भिल्ली भाषा : आपल्याकडील बहुतांश भाषांची नावे भौगोलिक आहेत. भिल्ली हे तसे नाही. ते जातिवाचक आहे. भिल्लांची भाषा ती भिल्ली. मात्र जवळजवळ सर्व भिल्लजातीय लोक एका विशिष्ट भौगोलिक मर्यादेतच सापडतात. ही मर्यादा म्हणजे महाराष्ट्राचा उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश, गुजरातच्या पूर्वेकडील राजस्थानला लागून असलेला जंगली प्रदेश आणि मध्य प्रदेशाचा महाराष्ट्रालगतचा डोंगराळ भाग.

 आजच्या भिल्ली भाषा आर्यवंशीय म्हणजेच संस्कृतोद्‍भव आहेत. पण भिल्ल लोक मुळात आर्यभाषिक नव्हते, हे निश्चित. त्यांची ध्वनिव्यवस्था व शब्दसंग्रहातील काही शब्द यांवरूनही हे स्पष्ट होते.

 भिल्ली भाषा अनेक आहेत. त्यांतील प्रत्येकीचे स्वरूप ती ज्या शेजारच्या महत्त्वाच्या आर्यभाषेच्या प्रभावाखाली आली, तिच्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण बनले आहे. या महत्त्वाच्या भाषा गुजराती, मराठी, राजस्थानी व हिंदी ह्या होत. कित्येक ठिकाणी एखादी भिल्ल बोली दोन आर्यभाषांच्या दरम्यान आढळते. उदा., गुजराती व मराठी किंवा गुजराती व राजस्थानी यांच्या सीमावर्ती भाषा. मग अशा भाषेचे स्वरूप स्वाभाविकपणेच संमिश्र बनते आणि तिचे वर्गीकरण करताना अडचण उभी राहते. या ठिकाणी ग्रीअर्सनने स्वीकारलेला वास्तव दृष्टीकोण व्यवहार्य वाटतो. त्याने वेगवेगळ्या भिल्ली भाषांचे योग्य ते वर्णन करून त्यांचे शेजारच्या मोठ्या भाषांशी असलेले नाते तर दाखवले आहेच, पण अशा सर्व भाषांचा एक समूह करून त्याला स्वतंत्र स्थान दिले आहे. या भाषांची माहिती व नमुने लिंग्विस्टिक सर्व्हेच्या खंड ९, भाग ३ मध्ये देण्यात आलेले आहेत.

 पण त्यानंतर या समूहाचा नीट अभ्यास झाला नसल्याने त्यात परस्परभिन्न अशा बोली किती आहेत, त्या कुठे व किती लोकांकडून बोलल्या जातात, शेजारच्या मोठ्या भाषांच्या दृष्टीने त्यांचे वर्गीकरण कोणते, हे प्रश्न अजून शिल्लकच आहेत. एखादी मोठी भाषा बोलणारा अभ्यासक जेव्हा अशा एखाद्या बोलीचा अभ्यास करू लागतो, त्यावेळी त्याला ती आपल्याच भाषेशी संबंधित आहे असे वाटते. काही अंशी हे अभिनिवेशाने असेल, तर काही अंशी आपली भाषा व ही परकीय भाषा यांच्यातील साम्यस्थळे ठळकपणे दिसत असल्यामुळे असेल. डांगीच्या वादाच्या वेळी हे दिसून आले आहे. एकभाषिक राज्ये करण्याच्या संदर्भात हे प्रश्न तीव्र बनतात.

 केवळ भाषिक कुतूहलाने प्रेरित झालेले तज्ञ इकडे वळले तरच हे काम नीट होऊ शकेल. पण इकडे वळतात ते सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्ते किंवा धर्मप्रसारक. ग्रीअर्सनने पूर्वग्रह न ठेवता सोयीस्कर विभाग कल्पून नमुने गोळा केले आणि त्यांची छाननी करून निष्कर्ष काढले. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात भिल्लीचे भाषिक चित्र स्पष्ट झाले.

 त्याचे भिल्लीचे नमुने पुढील ठिकाणचे आहेत : महीकांठा, मेवाडचा डोंगराळ प्रदेश, कोत्रा (मेवाड), गरासिया किंवा न्यार (मारवाड), माग्री (मेरवाड), रतलाम, बागडी, धर (भोपवाड), सूंठ (रेवाकांठा), जालोद आणि दोहद (पंचमहाल), झाबुवा (भोपवाड), अलिराजपूर व बरवानी (भोपवाड), भिलाली (अलिराजपूर व बरवानी), राठवी भिलाली (बरवानी) राठवी (छोटा उदेपूर), चारणी (पंचमहाल), आहीरी (कच्छ), बोरेल (छोटा उदेपूर), पावरी (खानदेश), भिल्ली (राजपिपळा), नाइकडी (लूणावड, जंबूघोडा, पंचमहाल व सुरत), मावची (खानदेशी), नोरी (भोपवाड), रानीभील (बडोदे), चोधरी (सुरत), गामटी किंवा गामटडी (सुरत व बडोदे), धोडिया, कोंकणी, पंचाली, खावट, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार), बावरी (पंजाब व मुझफरनगर), हबुडा (गंगेचा दोआब), पारधी किंवा टाकनकारी (वऱ्हाड), सियालगिरी (मिदनापूर, बंगाल).

