पशुसंवर्धन : उत्पादनशील पाळीव प्राण्यांची उत्पादनक्षमता किंवा उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रजनन (पैदास) व पालनपोषण करणे हा पशुसंवर्धनाचा खरा अर्थ आहे. नुसती त्यांची संख्या वाढवीत राहणे, हे पशुसंवर्धन नव्हे. गायीम्हशी, शेळ्यामेंढ्या, डुकरे, घोडे, गाढवे व  खेचरे आणि उंट यांचा पाळीव प्राण्यांत सामान्यतः समावेश होतो. तिबेट व त्याच्या शेजारील चीनचा भाग, नेपाळ, भूतान व हिमालयाच्या दक्षिणेकडील उतरणीवरील प्रदेशात याक, ब्रह्मदेश व भारतामध्ये हत्ती यांचाही पाळीव प्राणी म्हणून उल्लेख करतात. यांशिवाय कोंबड्या, बदके इ. उत्पादनशील पक्ष्यांचा पशुसंवर्धनामध्ये अंतर्भाव करण्याचा प्रघान आहे.

या सर्व प्राण्यांची वेगवेगळी शरीररचना, शरीरक्रियाविज्ञान (शरीराच्या क्रिया व कार्य कसे चालते याच्या अभ्यासाचे शास्त्र), तसेच त्यांच्यापासून मिळणाऱ्‍या विविध पदार्थांचे उत्पादन लक्षात घेता त्यांच्या शरीरपोषणाच्या व योगक्षेमाच्या गरजा व रोगसमस्या भिन्न असणार हे उघडच आहे. गायीम्हशी व शेळयामेंढ्या हे सस्तन समखुरी (खुरांची संख्या सम असलेले), रवंथ करणारे तर घोडा, गाढव व खेचर हे विषमखुरी, रवंथ न करणारे प्राणी आहेत. डुक्कर हा प्राणी समखुरी असला, तरी रवंथ न करणारा आहे. जगाच्या विविध भागांतील हवामानातील बदल व त्यांचा या प्राण्यांच्या क्रियाशीलतेवर म्हणजे उत्पादनावर होणारा परिणाम, आनुवंशिकतेमुळे प्रजेमध्ये दिसून येणारे गुणधर्म इ. अनेक बाबींचा विचार करता पशुसंवर्धन हा विषय किती व्यापक आहे, हे सहज लक्षात येईल. प्रस्तुत नोंदीत या विषयाच्या प्रमुख अंगांचे संक्षेपाने विवेचन केलेले असून अधिक माहिती त्या त्या जनावराच्या नोंदीमध्ये (उदा., गाय, म्हैस, मेंढी इ. ) तसेच पशुखाद्य, पशुप्रजनन या नोंदींमध्ये पहावी.

पशुपालनाचा इतिहास : रानटी अवस्थेतील ह्या प्राण्यांना माणसाळविण्याचा पहिला प्रयत्न मध्याश्म युगामध्ये झाला असला, तरी बरेचसे प्राणी नवपाषाण युगामध्ये (ख्रि. पू. ९००० ते ८०००) माणसाळविण्यात आले. सर्वप्रथम कुत्रा व त्यानंतर मेंढी, गाय , घोडा व डुक्कर हे प्राणी क्रमशः माणसाळविले गेले. या वेळी मनुष्य टोळ्याटोळ्यांनी राहत असे व त्याचे जीवनही भटके होते. पुढे तो शेती करून राहू लागल्यावर (ख्रि. पू. ७०००) त्याच्या जीवनाला स्थैर्य आले. घोडा, बैल व म्हैस हे प्राणी प्रथमतः ओझे वाहणारे पशू म्हणून तो पाळू लागला. पुढे शेतीच्या अवजारांचा विकास झाल्यावर त्यांना शेतीच्या कामासाठी उपयोगात आणले जाऊ लागले. आजही जगात कसल्या जाणाऱ्‍या जमिनीपैकी ८० %  जमीन पशूंच्या साहाय्याने कसली जाते. मुख्य व्यवसाय शेतीचा व त्याला पोषक म्हणून गुरे पाळणे ही अवस्था कित्येक शतके चालू होती. मात्र मांसाहार सर्रास चालू असल्यामुळे मेंढा व इतर मांसोत्पादक प्राण्याचे पालन करण्याकडे प्रवृत्ती वाढली. टोळ्याटोळ्यांनी राहत असल्यामुळे या पाळीव प्राण्यांमध्ये अंतःप्रजनन (जवळच्या नात्यातील प्राण्यांचा संयोग ) होऊन त्यांच्या जाती निर्माण होऊ लागल्या. टोळयाटोळयांतील संघर्षामुळे युद्धाच्या कामी उपयोगी पडतील अशा स्वारीच्या घोड्यांची पैदास सुरू झाली. मेसोपोटेमिया—हल्लीचा दक्षिण तुर्कस्तान व इराक –या प्रदेशांत बैलगाड्या ख्रि. पू.३५०० वर्षांपूर्वी वापरात होत्या. सिंधू नदीच्या खोऱ्‍यामध्ये (ख्रि. पू. २५००) व मध्य पूर्वेतील लोक (ख्रि. पू. २००० ते १०००) घोड्यांचे रथ वापरीत, तसेच हत्ती हा प्राणी ओझ्यासाठी वापरात असल्याचे दाखले मिळाले आहेत.

वेदकालीन भारतामध्ये पशुपालनाचा धंदा स्वतंत्रपणे करणारे लोक होते, असा ऋग्वेदात उल्लेख आहे. महाभारतकालामध्ये गायी-गुरांचे कळप पाळण्यात येत होते इतकेच नव्हे, तर भरपूर दूध देणाऱ्‍या गायी आस्तित्वात असल्याची माहिती मिळते. मांसाहार त्या वेळी निषिद्ध नव्हता. अतिप्राचीन काळी गायी-गुरे प्रायः भारतामधूनच आग्नेय व मध्य आशियात, तसेच यूरोप व उत्तर आफ्रिकेमध्ये गेली आहेत, असा इतिहासाचा दाखला आहे. गायीच्या दुधाचा वापर ख्रि. पू. ९००० वर्षांपासून होत आहे. हिपॉक्राटीझ यांनी ख्रि. पू. पाचव्या शतकात दुधाचा औषधी उपयोग सांगितला आहे.

