विंझर -२ : कॅनडाच्या आँटॅरिओ प्रांतातील एसेक्स परगण्याचे मुख्य ठाणे व प्रसिद्ध नदीबंदर. लोकसंख्या २,६२,०७५ (१९९१). हे ईअरी व सेंट क्लेअर या सरोवरांना जोडणाऱ्या डिट्रॉइट नदीच्या डाव्या तीरावर वसलेले असून याच्या समोरच नदीच्या दुसऱ्या तीरावर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील डिट्रॉइट हे प्रसिद्ध शहर आहे. विंझर हे कॅनडा व संयुक्त संस्थाने यांदरम्यानचे तसेच कॅनडामधील सर्वांत दक्षिणेकडील महत्त्वाचे शहर व अंतर्गत बंदर असून ते कॅनडाचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार मानले जाते.

फ्रेंचांनी इ.स. १७०१ मध्ये डिट्रॉइट येथे किल्ला बांधल्यानंतर याच्या आसपास फ्रेंच शेतकऱ्यांनी वसती करण्यास प्रारंभ केला. तत्पूर्वी या भागात ह्यूरन व इरोक्वायन हे अमेरिकन इंडियन राहत होते. १७४९ मध्ये फ्रेंचांनी गौरवर्णीयांची पहिली कायमस्वरूपी वसाहत या ठिकाणी स्थापन केली. इंग्रज वसाहतवाले मात्र १७९१-१८०० या दशकात येथे आले. हे ठिकाण डिट्रॉइटशी फेरी वाहतुकीने जोडले होते. सुरुवातीच्या काळात या वसाहतीला ‘द फेरी’ असे नाव देण्यात आले होते. पुढे याचे ‘रिचमंड’ असे नामकरण झाले. द फेरी, रिचमंड, साउथ डिट्रॉइट यांपैकी कोणते नाव ठेवावयाचे, यावरून १८३२ मध्ये वाद निर्माण झाला. १८३६ मध्ये सर्वांनी सामंजस्याने इंग्लंडमधील विंझरवरून (न्यू विंझर) याला ‘विंझर’ असे नाव दिले. फ्रेंच व अमेरिकन मोहिमा, अमेरिकन राज्यक्रांती व १८१२ मधील युद्धात या परिसरात अनेक महत्त्वाच्या ऐतिहासक घटना घडल्या. अमेरिकन राज्यक्रांतीनंतर अनेक राजनिष्ठ या भागात स्थायिक झाले. विंझरला १८५४ मध्ये खेड्याचा, १८५८ मध्ये नगराचा, तर १८९२ मध्ये शहराचा दर्जा प्राप्त झाला. विंझरमधील २५ टक्के लोक फ्रेंच वसाहतकऱ्यांचेच वंशज आहेत. १९३५ मध्ये सँडवीच, वॉकरव्हिल आणि ईस्ट विंझर नगरांचा विंझरमध्ये समावेश करण्यात आला. पुढे १९६६ मध्ये ऑबीज्वे, रिव्हरसाइड, सँडवीच वेस्ट, सँडवीच ईस्ट (काही भाग) या चार वसाहती विंझरमध्ये समाविष्ट करण्यात आल्या.

डिट्रॉइटचे सान्निध्य लाभल्याने जलवाहतूकीच्या दृष्टीने विंझरचा झपाट्याने विकास होत गेला. फोर्ड मोटार कंपनीची कॅनडियन बनावटीची पहिली मोटार १९०४ मध्ये येथे तयार झाल्यावर आणि क्रिसलर व जनरल मोटर्स या कंपन्यांनी आपले कारखाने १९२० मध्ये सुरू केल्यावर मोटारउद्योग व त्याच्या सुटया भागांच्या निर्मितीचे हे प्रमुख केंद्र बनले. देशातील हे चौथ्या क्रमांकाचे कारखानदारीचे शहर आहे. स्वयंचलित यंत्रोत्पादनांपैकी २५ टक्के उत्पादन या शहरात होते. अन्नप्रक्रिया, विविध पेये, मीठ, यंत्रसामग्री लोखंड व पोलाद उत्पादने, लोहोतर धातुउत्पादने, रंग, लहान नौका, मासेमारी साधने, औषधे, रसायने, विद्युत् साहित्य, काच, कापड, रबरी वस्तू निर्मिती इ. उद्योगधंदे शहरात चालतात. याच्या सुपीक आसमंतात भाजीपाला, फळे, मका, सोयाबीन, तंबाखू, बटाटे इ. पिके घेतली जातात. शहरात कृषिमालाची मोठी बाजारपेठ आहे.

विंझर हे देशातील वाहतूक मार्गाचे दक्षिण भागातील मुख्य ठिकाण असून कॅनडियन नॅशनल, कॅनडियन पॅसिफिक, न्यूयॉर्क सेंट्रल, इ. लोहमार्ग विंझरला येऊन मिळतात. अनेक प्रांतीय महामार्गही येथे येऊन मिळतात. पंचमहासरोवर मार्गावरील या उत्कृष्ट बंदराला आठ किमी. लांबीचा जलभाग लाभलेला असून तेथून प्रमुख चार जलमार्ग बाहेर जातात. दोन भुयारी मार्ग, मोटार फेरी व झुलता पूल यांद्वारे विंझर डिट्रॉइटशी जोडले आहे.

शहरात विंझर विद्यापीठ (स्था. १९६३) असून पूर्वीचे ‘ॲझम्शन कॉलेज’ (स्था.१८५७) या विद्यापीठातच समाविष्ट करण्यात आले आहे. येथे उपयोजित कला व तंत्रज्ञानाचे ‘सेंट क्लेअर कॉलेज’ असून इतरही अनेक शैक्षणिक संस्था आहेत. १८५५ मध्ये येथे धार्मिक शिक्षणाचे महाविद्यालय स्थापन झाले. शहराच्या दक्षिणेस २६ किमी.वर असलेले ‘फोर्ट माल्डेन नॅशनल हिस्टॉरिकल पार्क’ प्रेक्षणीय आहे. कलावीथी, हाइरम वॉकर हिस्टॉरिकल म्यूझीयम आणि मिमॉरिअल कन्व्हेंशन हॉल या वास्तू प्रेक्षणीय आहेत. शहरात संगीतिकागृह व वाद्यवृंद असून त्यांमार्फत करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जातात. येथील ‘मेन लायब्ररी’ (स्था. १९७३) उल्लेखनीय आहे. नदीकाठावरील १९ हेक्टर क्षेत्रात सुंदर उद्याने आहेत. डेली स्टार हे वृत्तपत्र येथून निघते. शहरात दोन रेडिओ प्रसारणकेंद्रे व एक दूरचित्रवाणी केंद्र आहे.

चौधरी, वसंत.