 ग्रीअर्सनने दिलेली भिल्ली भाषिकांची संख्या २० ते २५ लाखांच्या दरम्यान आहे. भारत सरकारच्या १९६१ च्या जनगणनेतही जवळजवळ हीच संख्या आढळते. पण कोष्टकांची वेगळी मांडणी व वर्गीकरणातील फरक यांमुळे हे झाले असावे. नाहीतर ही संख्या मूळच्या दुप्पट किंवा तिप्पट (६० ते ७५ लाख) व्हायला पाहिजे होती. या लेखात विवेचनाच्या सोयीसाठी नमुना म्हणून महीकांठाची भिल्ली घेतलेली आहे. याशिवाय ⇨अहिराणी भाषा (खानदेशी) व ⇨डांगी बोली या नोंदी पूर्वी येऊन गेलेल्या असल्यामुळे भिल्ली भाषासमूहाचे ज्ञान नीट होण्यास निश्चितच मदत होईल.

 ध्वनिव्यवस्था : ध्वनिव्यवस्थेची केवळ काही वैशिष्ट्येच या ठिकाणी दिली आहेत. स्वररचना किंवा व्यंजनरचना यांचा साचा स्थूलमानाने भारतीय आर्य प्रकारचा आहे हे लक्षात ठेवावे.

 स्वर : सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य हे, की ज्या ठिकाणी गुजरातीत अ किंवा आ आहेत तिथे ओ किंवा त्याचे किंचित विवृत्त रूप आ सापडतात : गु. पग, भि. पॉग ‘पाय’ गु. पण, भि. पॉण ‘परंतु’ गु. पाणी, भि. पॉणी ‘पाणी’ गु. आंख, भि. ऑख ‘डोळा’.

 अंत्य दीर्घ ई चा उच्चार ए केला जातो, तर अंत्य दीर्घ ए अनुनासिक उच्चारला जातो : सोरी &gt सोरे ‘मुलगी’, वे &gt वें ‘ती’. काही गुजराती पोटभाषांतही ही वैशिष्ट्ये आढळतात.


व्यंजन : अघोष तालव्य व्यंजने नाहीत. त्यांच्या जागी स येतो : गु. चोर, भि. सोर ‘चोर’ गु. छोरूं, भि. सोरूं ‘मूल’.

  च्या जागी स किंवा झ येतो : गु. जुनुं, भि. झुनुं ‘जुने’. ज नंतरच्या य चा उच्चार होत नाही.

 स्वरमध्यस्थ ड च्या जागी र येतो : गु. घोडो, भि. खोरो ‘घोडा’.

 गुजराती ह दोन प्रकारे दर्शवला जातो. हा ह जर मूळ ह पासून आला असेल, तर तो दुबळा होऊन लोप पावतो : गु. हुं हतो, भि. हुं अतो ‘मी होतो’. पण कित्येकदा गुजराती स च्या जागीही ह येतो व पुढे त्याचे घर्षक ख मध्ये परिवर्तन होते : गु. सोनुं, भि. होनुं, खोनुं ‘सोने’ गु. बेस, भि. बेह ‘बस’.

 बरेच वेळा सघोष व्यंजनाच्या जागी अघोष व्यंजन येते : डाही &gt टाही ‘गाय’ गु. लीदुं, भि. लीतुं ‘घेतले’. पण बरेच वेळा असे सघोष व्यंजन महाप्राणयुक्त असते : गु. भाई, भि. फाई ‘भाऊ’ गु. धोळुं, भि. थोळुं ‘पांढरे’ गु. घेर, भि. खेर ‘घर’.

 व्याकरण : नाम : नामांत मराठी व गुजरातीप्रमाणे तीन लिंगे व दोन वचने आहेत. विभत्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यये जोडून नामाचे कार्यदर्शक रूप तयार होते. नामाचा अंत्य वर्ण व्यंजन किंवा स्वर असू शकतो. पण काही बाबतीत अंत्य स्वर लिंगवचन दाखवतो : ए. व. पु. ओ, स्त्री, ई, न. ऊं-अ. व. पु. आ, स्त्री. (ओ), न. आं. उदा सोरो ‘मुलगा’- सोरा सोरी ‘मुलगी’ – सोरी (ओ) सोरूं ‘मूल’-सोरां.

 काही कार्यदर्शक प्रत्यय असे : कर्तृवाचक व प्रत्यक्ष कर्मवाचक प्रत्यय शून्य अप्रत्यक्ष कर्मवाचक ने ‘ला’ करणवाचक ए ‘ने’ पंचमी खुं ‘ऊन’ सप्तमी मां ‘त’ स्वामित्ववाचक नो, नी, नुं-ना, नी, नां ‘चा, ची, चे-चे, च्या, ची.’