भूमध्य समुद्राच्या पूर्व भागात व मध्य यूरोपमध्ये भटके लोक गुरे पाळण्याचा धंदा करीत. स्पेन, इटली, स्वित्झर्लंड, बाल्क, नॉर्वे व ब्रिटन येथील लोक सपाटीवर शेती करीत व डोंगरपठारावर गुरे व मेंढ्या चारीत. लोहयुगाच्या सुरुवातीस (ख्रि. पू. ५०० ते ४००) ब्रिटन व उ. यूरोपातील हवामानामध्ये बराच बदल घडून आला व कडक थंडीपासून गुरांचे संरक्षण करण्याची गरज  भासू लागली. तेव्हा भटकेपणा बराच कमी होऊन उन्हाळ्यात डोंगरपठारावर व हिवाळयात सपाटीवर असे स्थलांतर करुन हे लोक राहू लागले. पुढे  इ. स. १७५० च्या सुमारास बरीच चराऊ राने कुंपणांनी बंदिस्त करण्यात येऊ लागली व गुरांना निवाऱ्‍यासाठी झोपडीवजा गोठे या बंदिस्त रानामध्ये बांधून हिवाळ्यामध्ये जागेवरच चारापाणी करण्यात येऊ लागला. खऱ्‍या अर्थाने आजच्या पशुपालनाची ही सुरुवातच होती, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. फक्त गुरे पाळण्याचाच धंदा करणारा (कारण शेती हा त्याचा दुय्यम धंदा असे) मध्य यूरोपमधील ब्रेटन हा पहिला पशुपालक होय. मात्र शास्त्रीय दृष्टिकोनातून पशुपालकाचा धंदा करणारा पहिला पशुपालक म्हणून रॉबर्ट बेकवेल (१७२५–९५) यांचाच उल्लेख करावा लागेल. बेकवेल व कोलींग बंधू यांनी अठराव्या शतकात निवड पद्धतीच्या शास्त्रीय दृष्टीकोनाच्या अवलंब करुन दूध व मांस यांच्या उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने गुरांचे प्रजनन सुरू करून या क्षेत्रात एक क्रांतिकारी पर्व सुरू केले. यूरोपमधील देशांत या कामाचा बोलबाला होऊन अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रजननाची ही पद्धत बऱ्‍याच देशांत अवलंबिली गेली व त्याचा परिणाम म्हणजे एका दुग्धोत्पादन कालात १२ ते १५ हजार लिटरपर्यंत दूध देणाऱ्‍या गायींच्या जाती निर्माण झाल्या. निवड पद्धत म्हणजे उपलब्ध पशूतील ज्या पशूमध्ये इष्ट गुणधर्म दिसून येतील त्यांचीच प्रजननासाठी निवड करणे. याच पद्धचीचा डुकरे व मेंढ्या यांच्या प्रजननासाठी उपयोग करून डुकराचे मांस व मेंढीची लोकर यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि वर्षाला २० किग्रॅ. लोकर देणाऱ्‍या मेढ्यांच्या व वजनात जलद वाढ होणाऱ्‍या डुकरांच्या जातींची निर्मिती झाली.

सर्वसाधारणपणे उष्ण कटिबंधातील उष्ण हवामान व पाऊस यांचा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे त्या प्रदेशातील पशूंची   उत्पादनक्षमता शीत अगर समशीतोष्ण कटिबंधातील पशूंच्या मानाने बरीच कमी असते. हा ढोबळ अनुभव असला, तरी मेंढयांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया, कोंबड्यांच्या बाबतीत टांझानिंया व जॉर्डन आणि दुधाळ गायींच्या बाबतीत इझ्राएल या देशांमध्ये शास्त्रीय प्रजननाद्वारे वरीच प्रगती साधण्यात आली आहे.

भारतामध्ये पशुपालन हे शेतीच्या प्रमुख धंद्याला पूरक म्हणून वर्षानुवर्षे केले जात आहे. त्यामुळे येथे गुरांचे प्रजनन हे दुग्धोत्पादन व शेतीच्या कामासाठी व ओढकामासाठी उपयुक्त बैलांची निपज, अशा दुहेरी हेतूने केले गेले व दुग्धोत्पादनाकडे फारसे लक्ष पुरविण्यात आले नाही. त्यातच प्रतिकूल हवामान, चारा व खुराक यांची कमतरता, एकरी जास्त असलेली जनावरांची व माणसांची संख्या यांमुळे येथील पशुपालन प्रगत झाले नाही. इतकेच नव्हे, तर निकृष्ट आनुवंशिक उत्पादनक्षमता असलेल्या जनावरांची संख्या भरमसाट वाढली. वर्षाला प्रत्येक गायीपासून सरासरीने मिळणारे दूध (१७३ किग्रॅ.), मेंढीपासून मिळणारी लोकर (७०० ग्रॅ.) व कोंबडीपासून मिळणारी अंडी (५० ते ६०) यांवरून हे सहज लक्षात यावे.


विविध देशांतील हवामान, खाद्यपदार्थांची उपलब्धता, पशूंची आनुवंशिक घडण व त्यांच्या पालन पद्घती यांमुळे पशुसंवर्धनाच्या चालीरीतीतही फरक आढळून येतो. ईजिप्त, भारत, पाकिस्तान, मलेशिया, ब्रह्मदेश व आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळण्याकडे कल आहे, तर यातील काही देशांमध्ये शेतीच्या कामासाठी आणि ओढकामासाठी रेडे वापरण्यात येतात. अमेरिका, युरोप व बहुसंख्य पाश्चात्त्य देशांत गायींच्या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मध्यपूर्वेतील देशांत शेळी व उंटीण यांच्या दुधाचा वापर अधिक आहे. भारतात गाय, म्हैस व शेळी यांच्या दुधाचा सर्वत्र उपयोग केला जातो. उंट पाळणारे लोक उंटीणीच्या दुधाचा वापर काही प्रमाणात करतात, तर काश्मिरसारख्या काही भागात मेंढीचे दूधही अल्प प्रमाणात वापरतात. हिमाचल प्रदेशातील पंजी, चिनी व लाहूल या भागात व उत्तर प्रदेशातील हिमालयाकडील भागात याक या पशूता ओझे वाहून नेण्यासाठी व शेतीच्या कामासाठी उपयोग करतात. या भागातील याकची संख्या सु.२४,००० आहे . दूध, मांस, कातडी व लोकर हे पदार्थ याकपासून मिळतात. याक व गुरे यांच्या संकराने झालेली प्रजा उत्पादनाच्या बाबतीत सरस आहे.

पाळीव पशूंची जागतिक आकडेवारी : संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या १९६९-७० च्या अहवालाप्रमाणे जगामध्ये ३४६ कोटी ४६ लाख पाळीव जनावरे आहेत. त्यात १११ कोटी ८२ लाख गुरे (गायी व बैल), १२ कोटी ४५ लाख म्हशी, १०७ कोटी २६ लाख मेंढ्या, ३८ कोटी ४४ लाख शेळ्या, ६२ कोटी ६६ लाख डुकरे, ६ कोटी ७२ लाख घोडे, ४ कोटी २७ लाख गाढवे, १ कोटी ५० लाख खेचरे व १ कोटी ३४ लाख उंट आहेत. संख्येचा विचार करता सर्वांत अधिक घोडे व खेचरे ब्राझीलमध्ये, तर चीनमध्ये सर्वांत अधिक डुकरे आहेत. गुरे, म्हशी व शेळ्या यांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. सूदानमध्ये सर्वांत अधिक उंट तर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक मेंढ्या आहेत.

