिजातींची प्रमाणभूत वैशिष्ट्ये ठरवून दिली. साहजिकच पशुप्रजननकार अशा वैशिष्ट्यांबाबतच्या उदा., दुधाचे प्रमाण, दर आठवड्याला वाढत जाणाऱ्‍या वजनाचे प्रमाण, अंड्यांची संख्या इ. नोंदी करू लागला. त्यातच आनुवंशिकीतील प्रगती, कनिष्ठ प्रतीच्या पशूखाद्याचे प्राणिजन्य पदार्थामध्ये कार्यक्षमतेने रूपांतर करण्याची आर्थिक गरज व कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीचा वापर यांमुळे १९३० च्या सुमारास पशुप्रजननामध्ये नवीन युग सुरू झाले.

गुणमापन : मातापित्याचे गुणावगुण संततीमध्ये उतरतात या कारणास्तव संततीमध्ये अपेक्षित गुण उतरण्यासाठी प्रजननाकरिता वापरावयाच्या पशूंच्या गुणांचे मूल्यमापन करण्याची पद्धत आहे. पशूंच्या दृश्यरूपावरून हे मूल्यमापन पूर्वी करीत असत परंतु या पद्धतीमध्ये सर्व गुणांचे मूल्यमापन आकडेवारीत करणे शक्य होत नाही. गायीची कास किती लोंबती आहे, घोड्याचे पाय शरीराच्या मानाने किती बेतशीर आहेत अगर फर देणाऱ्‍या प्राण्यांच्या फरीची प्रत किंवा रंगाच्या विविध छटा यांचे मूल्यमापन आकडेवारीत करणे शक्य होत नाही. अलीकडे प्रत्येक पशूच्या कार्यमानावरून (उत्पादनातील कर्तृत्वावरून) त्याचे मूल्यमापन करण्यात येऊ लागले आहे. गाय़ीचे एका वेतातील दुग्धोत्पादन, प्रत्येक वेतात मेंढीला किती कोकरे झाली व पाचव्या महिन्यात त्यांचे वजन किती झाले, प्रत्येक वेतामध्ये डुकरीणीला किती पिले झाली, त्यांचे वजन तिसऱ्‍या आठवड्याच्या अखेरीस किती झाले, तसेच त्या वजनाचे त्यांनी खाल्लेल्या खाद्याशी गुणोत्तर काय आहे इ. गुणमापनाच्या पद्धतीने आकडेवारीत पशूचे मूल्यमापन उत्पादनाच्या दृष्टीने करता येऊ लागले. दुग्धमापनाची पद्धत प्रथमतः १८८५ मध्ये डेन्मार्कमध्ये सुरू झाली व तिचा प्रसार इतर देशांत झाला. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अंडी घालण्यासाठी पेट्यांचा उपयोग होऊ लागल्यावर एका कोंबडीने वर्षाला किती अंडी घातली किंवा मांसल जातीच्या कोंबड्यांचे वजन आठवड्याला किती वाढले या व अशांसारख्या गुणांचे मूल्यमापन होऊ लागले. दुसऱ्‍या महायुद्धानंतर या पद्धतीमध्ये सुधारणा होत जाऊन तिच्यातील तांत्रिक बाबी परिपूर्ण करण्यात आल्या. पशूंच्या प्रजननशास्त्रातील सुधारणांचा हा पायाच म्हटला पाहिजे.


