लहंदा भाषा : उत्तर-पश्चिम भाषासमूहातील एक अर्वाचीन इंडो-आर्यन (आर्य-भारतीय) भाषा. लहंदा (किंवा लहंदी) पाकिस्तानात अक्षांश २८° उ. ते ३४° उ. आणि रेखांश ७०° पू. ते ७४° पू. या भागात बोलली जाते. लहंदा व लहंदी या शब्दांचा अर्थ पश्चिम वा पश्चिमी. काही भाषावैज्ञानिक या भाषेला पश्चिमी पंजाबी म्हणतात. सामान्यतः लहंदी भाषक आणि पंजाबी भाषक या दोहोंचाही निर्देश पंजाबी भाषक म्हणून केला जातो. सध्याच्या पाकिस्तानात ‘सिरैकी’किंवा ‘सरैकी’असे नाव तिला अधिक प्रचलित आहे. स्मिर्नोव्हने द लहंदी लँग्वेज (१९७५) या ग्रंथात पाकिस्तानात १९७३ मध्ये लहंदा भाषक सु. एक कोटी तील लाख होते, असे अनेक पुरावे देऊन पटवून दिले आहे आणि भारतातही ती वोलणारे काही लाख लोक असावेत, असे म्हटले आहे.

 

हरदेव बहरी यांच्या लहंदी फोनटिक्स (१९६३) या ग्रंथात शेख इक्राम-उल-हक यांचे मत उद्धृत केले आहे, त्यानुसार मुलतानी (ही लहंदाची मुख्य बोली असल्याने लहंदालाच पुष्कळ लोक मुलतानी म्हणतात.) ही पश्चिम पाकिस्तानात फार मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. लहंदीमध्ये लिखित वाङ्मय मात्र निर्माण झालेले नाही.

 

लहंदा बोलींचे दोन गट पडतात :  मैदानी प्रदेशातील दक्षिणेचा गट व डोंगराळ उत्तरेचा गट. दक्षिणी गटाच्या तीन प्रमुख बोली आहेत : थळी, जटकी आणि मुलतानी ही प्रमुख वाङ्मयीन बोली तसेच मुलतानीला निकट अशा खेत्रानी, जाफिरी इ. दुय्यम बोली. उत्तरेकडील गटात पोठवारी, छिभाली, पुंची, अवाण्कारी, सोहै, लवणपर्वतीय शहापुरी, घेबी, धनोची, धन्नी, पेशवरी हिंडको, तिनौली आणि धूण्डी/कैराली या येतात. हे वर्गीकरण स्मिर्नोव्हवरून घेतलेले आहे. त्याच्या मते ग्रीअर्सनने उत्तरेच्या गटाची उत्तर-पूर्व व उत्तर-पश्चिम अशी उपगटांत केलेली विभागणी टिकण्याजोगी नाही.

 

उत्तर-दक्षिण गटांतील महत्त्वाचे फरक पुढीलप्रमाणे : (१) उत्तर गटात अनेक नामांना सामान्यरूपात – ‘ए’ किंवा ‘इ’ प्रत्यय लागतात  (२) पष्ठीचा प्रत्यय हा साधारणतः दक्षिणेकडे – ‘दा’ तर उत्तरेकडे – ‘ना’ आहे (३) दक्षिणेत वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषण – ‘दा’ प्रत्ययान्त आहे तर उत्तरेत – ‘ना’ प्रत्ययान्त आहे (४) उत्तरेकडील काही बोलींत मूर्धन्य ‘ण’ उच्चाराची प्रवृत्ती दिसते. उदा., दक्षिणेकडे ‘कोर’ (कोण) उत्तरेकडे कोण (५) उत्तरेकडील एक प्रसिद्ध बोली अवाण्कारी (बहरी हरदेव बहरींच्या लहंदी फोनॉलजीलहंदी फोनेटिक्स या पुस्तकांवरून) हिच्यात तीन शब्दस्वर (टोन) आहेत तर दक्षिणी लहंदात दोन शब्दस्वर आहेत (६) शब्दसंग्रहातील फरकांची काही उदाहरणे खालील तालिकेत दिली आहेत :

जाणे 

उत्तरी-गचणा- जुळण 

दक्षिणी-वंजुण 

येणे 

अचणा 

आवुण 

शकणे 

हगण 

सवकुण 

लहंदा आणि निकटवर्ती पंजाबी यांमधील फरक पुष्कळच आहेत. त्यांतील काही ठळक असे :

 

(१) लहंदात विश्लेषणात्मक रूपांपेक्षा संश्लेषणात्मक रूपे वापरण्याकडे जास्त कल. (२) लहंदामध्ये अंतःस्फुटांचे अस्तित्व.(३) सार्वनामिक प्रत्ययांचा वापर. (४) -स-वर आधारलेले (पंजाबीत-ग-) भविष्यकालीन प्रत्यय. (५) अस्तिवाची क्रियापदाचे नकारात्मक विकार. (६) -ई-मधील जुना कर्मणी प्रयोग टिकवून धरणे. (७) -ने-सारखे उत्तरयोगी न वापरता कर्मणी रचनेत कर्तृवाचक रूप वापरणे.

पहा:  इंडो – आर्यन भाषासमूह पंजाबीभाषा मुलतानी बोली.

संदर्भ  : 1. Bahri, Hardev,  Lahndi Phonetics, Allahabad, 1963.

            2. Bahri, Hardev, Lahndi Phonology, Allahabad, 1962.

            3. Grierson, George A. Linguistic Survey of India, Vol. III. Part I: Indo-Aryan Family: North-Western Group : Sindhi and Lahnda, Delhi, 1968.

            4. Smirnov, U. A. The Lahndi Language, Moscow, 1975.

            5. Wilson, James, Grammar and Dictionary of Western Panjabi as Spoken in the Shahpur  District : With Proverbs, Sayings,  and Verses,

                Lahore, 1899.

 

दासगुप्त, प्रबाल (इं.) रानडे, उषा (म.)