बऱ्‍याच पुढारलेल्या देशांमध्ये १९४७–७० या काळामध्ये शेतीची कामे यांत्रिक पद्धतीने करण्यात येऊ लागल्यामुळे घोड्यांच्या संख्येत १५·७% इतकी घट झाली आहे तर याच काळात इतर सर्व पशूंच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. सर्वांत अधिक वाढ डुकरांच्या संख्येत (११२% ) झाली. त्या खालोखाल म्हशी (४२·७ %), मेंढ्या (३८·६ %), शेळ्या (३२ %), खेचरे (२६·७ %), उंट ( २३·६ %) व गाढवे ( १७·१ %) यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसते.

उत्पादनशील पाळीव पक्ष्यांची १९७० साली सर्वांत अधिक संख्या पुढीलप्रमाणे होती : अमेरिका (५६ कोटी कोंबड्या), इंडोनेशीया (२ कोटीच्यावर बदके), पोलंड (८४.५ लाख गीज) व कॅनडा (८३ लाख ५८ हजार टर्की पक्षी ). याच वर्षी जगातील अंड्यांचे उत्पादन ३८८ अब्ज अंडी इतके झाले. यातील १/५ उत्पादन यूरोपमध्ये तर १/४ अमेरिकेमध्ये झाले.

पशूंच्या वाढत्या संख्येमुळे धान्यासारख्या मानवाच्या खाद्यावर त्यांचे आक्रमण होण्याची भीती सर्वसामान्यपणे व्यक्त केली जाते. तथापि तज्ञाच्या मते हा विचार तितकासा बरोबर नाही. कारण जगातील ६४ % जमीन कुरणे व चराऊ राने यांनी व्यापलेली आहे आणि रवंथ करणारे पशू या जमिनीवरील मानवाला निरुपयोगी असलेले गवत व झाडेझुडपे खाऊन त्याचे दूध, मांस यांसारख्या सकस प्राणिजन्य प्रथिनांमध्ये रूपांतर करतात.

भारतात १९६९-७० च्या अहवालानुसार पाळीव पशुपक्ष्यांची संख्या पुढीलप्रमाणे होती. गायी-गुरे १७,६४, ५०,००० म्हशी ५,४२,००,००० मेंढ्या ४, २६, ००,००० शेळ्या ६,७५,००,००० डुकरे ४८,००,००० घोडे १०,००,०००  खेचरे ८५,००० गाढवे १०,००,००० उंट ११,२०,००० कोंबड्या, बदके, टर्की इत्यादी ११,६५,००,०००. महाराष्ट्रात १९७२ च्या खानेसुमारीनुसार पाळीव पशुपक्षांची संख्या पुढीलप्रमाणे होती. गायी-गुरे १,४३,८५,२४६ म्हशी ३१,६८,३८३ मेंढ्या २१,२८,०३६ शेळ्या ५९,१०,५५४ घोडे ५८,२८७ खेचरे ४६९ गाढवे ५३,८८२ उंट ७०३ कोंबड्या १,२१,७९,५३६ बदके २९, ९५७. प्रती १००हेक्टर जमिनीमागे पाळीव पशुपक्ष्यांची संख्या पुढीलप्रमाणे होती : गाय़ी- गुरे ४८ , म्हशी ११, मेंढ्या ७, शेळ्या १९ व कोंबड्या ४०. प्रती १०० लोकांमागे पाळीव पशुपक्ष्यांची संख्या पुढीलप्रमाणे होती : गायी- गुरे २६, म्हशी ६, मेंढ्या ४,  शेळ्या ११, कोंबड्या २२.

पशुजन्य पदार्थांची आकडेवारी : पशूंपासून मुख्यत्वे दूध, मांस, लोकर, केस, हाडे व कातडी आणि कोंबड्यांपासून अंडी व मांस हे पदार्थ मिळतात. जगातील ५०% म्हशी आणि २०% गायी-गुरे भारतात आसूनही त्यांच्यापासून जगातील दुग्धोत्पादनाच्या (३८ कोटी ६४ लाख टन ) फक्त ५% दुग्धोत्पादन (२ कोटी ७ लाख टन) भारतात होते, तर शेळ्यांची संख्या जगातील संख्येच्या १६% असून दुधाचे उत्पादन मात्र जागातिक उत्पादनाच्या ८·५०% आहे. भारतामध्ये फक्त मांसोत्पादनासाठी गुरांचे प्रजनन करण्यात येत नाही.  त्यामुळे जगामधील वार्षिक ८ कोटी टन मांसोत्पादनापैकी फक्त ६ लक्ष टन मांस भारतामध्ये मिळते. यातील ५२·८% मांस शेळ्या व मेंढ्या यांचे असते. यांशिवाय म्हशीपासून १४·३%, गायी-गुरांपासून १·४% मांस मिळते. भारतामध्ये डुकरांची संख्या अर्ध्या कोटीच्या घरात आहे व त्यांपासून ५२ हजार टन मांस मिळते. डुकरांच्या मांसाचे जगातील वार्षिक उत्पादन ३·५ कोटी टनांच्या आसपास आहे. डुकरे पाळण्याच्या धंद्याकडे भारतामध्ये १९५५ नंतरच थोडेफार लक्ष पुरविण्यात येऊ लागले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तत्पूर्वी डुकराच्या मांसाला फारशी मागणी नव्हती हे आहे. अजूनही डुकरे पाळण्याचा धंदा करणारे लोक अत्यल्प आहेत. मेंढ्यांच्या संख्येच्या (४ कोटी २६ लक्ष) बाबतीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. मात्र जगातील २८ लाख टन लोकरीपैकी फक्त ३५ हजार टन लोकर भारतामध्ये होते. यातील जवळजवळ सर्व लोकर मध्यम ते कमी प्रतीची असते. जगातील संख्येच्या ५·५% कोंबड्या भारतामध्ये असूनही जगातील वार्षिक ३८८ अब्य अंड्यांच्या उत्पादनापैकी अवधी २ अब्ज २२ कोटी अंडी व कोंबड्यांच्या मांसाच्या २० कोटी ४२ लाख टन मांसापैकी ७ लाख ८० हजार टन मांस भारतामध्ये मिळते.

पाश्चात्त्य देशांमध्ये जवळजवळ सर्व दुग्धोत्पादन गायीच्या दुधाचे आहे. भारतामध्ये ४५% दूध गाईपासून ५४% म्हशीपासून मिळते. उंट पाळणारे लोक उंटीणीच्या दुधाचा वापर करतात [⟶ दुग्ध-व्यवसाय दूध]. भारतामध्ये ताजे मांस खाण्याकडे अधिक कल आहे. डुकराचे मांस त्यातील चरबीच्या प्रमाणामुळे साठविण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. अन्यथा त्याला घाण येण्याची शक्यता असते [⟶ मांस उद्योग].

