ओझ्ये, एमिल : (१७ सप्‍टेंबर १८२० — २५ ऑक्टोबर १८८९). फ्रेंच नाटककार. जन्म फ्रान्समधील व्हालांस शहरी एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात. ⇨ बाल्झॅक ह्या वास्तववादी फ्रेंच कादंबरीकाराचा शिष्य. फ्रेंच नाटकांत वास्तववाद आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्याने बजावली. प्रस्थापित नीतिमूल्यांबाबत विशेष जागरूकता दाखवून स्वैर जीवनाच्या वाङ्‍मयीन चित्रणावर त्याने टीका केली. घटस्फोट (Madame Carverlet, १८७६), अनैतिक संबंध(Les Fourchambault, १८७८), वर्गभेद(Le Gendre de M. Poirier, १८५४) सांदो ह्या फ्रेंच नाटककाराच्या सहकार्याने, वेश्याव्यवसाय (Lions et Renards, १८६९) आणि गणिकेचे सामाजिक महत्त्व (Le Mariage d’Olympe, १८५५) यांसारखे विषय त्याने आपल्या नाट्यकृतींमधून हाताळले. ⇨द्यूमा फीस (१८२४ — १८९५) ह्या श्रेष्ठ नाटककाराचा तो समर्थ पूर्वसूरी होय. क्र्‌वासी येथे तो निधन पावला.

एमिल ओझ्ये

टोणगावकर, विजया