 विशेषण : पुल्लिंगी एकवचनी ओकारांत विशेषणे स्वामित्वदर्शक प्रत्ययाप्रमाणे विकारक्षम आहेत : भालो ‘चांगला’, भाली, भालूं-भाला, भाली, भालां सामान्यरूप पु. न. भाला, स्त्री. भाली. 

 सर्वनाम : पुरुषवाचक सर्वनामे पुढीलप्रमाणे :

 

ए. व. 

अ. व. 

१ 

हुं

अमां, अमें, अपडां 

तू

तमां, तमें 

(पु.) वो, वी

वा

 

(स्त्री.) वे, वी

वी 

 

(न.)-

वां

तृतीय पुरुषी पेलो ‘तो’ – पेला पेली ‘ती’, पेलुं ‘ते’-पेलां ही रूपेही वापरतात.

इतर रूपे : (१) में, मएं (कारण), मय, मने ‘मला’, मारो ‘माझा’, इ. अमा, आमे, आपडे (करण), अमे ‘आम्हाला’, अमारो ‘आमचा’ इत्यादी. (२) तें, तएं (करण), तय ‘तुला’, तारो, थारो ‘तुझा’ इ. तमां, तमें (करण), तमे ‘तुम्हाला’, तमारो ‘तुमचा’ इत्यादी. (३) वणे, विणे ‘त्याने’, वणीए ‘तिने’, ‘वीणे’, वणाए ‘त्याला’ वणीए ‘तिला’, वीणो, वणानो ‘त्याचा’, वणीनो ‘तिचा’, वणांए, स्त्री. वणीआंए ‘त्यांनी’, ‘त्यांना’, वणानो, स्त्री. वणीआंनो ‘त्यांचा’.

कुण, कोण ‘कोण’, खुं ‘काय’.


क्रियापद : क्रियावाचक नामाचा वुं हा प्रत्यय काढून धातूरूप मिळते : होवुं ‘असणे’, हो- पडवुं ‘पडणे’, पड-, इ. क्रियापदांची रूपे सर्वसामान्य भारतीय आर्य भाषांच्या प्रक्रियेनुसारच होतात. काही रूपे सहायक क्रियापदांचा आधार घेऊन सिद्ध होतात. खाली काही निवडक प्रकार दिले आहेत :

हो – ‘अस –’

 

वर्तमान

भूत

भविष्य

आज्ञा

ए. व. १

खुं

अतो

अरवी, होइख, अहजे

 

खे

अतो

अखे

हो, होजो

खे

अतो

अखे

 

अ. व.१

खां, खाइये

अता

अखां

हो, होजे

खो

अता

अखो

 

खें, खे

अता

अखें

 

पड्-‘पड-’: वर्तमान ए. व. १ पडुंखुं २-३ पडे खे-अ. व. १ पडां खां २ पडो खो ३ पडें खें भूत ए. व. १-३ पडज्यो – अ. व. १-३ पडज्या भविष्य ए. व. १ पडी (ख), पडखी २ पडी (ख), पडखे ३ पडखे क्रियावाचक नाम पडवुं ‘पडणे’ धातुसाधित रूपे पडतो ‘पडत’, पडज्यो, पडेलो ‘पडलेला’ पडवानो ‘पडणारा (पडायच्या बेतात)’ पडतां ‘पडल्यावर’.

अव्यय वाचक रूपे पडी, पडीने, पडीनें ‘पडून’ ही आहेत.

वाक्यरचना : एक आदमन्ये बे सोरा अता. नें अणमांहा (ईमांहा) नोंने सोरे ईना बापनें केज्युं, ‘आता, मारे पांतिए आवे ई तमारे पुंजीनो फाग मय आलो’. र्ने वर्णे पोतानी पुंजी बेयांर्ने वांटी आल्यी. र्ने थोरा दन पस्से ई नोंने सोरे खेतो माल फेगो केद्यो (कीदो) र्ने वेगळा देखमां गिज्यो र्ने उं ररांखनांमां वणानो माल वेडकी नोंख्यो.

भाषांतर : एका माणसाला दोन मुलगे होते. त्यांतल्या लहान मुलाने त्याच्या बापाला म्हटले, ‘बाबा, माझ्या वाट्याला येतो तो तुमच्या मिळकतीचा भाग मला द्या’. आणि त्याने स्वतःची मिळकत दोघांत वाटून दिली. आणि थोड्या दिवसांनंतर त्या लहान मुलाने माल गोळा केला आणि वेगळ्या देशात गेला आणि तिथे खाण्यापिण्यात आपला पैसा उधळून टाकला.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Ed. Linguistic Survey of India, Vol. IX, Part III, Delhi, 1968.           

            2. Thomson, Rev, Char. S. Rudiments of the Bhilli Language, Ahmedabad, 1895.

कालेलकर, ना. ग