इतर अनेक देशांच्या मानाने भारतामध्ये पशूंच्या कातड्याचे उत्पादन बऱ्‍याच मोठ्या प्रमाणावर होते. म्हशी व गुरे यांची २ कोटी ८० लाख मेंढ्यांची १ कोटी ८० लाख व शेळ्यांची ३ कोटी ५० लाख कातडी प्रतिवर्षी मिळतात. कातड्यांची प्रतही चांगली असल्यामुळे जगाच्या बाजारात त्याला चांगली किंमत आहे [⟶ चर्मोद्योग] . ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड व इराण या लोकर उत्पादनातील अग्रेसर देशांच्या मानाने भारतातील प्रत्येक मेंढीपासून मिळणारे लोकरीचे प्रमाण बरेच कमी आहे [⟶ लोकर].


पशूंपासून मिळणाऱ्‍या वरील पदार्थांव्यतिरिक्त इतरही अनेक पदार्थ त्यांच्यापासून मिळतात. शेळी, मेंढी व डुक्कर यांच्या आतड्यापासून सॉसेजकरिता आवरण, शस्त्रक्रियेनंतर शिवण्यासाठी वापरली जाणारी तात, टेनिस रॅकेट विणण्यासाठी  वापरला जाणारा तंतू, तंतुवाद्यामध्ये वापरात येणारे तंतू इ. पदार्थ मिळतात. गुरांच्या शेपटीवरील, डुकरांच्या मानेवरील व पाठीवरील केस ब्रश बनविण्यासाठी वापरतात. हाडांपासून हाडांची भुकटी, सरस व जिलेटीन तर खुरांपासून उपयुक्त तेल (निटफूट ऑईल) मिळते. हाडाची भुकटी पशुखाद्य व खते यांमध्ये वापरली जाते. सरस व जिलेटीन यांचा उपयोग औषधी क्षेत्रात अनेक ठिकाणी होतो. पशूपासून मिळणाऱ्‍या वसेचा (चरबीचा ) उपयोग, खाण्यासाठी व साबण, मेणबत्त्या, विविध तऱ्‍हेची ग्रीजे, कापड उद्योग सौंदर्यप्रसाधने इत्यादींमध्ये करतात. खाटीकखान्यात मारल्या जाणाऱ्‍या पशूंचे रक्त तसेच पोष ग्रंथी, अवटू ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी, यकृत इ. इंद्रियांपासून औषधिद्रव्ये व हॉर्मोने मिळतात [⟶ खाटीकखाना जैव पदार्थ ].

गुरांच्या गोठ्यातून मिळणाऱ्‍या शेण, जनावरांना अंथरलेले गवत, टाकाऊ चारा, मूत्र इ. टाकाऊ पदार्थांपासून शेणखत तयार केले जाते. खतासाठी मेंढ्या शेतात बसविण्याची पद्धत बऱ्‍याच ठिकाणी प्रचलित आहे. कोंबड्यांच्या विष्ठेपासूनही उत्तम खत मिळते. शेणापासून गोबर वायू हा इंधन म्हणून उपयुक्त असणारा वायू तयार करता येतो. तसेच हा वायू तयार करताना चांगले खतही मिळते [⟶ खते गोबर वायु ].

औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या देशांत वर उल्लेखिलेल्या अनेक पदार्थांचा उपयोग करून घेतल्यामुळे पशुधनापासून मिळणाऱ्‍या उत्पन्नात भऱ पडली आहे. कातडी, केस, खूर, हाडांचा भुगा, आतडी, शिंगांचा भुगा इ, पदार्थांच्या बाबतीत असे दिसून येते की, हे पदार्थ भारतामधून कच्चा माल म्हणून मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात. उलटपक्षी या पदार्थांचा उपयोग करून तयार केलेले ग्रीज, तात, सरस, जिलेटीन इ. अनेक पदार्थ पक्का माल म्हणून आयात केले जातात. अलीकडेच थोड्या फार प्रमाणात वरील पदार्थांचा देशातच उपयोग करून घेण्यासाठी छोटी संयंत्रे बसविली जात आहेत, तरीसुद्धा अद्याप बऱ्‍याच प्रमाणात हे पदार्थ वाया जातात.

आर्थिक महत्त्व : भारतातील पशूंच्या संख्येच्या मानाने पशूंपासून मिळणारे उत्पन्न इतर देशांच्या तुलनेने बरेच कमी आहे, हे उत्पन्न १९६१ च्या उपलब्ध आकडेवारीप्रमाणे देशातील एकूण उत्पन्नाच्या ११·८३%  व एकूण शेतीच्या उत्पन्नाच्या १८·३% आहे. डेन्मार्कमध्ये पशुधनापासून मिळणारे उत्पन्न शेतीपासून मिळणाऱ्‍या उत्पन्नाच्या ८१%, आयर्लंडमध्ये ७९% तर नॉर्वे व ब्रिटन यांचे ७८% आहे. भारतामध्ये शेतीची कामे अद्याप बहुतांशी बैल व काही भागांत रेडे यांच्या साहाय्याने केली जातात. या कामाची किंमत करणे कठीण असले, तरी एका अंदाजाप्रमाणे या कामाचे मोल ३०० ते ५०० कोटी रूपये असावे, तसेच पशूंपासून मिळणाऱ्‍या खताची किंमत वर्षाला २७० कोटी रुपयांच्या आसपास असावी, असा अंदाज आहे. पशूंपासून मिळणाऱ्‍या निरनिराळ्या पदार्थांचे मूल्य १९६० च्या अंदाजाप्रमाणे १६०० कोटी रूपयांच्या घरात होते. यापैकी ९८८ कोटी रुपये दूध व दुग्धजन्य पदार्थांपासून, ४३ कोटी कातड्यापासून, १२० कोटी मांसापासून, ६६ कोटी कोंबड्यांचे मांस व अंडी यांपासून, १२ कोटी लोकर व केस यांपासून आणि ३६१ कोटी उरलेल्या सर्व पशुजन्य पदार्थांपासून मिळतात. पशूंपासून मिळणाऱ्‍या २० प्रकारच्या पदार्थांची निर्यात केली जाते व त्यापासून ४८ कोटी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध होते. वरील सर्व आकडे १९६०-६१ या वर्षाचे आहेत त्यानंतरच्या काळातील पशुसंवर्धनाच्या क्षेत्रातील प्रगती लक्षात घेता देशाच्या अर्थकारणात पशूंमुळे मिळणाऱ्‍या उत्पन्नाचा वाटा बराच मोठा असावा, असे दिसून येईल.