संततीचा पिंड निर्माण होताना मातापितरातील जनुकांची देवाणघेवाण कशी होईल याचा अंदाज बांधण्याचा आनुवंशिकीचा नियम तसेच पर्यावरणाचे परिणाम यांच्या अभ्यासाने संततीमध्ये गुणधर्म उतरण्यामध्ये काही फेरफार होतात असे दिसून आले. रंग, शिंगे असणे अगर नसणे, जन्मतः येणारे दोष यांसारखे गुणवत्ताप्रधान बदल हे संपूर्णतः आनुवंशिकी नियमाप्रमाणे व एकाच जनुकाच्या देवघेवीमुळेच होतात पण दुधाचे उत्पादन, त्य़ातील प्रथिने अगर स्निग्धांशाचे प्रमाण, लोकरीचे उत्पादन हे एका जनुकावर अवलंबून  नसून अनेक जनुकांची देवाणघेवाण कशी होईल, यावर अवलंबून आहे.  तसेच पर्यावरणाचाही त्यावर बराच परिणाम घडून येतो. सांख्यिकीचे नियम लागू करून परिमाणात्मक गुणधर्म संततीमध्ये उतरताना अशा गुणाबाबतची वंशागमक्षमता (गुणधर्म संततींमध्ये उतरण्यासंबंधीचे अंदाजी प्रमाण) आकडेवारीत ठरविता येते. एखाद्या  गुणधर्माबाबतची  वंशागमक्षमता १·०० आहे, असे म्हटले म्हणजे तो गुणधर्म विविध जनुकांच्या देवघेवींच्यामुळे संततीमध्ये उतरतो असे होते पण तीच ०·०० आहे म्हटले म्हणजे त्या गुणाचा आनुवंशिकतेशी काहीही संबंध नसून केवळ पर्यावरणाच्या परिणामामुळे या गुणधर्मावर परिणाम होतो, असे समजतात. या हिशोबाने काही गुणधर्मांबाबतीची वंशागमक्षमता अजमावली आहे. पशूच्या मातापित्याच्या व त्यामागील पूर्वजांच्या उत्पादनाच्या अभ्यासाने हे ठरवितात. पहिल्या वेतातील दुग्धोत्पादन ०·३०, दुधातील प्रथिने व चरबी ०·५५, पहिल्या वर्षातील अंड्यांची संख्या ०·३० हे वंशागमक्षमतेसंबंधीचे आकडे सांख्यिकीच्या आधारे ठरविले आहेत.

पशूचे प्रजनन मूल्यमापन:स्वतःच्या पिंडामध्ये असणारी उत्पादक जनुके किती परिणामकारक रीतीने एखादा पशू आपल्या संततीला देऊ शकतो, यावर त्या पशूचे प्रजनन मूल्यमापन अवलंबून असते. संततीला त्याच्या मातापित्याकडून निम्मी निम्मी मिळणारी जनुके यदृच्छ प्रतिदर्शाच्या ( नमून्याच्या ) नियमाप्रमाणे मिळतात[⟶प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्धांत]. एखाद्या पशूबद्दलचे हे मूल्यमापन त्याच्या वंशावळीच्या (यात मुख्यत्वे माता व पिता, त्यांचे सख्खे भाऊ आणि बहिणी, सावत्र भाऊ बहिणी अशांसारखे जवळचे आप्त आणि खुद्द त्याच्यापासून झालेल्या संततीच्या) कार्यमानाच्या अभ्यासाने होऊ शकते.

प्रजननासाठी वापरण्यात येणाऱ्‍या पशूच्या मूल्यमापनासाठी आनुवंशिकी, सांख्यिकी, गुणांची वंशागमक्षमता, वंशावळ, संतती इत्यादींच्या आधाराने जरी मूल्यमापन केले, तरी जनुकांची देवाणघेवाण योगायोगावर अवलंबून असल्यामुळे ठोकताळे तंतोतंत बरोबर येतीलच असे नव्हे. तरीसुद्धा यांचा एकसमयावच्छेदेकरून विचार झाल्यावर प्रजननासाठी निवड करणे हितावह ठरले आहे.

निवड :याचा अर्थ उद्याच्या कळपातील संततीचे पितर आजच्या कळपातील कोणते पशू असावेत हे ठरविणे.  सर्वसाधारणपणे प्रजननाचे ध्येय आणि गुणमापन निश्चित झाल्यावर ही निवड पशूंच्या आनुवंशिक गुणांच्या आणि गोतावळ्याच्या पात्रतेवर केली जाते. एखाद्या अभिजातीतील पशूंच्या कळपामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने जितक्या अधिक गुणांचा विचार होतो तितका प्रगतीचा वेग मंदावतो. याकरिता इच्छित ध्येय गाठण्यासाठी संबंधित असलेल्या मोजक्याच गुणांचा निर्देशांक बनविण्याच्या कामी उपयोग करतात. उदा., दुधाळ गायींच्या प्रजननासाठी दुग्धोत्पादन, पहिल्या वेताच्या वेळचे वय, दोन वेतांतील अंतर , दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण अशा मोजक्याच बाबींचा विचार करून पशूचा गुणनिर्देशांक बनवितात.

