पाळीव प्राणी : केवळ छंद, मैत्री, अभ्यास किंवा शौकाकरिता पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांना उद्देशून येथे ‘पाळीव प्राणी’ (आवडते प्राणी, पेट ॲनिमल्स) ही संज्ञा वापरलेली आहे. मनुष्यमात्राचा आणि प्राण्यांचा संबंध इतिहास कालापेक्षाही प्राचीन आहे परंतु त्या काळी ‘पाळीव प्राणी’ या संज्ञेला काही अर्थ नव्हता. रानटी अवस्थेतील मानव प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करीत असे. सु. दहा हजार वर्षांपूर्वी त्याची शिकाऱ्याची भूमिका हळूहळू बदलत जाऊन अन्नाचा प्रश्न सोडविण्यासाठी तो प्राण्यांचे कळप पाहू लागला. गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, लामा, अल्पाका, ससे, डुकरे हे प्राणी मुख्यत्वे दूध, मांस या खाद्यपदार्थांसाठी व चामडी, शिंगे, लोकर इत्यादींच्या उत्पादनासाठी म्हणजे मानवाच्या गरजा भागविण्यासाठी पाळले जाऊ लागले. बैल, घोडा, खेचर, उंट व गाढव हे प्राणी ओझे वाहण्यासाठी आणि शेतीच्या व इतर कामांसाठी चलशक्ती पुरविण्यासाठी त्याने जवळ केले. वाघ, सिंह, अस्वल यांसारखे हिंस्र प्राणी वैयक्तिक रीत्या माणसाळवून त्यांचे पालन तो अर्थोत्पादनासाठी व मनोरंजनासाठी करू लागला.

मनुष्य आज अनेक प्रकारच्या प्राण्यांचे विविध कारणांसाठी पालन करीत आहे. एकमेकांच्या सान्निध्यामुळे दोघांमध्ये भावनात्मक मैत्रीचे संबंध अभावितपणे प्रस्थापित केले जातात. दोघांनाही एकमेकांविषयी आस्था वाटू लागते आणि एक प्रकारचे समाधान मिळते. हा संबंध सहजीवी आहे असे म्हटले, तर वावगे होऊ नये.

सामान्यपणे असे प्राणी वैयक्तिक रीत्या माणसाळवून त्यांची लडिवाळपणे देखभाल केली जाते. सुरुवातीच्या काळात असे आवडते प्राणी त्याने माणसाळलेल्या प्राण्यांपैकीच निवडले असले, तरी आजमितीस तो पाळीव असलेले सर्व प्राणी माणसाळलेलेच आहेत असे नाही. काही वन्य प्राणी जबरदस्तीने बंदिस्त करून पाळण्यात येतात. तरीसुद्धा सान्निध्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबध प्रस्थापित होतात. या मैत्रीत प्राण्याकडून मिळणारा प्रतिसाद त्या त्या प्राण्याच्या स्वभावधर्मानुसार असतो. घोडा, कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांना हवे असलेले सुखसमाधान मानवाकडून मिळाल्याने त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळून ह्या प्राण्यांची मानवाशी अधिक दृढ मैत्री झाली. मानवाच्या इतिहासातील सर्व संस्कृतींमध्ये तो आवडते प्राणी केवळ मैत्रीकरिता पाळीत आल्याचे दिसून येते.

इतिहास : सर्वप्रथम कुत्रा माणसाळविण्यात आला व माणसाने मैत्रीकरिता पाळलेला पहिला प्राणीही तोच असावा. प्राचीन शिल्प व रंगीत चित्रांतील कुत्र्यांच्या आकृतींवरून तेच दिसून येते. मानवी इतिहासाच्या काही पर्वांमध्ये त्याची व प्राण्यांची बरीच जवळीक असल्याचे दिसून येते. ईजिप्तमधील प्राचीन थडग्यांवर ग्रेहाऊंडसारख्या कुत्र्यांची चित्रे रंगविलेली आहेत. तेथील बाराव्या राजघराण्याच्या काळात (ख्रि.पू. १९९१ ते १७८६) तरस व सिंह पाळण्यात येत असत आणि त्यांना शिकविण्यातही येत असे. मांजर याच सुमारास माणसाळविण्यात आले. यानंतर काही काळ ही प्रथा बंद झाली पण पुन्हा २०० वर्षानंतर हॅटशेपसूट राणीच्या काळात ती सुरू झाली, बायबलमध्ये नाथन प्रेषिताच्या तोंडी एका गरीब शेतकरी कुटुंबात लडिवाळपणे पाळलेल्या मादी कोकराचा उल्लेख आहे. महाभारतातील युधिष्ठिराच्या कुत्र्याचा उल्लेख किंवा पुराणातील श्री दत्तात्रेयाबरोबर असलेले कुत्र्यांचे चित्र ही अशा मैत्रीचीच साक्ष देतात.