पशुसंवर्धनातील शास्त्रीय दृष्टिकोन : पशुप्रजनन, त्यांचे संगोपन, पोषण आणि रोगराईपासून संरक्षण ही पशुसंवर्धनाची प्रमुख अंगे आहेत. या सर्व बाबतींत स्थानिक समस्या लक्षात घेऊन जास्तीत जास्त शास्त्रीय दृष्टिकोनातून पशुपालन केले, तरच ते खऱ्‍या अर्थाने पशुसंवर्धन होय.

पशुप्रजनन : प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे टोळ्याटोळ्यांनी राहणाऱ्‍या मानवाने पाळलेल्या पशूंच्या नैसर्गिक जाती निर्माण झाल्यावर त्याने आपल्या गरजा भागाविण्यासाठी त्यातल्या त्यात रंगाने व इतर दृश्यरूप गुणांवरून निवड करून आपल्याला पाहिजे तसे रंग, रूप आदि बाबतींत साम्य असलेले पशूंचे कळप नियंत्रित प्रजननाद्वारे तयार करण्यास सुरुवात केली. त्यातून अभिजातींची (अस्सल जातींची) निर्मिती झाली. ग्रेगोर मेंडेल आदि आनुवंशिकीविज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतांच्या [⟶ आनुवंशिकी ] आधारे संयोगाच्या विविध पद्धती वापरून आधिकाधिक इष्टतम गुणांचा संचय अपेक्षित असलेले आनुवंशिक प्रकृतीचे पशू निर्माण करण्याचे प्रयत्न अठराव्या शतकात सुरू झाले. उदा., दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने गायीचे माजावर येण्याचे वय, दोन वेतांतील अंतर, एका दुग्धकालातील दुग्धोत्पादन, दुधातील चरबीचे प्रमाण इ. आनुवंशिक गुणांचा अभ्यास करून प्रजननशास्त्रातील प्रतसुधार, बाह्यवर्ती संयोग व निवडक पैदास, स्ववंशीय संयोग, अंतःप्रजनन, संकरण यांसारख्या संयोग पद्धती वापरून दुधाळ गायींच्या जातींची निर्मिती करण्याचे प्रयत्न झाले. ब्रिटन, डेन्मार्क, हॉलंड, स्वीडन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील प्रसिद्ध दुधाळ गायींच्या होल्स्टीन, फ्रिजियन, जर्सी, गन्र्सी , आयर्शर इ. जाती हे अशा प्रयत्नांचे फळ आहे [⟶ गाय पशुप्रजनन ].

पाश्चात्त्य देशांमध्ये गुरांचे मांस बऱ्‍याच प्रमाणात खाण्यात येते. त्यामुळे गलेलठ्ठ मांसल गुरांची पैदासही करण्यात आली व त्यांच्या शॉर्टहॉर्न, हरफर्ड, ॲबर्डीन, अँगस इत्यादींसारख्या स्वतंत्र जाती निर्माण झाल्या. हाच शास्त्रीय दृष्टिकोन मेंढ्या व डुकरे यांच्या बाबतीत अवलंबिला जाऊन ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका आदि देशांमध्ये जास्त व मुलायम लोकर देणाऱ्‍या कॉरिडेल, मेरिनो, रॅमब्युलेट मेंढ्या व विपुल मांस देणाऱ्‍या लँड्रेस, यॉर्कशर इ. डुकरांच्या जाती अस्तित्वात आल्या. मेंढ्यांच्या बाबतीत वर्षातून किती वेळा कापण्यासारखी लोकर वाढते, लोकरीच्या धाग्याची लांबी, मऊपणा, चकचकीतपणा इ. गुणांचा विचार करून प्रजननासाठी त्यांची निवड करतात. डुकरांच्या बाबतीत डुकरीण एका वेळी किती पिलांना जन्म देते, तिची त्यांना पोसण्याची ताकद, पिलांची आठवड्याआठवड्याला होणारी वजनातील वाढ इ. गुणांचा विचार करतात.

भारतामध्ये गायींच्या बाबतीत अशा प्रयत्नांचा भऱ १९५५ सालापर्यंत दुग्धोपादन आणि शेतीच्या कामासाठी व ओढकामासाठी लागणारे बैल अशा दुहेरी हेतूने होत असल्यामुळे दुग्धोत्पादनात फारशी प्रगती झाली नाही. त्यानंतर मात्र जर्सी, होल्स्टीन, फ्रिजियन, ब्राऊन स्विस यांसारख्या दुधाळ जातींचे वळू आणून संकर पद्धतीचा अवलंब करून संकरित गायींची पैदास सुरू झाली. १९६० नंतर असे प्रयत्न खाजगी संस्थांमार्फत व शासनामार्फत सर्रास सुरू झाले आहेत.


महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या प्रयत्नांव्यतिरिक्त उरुळी कांचन (पुणे) येथील भारतीय कृषि उद्योग प्रतिष्ठान या संस्थेमार्फत जर्सी व होल्स्टीन, फ्रिजियन जातींच्या विदेशी गायी व वळू आणवून त्यांच्या शुद्ध बीजाचा कळप तयार केला आहे. याशिवाय सिद्ध जर्सी वळूंचे गोठलेले वीर्य आणवून संकरित गायी निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल अशा कालव्याखाली भिजणाऱ्‍या क्षेत्रांच्या परिसरात सेवाकेंद्रे स्थापन करून कृत्रिम वीर्यसेचन, पशुवैद्यकीय मदत इ. तदनुषंगीक सोयी उपलब्ध केल्यामुळे पशुपालकांकडून या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुग्धोत्पादन हाच मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवून नजीकच्या काळात १ लाख संकरित गायींची पैदास करण्याचा या संस्थेचा संकल्प आहे.

गायींच्या खालोखाल संकरित प्रजननामुळे उत्पादनात होणाऱ्‍या वाढीचा फायदा घेण्याच्या दृष्टिने भारतात कोंबड्यांच्या बाबतीत प्रयत्न करण्यात आले. ब्रिटन, अमेरिका येथील उत्पादनशील अभिजातींच्या व त्यांच्या विभेदाच्या कोंबड्यांची आयात करून त्यांची अंडी उबवण यंत्राच्या साहाय्याने उबवून एक दिवसांची पिले विकण्याची अनेक केंद्रे अस्तित्वात येऊन कोंबडीपालनात क्रांतिकारी बदल घडून आला आहे [⟶ कुक्कुटपालन]. मेंढ्यांच्या व डुकरांच्या बाबतीतही हेच तंत्र अवलंबिले जाऊ लागले आहे.

