आयुर्वेदीय तत्त्वज्ञान व पदार्थ विज्ञान : आयुर्वेदीय पदार्थविज्ञानाचे वाचन करीत असताना त्यात सांख्य व न्यायवैशेषिक या दोन शास्त्रांतील परिभाषा व पदार्थ विचार आढळतात. त्यामुळे, आयुर्वेदाला स्वतंत्र पदार्थविज्ञान नाही, आणि जे आढळते ते सांख्य व न्यायवैशेषिक या दर्शनांकडून घेतले आहे असे पुष्कळ विद्वान लोकांना वाटते. परंतु ते योग्य नाही. आयुर्वेद हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. कारण त्याचे ध्येय, सिद्धांत, प्रमेय ही सर्व तदितर शास्त्रांहून भिन्न आहेत. आयुर्वेदीय पदार्थविज्ञान आज प्रसिद्ध असलेल्या न्यायवैशेषिक व सांख्य दर्शनांतून घेतलेले दिसत नाही. कारण त्या दर्शनांतील मांडणीच्या पूर्वीची मांडणी यात दिसते. शारीरिक व मानसिक दु:खाच्या अत्यंत निवृत्तीचे अचूक ज्ञान ज्यास आहे त्या शास्त्रज्ञास सांख्य म्हणतात. दु:खरूपी व्याधींच्या अत्यंत निवृत्तीचे ज्ञान भगवान महर्षी पुनवर्सूंना असल्यामुळे ते आयुर्वेदाचे सांख्य दर्शनकार होते, असे चरकाचार्यांनी स्पष्ट म्हटले आहे. द्रव्यादी षट्पदार्थ विचार करून चतुर्विध पुरुषार्थप्राप्तीला साधनीभूत असलेल्या शरीराचे धातुसाम्य स्थापून रोगनाश करणे आयुर्वेदाचे साधारण ध्येय आहे. स्वास्थ्य संपादन म्हणजे पुरुष, प्रकृती इ. पंचवीस पदार्थांचा विचार करून आत्मा, इंद्रिय व मन यांचे प्रसन्नत्व राखणे व मोक्ष मिळविणे हे आयुर्वेदाचे अंतिम ध्येय होय.

पद म्हणजे शब्द त्याचा अर्थ म्हणजे विषय. शब्दाच्या किंवा अंत:करणवृत्तीचा जी वस्तू विषय होते तिला पदार्थ म्हणतात. शब्दाने किंवा बुद्धीने ज्ञान होणाऱ्या सर्व विषयांना पदार्थ अशी संज्ञा आहे. चरक व सुश्रुत यांनी सांगितलेल्या सांख्यशास्त्राप्रमाणे प्रकृती, महान, अहंकार, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच तंन्मात्रा, पंच महाभूते व पुरुष मिळून पदार्थांची संख्या चोवीस होते. आयुर्वेदातील वैशेषिक शास्त्राप्रमाणे पदार्थांची संख्या सहा. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. विश्वात जे जे ज्ञात होते त्याचा अंतर्भाव वरील सहांपैकी कोणत्या तरी पदार्थामध्ये होतो. म्हणून विश्व म्हणजे द्रव्यादी षट्पदार्थ असे म्हणण्यास हरकत नाही.

आयुर्वेदने पुरुषासंबंधीचा विचार दोन प्रकारच्या दृष्टिकोनांतून केला. नैष्ठिक म्हणजे आत्यंतिक सुखाच्या दृष्टीने व शारीर सुखाच्या दृष्टीने पुरुष म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृतीपासून भिन्न असलेला चेतन आत्मा तो अविनाशी व नित्य होय हा मुख्य दृष्टिकोन. जन्ममरण-परंपरा, नाना प्रकारच्या योनींमध्ये जन्म, त्रिविध-दु:खभोग इ. अनर्थ परंपरेला मूळ कारण अविवेक हेच एक आहे. विवेकबुद्धीने प्रकृतीहून अलग होणे हा खरा पुरुषार्थ आहे, असे आयुर्वेदाचे मत आहे. प्रकृती, महान, अहंकार इ. चोवीस तत्त्वांशी अविवेकाने तादात्म करणारा जो पुरुष त्याला आयुर्वेदाने ‘राशिपुरुष’ असे नाव दिले. हा पुरुषविषयक दुसरा दृष्टिकोन. प्रकृति-पुरुष विवेक करण्याकरिता हा राशिपुरुष सांगितला.

केवळ शारीर स्वास्थ्यरक्षण व रोगनाश या उद्देशाने आयुर्वेदशास्त्र निर्माण झाले आहे. आत्यंतिक सुखप्राप्ती हा विषय आयुर्वेदाचा नाही. तो सांख्याचा आहे, असे एक मत आहे. चरककाळी सांख्य दर्शनाचा प्रचार फार झाला होता त्यामुळे आयुर्वेदामध्ये सांख्य दर्शनातील विचारांचे प्रतिबिंब पडलेले दिसते. चरकाचार्य व सुश्रुताचार्य हे सांख्य मतानुयायीच होते असे म्हणतात परंतु चरक व सुश्रुत या ग्रंथांचा नीट अभ्यास केला, तर हे मत सिद्ध होत नाही.

आयुर्वेदाची व्याख्या करताना हितकारक आणि अहितकारक आयुष्याचा विचार करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे खरे स्वास्थ्य ‘समदोष: समाग्निश्व समधातुमलक्रिय:’ यावरच केवळ अवलंबून नसून आत्मा, इंद्रिय आणि मन यांच्या प्रसन्नतेवरही अवलंबून आहे, असे दिग्दर्शित केले आहे. चरकसंहिता शारीर (अ. १) यामध्ये आत्म्याच्या शुद्ध स्वरूपासंबंधी घेतलेल्या आक्षेपांचे खंडन करून, आत्म्याच्या ठिकाणी मन स्थिर केले असता पुरुष सुखदु:खातीत होतो, असे सांगितले आहे. वरील सर्व वचनांचा विचार केल्यास स्पष्ट दिसते की, आयुर्वेदाचे ध्येय केवळ शारीर सुखप्राप्तीच नसून नैष्ठिक सुख हेच मुख्य साध्य व शारीरिक आरोग्य हे त्याचे साधन होय. नैष्ठिक सुखप्राप्तीचे एकमेव साधन आत्मानात्मविचार म्हणजेच प्रकृति-पुरुष विवेक यालाच सांख्य म्हणतात. सत्व (मन), आत्मा आणि शरीर या तिघांच्या समुदायास पुरुष अशी संज्ञा आहे यालाच जीव म्हणतात. सुख-दु:ख, स्वास्थ्य-अस्वास्थ्य यालाच होत असल्यामुळे आयुर्वेदाचा उपदेश याच पुरुषाला उद्देशून केला आहे. काही ठिकाणी सहा पदार्थ मिळून पुरुष सांगितला आहे. पंचमहाभूते व चेतन एकूण सहा पदार्थांचा समुदाय म्हणजे पुरुष. यास ‘चिकित्साधिष्ठान कर्म-पुरुष’ ही म्हणतात.