प्राणी व पाळणारा यांचे परस्परसंबंध : असे प्राणी व ते पाळणारा यांच्या परस्परसंबंधाबाबत अनेक तऱ्हा दिसून येतात. काही मालक त्यांचे प्रमाणाबाहेर लाड करतात, तर काहींना असे वाटते की, या प्राण्यांना खाद्य दिले की, त्यांचे कर्तव्य संपले. पहिलीमध्ये त्या प्राण्याला इतके लाड आवडत नाही, तर दुसरीमध्ये त्याला पाळणाऱ्याविषयी काहीही प्रेम वाटत नाही. माणसाळलेले स्तनी (सस्तन) प्राणी व तसेच पक्षी यांची मानवाशी झालेली मैत्री दृढ व टिकणारी असते. याउलट वैयक्तिक रीत्या मानवीकरण केलेल्या पशूंची मैत्री खऱ्या अर्थाने क्वचितच होऊ शकते. वयाने मोठे झाल्यावर ते रानटी बनतात व मैत्री संपुष्टात येते. सर्कशीमध्ये अशा प्राण्यांकडून करवून घेतलेली कामे त्यांना अर्धपोटी ठेवून व चाबकाचा धाक दाखवून करवून घेतात. मोठ्या जातींच्या कपीविषयी (एक प्रकारच्या माकडाविषयी) हे विशेषच जाणवते. प्राण्यांना शिकविणाऱ्यांचे संबंध भागीदारासारखे असतात कारण शिकविलेल्या जनावराचे खेळ करून दोघेही आपली उपजीविका करीत असतात, तर शास्त्रीय अभ्यासासाठी पाळलेल्या प्राण्यांचे संबंधही मैत्रीचे असू शकतात. हे प्राणिशास्त्रज्ञ कॉनरॅड लोरेन्ट्स यांनी पाळलेल्या जॅकडॉज (कावळ्यासारखा पक्षी) व ग्रेलॅग गीज (हंस पक्षी) यांच्या संबंधावरून दिसून येते. अशीच मैत्री आणखी काही संशोधकांची चिंपँझी आणि गोरिला जातीच्या माकडांबरोबर झाल्याचे दिसून येते. मासे व साप या प्राण्यांना मालकाविषयी फारसे प्रेम वाटत नसावे, असे दिसते याउलट घोडा, हत्ती व कुत्रा यांची उदाहरणे आहेत. अपृष्ठवंशीय (पाठीचा कणा नसलेले) प्राणी, मासे व काही उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणारे) प्राणी यांना सामान्यतः त्यांच्या नैसर्गिक वातावरणासारख्याच कृत्रिम अवस्थेत ठेवण्यात येत असल्यामुळे व त्यांच्या शरीरक्रियात्मक गरजा निराळ्या असल्यामुळे- असे प्राणी पाळले तरी- त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत.

घरगुती पाळीव प्राण्यांपासून मुलांना जबाबदारीची जाणीव होते तसेच लैंगिक संबंध, गर्भावधी, जन्म इ. गोष्टींविषयी शैक्षणिक माहिती अनायसे मिळू शकते. कुत्री व हत्ती फार लवकर शिकतात तर ससे, उंदीर, डुक्कर, कासव यांना कोणत्याही प्रकारची शिकवणूक देता येत नाही [⇨ प्राणि माणसाळविणे].


प्राण्यांचे प्रकार : मित्र, भागीदार, छंद किंवा हौस म्हणून मनुष्य अनेक प्रकारचे प्राणी पाळीत आला आहे. कुणाला कोणता प्राणी पाळावासा वाटेल याचा काही नेम नाही. कुत्रा, मांजर व पक्षी हे घरगुती प्राणी म्हणून जगामध्ये सर्वत्र पाळण्यात येतात. कुत्र्यांच्या शंभरावर जाती असून एक किग्रॅ. वजनाच्या चिहुआहुआ या लहान जातीपासून १०० किग्रॅ. वजनाच्या सेंट बर्नार्ड या दांडग्या जातीपर्यंत सर्व जातींचे कुत्रे पाळण्यात येतात. कुत्र्याच्या खालोखाल मांजराचा क्रमांक लागतो. असे म्हणतात की, कुत्रा माणसाशी मैत्री करतो, तर मांजर घराशी बांधीलकी पत्करते.