पुढील निवड पद्धती प्रचलित आहेत : (१) आमनिवड पद्धत, (२) वंशावळीवरून केलेली निवड पद्धत, (३) कूल निवड पद्धत , (४) संततीच्या आधारे केलेली निवड पद्धत – प्रजाधारित निवड. या प्रत्येक पद्धतीमध्ये काही फायदे तसेच तोटेही आहेत. पूर्वजांसंबंधीची माहिती कुठल्याही पशूच्या बाबतीत मिळू शकेल पण संततीसंबंधीची माहिती मात्र संतती होऊन नंतर माहिती गोळा केल्यावरच उपलब्ध होईल. एखाद्या अनियंत्रित कळपातून एखाद्या पशूंच्या उत्पादन आणि इतर वैशिष्ट्यांवरून केलेली निवड वंशावळीवरून केलेल्या निवडीपेक्षा योग्य ठरेल. याहीपेक्षा संततीच्या कार्यमानावरून केलेली निवड अधिक अचूक ठरते. काही गुणविशेष पशूंच्या लिंगाशी संबंधित जनुकाशी संलग्न असतात (उदा., दुग्धोत्पादन –हा गुणधर्म वळूतून त्याच्या मुलीमध्ये उतरतो). त्यामुळे गुंतागुंत आणखीनच वाढून निवड करणे कठीण होते.

वरील कोणतीही पद्धत अनुसरण्यापूर्वी गुणांच्या नोंदींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक असते. यामुळे कोणत्याही दोन पशूंच्या गुणांची तुलना करणे सोपे जाते. असे करताना ठराविक वयाला अगर स्थितीला प्रमाण समजून सांख्यिकीच्या आधाराने क्रमांक लावता येतो. वयोमान, उत्पादन यांना प्रमाणरूप देऊन नोंदी एका पातळीवर आणल्यावर प्रत लावणे सोपे जाते.

आमनिवड :ही निवड सर्वस्वी पशूच्या वैयक्तिक योग्यतेवर आधारित असते. शरीरयष्टी, वाढ, आकार व वैयक्तिक उत्पादन यांचा एकत्रित विचार करून प्रत ठरविण्यात येते. उच्च वंशागमक्षमता असलेल्या व दोन्ही लिंगी पशूमध्ये उतरत असलेल्या गुणांचाच विचार आल्यास आमनिवड पद्धत उपयुक्त ठरते.

वंशावळ निवड :कालवडी किंवा गोऱ्‍हा यांची निवड करावयाची झाल्यास त्यांचे कार्य–उत्पादन–अजून सुरू झालेले नसते. अशा वेळी वंशावळीच्या माहितीचा उपयोग करून अनुमान काढता येते. मातापिता, मातुल आजाआजी, पितृक आजाआजी, पणजापणजी यांच्या उत्पादनक्षमतेच्या माहितीचा उपयोग करतात. मूळ निवडीतील पिढीपासून मागील पिढ्यांचा विचार उलट प्रमाणात करावा लागतो. माता व पित्यापासून गुणविशेष निम्म्या निम्म्या प्रमाणात येतात व ते १/२ च्या गुणाकाराने घटत जातात. उदा., मातेचे १/२ घटक पुत्रपुत्रीत पण या १/२ घटकात मातेच्या  आईकडील १/४ व पित्याकडील १/४ घटक असतात. अशा रीतीने ७ पिढ्या मागे गेल्यास सातव्या पिढीतील पूर्वजांच्या आनुवंशिक घटकांचे प्रमाण १/१२८ इतके होते. म्हणजेच त्या पूर्वजाच्या आनुवंशिकतेचा प्रभाव जवळजवळ नाहीसा होतो. म्हणूनच सात पिढ्यांपूर्वीच्या वंशजास प्राणिवंशावळीत महत्त्व देत नाहीत. सहोदर व त्याच्या नात्यातील पशूंच्या उत्पादनाच्या आधारानेही ही निवड करता येते मात्र हे अनुमान चुकीचे ठरणे अशक्य नसते. एकच मातापिता असलेले दोन पशू अर्थात जुळे नसतील, तर आनुवंशिक गुणधर्म प्रदान करण्याच्या बाबतीत निराळे असू शकतात.

कुल निवड : पशुप्रजननामध्ये ज्या समूहातील पशूंमध्ये अधिकाधिक जननिक (पितृक ) जवळीक असते, अशा समूहाला कुल म्हणतात. एकाच समूहातील पण निरनिराळ्या कुलांतील पशूच्या गुणावर केलेली निवड म्हणजे कुल निवड. कुलाचे सरासरी उत्पादन हे अभिजातीच्या बऱ्‍याच जनावरांच्या उत्पादन सरासरीवर अवलंबून असते. कुलाची सरासरी काढण्यासाठी जितके जास्त पशू कुलामध्ये असतील तितक्या प्रमाणात ही निवड यशस्वी ठरते. तलंगा अंडी घालू लागल्यावर त्यांनी घातलेल्या अंड्यांच्या संख्येवरून त्यांच्या भावाची–नराची–निवड या पद्धतीने करतात.

