महिना : दिवसापेक्षा मोठा पण वर्षाहून कमी कालावधी मोजण्यासाठी दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे नैसर्गिक कालमापनाचे परिमाण. सर्वसाधारणपणे हा कालावधी चंद्राच्या गतीवरून ठरविला जात असतो व अशा कालावधीला चांद्रमास म्हणतात. संस्कृत मास व फारसी माह या महिना वाचक शब्दांचा अर्थ चंद्र असा आहे. तसेच इंग्रजीतील मंथ हा महिनावाचक शब्द मून (चंद्र) या शब्दावरूनच आला असून तो वर्षांचा बारावा भाग दर्शवितो. सौर कालगणनेत मात्र महिन्याला सुलभ असा आविष्कार नाही.

चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा काळ म्हणजे महिना, अशी महिन्याची ढोबळ व्याख्या करता येते. तथापि प्रदक्षिणा कशाच्या संदर्भात (एखाद्या स्थिर वा चल बिंदूच्या संदर्भात) केलेली आहे, यावर महिन्याचा कालावधी अवलंबून असतो. त्यानुसार होणारे चांद्रमासाचे प्रकार खाली दिले आहेत.

नाक्षत्र मास : पृथ्वीच्या मध्यापासून पाहिल्यास अवकाशातील एखाद्या निश्चित वा स्थिर बिंदूच्या (उदा., तारा) सापेक्ष चंद्राचे एक कक्षीय परिभ्रमण पूर्ण होण्यास लागणारा कालावधी म्हणजे नाक्षत्र मास होय (उदा., चंद्राची रोहिणी या ताऱ्याशी एकदा युती झाल्यानंतर पुन्हा तशी युती होईपर्यंतचा कालावधी). हा कालावधी दिवसा अथवा रात्री केव्हाही संपतो. याचा उपयोग फक्त शास्त्रज्ञ करतात व्यवहारात मात्र नाक्षत्र मास वापरीत नाहीत. सूर्य व ग्रह यांच्या योगाने चंद्राच्या गतीवर घडत असणाऱ्या विक्षोभामुळे या कालावधीत ७ तासांपर्यंत फरक पडू शकतो. हा सांवासिक मासापेक्षा सु. दोन दिवसांनी लहान असतो.

सांवासिक मास : एकदा सूर्य-चंद्र युती झाल्यापासून म्हणजे एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतचा कालावधी म्हणजे सांवासिक मास होय. हाच चांद्रमास म्हणून ओळखला जातो  व परंपरागत पंचांगांतून वापरला जातो. अमावस्या ते पुढील अमावास्या असा काल घेतला, तर या कालावधीला ‘अमान्त मास’ आणि पौर्णिमा ते पुढील पौर्णिमा असा घेतल्यास त्याला ‘पौर्णिमान्त मास’ किंवा ‘गौण मास’ असे म्हणतात. नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे अमान्त, तर उत्तर भारतात पौर्णिमान्त मास रूढ आहेत [तथापि महाराष्ट्रात कार्तिक, माघ, वैशाख अशी स्नायने गौण (पौर्णिमान्त) मासाला धरून असतात]. शुक्ल पक्ष हा दोन्ही प्रकारच्या पद्धतींत समाईक असतो. परंपरागत पंचांगांतील चैत्रादी महिने याच प्रकारचे असतात. त्यांची नावे नक्षत्रांवरून पडलेली असून साधारणतः पौर्णिमेच्या सुमारास चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रावरून महिन्याचे नाव पडलेले असते. या चैत्रादी महिन्यांना मधु, माधव, शुक्र, शुचि, नभ, नभस्य, इष, ऊर्ज, सह (स), सहस्य, तप (स्) व तपस्य अशी वैदिक नावे आहेत.