सोळाव्या शतकापासून यूरोपमध्ये गाणारे ⇨ कॅनरी पक्षी पाळण्यात येत आहेत व अजूनही हा लोकप्रिय पाळीव पक्षी आहे. मूळचे ऑस्ट्रेलियामधील पण आता सर्वत्र पाळण्यात येणारे हिरवे, निळे व पिवळे बजरीगार पक्षी, तसेच पोपटांच्या ३०० पैकी अनेक जातींचे पोपट, मैना इ. पक्षी पाळण्यात येतात. भारतामध्ये बहुधा हिरव्या रंगाचे लाल चोच असलेले (राघू) पोपट पाळले जातात. यूरोप-अमेरिकेमध्ये मध्य आफ्रिकेतील करड्या रंगाचे किंवा द. अमेरिकेतील ॲमेझॉन पोपट पाळले जातात. पोपटाशिवाय भारतामध्ये साळुंकी, तितर, ससाणा, बुलबुल, कबूतर, पारवा इ. अनेक जातींचे पक्षी पाळले जातात. यांशिवाय अनेक प्रकारचे सर्प, कासव, रंगीबेरंगी मासे, खारी, ससे, गिनीपिग, हॅम्स्टर, जरबिल इ. अनेक प्रकारचे प्राणी शौक म्हणून पाळले जातात.

ब्रिटनमध्ये पाळी प्राण्यांची संख्या २ कोटीच्या घरात असून त्यात अर्धा कोटी कुत्री व तितकीच मांजरे आहेत. अमेरिकेत ही संख्या सात कोटीपर्यंत आहे व त्यात ३ कोटी कुत्री व ३ कोटीच्या वर मांजरे आहेत. ब्रिटनमध्ये अर्ध्या कोटीच्यावर तर अमेरिकेत २ कोटी पक्षी पाळण्यात येतात. यांशिवाय अमेरिकेत ३० लक्ष पाळीव कासवे आहेत. भारतामध्येही (अचूक गणना झालेली नसली तरी) कुत्री, मांजरे, पोपट, माकडे, ससे, अस्वले, साप व इतर काही प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात.

वाघ, सिंह व इतर हिंस्र पशूंचे बच्चे कित्येक वेळा योगायोगाने असहाय्य परिस्थितीत हाती लागतात व त्यांना पाळण्यात येते. मोठे झाल्यावर मात्र काही अपवाद सोडल्यास ते काबूत रहाणे कठीण होते म्हणून त्यांना प्राणिसंग्रहालयासारख्या ठिकाणी नेऊन सोडणे भाग पडते. भारतामध्ये दरवेशी, गारूडी व माकडवाले लोक अनुक्रमे अस्वल, मुंगूस व साप आणि माकड यांचे खेळ करून दोघांचीही उपजीविका करतात.

नरवानर गणातील चिंपँझी, गोरिला व इतर जातींची माकडे केव्हा केव्हा वैयक्तिक रीत्या माणसाळवून पाळली जातात. त्यांच्या विक्षिप्त स्वभावधर्मामुळे ती केव्हा धोकेबाज बनतील याचा नेम नसतो म्हणून सहसा त्यांना घरामध्ये ठेवत नाहीत. यांशिवाय रॅकून, कोॲटिस, स्कंक यांसारखे मांसाहारी प्राणी काही प्रमाणात पाळण्यात येतात.

निरनिराळ्या प्रकारच्या या पाळीव प्राण्यांचे शरीरक्रियात्मक कार्य व स्वभावधर्म यांनुसार त्यांचे खाद्य, राहण्याची व्यवस्था, व्यवस्थापन यांबाबतींतील गरजा निरनिराळ्या आहेत याची जाणीव पालन करणाऱ्याने ठेवणे आवश्यक असते. उष्ण कटिबंधातील सर्पांना अतिथंड हवा चालत नाही. मासे घरगुती प्राणी म्हणून पाळावयाचे असल्यास काचेच्या पेट्यांत चांगले राहतात. पेटीमधील पाण्यातील ऑक्सिजनाचे प्रमाण योग्य ठेवणे जरूर असते. त्यांना त्यांच्या लांबीचया प्रत्येक सेंमी ला २० चौ.सेंमी. जागा द्यावी लागते. उष्ण कटिबंधातील, थंड पाण्यातील, खाऱ्या पाण्यामधील व गोड्या पाण्यामधील जसे मासे असतील त्यानुसार त्यांच्या व्यवस्थापनामध्ये योग्य ते फेरबदल करणे आवश्यक असते. काही प्राण्यांना हाताळलेले अजिबात आवडत नाही, तर काही अंगाखांद्यावर खेळणे पसंत करतात.