पुरुषासंबंधी आयुर्वेद व सांख्य यांतील मतभेद : संपूर्ण चराचर सृष्टीला मूलकारण सांख्यशास्त्रात त्रिगुणात्मक जडप्रकृती सांगितली असताना तुम्ही पुरुष कारण कसे मानता असा प्रश्न अग्निवेशाने महर्षी आत्रेयांना विचारला. त्याचे उत्तर, संपूर्ण जगात्‌रूपी कार्य जडप्रकृतीचाच परिणाम आहे, हे जरी खरे असले तरी चेतन पुरुषाच्या संयोगावाचून तो काहीच करू शकत नाही म्हणून चेतन पुरुषच सृष्टीचा कर्ता मानला पाहिजे, असे आहे. आयुर्वेदाने आपली सांख्य प्रक्रिया कापिल सांख्यांकडून उचलली असती, तर त्यांच्या मूलभूत सिद्धांताचे खंडन केले नसते. सांख्यशास्त्रात पुरुष निर्गुण (गुणरहित) घेतला आहे. परंतु आयुर्वेदामध्ये पुरुषाच्या ठिकाणी सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, प्राण, अपान, उन्मेष, बुद्धी, संकल्प, विचारणा इ. गुण सांगितले आहेत. सांख्यशास्त्रामध्ये इंद्रिये व त्यांचे शब्दादी विषय आहंकारिक म्हणजे अहंकारापासून उत्पन्न होतात, असे सांगितले आहे. ज्यात इंद्रिये अभौतिक मानली आहेत परंतु आयुर्वेदामध्ये इंद्रिये पांचभैतिक मानली आहेत.

चेतना धातुस्वरूप शुद्ध परमात्मा अनादी असल्यामुळे त्याचा जनक कोणीच नाही. षड्धातुज किंवा राशिपुरुषाला मात्र मोह, इच्छा, द्वेष, कर्म या कारणांनी निरनिराळ्या योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो. आत्मा ज्ञानी की अज्ञानी? परमात्मा ज्ञानस्वरूपच आहे. राशिसंज्ञक पुरुषाच्या ठिकाणी मन आणि ज्ञानेंद्रियांचा संयोग झाला म्हणजे ज्ञान उत्पन्न होते. इंद्रिये निर्दोष असतील किंवा आत्म्याचा इंद्रियाशी संयोग झाला नाही तर ज्ञान होत नाही. अनादी व अव्यक्त परमात्मा पुरुष नित्य आहे. परंतु मोहेच्छाद्वेषकर्मज राशिपुरुष अनित्य आहे. राशिसंज्ञक जीवात्मा कर्मपरतंत्र असल्यामुळे आपल्या बऱ्यावाईट कर्मानुसार फलभोगाकरिता निरनिराळ्या उच्चनीच योनींमध्ये स्वत:च जातो. जीवात्म्याची उत्पत्ती प्रथम होते, की शरीराची होते? कारण हे दोन्ही एकमेकांपासून स्वतंत्रपणे उत्पन्न होऊ शकत नाहीत म्हणून संशय. बीज आणि वृक्ष हे जसे परस्पराश्रयी असल्यामुळे दोन्ही अनादी, त्याप्रमाणे जीवात्मा व राशिस्वरूप क्षेत्र-शरीर, हे परस्परावलंबी असल्यामुळे दोन्ही अनादीच आहेत. दोनपैकी अमुक अगोदर व त्यानंतर अमुक, असे सांगता येत नाही.

परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध होऊन तेथ वृत्ती स्थिर झाली म्हणजे दु:खाचा लवलेश राहात नाही. यालाच समाधी म्हणतात.

दुसरा उपाय, आत्मानात्मविचार करून ब्रह्मज्ञान संपादन करणे व सर्व उपाधींहून अलग होणे ज्ञानयुक्त निरुपाधिक आत्मस्थिती म्हणजेच मोक्ष. ही मोक्षप्राप्ती योगद्वारासुद्धा होऊ शकते. योगाने साधलेल्या समाधीमध्ये दु:खाची निवृत्ती होते. हे खरे, पण ती निवृत्ती कायमची नाही. समाधी अवस्थेत जोपर्यंत असतो तोपर्यंत दु:खे भासत नाहीत. परंतु तेथून उत्थान झाले म्हणजे पुन्हा देहात्मबुद्धी उत्पन्न होऊन दु:ख होते. मोक्षाची स्थिती मात्र तशी नाही. एकदा आत्मज्ञान झाले की, त्रिविध दु:खाची आत्यंतिक निवृत्ती होते. मोक्ष हा समाधीसारखा अनित्य नाही.


आयुर्वेदामध्ये पंचमहाभूते, (अहं) बुद्धी, अव्यक्त आणि महान या आठ पदार्थांना ‘भूतप्रकृती’ असे नाव दिले आहे. प्रकृती व पुरुष हे दोन्ही अनादी, अनंत, अलिंग, नित्य आणि सर्वगत आहेत. परंतु प्रकृती एक अचेतन, त्रिगुणात्मक, बीजधर्मी, प्रसवधर्मी व अमध्यस्थधर्मी आहे. याच्या उलट पुरुष अनेक, सचेतन, निर्गुण, बीजधर्मराहित, प्रसवधर्मरहित व मध्यस्थधर्मी आहेत.

आत्मा, पंचज्ञानेंद्रिये व त्यांचे शब्दादी विषय या तिघांचा संयोग होऊनसुद्धा, ज्याच्यावाचून विषयाचे ज्ञान होत नाही व ज्याचा संयोग झाला असता ज्ञान होते अशा पदार्थाला मन म्हणतात. विषय प्रत्यक्ष होण्याकरिता प्रथम आत्म्याचा मनाशी, नंतर मनाचा इंद्रियांशी व शेवटी इंद्रियांचा विषयांशी संयोग होतो. या चारपैकी एखाद्या पदार्थाचा जर संयोग नसेल, तर विषयाचे ज्ञान होत नाही.

मनाचे परिमाण अणुस्वरूप आहे, आत्म्याप्रमाणे विभु नाही. ते विभु मानले तर त्याचा पाचही इंद्रियांशी संबंध येणार व तसे झाले तर पंचेंद्रियांनी एकदम पाचही विषयांचे ज्ञान व्हावयास पाहिजे, परंतु तसे घडत नाही. म्हणून मन अणुप्रमाणे आहे, असे सिद्ध होते. प्रत्येक जीवाच्या शरीरात एकच मन असते. त्यामुळे एकावेळी एकाच विषयाचे ज्ञान होते. परंतु मने अनेक मानली तर एकावेळी अनेक विषयांचे ज्ञान व्हावे पण तसे होत नाही. त्रिगुणात्मक बुद्धी, अहंकार आणि मन यांवाचून पुरुष स्वतंत्र राहू शकत नाही. म्हणून पुरुषाचे स्थान शास्त्रकारांनी कुठे सांगितले आहे ते पाहिले म्हणजे मनाचे स्थान सापडेल. आयुर्वेद व तदितर वेदान्तादिशास्त्रे, यांनी चेतनारूप पुरुषाचे स्थान हृदय सांगितले आहे. हृदय म्हणजे मांसपेशीमय सुषिर अधोमुख पद्माकार असलेला अवयव. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांचे स्थान हृदय. आत्म्याचे स्थान हृदय असल्यामुळे इच्छा, द्वेष, सुखदु:ख इ. आत्म्याची लक्षणे हृदयामध्येच उत्पन्न होतात. म्हणून मनाचे किंवा बुद्धीचे स्थान तेच मानले पाहिजे.

