भूपति पंडित : (अठरावे शतक). ओडियातील प्रेम पंचामृत ह्या प्रख्यात काव्याचा कर्ता. भूपती पंडित हा मूळचा उत्तर प्रदेशातील सारस्वत ब्राह्मण होता. त्याच्या गुरूचे नाव चैतन्य दास. तीर्थयात्रेनिमित्त तो पुरीस आला व तेथेच राजाच्या दरबारी कवी म्हणून राहिला. मातृभाषा हिंदी असूनही त्याने ओडिया भाषेवर प्रभुत्व मिळवून तीत नितान्तसुंदर अशी काव्यरचना केली. राधाकृष्ण व गोपी यांच्या रासलीलांवर त्याने रचलेले प्रेम-पंचामृत हे ओडियातील अत्यंत सरस असे काव्य गणले जाते. ⇨ जगन्नाथदासांनी ओडियात प्रख्यात आणि लोकप्रिय केलेल्या ‘नवाक्षरी भागवत’ नावाच्या वृत्तात ते रचले आहे. त्याची भाषा विशुद्ध, प्रौढ व आलंकारिक आहे. कृष्णाच्या रासलीलांवरील सर्व काव्यांत भूपत्ती पंडिताच्या प्रेम-पंचामृत काव्याचे स्थान फार वरचे मानले जाते. त्याची प्रतिभा, पांडित्य व भक्तिभाव यांचा प्रत्यय त्याच्या ह्या काव्यात येतो. ह्याव्यतिरिक्त त्याने कृष्णाच्या मथुरेतील वास्तव्यावर एक भूपति चौतिसा नावाचे काव्यही लिहिले आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं) सुर्वे, भा. ग (म.)