नरसिंहाचार्य, पुरोहित तिरुनारायण अयंगार: (१७ मार्च १९०५ –    ). आधुनिक काळातील प्रसिद्ध कन्नड कवी, संगीतिकाकार, निबंधकार आणि समीक्षक. मंड्या जिल्ह्यातील मेलुकोटे येथे एका सुसंस्कृत घराण्यात त्यांचा जन्म झाला. ‘पु. ति. न.’ हे त्यांचे काव्यनाम होय. मातृभाषा तमिळ असूनही त्यांनी कन्नड साहित्यात आपल्या लेखनाने मोलाची भर घातली. धर्मशास्त्र, तर्कशास्त्र, भारतीय तत्त्वज्ञान, साहित्य इ. विषयांची त्यांना विशेष आवड आहे आणि या विषयांचा त्यांचा व्यासंगही सखोल आहे. रामायण, महाभारत, भागवत हे प्राचीन ग्रंथ तसेच कालिदास, शेक्सपिअर, गटे इ. अमर कवी-नाटककार यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आहे. १९२६ मध्ये ते म्हैसूर विद्यापीठातून बी.ए. झाले. बी.ए. होताच त्यांनी सैनिकी लेखाखात्यात नोकरी स्वीकारली. ३३ वर्षे त्यांनी विविध हुद्यांवर या खात्यात नोकरी केली तथापि त्यांच्या मनाचा कल साहित्य, संगीत, नृत्य यांकडेच होता. सेवानिवृत्तीनंतर १९६६ ते ७१ पर्यंत त्यांनी म्हैसूर विद्यापीठात इंग्लिशकन्नड डिक्शनरीच्या संपादनाचे काम केले.

त्यांच्या सुरुवातीच्या कविता प्रबुद्ध कर्नाटक नावाच्या नियतकालिकातून प्रकाशित होत. कन्नडमधील आधुनिक काव्याचे शिल्पकार म्हणून द. रा. बेंद्रे, के. व्ही. पुट्टप्प आणि पु. ति. नरसिंहाचार्य (नरसिंहाचार) या त्रयीचा निर्देश केला जातो. पु. ति. न. यांनी विपुल काव्यनिर्मिती केली. सात्त्विक प्रवृत्ती, सूक्ष्म दृष्टी व वेधक कल्पकता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांच्या भावकवितेवर पाश्चात्त्य प्रभाव असला, तरी तिची प्रेरणा मात्र मुख्यत्वे भारतीयच आहे. निसर्गाच्या विविध छटांचे विलोभनीय दर्शन त्यांच्या सर्वच भावकवितेत घडते. त्यांनी थोडीफार राष्ट्रीय आणि सामाजिक कविताही लिहिली आहे तथापि निसर्ग व जीवन यांबाबत अंतर्मुख होऊन, चिंतनपर कविता लिहिण्याचाच त्यांचा खरा पिंड असल्याचे दिसते. संस्कृत शब्दांच्या अतिवापरामुळे त्यांची कविता काही स्थळी दुर्बोध झाली आहे. हणंत (१९३३), मांदळिरु (१९३६), शारद यामिनि (१९४४), गणेशदर्शन (१९४७), रससरस्वती (१९५४), मलेदेगुल (१९५५), हृदयविहारी (१९६०) व इरुळ मेरगु हे त्यांचे काव्यसंग्रह असून त्यांत त्यांच्या भावकविता व प्रदीर्घ कविता संगृहीत आहेत.

त्यांनी सु. पंधरा संगीतिका (पद्यनाट्ये) लिहिल्या. त्यांतील अहल्ये (१९४१), कवी मत्तु दाणिय बिनद (१९४३), गोकुल निर्गमन (१९४५), शबरी (१९४६), विकटकवि विजय (१९४८), हंसदमयंती मत्तु इतर रूपकगळु (१९६५), रामपट्टाभिषेक (१९६७) इ. विशेष उल्लेखनीय होत.

रामाचारित्र नेनपु (१९३१) हा त्यांचा निबंधसंग्रह विशेष गाजला. रथसप्तमी मत्तु इतर चित्रगळु (१९४५) आणि इचलु मरद केळगे (१९४९) हे त्यांचे निबंधसंग्रहही दर्जेदार असून फार लोकप्रिय आहेत. धेनुकपुराण (१९६९) हा त्यांचा गद्यग्रंथही उल्लेखनीय आहे. काव्यकुतूहल (१९६३) हा त्यांच्या साक्षेपी समीक्षापर लेखांचा संग्रह आहे. यांशिवाय त्यांनी भगवद्‌गीतेचा आणि गटेच्या फाउस्टचाही (फक्त १ भाग) कन्नड अनुवाद केला आहे.

साहित्यनिर्मितीसाठी १९६६ मध्ये त्यांना राज्य पुरस्कार लाभला. १९६७ मध्ये त्यांच्या हंसदमयंती मत्तु इतर रूपकगळु या संगीतिकासंग्रहास साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला. म्हैसूर विद्यापीठाने त्यांना १९७२ मध्ये सन्मान्य डी. लिट्. देऊन त्यांचा गौरव केला.

सु. रं. एक्कुंडी यांनी १९५७ मध्ये त्यांच्यावर श्री. पु. ति. नरसिंहाचार नावाचे एक छोटे पुस्तक प्रकाशित केले. १९७३ मध्ये यदुगिरीय वीणे नावाचा त्यांचा गौरवग्रंथ प्रकाशित झाला. चौतीस कवींनी पु. ति. न. यांच्याविषयी लिहिलेल्या गुणगौरवपर कविता त्यात संगृहीत आहेत. पु. ति. न. यांचे अत्यंत निकटचे स्नेही आणि प्रख्यात कन्नड लेखक गोरूर रामस्वामी यांनी या ग्रंथास एक अभ्यासपूर्ण विस्तृत प्रस्तावना लिहिली असून तीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर चांगला प्रकाश टाकला आहे.

बेंद्रे, वा. द.