प्रजाधारित निवड : संततीच्या गुणावगुणावरून माता व पिता यांची केलेली निवड ही प्रजाधारित निवड होय. संततीच्या दृश्य उत्पादनात मातृक व पैतृक आनुवंशिकतेचा समान वाटा असतो. पर्यावरणाच्या खाद्य व व्यवस्थापन या बाबतींत नियंत्रण असले, तर वंशपरंपरा प्राप्त झालेल्या गुणधर्मांच्या अनुरोधाने मातापित्यांच्या उतपादनक्षमतेबाबतचे गुणधर्म प्रदान करण्याबद्दलचा अंदाज बांधता येतो. ही सर्वश्रेष्ठ  निवड पद्धत आहे परंतु खर्चिक व कालापहारी आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये दुग्धोत्पादनात सुधारणा करण्यासाठी गोवंशाच्या प्रजननासाठी वळू निवडताना त्याच्या संततीच्या उत्पादनाच्या नोंदींचा व्यापक प्रमाणावर उपयोग करतात. प्राथमिक निवड पूर्वजांच्यावरून म्हणजे वंशावळीवरून करतात, ही निवड वळू वयात आल्यावर त्याच्याकडून संयोगित (फळलेल्या) कालवडींतील गाभण राहण्याचे प्रमाण पाहून निश्चित होते व शेवटी त्याच्या संततीचे उत्पादन पाहून पक्की केली जाते. अशा वळूंना ‘सिद्ध वळू’ म्हणतात.


सर्व निवड पद्धतींच्या बाबतीत सारांशाने असे म्हणता येईल की, एखाद्या पशूची प्रजा कशी दिसेल, हे आमनिवडीवरून कळेल ती कशी असणे शक्य  आहे हे वंशावळ व कुल निवडीवरून समजेल पण ती किती उत्पादनशील होईल याचा पुरावा प्रजाधारित निवडीवरून मिळेल. व्यावहारिक पशुप्रजननकार अर्थातच वरील सर्व निवड पद्धतींचा तारतम्याने उपयोग करून प्रगती साधीत असतो.

समागम पद्धती :अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात रॉबर्ट बेकवेल (१७२५–९५) यांनी ब्रिटनमध्ये संयोजनपूर्वक गो-अभिजातींच्या उत्पादनविकास कार्यास प्रारंभ करून शास्त्रोक्त प्रजननाचा मार्ग आखून दिला. यामुळे त्यांना अर्वाचीन पशुपैदासशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांची काही वचने आजही सार्थ आहेत. (१) उत्कृष्ट गुरांचा समागम उत्कृष्टांशीच करावा. (२) समानापासून समानाची निर्मिती होते.(३) अंतःप्रजननाने प्रगुणचा तसेच शुद्धता प्राप्त होते.

प्रजननकार उत्कृष्ट जनावरे पैदास करतो म्हणजे नेमके काय करतो? त्याच्याजवळ पशूंच्या रूपाने गुणावगुणांच्या अनेक क्रमचयसमचयांचे संच असतात. या संचयातील कोणते गुणघटक वाढू द्यावयाचे व कोणते कमी करावयाचे, हे तो ठरवतो. त्याचा धंदा निवडकाराचा असतो, घडविणाऱ्‍याचा नसतो. योग्य निवड करून त्यांच्या संयोगास अनुकूलता आणण्याची कृत्रिम योजना तो करू शकतो. अशा संयोग पद्धतींचे दोन दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतात : (१) आनुवंशिकतेवर आधारलेली गुणघटक प्रकार पद्धत आणि (२) दृश्य गुणघटक प्रकार पद्धत. वंशावळीवर आधारलेले संयोग पहिल्या प्रकारात मोडतात व व्यक्तीच्या दृश्य गुणावर अवलंबिलेले दुसऱ्‍या प्रकारातील आहेत. पहिली पद्धत निवड करण्यास जास्त योग्य ठरते. कारण अंतः गुणघटकावर तिचा भर असतो. पशुप्रजननकार खालील समागम पद्धतींचा अवलंब करतो.