कुत्रा धन्यावर प्रेम करतो व त्याच्याशी इमान राखतो. मांजराला रात्री भटकण्याची सवय असते व ते कपटी असते. बजरीगार पक्षी आकर्षक असून ते काही शब्द बोलू शकतात. मैना चांगले बोलू शकते. भारतामध्ये राघू इ. अनेक पोपटांच्या जाती बोलायला शिकू शकतात. पंडित मंडनमिश्रांचा पोपट संभाषण ऐकून स्वतंत्रपणे बोलू शकत असे, अशी दंतकथा आहे.

जगातील सर्व देशांमध्ये बहुसंख्य प्रमाणात पाळण्यात येणाऱ्या कुत्रा व मांजर ह्या प्राण्यांचे प्रजोत्पादन करून विकण्याचा धंदा करणारे लोक सर्व देशांमध्ये आहेत. तसेच बडग्रिगर, पोपट, तितर यांसारखे पक्षी पकडून विकणारे लोकही सर्वत्र आढळतात. पक्षी व वन्य स्तनी प्राणी लहान वयाचे असताना पकडण्यात येतात. पूर्ण वाढ झालेले रानटी प्राणी पकडल्यास ते जगणे मुश्कील हाते. पक्षी लहान असताना त्यांच्या घरट्यातूनच उचलले जातात. मासे, त्यांच्यासाठी पेट्या, त्यांचे खाद्य व ते पाळण्याची माहिती असलेली पुस्तिका विकणारे विक्रते अलीकडे सर्व मोठ्या शहरांमध्ये आढळून येतात.काही देशांमध्ये पक्षी पकडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच काही प्राणी नष्ट होऊ नयेत, या उद्देशाने त्यांच्या आंतरदेशीय व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर या संस्थेमार्फत प्रसिद्ध होणाऱ्या लाल पुस्तकात अशा प्राण्यांची यादी प्रसिद्ध होत असते.

पाळीव प्राणी व कायदा : देशादेशांतून पाळीव प्राण्यांच्या बाबतीत निरनिराळे कायदे अस्तित्वात आहेत. काही देशांमध्ये काही प्राण्यांची आयात करताना त्यांना विशिष्ट काळ विलग्नवासात ठेवणे कायद्याने भाग पडते. बहुधा अलर्क रोग (पिसाळ रोग), लाळ रोग, सिटॅकोसिस (पोपटाच्या जातीच्या पक्ष्यांना होणारा व्हायरसजन्य रोग, शुक रोग) यांसारखा रोगांचा प्रसार या प्राण्यांमार्फत होऊ नये यासाठी ही तरतूद आहे. निर्यात करणाऱ्या देशाने प्राण्यांच्या आरोग्यासंबंधीची प्रमाणपत्रे देणे कायद्याने आवश्यक आहे. स्थानिक कायद्याप्रमाणे कधीकधी काही प्राणी पाळण्यावर संपूर्ण बंदी असते. काही देशांत प्राण्यांना सार्वजनिक जागी मोकळे सोडणे व त्यांची सार्वजनिक वाहनांतून वाहतूक करणे यांवर बंदी आहे. पुढारलेल्या बऱ्याच देशांमध्ये कुत्रा, मांजर यांसारखे काही प्राणी पाळण्यासाठी परवाना काढणे कायद्याने आवश्यक आहे [⇨ कुत्रा]. पाळीव प्राण्यांना-विशेषतः बंदीवासात पाळलेल्या प्राण्यांना- उपलब्ध करून द्यावयाच्या सोयींसबंधीच्या कायद्यांचे पालन योग्य रीतीने होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था काही देशांमध्ये स्थापन करण्यात आल्या आहेत.