अमावास्या व पौर्णिमा हे क्षण असल्याने वस्तुतः या चांद्रमासाची सुरुवात म्हणजे प्रतिपदारंभ दिवसाच्या कोणत्याही क्षणी होत असतो. परंतु सोईसाठी प्रतिपदा ज्या सूर्योदयाला असेल त्या दिवशी व या तिथीची वृद्धी (लागोपाठच्या दोन सूर्योदयांना तीच तिथी असणे) असेल, तर पहिल्या दिवशी आणि या तिथीचा क्षय (ती तिथी कोणत्याच सूर्योदयाला नसणे) असेल, तर द्वितीयेला महिन्याचा आरंभ समजतात.

चंद्र व पृथ्वी यांच्या कक्षांच्या विवृत्तेमुळे (दीर्घवर्तुळाकार आकारामुळे) सांवासिक महिन्याच्या कालावधीत १३ तासांपर्यंत फरक पडू शकतो. हा महिना नाक्षत्र मासापेक्षा सु. दोन दिवसांनी मोठा असतो. कारण एका अमावास्येला चंद्र-सूर्य ज्या नक्षत्रात असतात, तेथे चंद्र पुन्हा परत येईपर्यंत सूर्य त्या नक्षत्राच्या पूर्वेस सु. २७ अंश सरकलेला असतो. त्यामुळे सूर्याला गाठावयास चंद्राला आणखी सु. दोन दिवस लागतात.

उपमास : चंद्राची कक्षा विवृत्तीय असून पृथ्वी तिच्या एका नाभीपाशी असते. या कक्षेच्या पृथ्वीला सर्वांत जवळच्या बिंदूत (उपभूमध्ये) चंद्र लागोपाठ दोन वेळा येण्यास लागणाऱ्या  कालावधीस उपमास म्हणतात. यालाच कोणिकांतरीय अथवा पारिक्रमिक मास असेही म्हणतात. हा ग्रहणांच्या संदर्भात उपयुक्त आहे. उपभू बिंदूस पश्चिम-पूर्व गती असल्याने हा नाक्षत्र मासापेक्षा थोडा मोठा असतो.

पातिक मास : चंद्र कक्षेवरील राहू (चंद्राची कक्षा व क्रांतिवृत्त-सूर्याचा भासमान मार्ग-यांचा एक छेदनबिंदू) या ठिकाणी चंद्र लागोपाठ दोन वेळा येण्यासाठी लागणाऱ्या कालावधीस पातिक, पाताश्रित वा ग्राहणिक मास म्हणतात. याचा उपयोगही ग्रहणांच्या संदर्भातच होतो. राहूला पूर्व-पश्चिम असी उलट गती असल्याने पातिक मास नाक्षत्र मासापेक्षा थोडा लहान असतो.

सांपातिक मास : एका (उदा., वसंत) संपाताशी (क्रांतिवृत्त व खगोलीय विषुववृत्त यांच्या छेदनबिंदूपाशी) चंद्र युतीत आल्यापासून लगेच पुढच्या तशा युतीत येण्यास चंद्राला जो काळ लागतो, त्याला सांपातिक मास म्हणतात. संपातालाही पूर्व-पश्चिम अशी विलोम गती (उलट गती) असते. परिणामी सांपातिक मास नाक्षत्र मासापेक्षा फक्त सात सेकंदांनी लहान असतो.


वर उल्लेखिलेल्या मासांचे सरासरी व माध्य सौरमानातील कालावधी कोष्टकात दिलेले आहेत.