प्रतसुधार :कुठल्याही विशिष्ट अभिजातीच्या नसलेल्या जनावरांच्या कळपाची सुधारणा करण्यास ही पद्धत अवलंबितात. नर मात्र इच्छित अभिजातीचा निवडतात. संततीतील सर्व नर खच्ची करतात व माद्यांपैकी किमान निकषाला उतरणाऱ्‍या राखून बाकीच्या त्याज्य ठरवितात. सतत ७-८ पिढ्या याच पद्धतीचा अवलंब केल्यास सबंध कळप नराइतक्या शुद्ध बीजाचा होऊ शकतो. मात्र प्रत्येक पिढीसाठी कसोशीने निवडलेला त्याच जातीचा नवा नर वापरतात.

बाह्यवर्ती समागम व निवडक पैदास: एकाच जातीच्या परंतु नातेसंबंध नसलेल्या नरमाद्यांच्या समागमाला बाह्यवर्ती समागम म्हणतात. उत्पादनावर लक्ष ठेवून प्रजनन करणारे या पद्धतीचा व्यापक प्रमाणावर उपयोग करतात. उत्पादन, प्ररूप व लक्षणे यांसंबंधीचे निकष निश्चित ठरवून त्यानुसार नरमाद्यांची समागमासाठी निवड करतात. या सतत निवड करून पैदास करण्यालाच निवड पैदास म्हणतात. प्रतसुधार पद्धतीने विशिष्ट पातळीपर्यंत प्रगती झाल्यावर निवडक पैदाशीस प्रारंभ करतात.

स्ववंशीय समागम:वरील दोन्ही समागम पद्धतींचा वापर केल्यावर काही पिढ्यांनी प्रगतीचा वेग मंदावतो. अशा वेळी एखाद्या असमान्य कर्तृत्वाचा, बहुधा सिद्ध वळूचा (किंवा क्वचित प्रसंगी मादीचा)  प्रकर्षाने उपयोग करतात. यामुळे कळपातील प्रत्येक पशूचे अशा असामान्य नराशी अनेक मार्गांनी प्रत्यक्ष नाते बनते. या पद्धतीने काही प्रमाणात अंतःप्रजनन साधते. काही पिढ्यांनंतर अधिक कर्तृत्त्ववान पशू (नर) आढळल्यास त्याचा उपयोग करून त्याच्यातील गुण संततीत उतरविण्याचे प्रयत्न होतात.

अंतःप्रजनन : या पद्धतीत अगदी निकटच्या नातेवाईकांचा  समागम अभिप्रेत आहे. बहिणभाऊ, पितापुत्री, मातापुत्र याखालोखाल क्रमशः सहोदर, सावत्र व चुलत संबंध अशांचा समागम म्हणजेच अंतःप्रजनन. शुक्राणू (नराकडील जननपेशी ) व अंडाणू ( मादीकडील जननपेशी ) यांच्या संयोगाने युग्मनज तयार होताना गुणसूत्रे व त्यांवरील जनुके द्विगुणित होतात आणि ही द्वित्त जनुके पुत्रपुत्रीत उतरतात. गुणसूत्रावरील एका केंद्रावरील दोन जनुके एकरूप होतात. अंतःप्रजननामुळे समयुग्मनजत्वामध्ये वाढ होते व विषमयुग्मजत्व कमी होते. बहिणभाऊ, पितापुत्री, मातपुत्र यांच्या समागमामुळे संततीमध्ये विषमयुग्मनजत्व २५%कमी होते. म्हणजे अःतप्रजनन गुणांक २५% असतो. बहिणभाऊ समागम दोन पिढ्यांत चालू ठेवल्यास विषमयुग्मनजत्त्व ३७.५% कमी होते व तीन पिढ्यांत चालू ठेवल्यास ५०% कमी होते. अशा प्रकारे समागम करवूनच अंतःप्रजननक्रमवंश तयार होतात. निरनिराळ्या अभिजातींच्या निर्मितीच्या कार्यांत या पद्धतीचा जास्तीत जास्त वापर केला असला पाहिजे. कारण यामुळेच रंग, आकार व गुणधर्म यांचा सारखेपणा ही अभिजातीची लक्षणे ठरली. या पद्धतीच्या समागमामुळे नवीन काही निर्माण न होता गुणसूत्रात विषमतेने झाकले जाणारे बरेवाईट गुणधर्म सुस्पष्ट होतात. सुप्त दोष ज्या पशूमध्ये व्यक्त होतील, अशा पशूंचा त्याग करावाच लागतो . जनुक संचय संकुचित होतो. संततीमध्ये जोम कमी होणे, वांझपणा, शरीरविकृतीचा प्रादुर्भाव व हीन प्रतीची जीवनक्षमता इ. दुष्परिणाम घडतात. याउलट प्रगुणता वाढणे, सरासरी उत्पादनावर निवड करणे शक्य होणे इ. फायदेही होतात.