मस्तिक आणि चेतना यांचा संबंध : मेंदूवर जोराचा आघात झाला किंवा काही कारणांनी विकृती झाली असता मनुष्य निश्चेष्ट पडतो त्याच्या ठिकाणी सुखदु:खाची संवेदना नसते. ज्ञानेंद्रियांच्या व कर्मेंद्रियांच्या कार्यात बिघड होतो यावरून मेंदू हेच चेतनास्थान आहे असे कित्येक विद्वानांचे मत आणि यास साक्षीदार म्हणून आधुनिक पाश्चात्य शास्त्रांकडे बोट दाखविले जाते. आयुर्वेदामध्ये ह्रदयाप्रमाणे मस्तिष्काचेही महत्त्व वर्णिले आहे. जीवाच्या ठिकाणी चेतना उत्पन्न होण्याकरिता जी कारणसामग्री लागते त्यांपैकी एक कारण शिरामध्ये आहे म्हणून मस्तिष्काचे विशेष महत्त्व गाईले आहे. मस्तिष्कातून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ज्ञानवहस्रोतसे निघून श्रोत्रादी गोलकांकडे गेली आहेत. तसेच कर्मवहस्रोतसेही मस्तिष्कातून निघाली आहेत. एवंच ज्ञानवह आणि कर्मवह स्रोत यांचे मूलस्थान मस्तिष्क आहे.

पुरुषाला एखाद्या विषयाच्या ज्ञानाची इच्छा झाली तर तो प्रथम बुद्धीला कळवतो. बुद्धी मनात हुकूम सोडते. नंतर मन इंद्रियांवर अधिष्ठित होऊन त्यांना प्रेरणा देते. इंद्रिय आणि मन ही दोन्ही मिळून विषयाला व्यापतात, म्हणजे विषयाकार बनतात. मनासह विषयाकार झालेल्या इंद्रियांना त्या पदार्थाचे नाम, रूप, गुण, क्रिया, जाती असे सर्व प्रकारचे ज्ञान झाल्यावर त्यासंबंधीची सर्व माहिती बुद्धीला मनाकडून मिळते आणि शेवटी बुद्धी आत्म्याला त्यासंबंधीची माहिती देते व हा पदार्थ अमुक आहे आणि तो मी जाणतो अशी जाणीव उत्पन्न होते.

मनाचे विषय : दहा इंद्रियांपैकी प्रत्येक इंद्रियाचा एक विशिष्ट ठराविक विषय आहे. ज्या इंद्रियाचा जो विषय असेल त्या विषयाचे ज्ञान त्याच इंद्रियाने होते दुसऱ्याने होत नाही. परंतु मनाचे विषय अनेक आहेत. चिन्त्य, विचार्य, ऊह्य, ध्येय, संकल्प्य इ. याशिवाय इंद्रिय निरपेक्ष जेवढे विषय, ते सर्व मनाचे होत. प्रत्येक ज्ञानेंद्रियावर आरूढ होऊन त्यांच्याकडून श्रवण, स्पर्शन इ. कार्ये करून घेणे, तसेच आपल्या इच्छेनुसार कर्मेंद्रियांना प्रेरणा देणे हे मनाचे कार्ये. दुसरे महत्त्वाचे कार्य असे की, ते स्वत:चे नियमन स्वत:च करते. दुसऱ्या नियामकाची गरज नाही. 

मनाचे आत्माधिष्ठितत्त्व : मन हे अचेतन, जड आहे, परंतु त्याचा आत्म्याशी संयोग झाला म्हणजे क्रियाकारी शक्ती त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते. पांचभौतिक जड शरीर व जीवात्मा यांचा संयोग आणि वियोग मनाच्या द्वारेच घडतो. जनन-मरण, इह-परलोकातील गमनागमन, नाना प्रकारच्या योनींमध्ये फिरणे हे मन करते.

मनाचे त्रिविध गुण : सात्विक गुण-दयाशीलता, परोपकार बुद्धी, क्षमा, सत्यधर्म, आस्तिक्यबुद्धी, ज्ञान, धारणा, स्मृती, धृती, अनासक्ती. रजोगुण-दु:ख, दैन्य, उतावीळपणा, चांचल्या, अंहकार, मिथ्याभाषण, ढोंगीपणा, कपट, मान, हर्ष, काम, क्रोध. तमोगुण-औदासिन्य, नास्तिक्य, पापप्रवृत्ती, अज्ञान, मूढता, आलस्य, अतिनिद्रा. 

राशिसंज्ञक पुरुषाने प्रकृतिपुरुषविवेकद्वारा नैष्ठिक, आत्यंतिक व अविनाशी सुख प्राप्त करून घ्यावे, हे आयुर्वेदाचे अंतिम ध्येय आणि याकरिताच  सांख्यतत्त्वाची मीमांसा केली.

परंतु वरील ध्येय साध्य करण्याचे मुख्य साधन आरोग्य आणि ते सर्वस्वी बाह्य पांचभौतिक पदार्थांवर अवलंबून आहे. त्याकरिता त्रिगुणात्मक प्रकृती, महान, अहंकार, पंचतन्मात्र इ. सांख्यतत्त्वांचा विचार करण्याची गरज नाही. एवंच पांचभौतिक सृष्टीचा प्राधान्याने विचार करणे म्हणजे भौतिक पदार्थविज्ञान.

सृष्टीतील ज्ञेय पदार्थांचे साधर्म्य म्हणजे समानता आणि वैधर्म्य म्हणजे विपरीतता असे द्विविध वर्गीकरण आहे. क्षीण झालेले देह-धातू वाढविणे, जास्त प्रमाणात वाढलेले क्षीण करणे आणि समानस्थितीत असलेले स्थिर ठेवणे हेच चिकित्सेचे तत्त्व आहे.

दुसरे असे की, पदार्थांचे वर्गीकरण करताना सजीव शरीर व बाह्यसृष्टी या दोहोंचे ऐक्य साधले पाहिजे. कारण, चिकित्सेचे अधिष्ठान, शरीराधिष्ठित पुरुष असून, संपूर्ण चराचर सृष्टी हे उपकरण म्हणजे साधन आहे.


 सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म आणि समवाय या सहा पदार्थांहून सृष्टी म्हणून काही स्वतंत्र वस्तू नाही. कोणत्याही ज्ञेय वस्तूचा अंतर्भाव वरील सहांपैकी कोणत्या तरी पदार्थामध्ये होतोच. आयुर्वेदाने कापिल सांख्यशास्त्रातून जशी चोवीस तत्त्वे उचलली तसे न्यायवैशेषिकांकडून सामान्यादी षट् पदार्थांचे ग्रहण केले असा पुष्कळ विद्वानांचा समज आहेपरंतु तो योग्य वाटत नाही.

पारिभाषिक सामान्यादी शब्दांचे सादृश्य दिसत असल्यामुळे तसा समज होणे स्वाभाविक आहे. परंतु शब्द सादृश्यावरून दोन शास्त्रांचे ऐक्य ठरत नाही कारण तात्पर्य एक असत नाही अथवा एका शास्त्राकडून दुसऱ्या शास्त्राची निर्मिती झाली ही कल्पनासुद्धा चूक ठरते. साध्य किंवा ध्येय भिन्न झाल्यास ते शास्त्र इतर शास्त्रांहून भिन्न होते त्याचप्रमाणे त्यातील पारिभाषिक शब्दांचे अर्थ सुद्धा भिन्न असू शकतात. उदा., ‘सामान्य’ या शब्दाचा अर्थ व त्याच्या अर्थाची व्यापकता न्याय आणि आयुर्वेद यांत भिन्न आहे. ‘विशेष’ हा शब्द सुद्धा निराळ्या अर्थाने आयुर्वेदात वापरला जातो. गौतम-कणाद-महर्षि-प्रणीत पदार्थविज्ञानाचे ध्येय नि:श्रेयस म्हणजे मोक्षप्राप्ती हेच असल्यामुळे आत्मानात्मविचाराच्या उद्देशाने षट् पदार्थांचे अर्थ-विवेचन त्यांनी केले. आयुर्वेदाचे मुख्य ध्येय आरोग्यप्राप्ती हे आहे.

सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म व समवाय असा क्रम घेतला याचे कारण असे की, ‘धातुसाम्यक्रिया’ म्हणजे स्वास्थ्यरक्षण हे आयुर्वेदाचे एक पायाभूत ध्येय. स्वास्थ्यवस्थेतील दैनंदिन जीवन-व्यापारांनी शरीरधातूंची झीज सुरू असते. ती भरून काढण्याकरिता तत्समान गुण-कर्मात्मक द्रव्यांची गरज असते. त्यांच्या समान धर्मालाच ‘सामान्य’ असे म्हणतात. कारण कोणत्याही वस्तूची झीज तत्समान द्रव्यानेच भरून निघते.

रोगावस्थेमध्ये वातादी दोषांचा प्रकोप होऊन स्थान-भेदाने निरनिराळे रोग उत्पन्न होतात. प्रमाणाबाहेर वाढलेल्या दोषांचा र्‍हास केलाच पाहिजे, यालाच चिकित्सा म्हणतात. कोणत्याही पदार्थाचा र्‍हास विपरीतानेच होतो. विपरीत द्रव्यगुणकर्मालाच ‘विशेष’ असे म्हणतात. पदार्थक्रमामध्ये सामान्य व विशेषाला अग्रस्थान देऊन आयुर्वेदाने न्यायवैशेषिकांहून आयुर्वेदीय पदार्थविज्ञान स्वतंत्र आहे, असे निदर्शनास आणले. आयुर्वेदाने पदार्थवर्णानाचा क्रम सामान्य-विशेषापासून सुरू केला असला तरी विषय विवेचनाच्य दृष्टीने ‘द्रव्य-गुणकर्म’ हाच क्रम सोयीचा आहे. म्हणून पदार्थांची रूपरेषा द्रव्यापासूनच दर्शविणे ठीक होईल.

द्रव्यनिरूपण : सहा प्रकारच्या भावरूप पदार्थांपैकी द्रव्य हा श्रेष्ठ पदार्थ आहे. कारण त्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने गुण व कर्म राहतात. त्यांना द्रव्याशिवाय दुसरा आधार नाही. शिवाय द्रव्याच्या ठिकाणी सामान्य व विशेष हे सुद्धा पदार्थ राहतात. तात्पर्य द्रव्य हा पदार्थ सर्व प्रकारच्या पदार्थांना आधारभूत आहे म्हणून ‘द्रव्यमिति आधारकारणम्’ अशी व्याख्या केली आहे. (१) आकाश, (२) वायू, (३) अग्नी, (४) जल, (५) पृथ्वी, (६) जीवात्मा, (७) मन, (८) काल आणि (९) दिशा हीच नऊ द्रव्ये न्यायशास्त्रामध्ये सुद्धा सांगितली आहेत. मानवी बुद्धीला ज्ञेय होणारी द्रव्ये, यापेक्षा जास्त असू शकत नाहीत असा अर्थ.

कारणाद्रव्ये व कार्यद्रव्ये असे द्रव्याचे दोन प्रकार. वर सांगितलेली कारणद्रव्ये सर्व प्रकारच्या कार्यद्रव्यांना कारणीभूत म्हणून यांना कारणद्रव्ये म्हणतात. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच द्रव्यांना ‘भूत’ अशी संज्ञा आहे. श्रोत्रादी बाह्येंद्रियांनी ज्यांच्या विशेष गुणांचे ज्ञान होते किंवा बहिरिंद्रियग्राह्य विशेषगुण ज्यांच्या ठिकाणी राहतात त्यांना ‘भूत’ म्हणतात. बाकीची अभूत द्रव्ये समजावीत. आकाशादी पाच द्रव्यांच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे विशेष गुणे क्रमाने राहात असून ते श्रोत्र, त्वक्, चक्षू, जिव्हा आणि घ्राण या ज्ञानेंद्रियांनी क्रमश: ग्राह्य आहेत.

मूर्त द्रव्ये व अमूर्त द्रव्ये, विभु द्रव्ये म्हणजे सर्व मूर्तांना व्यापणारी द्रव्ये आणि तशी नसणारी अविभु द्रव्ये, असे द्रव्यांचे प्रकार पाडलेले आहेत परंतु चिकित्सेला त्यांचा विशेष उपयोग नाही.

ज्या भूतांची उत्पत्ती परमाणूंच्या संयोगाने होते ती भूते सावयव होत. पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही भूते सावयव होत आणि आकासाला परमाणू नसल्यामुळे ते निरवयव आहे. आयुर्वेदीय भौतिक पदार्थविज्ञानामध्ये सांख्यशास्त्राप्रमाणे पंच भूतांसंबंधी क्रमपरिणामवाद मानला नाही, नैयायिक वैशेषिकांप्रमाणे आरंभवादच स्वीकारला आहे त्यामुळे आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप व त्याच्यापासून पृथ्वी अशा तर्‍हेची क्रमोत्पत्ती भौतिक पदार्थ विवेचनात मानिली नाही. कारण चिकित्सेच्या दृष्टीने सांख्यांच्या परिणामवादापेक्षा न्यायवैशेषिकांचा आरंभवाद जास्त पोषक आहे. परंतु आयुर्वेदाने आपल्या आध्यात्मिक विज्ञानखंडामध्ये सांख्य प्रक्रियेनुसार क्रमपरिणमोत्पत्तीही घेतली आहे.

पृथ्वीचे परमाणू खर म्हणजे कठीण, स्थूल व स्थिरजलाचे परमाणू द्रव म्हणजे प्रवाही. वायूचे परमाणू चंचल व गतिमान. अग्नीचे परमाणू उष्ण. आकाश विभु व निरवयव त्याचे परमाणू नाहीत.

अवयवी-स्वरूप व स्थूल पृथ्व्यादी भूतांच्या ठिकाणी ज्या अर्थी खरत्व, द्रवत्व, चलत्व आणि उष्णता हे धर्म दिसतात त्या अर्थी त्यांच्या अवयवभूत परमाणूंचे सुद्धा तेच स्वरूप असले पाहिजे, असे अनुमान निघते. पृथ्वीच्या परमाणूंचा विशेष गुण गंध, जलीय परमाणूंचा रस, तेजस परमाणूंचा गुण रूप, वायवीय परमाणूंचा स्पर्श.

प्रत्येक भूताचे परमाणू १/२ प्रमाण व इतर भूतांचे प्रमाण १/८ यांच्या परस्पर संयोगाला पंचीकरण म्हणतात. आयुर्वेदामध्ये सुश्रुताने त्यास ‘अन्योन्यानुप्रवेश’ असा शब्दप्रयोग केला आहे. यानंतर पृथ्व्यादी भूतांना स्थूल-व्यवहार्य स्वरूप येते. तोपर्यंत ते अव्यक्त म्हणजे सूक्ष्मच असतात.

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आपण ज्यास म्हणतो, ती पंचमहाभूते पंचीकृत, म्हणून स्थूल आहेत. ह्या पंचमहाभूतांपासून स्थावरजंगम सृष्टी उत्पन्न झाली. प्रत्येक आहारौषधीभूत स्थावरजंगम द्रव्य पांचभौतिक आहे. याचा अर्थ असा की, आकाशासहित पृथ्व्यादी चतुर्विध परमाणूंच्या संयोगापासून त्यांची निर्मिती आहे.