प्रजननक्षेत्रातील या प्रयत्नांना कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीची जोड मिळाल्यामुळे प्रगतीचा वेग वाढला. सिद्ध वळूच्या रेताचा जास्तीत जास्त उपयोग करणे शक्य झाले. पाश्चात्त्य देशांत व रशिया आदि पुढारलेल्या देशांत जवळजवळ सर्व पाळीव पशूंच्या बाबतीत कृत्रिम वीर्यसेचन पद्धत सर्रास अवलंबिली जाऊ लागली आहे. भारतात दुसऱ्‍या महायुद्धानंतर या पद्धतीचा अवलंब करण्याचे प्रयत्न प्रथम शासकीय पातळीवर सुरू झाले. दुग्धोत्पादनाच्या दृष्टिने आधीच जातिवंत वळूंची वाण आहे. जेथे २५० वळूंची जरूरी आहे तिथे फक्त एक उपलब्ध आहे. म्हणून कृत्रिम वीर्यसेचन हे भारतास वरदानच ठरले आहे. गायीम्हशींच्या बाबतीत कृत्रिम वीर्यसेचन करण्याची अनेक केंद्रे भारतामध्ये आहेत. मेंढ्यांच्या बाबतीत या पद्धतीचा अवलंब फारच थोड्या प्रमाणावर होत आहे. तथापि लोकरीची प्रत व उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न मेरिनो, रॅम्ब्युलेट, कॉरिडेल, साऊथ डाऊन इ. विदेशी जातींचे नर आणवून कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीद्वारा त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अलीकडे कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीत क्रांतिकारक सुधारणा झाली असून गोठवलेले रेत कित्येक वर्षापर्यंत उपयोगात आणता येते. यामुळे सिद्ध जातिवंत वळूच्या मृत्यूनंतरही त्याची प्रजा जन्माला येत राहते. शिवाय अनेक देशांना एका वळूच्या वीर्याचा फायदा होऊ शकतो [⟶ वीर्यसेचन, कृत्रिम ].

 संगोपन व संगोपनातील व्यवस्थापन : शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रजननाद्वारे उत्पादनशील पशूंची निर्मिती झाली, तरी त्यांचे पालन, पोषण व व्यवस्थापन यांकडे दुर्लक्ष झाले,तर उत्पादनात घट होऊ शकते. संगोपनाचे तंत्र देश, काल, हवापाणी व इतर सोयी यांवर अवलंबून असते. पाश्चात्त्य देशांत गायी-गुरांच्या बाबतीत संगोपनाच्या दोन पद्धती दिसून येतात. दुग्धोत्पादनाकरिता पाळण्यात येणाऱ्‍या गायींचे गोठे बहुधा पक्के असून गायींना दाणावैरण गव्हाणीतच घालतात. त्यांना चरण्यासाठी दूरवर नेण्याचा प्रघात नाही. जास्त व्यायाम झाल्यास खाद्याची जरूरी वाढते. तसेच दुधाच्या उत्पादनातही घट होते. वळूंना मात्र व्यायामाची आवश्यकता असते. वळूंना व्यायामासाठी घाण्याला जसा बैल फिरत राहतो तशाच प्रकारची व्यवस्था असलेले एक यांत्रिक साधन दुग्धशाळेच्या आवारात बसवितात. एकाच वेळी चार किंवा सहा वळूंच्या व्यायामाची सोय यामध्ये होऊ शकते. वासरांना स्वतंत्रपणे ठेवण्याची व्यवस्था असते. या पद्धतीमध्ये प्रत्येक गायीकडे वैयक्तिक लक्ष पुरविणे शक्य होते. तसेच कालवडींची काळजी घेणे, योग्य वेळी वीर्यसेचन करणे सोयीचे होते. एका छपराखाली ३० मी.X ९·१ मी. एवढ्या जागेत प्रत्येक गायीस ६ चौ. मी. याप्रमाणे ५० गायींची सोय होते. भारतामध्ये शहरी भागात दुग्धोत्पादनासाठी पाळलेल्या गायीम्हशींची व्यवस्था थोडीफार याच पद्धतीने करतात.

वळूंना व्यायाम देण्याचे यांत्रिक साधन (खेडा गुजरात).

पाश्चात्त्य देशांत मांसोत्पादनासाठी पाळलेल्या गुरांच्या संगोपनाची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हीमध्ये प्रजननासाठी पाळलेली गुरे आणि गलेलठ्ठ करून सरळ खाटीकखान्याकडे रवानगी करावयाची गुरे असे दोन भाग पडतात. दोन्हीही प्रकारांमध्ये गुरांचे कळप पाळतात. त्यांना बांधण्यात येत नाही. प्रजननासाठी पाळलेल्या गायीच्या कळपात वर्षातून २-३ महिनेच वळू सोडतात. यामुळे जन्माला येणाऱ्‍या वासरांच्या वयात फारसे अंतर राहत नाही. याचा फायदा म्हणजे त्यांचे संगोपन व खाणेपिणे सामुदायिक पद्धतीने करणे होते. कडकडीत थंडीच्या दिवसात ही वासरे एक वर्षाच्या वयाच्या जवळपास असावीत असे त्यांचे जन्माचे वेळापत्रक आखलेले असते. वासरांची शिंगे वाढू नयेत म्हणून ती जाळणे, नर खच्ची करणे, प्रतिबंधक लस टोचणे इ. सर्व सोपस्कार (वासरे जवळजवळ एकाच वयाची असल्यामुळे) एकाच वेळी करणे शक्य होते. वासरांचे कळप उघड्यावरच असतात. फक्त कडक थंडीच्या वेळी त्यांना लाकडी झोपडीवजा घरामध्ये आणतात. या वेळी मात्र त्यांना खाद्य व गवत देतात, एरवी बव्हंशी चरण्यावरच त्यांची उपजीविका होते. वजनात लवकर वाढ व्हावी यासाठी केव्हा केव्हा भरडलेला मका, लवणे व क्वचित हॉर्मोने यांचा खाद्यात उपयोग केला जातो. प्रजननासाठी पाळलेल्या गायी कळप पद्धतीनेच पाळतात, परंतु त्यांना थोडा खुराक देतात पण बव्हंशी त्या चरण्यावरच वाढतात.

भारतामध्ये बहुसंख्य गुरे शेतकरी शेतीशी संलग्न व्यवसाय म्हणून पाळीत असतात आणि त्यांची संख्या त्याच्या गरजेप्रमाणे कमीजास्त राहते. काही भटक्या जमातीचे लोक गायीगुरांचे कळप पाळतात. आपले कळप घेऊन हे लोक चाऱ्‍याच्या शोधात वर्षभर भटकत राहतात. महाराष्ट्रात धनगर जमातीचे लोक मेंढ्यांचे कळप याच पद्धतीने पाळतात. मेंढ्यांना जास्त पाऊस मानवत नाही म्हणून हे लोक आपला भटकण्याचा मार्ग त्यानुसार आखतात. मेंढ्या बहुधा उघड्यावरच राहतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इ. देशांत हजारो मेंढ्यांचे मोठाले कळप पाळले जातात. थंडी व पाऊस यांपासून संरक्षण देण्यासाठी गवताचे उतरते छप्पर असलेली झोपडीवजा झापडे बांधतात पण तेथेही मेंढ्या वर्षाचा बराच काळ उघड्यावरच राहतात. डुकरे प्रायः मांसोत्पादनाकरिता पाळली जातात. त्यांना राहण्यासाठी हौदाच्या आकाराचे १·२ ते १·५ मी. उंचीची भिंत असलेले गाळे एकापुढे एक बांधतात व सर्व गाळ्यांवर ४·५ मी. उंचीवर एक छप्पर घालतात. प्रत्येक गाळ्याला लागून गाळयाइतक्याच आकारमानाची म्हणजे ३·७ × २·५ मी. उघडी पण बंदिस्त जागा असते. गाळ्यातून पाहिजे तेव्हा डुकरे या मोकळ्या जागेत फिरू शकतात. भारतीय मानक संस्थेने निरनिराळया पशूंच्या राहत्या घराबाबत मानके ठरविलेली आहेत.