संकर प्रजनन पद्धत : सामान्यपणे एकाच जातीच्या दोन अभिजातीतील नर व मादी यांच्या समागमाने प्रजनन करणे यास संकर प्रजनन पद्धत म्हणतात परंतु काही वेळा निराळ्या जातींतील पशूमध्ये संकर प्रजनन करता येते. घोडी व गाढव यांच्या समागमाने झालेली खेचराची उत्पत्ती हे अशा संकर प्रजननाचे उदाहरण होय. संकर प्रजनन यूरोप, अमेरिकेमध्ये फार पूर्वीपासून प्रायोगिक स्तरावर चालू होते व सामान्यतः ते फलदायी झाले आहे. संततीमध्ये विषमयुग्मजत्व वाढविणे हा संकर प्रजननाचा हेतू असतो. एक अभिजाती काही गुणांमध्ये श्रेष्ठ असेल, तर दुसरी दुसऱ्‍या काही गुणांमध्येसरस असेल. संतती सामान्यतः दोन्ही जातींमधील गुण मध्यम प्रमाणात घेऊन जन्मते परंतु काही वेळा पहिल्या पिढीतील संतती दोन्ही जातींमधील गुणांच्या सरासरीपेक्षा श्रेष्ठ ठरते. हे संकर ओजामुळे (संकरजातीतील वृद्धक्षमता लक्षणीय रीतीने वाढल्यामुळे) घडते. हे विवक्षित जनुकाच्या विविध प्रकारांच्या – विकल्पांच्या – अन्योन्य क्रियेमुळे घडते. यामुळे उत्पादनात वाढ होते. दोन अंतःप्रजननक्रम वंश तयार करून त्यांचा संकर केल्यास या पद्धतीचा जास्त फायदा होतो . या प्रकारे प्रजनन करुन तयार केलेल्या संकरित कोंबड्या अंडी देण्याच्या बाबतीत सरस असतात. इंग्लंड व अमेरिकेच्या बाजारांत येणारी बहुसंख्य अंडी अशा संकरित कोंबड्यांचीच आहेत. आळीपाळीने तीन अभिजातींचा संकर करून (बहुधा फक्त अभिजातीतील नरांचा उपयोग करून) डुकरांच्या बाबतीत प्रयोग करून संकरित डुकरे तयार करण्यात आली आहेत व ती फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. संकर पद्धतीचा आणखी एक उपयोग म्हणजे नवीन अभिजाती तयार करणे. मेंढ्या, कोंबड्या आणि डुकरे यांच्या अभिनव अभिजाती १९२५ सालानंतर निर्माण करण्यात आल्या आहेत.


कृत्रिम वीर्यसेचन व पशुप्रजनन : विसाव्या शतकाच्या पहिल्या काही दशकांमध्ये कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीचा वापर रशियामध्ये घोडे, डुकरे, गुरे व मेंढ्या यांच्या बाबतीत सुरू झाला. १९५० च्या सुमारास –७९ से. या तापमानात वीर्य गोठवून ठेवणे शक्य झाले. पुढे द्रव नायट्रोजनाचा प्रशीतनाकरिता वापर सुरू झाल्यावर –१९६ से. तापमानात वीर्यसंचय करण्यात येऊ लागला. यामुळे पशुप्रजननामध्ये क्रांतिकारी बदल घडून आले. या तऱ्‍हेने १० वर्षंपूर्वी साठविलेले वीर्य वापरून वासरे जन्माला आलेली आहेत. कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीने एका  वळूपासून एका वर्षात तत्त्वतः १ लाख वासरे निपजणे शक्य असले, तरी प्रत्यक्षात १०,००० वरच जन्मली आहेत. डेन्मार्कमध्ये ९५%, ब्रिटनमध्ये ७०% व अमेरिकेत ५०% गायी कृत्रिम विर्यसेचन पद्धतीने गाभण होतात. एका ठिकाणाहून दुसरीकडे वीर्य पाठविता येत असल्यामुळे निरनिराळ्या पर्यावरणाचा संततीवर होणारा परिणाम पडताळून पाहता येतो. कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीचा प्रसार दुधाळ गायींच्या प्रजननासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असला, तरी घोडे, मेंढ्या, डुकरे व कोंबड्या यांच्या बाबतीतही बऱ्‍याच प्रमाणावर करण्यात येतो.