शरीरातील दोष, धातू, मल, आशय, स्रोतसे इ. सर्व तशीच आहेत. त्यामुळे शरीर आणि इतर सृष्टी यात काही फरक नाही. शरीर हे चेतनाधिष्ठानभूत आहे तशी इतर सृष्टी नाही ती जड आहे असे स्थूलदृष्ट्या फार तर म्हणता येईल परंतु तात्त्विकदृष्ट्या पाहिले तर समष्टी सृष्टीसुद्धा चेतनाधिष्ठित आहे.

इंद्रियग्राह्य अशा द्रव्यांचा उपयोग आहार आणि औषध यांमध्ये होतो. ही सर्व द्रव्ये सावयव, मूर्त आहेम्हणजे चतुर्विध परमाणूंपासून उत्पन्न झाली आहेत.

आयुर्वेदामध्ये परमाणू शब्दाचा अर्थ सूक्ष्मकण, सूक्ष्म अवयव एवढ्याच अर्थाने मर्यादित आहे. न्यायवैशेषिकांप्रमाणे, नित्य, निरवयव, अंत्यावयव स्वरूप असा अर्थ मानला नाही. ‘शरीरावयवास्तु परमाणुभेदेने अपरिसंख्येया भवन्ति’ येथे परमाणू शब्द अणू म्हणजे सूक्ष्म अवयव या अर्थाचा आला आहे. म्हणून द्रव्यगुणशास्त्रा-मध्ये तोच अर्थ सर्वत्र घ्यावा.

आकाशसहित चतुर्विध महाभूतांच्या न्यूनाधिक सूक्ष्मांकणांपासून नानाविध अनंत द्रव्ये तयार होतात. याचा अर्थ असा की, आकाश आणि निरनिराळ्या परमाणूंची न्यूनाधिक संख्या यामुळे द्रव्याला आनंत्य आणि वैचित्र्य येते. पार्थिवादी परमाणूंची संख्या हेच एकटेआनंत्याला कारण नाहीपरमाणूंचा परस्पर संयोग हेही कारण आहे. ऊर्ध्व, अध:, तिर्यक् अशा दिग्भेदाने त्याचा सन्निवेश म्हणजे मांडणी, जुळणी किंवा ठेवण होते. एका द्रव्याचे दुसऱ्या द्रव्यामध्ये रूपांतर होण्याकरिता किंवा गुणांतर होण्याकरिता अग्निसंयोगाची आवश्यकता असते, यालाच पाक अशी संज्ञा आहे.

न्यायवैशेषिकशास्त्रामध्ये सर्व प्रकारच्या कार्यद्रव्याची उत्पत्ती पृथ्व्यादी चतुर्विध परमाणूंपासूनच होते, म्हणून द्रव्यारंभक भूते चार मानिली आहेत. परंतु आयुर्वेदामध्ये प्रत्येक द्रव्य पांचभौतिक सांगितले आहे. पृथ्व्यादी चतुर्विध परमाणुसंघात द्रव्य जसे पांचभौतिक तसे गुणसुद्धा पांचभौतिक आहेत. आणि ग्राही, भेदी इ. कर्मे पंचमहा-भूतांच्या विशिष्ट संयोगाने उत्पन्न होतात म्हणू ती (कर्मे) पंचमहाभूतजन्य आहेत. द्रव्यारंभक मुख्य महाभूतांहून गुणारंभक व कर्मारंभक महाभूते भिन्नही असू शकतातअसे आयुर्वेदशास्त्राचे मत. या मताचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.

कार्यद्रव्योत्पत्ती प्रक्रिया : पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचे परमाणू अनुक्रमे खर म्हणजे कठीण, द्रव, उष्ण आणि गतिमान आहेत हे पूर्वी सांगितले आहेच. आपण सर्व जीव भूलोकावर राहणारे म्हणून या लोकातील प्रत्येक द्रव्याचे अधिष्ठान पार्थिव परमाणू असणार. पार्थिव परमाणू कठीण असल्यामुळे त्याचे संघटन (एकमेकांशी चिकटणे) होऊ शकत नाहीत्याकरिता द्रवाची आवश्यकता आहे. हे संघटनेचे कार्य जलीय परमाणू करतात म्हणून द्रव्योत्पत्तिकरता जलीय परमाणु योनी म्हणजे कारणीभूत आहेत. योनी हा शब्द ‘यु’ धातुपासून बनला. यु म्हणजे मिश्रण करणे, पार्थिव परमाणूंचे मिश्रण करतात म्हणून जलीय परमाणूंना ‘योनी’ म्हटले.


दूध, तेल इ. आहारौषधीभूत द्रव्यांमध्ये जलीय परमाणूंचे प्रमाण जास्त असते म्हणून ते द्रवस्वरूप बनले आहेत. जलीय परमाणूंच्या संयोगाने संघटित झालेल्या पार्थिव परमाणूंचे प्रत्येक द्रव्यांच्या स्वरूपानुसार ऊर्ध्व, अध:, तिर्यक् अशा निरनिराळ्या बाजूने यथायोग्य प्रमाणात संयुक्त करण्याचे कार्य वायू करतो त्यामुळे प्रत्येक द्रव्याचे स्वरूप व आकार बदलतो. गर्भाशयामध्ये पंचमहाभूतांच्या संयोगाने बनणाऱ्या गर्भपिंडास जो निरनिराळा आकार येतो, त्याला कारण वायूच आहे. शिवाय द्रव्यामध्ये काठिण्य उत्पन्न करणे हे वायूचे कार्य.

घट इ. मातीची भांडी भट्टीत घालून पक्व झाल्याशिवाय त्यांचा काही उपयोग नाही, त्याप्रमाणे द्रव्यनिष्पत्ती होण्याकरिता पाकक्रिया घडलीच पाहिजे, हे कार्य अग्निय परमाणूंच्या संयोगाने घडते.

द्रव्यनिष्पत्ती होत असताना पार्थिवादी परमाणूंची संयोग, विभाग, ऊर्ध्व, अध:, तिर्यक् गती पाहिजे आणि त्या करिता न्यूनाधिक प्रमाणात अवकाशाची म्हणजे आकाशाची गरज आहे. द्रव्याला विशिष्ट आकार येणे, त्यातील पोकळीवर अवलंबून आहे. ती जर नसेल तर एक गोळा तयार होईल आकार येणार नाही. कोणतेही द्रव्य तयार होताना पंचमहाभूतांची हीच क्रिया चालते. द्रव्योत्पत्तीच्या वेळी अधिष्ठानभूत पार्थिव परमाणूंवर निरनिराळ्या भूत परमाणूंच्या क्रिया सुरू असताना ज्या भूतांचे अधिक्य होईल त्या भूतांचे गुण द्रव्यामध्ये उतरतात व तदनुसार द्रव्याला पार्थिव, आप्य, तैजस, वायवीय किंवा आकाशीय असे नाव पडते. पृथ्वी, आप तेज वायू आणि आकाश या भूत-संज्ञक द्रव्यांचे स्वरूप व गुण पूर्वी सांगितले. खर, द्रव, चल, उष्ण व आकाश हे पृथ्व्यादी भूतांचे स्वरूप धर्म असून गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द हे अनुक्रमे त्यांचे गुण आहेत.

न्यायवैशेषिक शास्त्रामध्ये भूत, भविष्य, वर्तमान इ. व्यवहारांची उपपत्ती लावण्याकरिता ‘काल’ हे द्रव्य मानले. द्रव्याची, गुणाची, मधुरादी रसांची उपपत्ती कालावर कशी अवलंबून आहे हे त्यांनी सांगितले नाही. परंतु आयुर्वेदाने देह आणि द्रव्य, गुण, रस, वीर्यादीकांचा कालाशी अगदी निकटचा संबंध दाखविला आहे. मानवी जीवन कालाशी सुसंबद्ध आहे.