विविध महिन्यांचे सरासरी व माध्य सौरमानातील कालावधी 

महिना 

सरासरी 

माध्य सौरमान 

(दिवस) 

दिवस 

तास 

मिनिटे 

सेकंद 

नाक्षत्र 

२७ 

७ 

४३ 

११·५ 

२७·३२१६६१ 

सांवासिक 

२९ 

१२ 

४४ 

२·८६४ 

२९·५३०५८४ 

उपमास 

२७ 

१३ 

१८ 

३१·१ 

२७·५५४५५० 

पातिक 

२७ 

५ 

५ 

३५·८१ 

२७·२१२२२० 

सांपातिक 

२७ 

७ 

४३ 

४·७ 

२७·३२१५८२ 

  

सौर कालगणना:  १२ सांवासिक अथवा चांद्र मासांच्या एका वर्षात ३५४ दिवस येतात परंतु सौर वर्ष ३६५ १/४ दिवसांचे असते. या दोन्हीचा मेळ घालण्यासाठी ⇨ अधिक मासाची किंवा ⇨ क्षयमासाची योजना केलेली असते.

सौरमास : बारा सायन राशींनुसार [⟶ निरयन-सायन] सूर्याची १२ राशि-संक्रमणे होतात. एका संक्रमणापासून, दुसऱ्या संक्रमणापर्यंतच्या कालावधीला ‘सौरमास’ म्हणतात. सूर्याची गती बदलत असल्याने या प्रत्येक संक्रमणाचा म्हणजे महिन्याचा काल अगदी सारखा नसतो. काही देशांत सौर मास पाळतात आणि त्यांना मेष, वृषभ इ. राशिवाचक नावेही निरनिराळ्या भाषांतून दिलेली आढळतात.

सावन मास : सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला सावन दिवस म्हणतात आणि अशा तीस दिवसांचा कालावधी म्हणजे ‘सावन मास’ होय.

कॅलेंडर महिना : ग्रेगरियन कॅलेंडरमधील जानेवारी, फेब्रुवारी आदी महिन्यांना कॅलेंडर महिने म्हणतात. हे महिने कृत्रिम असून प्रत्येक महिना २८ ते ३१  दिवस अशा कमी-अधिक कालावधीचा आहे. व्यावहारिक सोयीसाठी ते वापरले जातात. त्यांचा चंद्राशी संबंध नसतो. जानेवारीच्या आरंभी सूर्याची गती अधिकात अधिक व जुलैच्या प्रारंभी कमीत कमी असल्याने दोन्ही सहामहींचे दिवस सारखे नसतात.

कालगणनेमध्ये प्रथम चांद्रमास वापरात आला. वेदांत चांद्रमासाचा उल्लेख असून खाल्डियन व ईजिप्शियन लोक चांद्रमास वापरीत. ज्यू, तुर्क व इस्लामी लोक व काही देशांत अजूनही चांद्रमास वापरतात. इतरत्र चांद्र-सौर व सौर कालगणना वापरतात. कारण चांद्रमासात पुढील त्रुटी आढळतात : योजनाबद्ध व्यवहारांस चांद्रमास सोयीचा नसतो. उदा., पावसाळा हा ऋतू वेगवेगळ्या चांद्रमासांत येते असल्याने शेतीचे वेळापत्रक (पंचांग) बनविणे कठीण होते. चंद्राची गती गुंतागुंतीची असल्याने त्याचे स्थान ठरविण्यासाठी अनेक सूक्ष्म गणिते करावी लागतात व ती आगाऊ करणे अवघड असते. चांद्रमासांची सौरवर्षाशी सांगड घालण्यासाठी दर २८ ते ३३ महिन्यांनी अधिकमास व क्षयमासाची योजना करावी लागते. मात्र भारतात हिंदू लोक तिथीनुसार करावयाची धार्मिक कार्ये मुख्यत्वे चांद्रमासाला धरून करतात.

प्रत्येक कॅलेंडर महिन्यांवर व चैत्रादी मराठी  महिन्यांवर स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत.

पहा : कालगणना, ऐतिहासिक कालमापन.

संदर्भ : १. ढवळे, त्र्यं. गो. पंचागातील ज्योतिःशास्त्र, पुणे, १९५८. 

            २. दीक्षित, शं. बा. भारतीय ज्योतिःशास्त्र, पुणे, १९३१.

ठाकूर, अ. ना.