विवक्षित हॉर्मोनांची (उत्तेजक स्त्रावांची) अंतःक्षेपणे (इंजेक्शने) देऊन गायीच्या गर्भाशयामध्ये एकापेक्षा अधिक अंडाणूंचे मोचन करण्यात येऊ लागले आहे. अशा अंडाणूंचे कृत्रिम वीर्यसेचनाद्वारा तेथेच फलन घडवून आणून अशा फलित अंड्यांचे साधारण जातीच्या गायीच्या गर्भाशयात प्रतिरोपण करतात. यामुळे जातिवंत वासरांची प्रजा मोठ्या संख्येने अल्प काळात निर्माण करता येणे शक्य आहे. अद्याप हे तंत्र प्रायोगिक स्वरूपातच वापरण्यात येत आहे पण पशु-प्रजननातील ही एक पुढची पायरी आहे [⟶ वीर्यसेचन, कृत्रिम].

पशुप्रजननातील प्रगती :दुसऱ्‍या महायुद्धानंतर बऱ्‍याच पाश्चात्त्य देशांमध्ये पशुप्रजननाच्या शास्त्रीय बैठकीमुळे त्यांच्यापासून मिळणाऱ्‍या उत्पादनामध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. अमेरिकेतील नोंदणी झालेल्या गायींचे दुग्धोत्पादन १९५५ मध्ये ४,२७५ किग्रॅ. होते ते १९६७ मध्ये ५,५३८ किग्रॅ. झाले. ही वाढ २९·५ % म्हणजे वर्षाला २·२७% आहे. डेन्मार्कमधील डुकरांच्या रोजच्या वजनातील वाढ १९५५ ते १९६२ या काळात ६७८ ग्रॅ.वरुन ६९७ ग्रॅ. तसेच डुकराची लांबी ९३·८ सेंमी, वरून ९५·९ सेंमी. झाली.

भारतामध्ये पशुप्रजननाचे कार्य कित्येक शतकांपासून पिढीजात पशुप्रजननकार करीत आहेत. गुरे, मेंढ्या व घोडे यांचे प्रजनन करणारे बहुप्रजननकार करीत आहेत. गुरे, मेंढ्या व घोडे यांचे प्रजनन करणारे बहुसंख्य लोक भटक्या जातीचे होते. त्यांच्या प्रजनन पद्धती परंपरागत समजुतीवर आधारलेल्या असत. हा उद्योग बहुतांशी अशिक्षित पैदासकारंच्या हातात राहिल्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनक्षमतेऐवजी त्याच्याशी बादरायण संबंधही नसलेल्या तथाकथित सुलक्षणांना अवास्तव महत्त्व प्राप्त झाले होते. तथापि १९२७-२८ मध्ये रॉयल कमिशनने गुरांच्या विकासासंबंधी काही महत्त्वाच्या सूचना केल्यापासून शासकीय पातळीवर पशुप्रजननाच्या काही शास्त्रीय योजना कार्यवाहीत आल्या आहेत. गाई, म्हशी, मेंढ्या आणि कोंबड्या यांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने त्यांची प्रजनन केंद्रे उघडण्यात आली. या कामात सुसूत्रता आणण्याचे काम १९२९ मध्ये स्थापन झालेल्या इंपिरियल कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेने सुरू केले.