सूर्य-चंद्राची विशिष्ट क्रमिक गती व त्यांचे बलाबल, यामुळे शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद्, हेमंत असे सहा ऋतुविभाग होतात. पहिले तीन ऋतू मिळून आदान काल व शेवटचे तीन मिळून विसर्ग काल यास उत्तरायण व दक्षिणायन असेही म्हणतात. शीत, उष्ण, वर्षा असे तीन प्रकार. शिशिर ऋतूमध्ये तिक्तरस, वसंत ऋतूमध्ये कषायरस, ग्रीष्म ऋतूमध्ये कटुरस, वर्षा ऋतूमध्ये अम्‍लरस, शरद ऋतूमध्ये लवणरस आणि हेमंत ऋतूमध्ये मधुर रस उत्पन्न होतात. प्रत्येक ऋतूमध्ये पंचमहाभूतांपैकी विशिष्ट भूतांची वृद्धी होते व क्षय होतो. पृथ्व्यादी परमाणूंचा उत्कर्षापकर्ष कालावर अवलंबून आहे यास कालप्रभाव असे म्हणतात. ऋतुपरत्वे शरीरबल कमी अधिक होते संपूर्ण सृष्टीमध्ये घडामोड होते. त्याचे बरे-वाईट परिणाम शरीरावर होतात. ऋतू अनुकूल असल्यास त्यास ऋतुसंपत् व ऋतू प्रतिकूल असल्यास त्यास ऋतुव्यापत् म्हणतात. ऋतुव्यापत् झाली असता जनपदोध्वंस होतो.

खाल्लेल्या अन्नाचे जसे मधुरादी तीन विपाक शरीरात होतात, त्याप्रमाणे हेमंत, वर्षा आणि ग्रीष्म या ऋतूंमध्ये सृष्टीतील आहारौषधिद्रव्यांत मधुर, अम्‍ल आणि कटू विपाक होतात त्याचेच परिणाम कफ, पित्त व वात प्रकोपाच्या रूपाने शरीरावर होतात. यास ‘कालस्वभाव’ असे म्हणतात. तात्पर्य, पांचभौतिक शरीर व सृष्टी या दोहोंचा संयोजक काल आहे. कालाचे बरे-वाईट परिणाम अगोदर बाह्य सृष्टीवर होतात आणि नंतर शरीरावर घडतात. कारण शरीर हे सृष्टीचाच एक घटक आहे. म्हणून न्यायवैशेषिक शास्त्रापेक्षा कालाचे महत्त्व आयुर्वेदात विशेष आहे. ‘अतीतादिव्यवहारहेतु: काल:’ एवढ्याच पुरता कालाचा संबंध नसून त्याचा मानवी जीवनाशी व सृष्टीतील द्रव्याच्या निर्मितीशी संबंध आहे.

दिशांसंबंधी आयुर्वेद आणि न्यायवैशेषिक शास्त्र या दोन शास्त्रांचा दृष्टिकोन भिन्न आहे. पूर्व, पश्चिम इ. व्यवहाराला कारणीभूत काहीतरी द्रव्य मानले पाहिजे, म्हणून केवळ व्यवहाराची उपपत्ती लावण्याकरिता दिशांची कल्पना न्यायवैशेषिकांनी मांडली. मानवी सजीव शरीराशी व त्याला उपकरण भूत बाह्य सृष्टीशी दिशांचा कोणत्याच प्रकारचा संबंध त्यांनी दाखविला नाही. याच्या उलट आयुर्वेदाने शरीर आणि सृष्टी या दोहोंचा मेळ घालण्याकरिता दिशांची मांडणी केली. कोणतेही कार्य जसे विशिष्ट काळात उत्पन्न होते त्याप्रमाणे कोणत्या तरी दिशेलाही होते. तात्पर्य, प्रत्येक कार्यद्रव्याला दिक् व काल यांचा परिच्छेद आहे. म्हणून त्यांना निमित्त कारण मानले आहे. द्रव्य उत्पन्न होत असताना ते कोणत्यातरी पूर्व, पश्चिम इ. दिशेला उत्पन्न होते एवढ्यापुरताच द्रव्य आणि दिशा यांचा संबंध, असे न्यायवैशेषिक शास्त्र समजते. द्रव्यांतर्गत दिशांची कल्पना त्यात नाही. आयुर्वेदशास्त्रामध्ये साकार द्रव्याच्या बाजूला दिशा असे नाव दिले आहे. अधिष्ठान भेदाने म्हणजे देशभेदाने दिशांची नावे बदलतात. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर ही नावे भूमिरूपी अधिष्ठानाच्या अपेक्षेने आहेत. डावा, उजवा, आत-बाहेर, ऊर्ध्व-अध:, तिर्यक् ही दिशांची भाषा द्रव्य व शरीराचा देश यांच्या अपेक्षेने निर्माण झाली आहे. मागे, पुढे, लांबी, रुंदी, जाडी ही सुद्धा दिशांचीच आहे. दिशेमुळे द्रव्याला आकार येतो. आहारौषधिस्वरूप कोणत्याही कार्यद्रव्याच्या सूक्ष्म कणाला दिशा म्हणजे बाजू असते. एक कण दुसऱ्या कणाशी ज्या दिशेने चिकटतो त्या दिशेने त्या द्रव्याचा आकार वाढतो, व ज्या दिशेने विभक्त होतो तो भाग क्षीण होतो. अशा रीतीने द्रव्याच्या स्वरूपाला आकार येण्याकरिता दिशेचा उपयोग होतो. दिग्भेदाने द्रव्याच्या आकारात जसा फरक पडतो तसा गुणामध्येही भेद होतो. उदा. नरजातीय प्राण्यांच्या नाभीपासून वरचा भाग गुरू असून, मादीजातीय प्राण्यांचा नाभीपासून खालचा भाग गुरू (पचनास जड) असतो. बाह्यरोगमार्ग, मध्यमरोगमार्ग व आंतररोगमार्ग हे मार्गभेद दिग्विभागानेच निर्माण केलेले आहेत. द्रव्याच्या प्रत्येक बाजूला (दिशेला) पंचमहाभूते व त्यांची रचना अगदी सारखीच असेल असे नाहीभिन्न भिन्न असू शकते. हे वाग्भटोक्त वचनावरून दिसून येते. तसेच द्रव्याच्या निरनिराळ्या अंगाची पांचभौतिक घटनासुद्धा अगदी सारखी असते असे नाहीभिन्न भिन्न सुद्धा असू शकते.

दिग्भेदाने संयुक्त झालेल्या पंचमहाभूत परमाणूंपासून निरनिराळ्या आकारांची व स्वरूपांची द्रव्ये निर्माण होतात व ती आहार-औषधी रूपाने आपल्या पोटात गेली असता पचन झाल्यावर त्यांचा परिणाम तत्सदृश देहधातूंवर होतो. पदार्थांच्या दिशेत बदल करता येतो. द्रव्यारंभक, गुणारंभक व कर्मारंभक पांचभौतिक परमाणूंचा दिग्भेदाने झालेला संयोग द्रव्यांतराने, संस्काराने, पाकाने किंवा कालप्रकर्षाने बदलतो. त्यामुळे पूर्वीच्या द्रव्याचे, गुणाचे व कर्माचे दुसऱ्या द्रव्यामध्ये, गुणामध्ये व कर्मामध्ये रूपांतर होते. उदा., अग्निसंयोग व अम्लद्रव्यसंयोग यांमुळे दुधाचे दही बनते. पाण्यामध्ये मुरलेल्या दंती मुळात रेचक गुण रहात नाही. तात्पर्य, देहधातू व आहारौषधीभूत द्रव्ये यांची उत्पत्ती पंचमहाभूतांच्या दैशिक संयोगावर अवलंबून आहे.

