लव्हेऱ्ये, यूर्‍ बँ झां झोझेफ : ( ११ मार्च १८११-२३ सप्टेंबर १८७७). फ्रेंच ज्योतिर्विद. वरूण (नेपच्यून) या ग्रहाचे अस्तित्व, स्थान आणि वस्तुमान गणिताच्या साहाय्याने आगाऊ वर्तविणारे ज्योतिर्विद व आधुनिक हवामानशास्त्राचे एक आद्य प्रवर्तक म्हणून त्यांची ख्याती आहे.

फ्रान्समधील नॉर्मडी प्रांतात सँ लो या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. पॅरिसच्या एकोल तंत्रनिकेतनात तसेच तंबाखू उत्पादनासंबंधी विशेष शिक्षण देणाऱ्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले.

लव्हेऱ्ये यांनी १८३२ मध्ये उल्कांचा अभ्यास केला. या विषयावर प्रसिद्ध केलेल्या निबंधामुळे राजज्योतिपी जॉर्ज एअरी यांच्याशी त्यांचा परिचय झाला. १९३७ मध्ये त्यांनी एकोल तंत्रनिकेतनातच ज्योतिषशास्त्र शाखेत अध्यापनाचा पेशा पत्करला. तेथे त्यांनी खगोल यामिकी आणि ग्रहांच्या गतीचे गणिती विश्लेषण या विषयांत संशोधन केले. लाप्लास यांनी सूर्यकुलासंबंधी केलेल्या संशोधनाचा आधार घेऊन त्यासंबंधीच्या गणितात त्यांनी मानलेली ठोकळ परिणामे अधिक अचूक धरून त्यांचे कार्य अधिक चांगल्या रीतीने पूर्ण केले व सूर्यकुलाचे स्थैर्य काटेकोरपणे सिद्ध केले. १८३९ मध्ये त्यांनी त्या वेळी ज्ञात असलेल्या ग्रहांच्या वस्तुमानांवरून त्यांच्या कक्षांच्या विमध्यतेच्या आणि पातळ्यांच्या कलांच्या सीमा गणिताने निश्चित केल्या.

प्रजापतीची गती अचूकपणे दाखविणारे गणित १८४६ पर्यंत कोणीही केलेले नव्हते. १८२१ मध्ये बूचर्ड यांनी तयार केलेल्या प्रजापतीच्या गति-कोष्टकानुसार १८४१ च्या सुमारास त्याच्या स्थानात सु. २ मिनिटांची चूक येत होती. या चुकीचे कारण शोधत असताना त्यांना असे आढळले की, ही चूक गुरू वा शनी या मोठ्या ग्रहांच्या परिणामाने स्पष्ट होऊ शकत नाही. आणखी कोणत्या तरी अज्ञात ग्रहांचा परिणाम प्रजापतीच्या गतीवर होत असला पाहिजे, गणितावरून त्यांनी अशा अज्ञात ग्रहाचे नेमके स्थान व त्याचा दृश्य व्यास काढला. दोनच दिवसांनी म्हणजे २३ सप्टेबर १८४६ रोजी जे. जी. गॉल यांनी तो ग्रह आकशात प्रत्यक्ष पाहिलेला स्थानात सु. ५२ मिनिटांचा फरक होता. आरंभी तो लव्हेऱ्ये ग्रह म्हणून ओळखला गेला, इंगलंडमध्ये जे. सी. ॲडम्स यांनीही स्वतंत्र रीत्या या ग्रहाचे अस्तित्व वर्तविले होते. यामुळे याच्या शोधाचे श्रेय कोणाचे याबद्दल थोडा वादही झाला. हा ग्रह योगायोगाने तेथे सापडला, असाही एक मतप्रवाह होता.

बुधाच्या गतीचा अभ्यास व गणित करताना १८४३ पासून लव्हेऱ्ये यांना असे आढळले की, बुधाची प्रत्यक्ष गती ही सिद्धांतानुसार येणाऱ्या गतीहून भिन्न आहे. १८५९ मध्ये त्यांनी असे दाखविले की, बुधाचा उपसूर्य दर शतकात ३२ सेंकदांनी पुढे नेणारी एक प्रेरणा बुधावर परिणाम करित आहे. हा परिणाम घडवणारा एक ग्रह किंवा लघुग्रह समूह बधकक्षेपेक्षा लहान कक्षा असलेले असावाअसे त्यांना वाटले व त्याचे नाव व्हल्कन असे ठेवले परंतु असा ग्रह खूप शोध घेऊनही सापडला नाही आणि बुधाचा गतीवर परिणाम करणारे कारण पुष्कळ वर्षे अज्ञात राहिले. १९१६ मध्ये आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताचा अवकाश यामिकीत वापर केल्यावर असे आढळते की, न्यूटन यांच्या सिद्धांतानुसार येणारे ग्रहांचे उपसूर्य बिंदू हे थोडे पुढे असावयास पाहिजेत. यानुसार बुधाच्या उपसूर्य बिंदूत होणारी सरक दर शतकात सु. ४३ सेकंद इतकी येते आणि लव्हेऱ्ये यांच्या संशोधनामुळे आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांताच्या खरेपणास प्रत्यक्ष निरीक्षणात्मक पुष्टी मिळाली.

लव्हेऱ्ये हे आधुनिक वातावरणविज्ञानाचे एक आद्य प्रवर्तक समजले जातात. फ्रेंच सरकारने लव्हेऱ्ये यांची नेमणूक वादळासंबंधीचे संशोधन करण्यासाठी केली. यासाठी अनेक ठिकाणच्या हवामानाची समकालिक नोंद करून ती तारायंत्राच्या मदतीने द्रुतगतीने मिळविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली व ती नकाशावर त्या त्या ठिकाणी विवक्षित पद्धतीने लिहून हवामानाचे नकाशे तयार करण्याचे तंत्र विकसीत केले गेले. अशा नकाशातील वाऱ्यांच्या प्रवाहदर्शक रेषा व समभारदर्शक रेषा यांच्या परिक्षमावरून आगामी हवामानाची रूपरेषा देणारी दैनिक पत्रके प्रसिद्ध होऊ लागली.

लव्हेऱ्ये १८५४ मध्ये पॅरिस वेधशालेचे संचालक झाले व (१८७०-७३ हा कालखंड सोडून) मृत्यूपर्यंत ते त्या पदावर राहिले. या काळात त्यांनी खगोल यामिकीचा अभ्यास केला आणि प्रत्यक्ष निरीक्षणांच्या आधारे ग्रहांच्या सिद्धांताची पुनर्तपासणी केली.

डेन्मार्कच्या राजांनी ग्रँड क्रॉस ऑफ लीजन ऑफ ऑनर हा किताब लव्हेऱ्ये यांना देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांच्याकरिता पॅरिस विद्यापीठात खगोल यामिकी व ज्योतिषशास्त्र यांचे अध्यासन निर्माण करण्यात आले. यूरोपमधील बहुतेक शास्त्रीय संस्थांचे ते सभासद होते. त्यांना दोन वेळा रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक तसेच कॉल्पी पदक मिळाले होते. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

नेने, य. रा.