रॉब्लेस, आल्फॉन्सा गार्सिया : (२० मार्च १९११−). मेक्सिकन मुत्सद्दी, निःशस्त्रीकरणाचा पुरस्कर्ता आणि जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा पहिला मेक्सिकन मानकरी (१९८२).

त्याचा जन्म झामोरा (मेक्सिको) येथे झाला. कीरीनो आणि तेरेसा रॉब्लेस हे त्याचे आई-वडील. त्याचे शिक्षण मेक्सिकोतील राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठातून झाले. त्याने पदवी संपादन केली. पुढे उच्च अध्ययनासाठी तो पॅरिस विद्यापीठात गेला. काही वर्षे त्याने द हेग येथील आंतरराष्ट्रीय विधी अकादमीत शिक्षण घेतले. नंतर त्याने मेक्सिकोच्या परराष्ट्रीय खात्यात नोकरी पतकरली आणि सॅन फ्रॅन्सिस्को येथील परिषदेत भाग घेतला. या परिषदेतच संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. पुढे त्याची संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सचिवालयात नियुक्ती झाली. या सुमारास त्याचा विवाह क्वॉनॉ मारिआ द शिझ्‌सलो या युवतीशी झाला (१९५०). त्यांना दोन मुलगे आहेत.

स्वीडनमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय विभागात काम केले (१९३९−४१). तेथेच त्याला राजकीय घडामोडींच्या समितीचे महासंचालकपद मिळाले (१९४१−४६) आणि नंतर त्याला संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या मुख्य सचिवालयात महासंचालकपद देण्यात आले (१९४६−५७). ब्राझीलला तो मेक्सिकन राजदूत म्हणून गेला (१९६२−६४). लॅटिन अमेरिका अण्वस्त्र चाचणीपासून मुक्त राहावी, म्हणून नियुक्त केलेल्या आयोगाचे अध्यक्षपद त्याच्याकडे आले (१९६४). त्याच्याच प्रयत्नांनी इलातेलोल्को हा महत्त्वाचा करार झाला (१९६७). त्यानंतर साहाय्यक परराष्ट्र सचिव (१९६४−७१), संयुक्त राष्ट्रे या संघटनेत स्थायी प्रतिनिधी, परराष्ट्रमंत्री इ. उच्च पदांवर त्याची नियुक्ती झाली. निःशस्त्रीकरणाच्या धोरणाला पाठिंबा देण्यासाठी जिनीव्हा व न्यूयॉर्क येथील निःशस्त्रीकरण परिषदांत तो सहभागी झाला आणि जागतिक शांततेसाठी त्याने निःशस्त्रीकरणाचा निर्भिडपणे पुरस्कार केला (१९७७−७८). इलातेलोल्को या शांतता तहाबद्दल तसेच निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नाबद्दल त्याला ⇨अल्वा मीर्दाल यांच्याबरोबर १९८२ चा नोबोल शांतता पुरस्कार देण्यात आला.

रॉबेन्स याने जागतिक शांततेच्या पुरस्कारार्थ विपुल लेखन केले. त्यांपैकी पॅन अमेरिकॅनिझम अँड द गुडनेथर पॉलिसी (१९४०), द सॉरबॉन यस्टरडे अँड टूडे (१९४३), पोस्ट वॉर मेक्सिको (१९४४), मेक्सिकन इंटरनॅशनल पॉलिसी (१९४६), द पोस्ट वर्ल्ड वॉर : फ्रॉम द अटलांटिक चार्टर टू द सॅन फ्रॅन्सिस्को कॉन्फरन्स (३ खंड, १९४९), मेक्सिको इन युनायटेड नेशन्स (२ खंड, १९७०), द प्रोहिबिशन ऑफ न्यूक्लिअर आर्म्‌स इन लॅटिन अमेरिका (१९७५), सिक्स यिअर्स ऑफ मेक्सिकन फॉरिन पॉलिसी (१९७६), ३३८ डेज ऑफ इलातेलोल्को (१९७७) इ. ग्रंथ लोकप्रिय व प्रसिद्ध आहेत.

उर्वरित आयुष्य तो स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथे लेखन-वाचनात व्यतीत करीत आहे.

संदर्भ : १. रेगे, मे. पु. संपा. नवभारत, वाई, जानेवारी १९८३.

२. शेख, रुक्साना, शांतिदूत, सातारा, १९८६.

शेख, रुक्साना