पोषण : मनुष्य प्राण्याप्रमाणे पशूंच्या पोषणासाठी प्रथिने, कार्बोहायड्रेटे (पिष्टमय पदार्थ), वसा, खनिजे, जीवनसत्त्वे इ. पोषक घटकांची जरूरी आहे. स्वतःच्या पोषणाशिवाय दूध, मांस, लोकर इ. पदार्थांच्या उत्पादनासाठी त्यांना अधिक खाद्य पुरवणे इष्ट असते. त्या त्या पशूंची वरील पोषक घटकांची गरज निरनिराळी असते. ही गरज लक्षात घेऊन त्यांचा संतुलित आहार ठरवितात. रवंथ करणाऱ्‍या चार कप्प्यांचे पोट असणाऱ्‍या गायीगुरांना घोड्यापेक्षा जास्त प्रमाणात चारा द्यावा लागतो. मेंढ्यांना खुराक बहुधा द्यावा लागत नाही. चराऊ रानावरच त्या आपली गरज भागवू शकतात.याउलट डुकरांना खुराक मोठ्या प्रमाणावर द्यावा लागतो. गुरे काही जीवनसत्त्वे आपल्या शरीरात तयार करतात. खनिजे व जीवनसत्त्वे पशूंना हिरव्या चाऱ्‍यामधून मिळतात. गायींना जो अन्नांश अपचनीय आहे तो डुकरे पचवू शकतात. या व अशासारख्या शरीरक्रियात्मक बाबींचा विचार करून निरनिराळ्या पाळीव जनावरांकरिता तयार पशुखाद्ये बनविण्यात आली आहेत. निकस किंवा अपुरा आहार दिल्यास पशूची उत्पादनक्षमता भरपूर असूनही उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. याउलट उत्पादनाच्या गरजेपेक्षा अधिक आहार दिल्यास उत्पन्नात वाढ न होता दिलेला आहार वाया जातो. याचाच अर्थ पोषणाचा खर्च वाढून फायद्यात घट होते. अलीकडे पशुखाद्य तयार करण्याचे कारखाने जगातील सर्व देशांत उभारण्यात आले आहेत. भारतातही असे अनेक कारखाने शासकीय व खासगी क्षेत्रांत निघाले आहेत. पशुखाद्यांचे अनेक प्रकार या कारखान्यांनी तयार केले आहेत. केवळ एखाद्या जातीच्या पशूच्या गरजा नव्हे, तर त्या पशूच्या वयोमानाप्रमाणे लागणारी कमीजास्त अन्न घटकांची जरूर लक्षात घेऊन तीनुसार हे खाद्यांचे प्रकार बनविले आहेत. उदा., दुभत्या गायीसाठी, मांसोत्पादन करणाऱ्‍या गायीसाठी, गाभण गायीसाठी, वासरांसाठी, कोंबड्यांच्या १ ते ३ महिने वयाच्या पिलांसाठी, वाढीस लागलेल्या २ ते ५ महीन्यांच्या पिलांसाठी, अंडी देणाऱ्‍या कोंबड्यांसाठी इ. [⟶ पशुखाद्य ]. याशिवाय दिवसाचा ठरलेला आहार किती वेळा द्यावा, पाणी केव्हा द्यावे यांसारख्या सामान्य गोष्टींकडे लक्ष पुरविणे या बाबींचा पशूंच्या व्यवस्थापनात अंतर्भाव होतो.

रोगराईपासून संरक्षण : पशुसंवर्धनात निरोगी जनावरांना अनन्यसाधारण स्थान आहे. रोगचिकित्सेपेक्षा रोगप्रतिबंधात्मक उपायांना पशुविकारविज्ञानात आगळे महत्त्व आहे. विशेषतः संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत वरील विधान प्रकर्षाने लागू आहे. रोगावर उपचार करणे त्रासाचे, जिकिरीचे व पुष्कळ वेळा अतिखर्चाचे असते. पशूंच्या अनेक सांसर्गिक रोगांवर रोगप्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. वर्षातून कोणत्या मोसमात कोणत्या रोगांच्या साथी उद‌्भवण्याची शक्यता असते, हे विचारात घेऊन या लसींचा वेळच्या वेळी वापर करणे फायद्याचे ठरते. या लसींची उपाययोजना करून कित्येक पुढारलेल्या देशांतून पशूंच्या काही रोगांचे संपूर्ण निमूलन केले गेले आहे. अमेरिकेतून गायी-गुरांच्या  लाळ रोगाचे निर्मूलन  झालेले आहे. भारतात बुळकांड्या रोगाविरुद्ध देशव्यापी मोहीम आखून या रोगाविरुद्धच्या लसीचा वापर करून या भयंकर हानिकारक रोगाचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न जारी आहेत. ही मोहीम १९५६ पासून सुरू असून काही राज्यांतून या रोगाचे संपूर्ण निर्मूलन झालेले आहे व इतर राज्यांत तो आटोक्यात आला आहे.

पशुसंवर्धनाचे तंत्रशास्त्र : अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, हॉलंड, रशिया या पुढारलेल्या देशांमध्ये पशुसंवर्धन तंत्रशास्त्र दिवसेंदिवस प्रगल्भावस्थेस पोहोचत आहे. निरनिराळ्या पशूंच्या शरीरक्रियाविज्ञानाचा अधिक सखोल अभ्यास होऊ लागला आहे. पशूंना दिल्या जाणाऱ्‍या खाद्यपदार्थांचे मूल्यांक व पशूंच्या पोषण गरजा लक्षात घेऊन आहार ठरविण्यात येत आहेत. आनुवंशिकीय गुणांची पारख करून त्यांचा प्रजननासाठी उपयोग करण्यात येत आहे. शरीरक्रियाविज्ञान, पोषणशास्त्र, आनुवंशिकी, मादीरोगविज्ञान इ. पशुसंवर्धन तंत्रशास्त्राच्या शाखा अस्तित्वात आल्या आहेत. या सर्व शास्त्रांच्या अभ्यासाचे उद्दिष्ट आर्थिक उत्पादन हेच आहे. खाद्यरूपाने देण्यात येणाऱ्‍या कच्च्या मालाचे दूध, मांस, लोकर, अंडी इ. पक्क्या मालात रूपांतर करण्याची गाय, मेंढ्या, डुकरे ही जणू सजीव यंत्रेच झाली आहेत. वर उल्लेखिलेल्या पशुसंवर्धन तंत्रशास्त्राच्या शाखांचे विशेषीकरण झाल्यामुळे त्यांच्या अभ्यासाची सोय पशुवैद्यक महाविद्यालयांतून करण्यात आली आहे. भारतामध्ये गोपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन या धंद्यांचे औद्योगिकीकरण होऊ लागले आहे. अलीकडे बऱ्‍याच राज्यांमध्ये कृषी विद्यापीठे स्थापन करण्यात आली आहेत व त्यांच्याशी संलग्न असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांतून प्रगतीपर संशोधन व संशोधनाचे निष्कर्ष पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याचे विस्तार कार्य यांकडे अधिक लक्ष पुरविले जात आहे. राज्याराज्यातील पशुसंवर्धन खात्यांमार्फत शिबिरे, परिसंवाद, पशुपालकांचे मेळावे यांद्वारा हे तंत्रज्ञान उपयोगात आणले जाऊ लागले आहे. 