पाळीव प्राण्यांचे रोग व मानवी आरोग्य : शौकाकरिता पाळलेल्या प्राण्यांना होणाऱ्या रोगांचे दोन प्रकार मानता येतील : त्यांना स्वतःला होणाऱ्या रोगांचे दोन प्रकार मानता येतील : त्यांना स्वतःला होणारे व त्यांच्यापासून मानवाला होणारे. माणसाळलेल्या प्राण्यांना होणाऱ्या व त्यांच्यापासून मानवाला होणारे. माणसाळलेल्या प्राण्यांना होणाऱ्या रोगासंबंधीची बरीच माहिती उपलब्ध असली, तरी वन्य पशुपक्ष्यांना होणाऱ्या रोगासंबंधीची माहिती बरीच अपुरी आहे.

कुत्री व मांजरे यांना व्हायरसामुळे अलर्क नावाचा प्राणघातक रोग झाल्यामुळे ती पिसाळतात व माणसांना चावतात. यामुळे माणसांनाही अलर्क रोग होतो [⇨ अलर्क रोग]. लेप्टोस्पायरोसिस या कुत्र्याच्या रोगाचे सूक्ष्मजंतू रोगी कुत्र्याच्या मूत्रावाटे बाहेर पडतात. माणसांना झालेल्या जखमा अशा मूत्राने दूषित झाल्यास माणसांना रोगसंपर्क होऊन त्यांना वृक्क (मूत्रपिंड) या यकृताचे आजार होतात. कुत्र्यांना होणाऱ्या काही अंकुशकृमींच्या जीवनचक्रातील अळी अवस्थेमुळे लहान मुलांमध्ये त्वचा रोग, तर दुसऱ्या एका पट्टकृमीच्या जीवनचक्रातील अवस्थेमुळे द्राक्षार्बुद रोग (द्रवयुक्त गाठ होणारा रोग) मनुष्यामध्ये होतो. कुत्र्याच्या लिशमॅनियासिस नावाच्या रोगाचे रक्तामध्ये दिसणारे रोगकारक प्रजीव (एकपेशीय प्राणी) वालुकामाशीमार्फत माणसाच्या रक्तात टोचले जातात व माणसांना रोगसंपर्क होतो. यकृतविकार, प्लीहा (पानथरी) वाढणे व उच्च ताप ही लक्षणे दिसतात. काही वेळा त्वचेवर व्रण होतात व ते लवकर बरे होत नाहीत. भारतामध्ये आसाम, बंगाल, ओरिसा वगैरे राज्यांत वालुकामाशीच्या जातीचे कीटक असून १९०३ च्या सुमारास कलकत्त्याजवळील डमडम येथे व्रण झालेले अनेक रोगी प्रथमत: आढळले होते.

सिटॅकोसिस हा व्हायरसजन्य रोग पोपट, पॅराकीट, कबुतरे वगैरे पिंजऱ्यातील पक्ष्यांमध्ये दिसून येणारा आहे. संसर्गाने तो माणसांना होतो व न्यूमोनिया हे या रोगाचे मुख्य लक्षण माणसामध्ये दिसून येते. ऑस्ट्रिया, इटली, फ्रान्स वगैरे देशांमध्ये १९२९ – ३० मध्ये या रोगाची साथ पसरली होती. माणसांना होऊ शकणाऱ्या काही व्हायरसजन्य रोगांच्या रोगकारक व्हायरसांचे कासव व सर्प हे रोगवाहक असल्याचे आढळले आहे. माणसांना होणारे काही श्वसन तंत्राचे (श्वसनसंस्थेचे) संसर्गजनय रोग संपर्कामुळे कुत्री व मांजरे यांना होतात व त्यांच्याकडून पुन्हा माणसांना होतात. गजकर्णासारखे काही त्वचेचे रोग मांजरामुळे होत असावेत असा कयास आहे. अमेरिकेतील एका पाहणीत असे आढळून आले आहे की, शहरी वस्तीमध्ये १०% तर ग्रामीण भागामध्ये ७०% त्वचेच्या रोगाचे कारण मांजर हा प्राणी होता. जपानमध्ये १९३१ मध्ये पसरलेल्या एका अतिसाराच्या साथीला आफ्रिकेहून आणलेली माकडे कारणीभूत असल्याचे दिसून आले. सापाची लाळ किंवा विष्ठा यांच्या संपर्कामुळे साप पाळणाऱ्यांना पोटदुखीचा विकार झाल्याचे दिसून आले आहे. [⇨ प्राणिजन्य मानवी रोग].

संदर्भ :  1. Levinson, B.M. Pets and Human Development, Spring Field, 1972.  2. Mathews, R.K. Wild Animals as Pets, New York, 1971.  3. Whiteney, L.F. Pets, New York, 1971.

दीक्षित, श्री.गं.