कोणत्याही एका माणसाचे दुसऱ्याशी अगदी हुबेहुब सादृश्य जुळत नाहीयाचे कारण काय? कारण हेच की, गर्भाशयामध्ये पांचभौतिक शरीर निर्माण होताना आकाश आणि पार्थिवादी चतुर्विध परमाणू यांचा सन्निवेश निराळा असतो. भूतपरमाणुसंघात निरनिराळ्या दिशेने एकमेकाशी चिकटतो त्यामुळे कुणाचे डोळे मोठे, तर कुणाचे बारीक, एखाद्याचे लांब सरळ नाक, तर दुसऱ्याचे चपटे-बसके. अशा निरनिराळ्या दिशेने म्हणजे बाजूने होणाऱ्या संयोगास आयुर्वेदशास्त्रामध्ये ‘सन्निवेश’ म्हणजे मांडणी, जुळणी, ठेवण असे म्हणतात.


सन्निवेश म्हणजे दिग्भेदाने होणारा परमाणू संयोग. आश्रय भेदाने दिशांची नावे:स्थूल,मूर्त व अवयवी द्रव्यावाचून स्वतंत्रपणे दिशांची कल्पना येऊ शकत नाही आणि आश्रयीभूत द्रव्याच्या अपेक्षेने दिशांची भाषा बदलते. पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर ही भौगोलिक दिशांची नावे होत. ऊर्ध्व, अधः, तिर्यक्, आंतर, बाह्य, मध्यम, दक्षिण, वाम, उताणा, उलथा-पालथा, कोष्ठाशाखा ही दिशांचीच नावे आहेत. परंतु ती आहेत शरीरदेशाच्या दृष्टीने. तसेच लांबी, रुंदी, जाडी, खोली ही भाषा दिशांची आहे. आकाशामध्ये सूर्याच्या गतीची दिशा दाखविणारी नावे – उत्तरायण, दक्षिणायन.

दिशांची अनियत स्थिती : द्रव्यारंभक, गुणारंभक व कर्मारंभक परमाणूंचा दिग्भेदाने होणारा सन्निवेश इतका अनिश्चित व अस्थिर असतो की, कोणत्याही कारणाने त्यात कसा बदल होईल आणि त्यामुळे कशा तर्‍हेचे रूपांतर होईल याचा नेम नाही. द्रव्यांतर संयोग, संस्कार, पाकक्रिया आणि काल ही दिग्भेदाची प्रमुख कारणे होत.

दिग्भेदाने द्रव्यगुण भेद : पदार्थाच्या भिन्न भिन्न सन्निवेशामुळे निरनिराळी विचित्र द्रव्ये तयार होतात. परमाणूंच्या संयोगाची थोडी जरी दिशा बदलली तरी द्रव्यामध्ये व गुणामध्ये बदल होतो, त्यामुळे त्यांच्या कार्यातही फरक पडतो. न्यायवैशेषिक शास्त्रात सुवर्ण तेजस मानले जाते. परंतु सुवर्णोत्पादक भूत परमाणूंचा असा काही विचित्र सन्निवेश झालेला आहे की, त्यामुळे सोन्यामध्ये कांती, तेज, मृदुता हे गुण आले. परंतु उष्णता हा तेजाचा गुण उतरला नाही. मकुष्ठामध्ये जलीय परमाणूंच्या विशिष्ट सन्निवेशाने मधुर गुण आला पण त्याचा स्निग्ध गुण आला नाही.

प्रमाण विचार : भावरूप पदार्थ व अभावरूप पदार्थ असे पदार्थाचे दोन प्रकार. ज्याला सत्ता म्हणजे अस्तित्व आहे त्याला भावरूप पदार्थ म्हणतात आणि भावपदार्थांचा नकार म्हणजे अभावरूप पदार्थ असे म्हणतात.

द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष व समवाय हे भावरूप पदार्थ आयुर्वेदात सांगितले आहेत. भावरूप किंवा अभावरूप कोणताही पदार्थ असो त्याची परीक्षा झाल्याशिवाय तो आहे किंवा नाही हे निश्चित ठरत नाही. ज्याच्या योगाने वस्तूचे यथार्थ ज्ञान होते त्याला परीक्षा म्हणतात. या परीक्षेलाच शास्त्रामध्ये ‘प्रमाण’असे पारिभाषिक नाव आहे. यथार्थानुभव ज्याच्या योगाने येतो, अशा साधनास प्रमाण म्हणतात आणि ज्याच्या बाध होत नाही, जो अनुभव म्हणजे जे ज्ञान खोटे ठरत नाही, अशा अबाधित ज्ञानाला प्रमाण असे नाव आहे. पदार्थाचे यथार्थ ज्ञान होण्याकरिता प्रमाता, प्रमाण व प्रमेय या तिघांची गरज आहे. ज्ञान होण्याकरिता त्याला काही तरी विषय पाहिजे. विषयच नाही तर ज्ञान कुणाचे होणार? म्हणून यथार्थ ज्ञानाचा जो विषय त्याला ‘प्रमेय’अशी संज्ञा आहे. प्रमाणाच्या योगाने ज्याला प्रमेयाचे म्हणजे विषयाचे ज्ञान होते त्याला प्रमाता म्हणतात, म्हणजे प्रमेय वस्तूच्या ज्ञानाचे जे साधन ते प्रमाण. असाधारण कारण म्हणजे करण होयम्हणजे ज्ञाता आहे, त्याच्यासमोर ज्ञेयवस्तू आहे, पण जे नसल्यामुळे त्याला त्या वस्तूचे ज्ञान होत नाही, परंतु ते असले तर ज्ञान नियमाने होते, अशा असाधारण कारणाला करण म्हणतात. आयुर्वेदामध्ये ‘प्रमाकरण प्रमाण’ या लक्षणानुसार तीन प्रमाणे मानली आहेत. ती प्रत्यक्ष, अनुमान व शब्द किंवा आप्तवचन ही होत. चरक सूत्रस्थानामध्ये ‘युक्ति’हेही एक प्रमाण सांगितले आहे. परंतु युक्ती, हे स्वतंत्र प्रमाण नसून ते अनुमान प्रमाणाला अनुग्राहक असल्यामुळे तिचा अंतर्भाव अनुमानामध्येच वस्तुत: होतो. परंतु रोगनिदान व चिकित्सेमध्ये चरकाचार्यांनी युक्तीचे विशेष महत्त्व सांगितले आहे. वैद्य हा नेहमी युक्तिवान पाहिजे. वेळेवर ज्याला युक्ती सुचत नाही, तो वैद्य कुचकामाचा, असे चरकाचार्यांचे म्हणणे. परिणाम व कालमान यांना धरून विचार करणे म्हणजे युक्ती होय.

विमानस्थानाच्या आठव्या अध्यायात ‘उपमान’ हेही एक प्रमाण सांगितले. एकाचे दुसऱ्याशी सादृश्य ध्यानात घेऊन एकाच्या नावाने दुसऱ्याचा निर्देश करणे. उदा., दंडक रोग व धनुस्तंभ रोग. परंतु याचाही अंतर्भाव अनुमानातच केला असल्यामुळे प्रमाणे तीनचप्रत्यक्ष, अनुमान व शब्द.