मागासलेल्या व विकसनशील देशांतील पशुसंवर्धन आर्थिक दृष्ट्या अधिक उत्पादनशील होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेमार्फत अनेक योजना कार्यान्वित आहेत व त्यांचा फायदा या देशांना होत आहे.

पशूंची उत्पादनक्षमता उच्चतम असूनसुद्धा त्याला योग्य प्रमाणात खाद्य पुरविले गेले नाही, तर उत्पादनात घट होणे अपरिहार्य आहे. भारताचा विचार करता पशुखाद्याची कमतरता हा पशुसंवर्धनाच्या प्रगतीतील प्रमुख अडसर आहे. एका अंदाजाप्रमाणे भारतामधील पशूंच्या पोषणासाठी ८७ कोटी टन चारा व ९·६ कोटी टन खुराकाची आवश्यकता आहे. यापैकी फक्त ३०·९ कोटी टन चारा व १·७३ कोटी टन खुराक उपलब्ध आहे. पिकाखाली असलेल्या एकंदर जमिनीच्या फक्त ४ % जमीन पशूंच्या चाऱ्‍यासाठी उपयोगात आणली जाते. या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने पशूंना हिरवा चारा अधिक प्रमाणात उपलब्ध व्हावा म्हणून लसूण घास, गजराज गवत, पॅरा गवत इ. रसाळ गवतांचे उत्पादन करण्याचे शिक्षण देणारी प्रात्यक्षिक क्षेत्रे, मुरघास करण्याची प्रात्यक्षिके पशुसंवर्धन खात्यामार्फत योजिली जात आहेत. याशिवाय निकृष्ट वळूंचे निर्बीजीकरण (खच्चीकरण), जातिवंत वळूचा कृत्रिम विर्यसेचनाद्वारा मोठ्या प्रमाणात उपयोग, सहकारी संस्थांमार्फत पशुखाद्यांचा पुरवठा, राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत गायी-म्हशी, मेंढ्या, डुकरे इत्यादींच्या पालनसाठी कर्ज पुरवठा इ. अनेक उपायांनी भारतातील पशुसंवर्धन प्रगत करण्याचे प्रयत्न शासनामार्फत होत आहेत. लोकसंख्या वाढीमुळे चराऊ राने पिकांखाली अधिकाधिक उपयोगात येऊ लागली आहेत. यामुळे कमाल उत्पादनक्षम असे थोडेच पशू पाळण्याकडे कल दिसून येऊ लागला आहे व तो आवश्यक दिसतो.


पशुपालनाचा व्यवसाय : पशूंच्या उत्पादनक्षमतेचा संपूर्ण फायदा उठविता आला व खर्चाच्या बाबी आटोक्यात ठेवता आल्या, तरच पशुपालनाचा व्यवसाय किफायतशीर होतो. स्वतःच्या गरजेपुरती आवश्यक इतकी थोडी जनावरे पाळणे व धंदेवाईक दृष्टीने ती मोठ्या प्रमाणावर पाळणे या दोन प्रकारांत मूलतः फरक असल्यामुळे विचारधाराही निराळी असते. पहिल्या प्रकारात त्यांच्यावर करावयाच्या खर्चावर मर्यादा पडल्यामुळे विशिष्ट मर्यादेहून जास्त उत्पन्न त्यांच्यापासून मिळत नाही. मोठ्या प्रमाणावर केलेल्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करून जास्त प्रमाणात फायदा मिळविता येतो. अर्थात पालन, पोषण व व्यवस्थापन यांची शास्त्रीय तत्त्वे काटेकोरपणे पाळावीच लागतात.

याशिवाय उत्पादन केलेल्या वस्तूंना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध असली पाहिजे व तेथील व्यवहारावर योग्य नियंत्रण असले पाहिजे. अन्यथा किंमती घसरू लागतात. डेन्मार्कमध्ये दुग्धव्यवसायाच्या बाबतीत सहकारी संस्थांचे जाळेच निर्माण केले गेल्यामुळे पशुपालकाला दुधाचा योग्य भाव तर मिळतोच पण गिऱ्‍हाइकाचेही हित साधले जाते. भारतातील बहुतेक राज्यांमध्ये दूध उत्पादकाला योग्य फायदा मिळावा यासाठी ग्रामीण भागातून दूध गोळा करण्याची यंत्रणा शासनामार्फत उभी केली आहे. त्यामुळे किंमतीवर नियंत्रण राहून उत्पादकाला योग्य फायदा मिळू लागला आहे. गोळा केलेले दूध शहरामधील ग्राहकांना शासनामार्फत विकले जात आहे. त्यामुळे ग्राहकालाही ते योग्य भावात मिळू शकते [⟶ दुग्धव्यवसाय].

बहुतेक पाश्चात्त्य देशांमध्ये पशूपासून मिळणाऱ्‍या उत्पादनांचे भाव स्थिर ठेवण्याच्या बाबतीत काहीना काही यंत्रणा अस्तित्वात आहे. यामुळे प्रगत पशुसंवर्धनाचे फायदे उत्पादक व ग्राहक या दोहींनाही मिळू शकतात.

संदर्भ : 1. Anderson, A. L . Introductory Animal Husbandry, New York, 1958.

     2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. Vl,Supplement Livestock (including Poultry), New Delhi, 1970.

     3. Davis, R. F. Modern Dairy Cattle Management, New Delhi, 1965.

     4. Lush, J.L . Animal Breeding Plans, Ames, Iowa,1956.

     5. Randhwa, M.S. Agriculture and  Animal Husbandry in India, New Delhi, 1956.

     6. Sen, S. K. and others, Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1962.

क्षीरसागर, श्री.गो दीक्षित, श्री. गं.