शिवशंकर पिळ्ळा तकळी

तकळि, शिवशंकर पिळ्ळा : (१४ एप्रिल १९१४– ). आधुनिक काळातील प्रसिद्ध मलयाळम् कादंबरीकार व लघुकथाकार. जन्म केरळमध्ये तकळी ह्या गावी. त्रिवेंद्रम येथील महाविद्यालयातून वकिलीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर अधिवक्ता म्हणून ते व्यवसाय करू लागले. आधुनिक पाश्चात्त्य साहित्यातील समाजवादी आणि वास्तववादी प्रवाहांपासून ज्या अनेक मलयाळम् साहित्यिकांना प्रेरणा लाभली, त्यांमध्ये तकळींचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. फ्रेंच वास्तववादाचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला विशेषतः मोपासांच्या साहित्याने ते अधिक प्रभावित झाले. प्रसिद्ध मलयाळम् पत्रकार आणि केसरी ह्या मलयाळम् पत्राचे संपादक ए. बालकृष्ण पिळ्ळा यांच्यापासून तकळींना साहित्यनिर्मितीसाठी उत्तेजन मिळाले. ए. बालकृष्ण पिळ्ळांच्या प्रेरणेने पी. केशवदेव, पोनकुन्नं वर्की, एस्. के. पोट्टक्काट्‌टू, चंगम्पुळ कृष्णपिळ्ळा, वैक्कम् बशीर यांसारखे जे आधुनिक साहित्यिक त्रिवेंद्रममध्ये एकत्र जमत, त्यांमध्ये तकळींचाही सामवेश असे. साहित्य अकादेमीचे ते सदस्य होते. सध्या त्यांचे वास्तव्य अंबलप्पुळ (केरळ) येथे आहे.

आपल्या लेखनाची सुरुवात तकळींनी कथालेखनाने केली. समाजातील तथाकथित लब्धप्रतिष्ठित लोकांच्या स्वैर व विलासी जीवनाचे भेदक चित्रण त्यांनी आपल्या कथांतून केले आहे. स्पष्टोक्ती, साधी परंतु ओजस्वी भाषाशैली, परखड निवेदन इत्यादींमुळे त्यांच्या लघुकथा वाचकांच्या मनाची विलक्षण पकड घेतात. प्रस्थापित रूढींवर त्यांनी केलेल्या प्रखर टीकेमुळे काही काळ त्यांच्या लघुकथांनी मलयाळम् समाजात खळबळ माजविली होती. आधुनिक मलयाळम् कथालेखकांत तकळींना मानाचे स्थान आहे. त्यांचे प्रमुख कथासंग्रह चंडतिगळ (१९४४), अडियोळुक्कुकळ (१९४५), मगळुडे मगळ (१९४६), प्रतीक्षकळ (१९४७), इंक्विलाब (१९५१), घोषयात्रा, प्रतिव्रता इ. होत.

मलयाळम् कादंबरीक्षेत्रातील त्यांचे कार्यही महत्त्वाचे आहे. त्यांनी सु. पंधरा कादंबऱ्या लिहिल्या आहेत तथापि कलात्मक दृष्ट्या श्रेष्ठ कादंबऱ्या म्हणून त्यांच्या पुढील कादंबऱ्यांचा निर्देश केला जातो : रंटिटंगळि (सहावी आवृ. १९४४), तोट्टियुडे मकन (१९४६), चेम्मीन (१९५६), आणि एणिप्पडिकळ (१९६३). चेम्मीन या त्यांच्या कादंबरीला १९५७ चा साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला. रंटिटंगळि या कादंबरीचेही साहित्य अकादेमीतर्फे इतर भारतीय भाषांत अनुवाद होत आहेत. मराठीत तिचा अनुवाद दोन शेर धान या नावाने उषाताई कोलते यांनी केला असून तो साहित्य अकादेमीतर्फे प्रकाशित झाला (१९६३). तोट्टियुडे मकन या कांदबरीचा चुनौती या नावाने हिंदी अनुवाद झाला आहे. चेम्मीनची इतर भारतीय भाषांतून त्याचप्रमाणे इंग्रजी व काही परकीय भाषांतूनही भाषांतरे झाली आहेत. तिचा हिंदी अनुवाद मछुआरे या नावाने प्रसिद्ध झाला असून चेम्मीन हा इंग्रजी अनुवाद युनेस्कोच्या मदतीने प्रसिद्ध झाला आहे. चेम्मीनवर आधारित मलयाळम् चित्रपटालाही १९६६ चे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले.

त्यांच्या कादंबऱ्या सामाजिक असून केरळमधील पददलित, मागासलेल्या व आर्थिक गुलामगिरीत जगणाऱ्या विपन्नावस्थेतील समाजाचे भेदक चित्रण त्यांतून आढळते. प्रस्थापित समाजव्यवस्था व तीमुळे अशा जमातींची होणारी विलक्षण कोंडी, याचा वेध ते आपल्या कादंबऱ्यांतून घेऊ पाहतात. त्यांच्या कादंबऱ्यांची कथानके काहीशी कल्पनारम्य (रोमँटिक) असली, तरी केरळमधील वास्तव जीवनाची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे. चेम्मीन या कांदबरीत केरळच्या किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या कोळ्यांचे चित्रण असून भोळ्याभाबड्या धार्मिक समजुतींचा विलक्षण पगडा व त्यांच्या प्रभावाखालील त्यांचे जीवन त्यांची पार्श्वभूमी लाभली आहे. यामुळे ती अतिशय वास्तवदर्शी झाली आहे. रंटिटंगळि ही त्यांची कादंबरी कुट्टेनाड येथील परयन या अस्पृश्य जातीतील लोकांवर आधारित आहे. भूमिहीन असल्यामुळे आर्थिक गुलामगिरीत अत्यंत कष्टमय जीवन जगणाऱ्या शेतमजुरांचे अतिशय परिणामकारक चित्रण त्यांनी तीत केले आहे. तोट्टियुडे मकनमध्ये अलेप्पी येथील भंगीकाम करणाऱ्या पददलित वर्गाचे चित्रण आहे व एणिप्पडिकळमध्ये दांभिक पुढारीपणाचा वेध त्यांनी घेतला आहे.

तकळींचे लेखन जहालमतवादी आहे. आपल्या ओजस्वी आणि धारदार भाषाशैलीने ते शासन, समाजव्यवस्था, रूढी इत्यादींवर प्रखर हल्ला चढवतात. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत जीवन जगणाऱ्या मागासवर्गीयांचे मानवतावादी दृष्टिकोनातून केलेले परिणामकारक चित्रण, सार्थ व्यक्तिचित्रणे, वास्तव वर्णने इत्यादींमुळे त्यांच्या कादंबऱ्या अतिशय लोकप्रिय आहेत.

नायर, एस्. के. (इं.) पोरे, प्रतिभा (म.)