बालकृष्ण पिळ्ळा, ए.: (१३ मे १८८९-१८ डिसेंबर १९६०). आधुनिक मलयाळम् लेखक व पत्रकार. जन्म त्रिवेंद्रम येथे. मद्रास विद्यापीठातून बी.ए. आणि बी.एल्. काही काळ बालकृष्ण पिळ्ळा यांनी इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केले नंतर ते वकिली करू लागले.

ए.बालकृष्ण पिळ्ळा

त्यांनी समदर्शी, प्रबोधिनी आणि केसरी ही नियतकालिके सुरू केली व नेटाने चालविली. कुशल संपादक म्हणून ते प्रसिद्ध होते. विशेषतः केसरी ह्या नियतकालिकाच्या संपादकीय कार्याबद्दल त्यांना ‘केसरी’ ही सार्थ उपाधी लाभली. १९३०-३३ ह्या कालात केसरीतून त्यांनी त्रावणकोर संस्थानाच्या राजा विरूद्ध प्रखर टीका केली आणि त्यामुळे सरकारने त्या नियतकालिकावर बंदी घातली. याच संस्थानाचे दिवाण पेशकार अय्यप्पन पिळ्ळा यांची बहीण म्हणजे बालकृष्णांची आई होय. बालकृष्णांनी नंतरचे आपले पुढील आयुष्य ऐतिहासिक संशोधनात व साहित्यसेवेस वेचले. ऐतिहासिक कालगणनेसाठी त्यांनी ज्योतिषशास्त्रावर आधारित ‘कल्पगणित’ नावाची एक पद्धत शोधून काढली आणि या पद्धतीच्या आधारे महाबली, महाविष्णू इ. पौराणिक देवतांची ऐतिहासिकता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

यूरोपीय साहित्य व समीक्षा आपल्या भाषांतरांद्वारे पहिल्यांदाच मल्याळम् मध्ये आणण्याचे महत्त्वाचे कार्य बालकृष्णांनी केले. त्यांनी फ्रेंच लघुकथा, कांदबऱ्या, नाटके इत्यादींचे मल्याळम् मध्ये भाषांतर केले व त्याद्वारे यूरोपीय लेखकांची नवीन पिढीला ओळख करून दिली. इब्सेनच्या घोस्ट्सचे भाषांतर (१९३५) तसेच बाल् झॅकच्या कथांचे सांधिल्य (१९२१) या नावाने त्यांनी केलेले भाषांतर यांचा या संदर्भात आवर्जून उल्लेख करावा लागेल. जुन्या लेखनपरंपरांना चिकटून राहिलेल्या लेखकांना त्यांनी नवीन दृष्टी दिली तसेच वैज्ञानिक उदयास आलेल्या आधुनिक युगाचे भानही त्यांच्या मनावर बिंबविले.त्यांनी अनेक नवीन लेखकांच्या पुस्तकांना चिकित्सक प्रस्तावना लिहिल्या व त्यांना प्रोत्साहन दिले. या त्यांच्या कामगिरीमुळे मल्याळम्‌मध्ये अनेक नवे लेखक उदयास आले.

आपल्या नोबेल प्रस्थानङ्डळ (१९४७), रुपमंजरी (१९४७), सांकेतिक ग्रंथ निरुपणङ्डळ (१९५७) इ. समीक्षात्मक ग्रंथांत त्यांनी कादंबरी, लघुकथा, नाटक, निबंध इ. साहित्यप्रकारांचे चिकित्सक विवरण केले आहे. स्वच्छंदतावाद, निसर्गवाद, वास्तववाद अशांसारख्या साहित्यिक संप्रदायांचे त्यांनी सोदाहरण विवेचन केले आहे. वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक विवेचन हे त्यांचे वैशिष्ट्य. एखाद्या साहित्यकृतीतील गुणदोष शास्त्राज्ञाच्या अलिप्त दृष्टीने ते दाखवितात. साहित्यगवेषणमाला (१९५४), साहित्य विमर्शनङ्डळ (समीक्षात्मक निबंध, १९५४), प्राचीन चरित्रगवेषणम् (प्राचीन केरळच्या इतिहासावरील पाच लेख, १९५७), केसरियमुखप्रसङ्डळ (केसरीच्या संपादकीय लेखांचा संग्रह, १९६१) इ. त्यांचे इतर उल्लेखनीय ग्रंथ होत. यांशिवाय हर्षवर्धन, अलेक्झांडर, ह्यूएनत्संग इ. व्यक्तींची चरित्रेही त्यांनी लिहिली आहेत.आपल्या ह्या विविध प्रकारच्या लेखनातून त्यांनी आपले सामाजिक, राजकीय, साहित्यिक विषयांबद्दलचे क्रांतिकारी विचार मांडले आणि आधुनिक मलयाळम् साहित्यात नवचैतन्य आणले.

 

भास्करन्, टी. (इं.) ब्रह्मे, माधुरी (म.)