शासकीय पातळीवर सुरू झालेल्या या कार्य़ाकडे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अधिक लक्ष पुरविण्यात आले. खासगी क्षेत्राकडूनही गायी आणि कोंबड्या यांच्या प्रजननाच्या बाबतीत चांगलाच प्रतिसाद मिळाला. देशातील गोशाळा, पांजरपोळ या संस्थांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्पादनशील गायींच्या पैदाशीचे कार्य हाती घेतले. शासनामार्फत जर्सी, ब्राऊन स्विस, होल्स्टीन, फ्रिजियन यांसारख्या विदेशी गुरांच्या जातींचे वळू आयात करून त्यांचे वीर्य कृत्रिम वीर्यसेचन केंद्रांमार्फत उपलब्ध करून संकर प्रजननास चालना दिली आहे . अनेक ठिकाणी सहकारी क्षेत्रामध्येही दुधाळ गायींच्या पैदाशीसाठी प्रजननक्षेत्रे स्थापन करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात उरुळी कांचन ( पुणे ) येथील भारतीय कृषि उद्योग प्रतिष्ठान ही संस्था मणीभाई देसाई यांच्या संचालकत्वाखाली हे कार्य योजनापूर्वक करीत आहे. त्यांनी १९४७ मध्ये गुजरातमधील ३९ गीर गायी आणवून या जातीच्या गायींची निवड पद्धतीने सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू केले. दुग्धोत्पादन, पहिल्या वेताच्या वेळचे वय या बाबतींत त्यांना यशही आले आहे पण हळूहळू गायी माजावर न येणे, उलटणे (गर्भपात) यांसारखे दोष निर्माण होऊ लागले. निवड पद्धतीनेच हे दोष काढून टाकून शुद्ध अभिजातीच्याच गायी वाढवायच्या व त्याद्वाराच दुग्धोत्पादनात वाढ करावयाचे म्हटले, तर कालापहरण होणार हे उघड आहे. म्हणून त्यांनी वर उल्लेखिलेल्या विदेशी जातींच्या सिद्ध वळूंचे गोठविलेले वीर्य आयात करून संकर प्रजनन करण्याचे ठरविले. मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी बहुसंख्य शेतकऱ्‍यांना दुग्धोत्पादनाचा जोडधंदा मिळवून देण्यास हाच एक जवळचा मार्ग आहे हे ओळखून त्यांनी स्थापन केलेल्या भारतीय कृषि उद्योग प्रतिष्ठान या संस्थेमार्फत या कार्याचा प्रसार करण्याची योजनापूर्वक आखणी केली. प्रतिष्ठानामार्फत अनेक कृत्रिम वीर्यसेचन केंद्र स्थापन केली. या केंद्रांमार्फत निपजलेल्या संकरित कालवडींना विनामूल्य पशुवैद्यकीय मदत देण्याची सोयही करण्यात आली. या योजनेमुळे १०,००० हून अधिक संकरित कालवडी निपजलेल्या असून त्यांतील अनेकांचे दुग्धोत्पादनही सुरू झाले आहे. विदेशी तसेच शुद्ध देशी जातींचे वळू आळीपाळीने वापरून विदेशी रक्ताचे प्रमाण ३५% ते ७५% असलेल्या कालवडी बहुसंख्येने निर्माण करणे हे प्रतिष्ठानाचे सध्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे प्रजेमध्ये देशी जनावरातील रोगप्रतिकारशक्ती व विदेशी जातीमधील प्रजननक्षमता, दुग्धोत्पादन, संयोगक्षम वय इ. आनुवंशिक गुणांच्या बाबतीत सुधारणा होत राहील, असे या योजनेचे स्वरूप आहे.

अंडी देणाऱ्‍या व मांसल कोंबड्यांच्या विदेशी जातींच्या उत्कृष्ट विभेदाच्या (प्रकारच्या) कोंबड्या आयात करून खाजगी क्षेत्रामध्ये कित्येक उबवण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. काही केंद्रांतून शास्त्रीय प्रजननाद्वारे जनक पिढी तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मेरिनो, अमेरिकन रॅम्ब्युलेट, रशियातील स्टेव्हेरोपोलेस्की व पोलवर्थ या जातींच्या मेंढ्यांच्या नरांची आयात करून प्रजननाद्बारा भारतीय मेंढ्यांच्या जातींच्या लोकरीची प्रत सुधारण्याचे प्रयत्न चालू आहेत. जमनापारी या मध्य प्रदेशातील दुधाळ शेळ्यांच्या जातीचे प्रजनन करण्याचे प्रयत्न  भारतात इतरत्र चालू आहेत.

उत्तम खुराक, भरपूर ओला चारा व चांगली निगा असल्याशिवाय प्रजननाने प्राप्त झालेल्या आनुवंशिक गुणांचा लाभ उठवता येत नाही, हे शास्त्रीय सत्य मात्र दृष्टीआड करता येत नाही. अन्यथा पशुप्रजनन फक्त तात्त्विक रीत्या अवलंबिल्यासारखे होईल.

ब्रिटन-अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य देशांत निरनिराळ्या अभिजातींच्या प्रजननकारांच्या संघटना अस्तित्वात आहेत व त्यांचे अभिजातीची वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्याकडे बारकाईने लक्ष असते .

पहा : आनुवंशिकी पशुसंवर्धन.

संदर्भ :1. C.S.I.R. The  Wealth of India, Raw Materials, Vol. VI, Supplement Livestock ( Including poultry ), New Delhi, 1970.

     2. Rice, V.A. and others, Breeding and Improvement of Farm Animals, Tokyo, 1957.

     3. Sen, S.K. and others, Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.

     4. Williamson, G. payne, W. J .A. An Introduction to Animal Husbandry in the Tropics, London, 1960.

क्षीरसागर, श्री. गो. ताटके, म.बा.