चेरुश्शेरि नंपूतिरि: (पंधरावे शतक). अभिजात मलयाळम् कवी. याने कृष्णचरित्रावर कृष्णपाट्‌टु  अथवा कृष्णगाथा  हे काव्य लिहिले असून ते केरळमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हे गेय काव्य त्याने मलयाळममधील संगीतानुकूल अशा मंजरी वृत्तात रचले. चेरुश्शेरी हा मलबारमधील कोळत्तुनाडू येथील उदयवर्मन् राजाच्या दरबारात राजकवी होता. चेरुश्शेरीच्या जीवनाबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही.

ही कृष्णगाथा  कोणी लिहिली, याबाबत विद्वानांत मतभेद आहेत. काहींच्या मते ती चेरुश्शेरी नंपूतिरीने (नंबुद्री), तर काहींच्या मते ती प्रसिद्ध चंपूकवी पूनम नंपूतिरी (नंबुद्री) याने लिहिली. पी. गोविंद पिळ्ळा यांच्या मते ती चेरुश्शेरीनेच लिहिली असून ‘चेरुश्शेरी’ हे नंबुद्रींचे कुलनाम आहे. कवनोदयम्  ह्या नियतकालिकाने प्रस्तुत मत खोडून काढून, मलबारमध्ये अशा प्रकारचे कुलनाम नाही व म्हणूनच कृष्णगाथा  चेरुश्शेरीची नसून पूनमची आहे, असे प्रतिपादिले. पी. के. नारायण पिळ्ळा ह्या प्रसिद्ध टीकाकाराने चेरुश्शेरीचा पक्ष उचलून धरला आणि पूनमपक्षाचे मत खोडून काढले. चिरक्कळ टी. बालकृष्णन् नायर यांनी बराच पुरावा जमवून चेरुश्शेरीपक्षाचे समर्थन केले. त्यांच्या मते कोळत्तुनाडू प्रदेशात एकूण बारा‘चेरी’ होत्या आणि त्यांतील सर्वांत लहान‘चेरी चेरी’ ही होती. ‘चेरी चेरी’ चेच‘चेरुश्शेरी’ झाले. ह्याच घराण्यात कृष्णगाथाकार चेरुश्शेरी झाला. ही घराणी आता नामशेष झाली आहेत. शेवटचे चेरी चेरी घराणेही पूनम घराण्यात विलीन झाले.

कृष्णगाथेच्या आरंभी आणि अखेरीसही कवीने आपण कोळत्तुनाडू येथील राजा उदयवर्मन् (कार. १४४६–७५) याच्या आज्ञेवरून प्रस्तुत काव्य रचल्याचे म्हटले आहे. कृष्णजन्मापासून तो स्वर्गारोहणापर्यंतचा कथाभाग या काव्यात आला असून संस्कृत भागवताच्या  आधारे व त्याचा आदर्श अनुसरून कवीने ते लिहिले आहे. त्यात एकूण ४७ ‘कथा’ (भाग) आहेत. कवी कृष्णभक्त आहे. आतापर्यंत कृष्णगाथेची बरोबरी करणारे या विषयावर एकही काव्य मलयाळमध्ये झाले नाही. साध्या, सहजसुंदर व प्रासादिक शैलीत त्याची रचना आहे. मलयाळम् भाषेस संवादी ठरणाऱ्या संस्कृत शब्दांचा त्यात वापर आहे. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत त्याने हे काव्य लिहिले. सुंदर उत्प्रेक्षांचा वापर तो प्राचुर्याने व समर्थपणे करतो. विविध भावभावनांचा आविष्कार त्याच्या काव्यात आढळत असला, तरी शृंगार व हास्य या रसांची त्याला विशेष आवड दिसते. गेयतेसोबतच मोजक्या शब्दांत प्रसंग समोर उभा करण्याचे विलक्षण सामर्थ्य त्याच्या लेखणीत आहे. मूळ भागवतातील आध्यात्मिक चर्चा टाळून सुटसुटीत संक्षेपाचे धोरण त्याने आपल्या काव्यात कटाक्षाने पाळले आहे. प्राचीन मलयाळम् साहित्यात चेरुश्शेरीचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे.

नायर, एस्. के. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)