प्रत्यक्ष: मनुष्याला श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रियांनी शब्दादी पाच प्रकारच्या विषयांचे ज्ञान होतेसुखदुःखादी काही विषयांचे ज्ञान मनाने होते. अनुमान : उदा., धूमावरून वन्हीचे ज्ञान होणे. शब्द: कित्येक गोष्टींचे ज्ञान आप्तपुरुषांच्या सांगण्यावरून होते किंवा पुस्तकावरूनही होते. अशा रीतीने ज्ञान होण्याची साधने अनेक आहेत. आपल्याला येणारा अनुभव अगदी अबाधित सत्यच राहील असा नेम नाही. अनुभव खरा असू शकेल किंवा खोटाही असू शकेल. पृथ्वी स्थिर वाटते व सूर्य फिरतो असे वाटते परंतु शास्त्राच्या मते हा अनुभव खोटा आहे. तात्पर्य, जो अनुभव येतो तो अगदी खराच आहे असे केव्हाही समजू नये. ज्या विषयाच्या ज्ञानाचा बाध हा होत नाही असा अनुभव खरा समजावा. अबाधित विषय ज्ञानालाच प्रमा’ किंवा प्रमिति’ असे म्हणतात, आणि असे अबाधित विषय-ज्ञान ज्याच्या योगाने होते, त्यालाच प्रमाण अशी संज्ञा आहे. प्रत्यक्ष अनुभव आणि अप्रत्यक्ष अनुभव असे अनुभवाचे किंवा ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. आपल्या पंचज्ञानेंद्रियांनी किंवा मनाने जो अनुभव येतो किंवा जे ज्ञान होते, ते प्रत्यक्ष होय आणि बाकीच्या साधनांनी जे ज्ञान होते किंवा अनुभव येतो त्याला अप्रत्यक्ष म्हणतात. अनुमान प्रमाणाने जे यथार्थ ज्ञान होते त्याला अनुमिति-प्रमाण असे म्हणतात. उपमानावरून म्हणजे एखाद्या उदाहरणावरून जे यथार्थ ज्ञान होते त्याला उपमिति’ प्रमा व शब्दावरून होणाऱ्या यथार्थ ज्ञानास शाब्द प्रमा असे म्हणतात. चक्षुरादी इंद्रिये व घटपटादी विषय यांचा संयोग झाल्यानंतर जे ज्ञान होते त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. चक्षुरादी इंद्रिये प्रत्यक्ष प्रमाण होय. लौकिक प्रत्यक्ष आणि अलौकिक प्रत्यक्ष असे प्रत्यक्ष ज्ञानाचे दोन प्रकार. इंद्रियाचा विषयाशी संयोग झाल्यानंतर जे ज्ञान होते त्याला लौकिक प्रत्यक्ष म्हणतात. ऐंद्रिय प्रत्यक्ष व मानस प्रत्यक्ष. पंचज्ञानेंद्रियांच्या संयोगाने होणारे ज्ञान ऐंद्रिय होयआणि सुख, दुःख, इच्छा, द्वेष इ. विषयाचे मनाने होणारे ‘मानस प्रत्यक्ष’ होय.

लौकिक प्रत्यक्षाचे अल्पत्व :साधारण प्रत्येक मनुष्य आपल्या चक्षुरादी इंद्रियांची व मनाची अगदी खात्री बाळगतो. पुष्कळ वेळा आपली इंद्रिये व मन आपल्यालाच फसवितात अशी कल्पना नसतेम्हणून प्रत्यक्ष प्रमाण हेच काय ते एकटे खरे असे लोक समजतात. याला उद्देशून चरकाचार्य म्हणतात, प्रत्यक्ष प्रमाणाच्या पलीकडे आम्ही काही मानीत नाही, आमच्या डोळ्याने जे दिसेल तेच खरे, बाकी सब झूट, असे म्हणणे निदान बुद्धिमान म्हणविणार्‍यांनी सोडून दिले पाहिजे.

ज्या प्रत्यक्षावर तुम्ही एवढा जोर देत आहात त्या प्रत्यक्षाचे क्षेत्र किती अल्प-मर्यादित आहे, याची कल्पना आहे का? ज्या इंद्रियांच्या साहाय्याने प्रत्यक्ष ज्ञान होते ती इंद्रियेच तर मुळी अप्रत्यक्ष आहेत. आपला डोळा आपण पाहू शकत नाही, अर्थात तो अप्रत्यक्ष आहे. मग तो नाही म्हणणार का? पंचज्ञानेंद्रियांपैकी एकही इंद्रिय आपणास प्रत्यक्ष दिसत नाही. अर्थात अनुमानावरूनच त्यांचे ज्ञान होते. आपल्या इंद्रियांनी प्रत्यक्ष कळण्याजोगी वस्तू असून सुद्धा निरनिराळ्या प्रतिबंधक कारणांनी ती प्रत्यक्ष होऊ शकत नाही. अत्यंत समीप असलेली वस्तू दिसत नाही. अत्यंत दूरची वस्तू इंद्रियगोचर होत नसतेवस्तूला एखादे आवरण वा व्यवधान असेल तर ती प्रत्यक्ष होत नाहीमन स्थिर नसेल तर वस्तू दिसत नाही. दोन किंवा अनेक समान स्वरूपाच्या वस्तूंचे मिश्रण झाले तर दिसत नाही (उदा., दूध-पाणी). अभिभवाने दिसत नाही म्हणजे जसे सूर्याच्या तेजाने तारे दिसत नाहीत. अत्यंत सूक्ष्म किंवा अत्यंत व्यापक दिसत नाही. वरील अनेक कारणांनी वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान होत नसेल, तर ती वस्तू मुळी अस्तित्वातच नाही, असे मानणार का? तात्पर्य, आयुर्वेदाने प्रत्यक्ष प्रमाणाचे क्षेत्र किती मर्यादित म्हणजे संकुचित आहे हे स्पष्ट दाखवून त्यावरच सर्वस्वी विसंबून राहू नका, असे सांगितले.


ज्याला अतींद्रिय ज्ञानप्राप्तीची इच्छा असेल त्याने बाह्य विषयांपासून पंचज्ञानेंद्रियांचा संयम करावा. अत्यंत चंचल मनाचाही रोध करून त्याचा आत्म्यामध्ये लय करावा. याचा अर्थ असा की, आपले मन इंद्रियांच्या द्वारा विषयाकार होऊ न देता, ते आत्माकार करावे. तसे झाले असता मनाला इंद्रिये आणि विषय यांची औपाधिक मर्यादा न राहिल्यामुळे त्याला कोणत्याही वस्तूचे यथार्थ ज्ञान होते. त्याच्या ज्ञानाला दिक्-देश-काल व वस्तु-परिच्छेद राहात नाही. जागृतीमध्ये जीव स्थूलदेहाचा अभिमान म्हणजे मीच देह’ असा अभिमान धारण करीत असल्यामुळे त्याला स्थूल पदार्थांचेच ज्ञान होते. परंतु स्वप्नामध्ये स्थूलाचा अभिमान सोडून सूक्ष्म देहाचा अभिमान धरत असल्यामुळे स्थूल भौतिक मर्यादा सुटते, व एका क्षणात कुठेही जाऊ शकतो चक्षुरिंद्रियावाचून पाहू शकतो. योगी किंवा आत्मज्ञानी यांना विषयांचे ज्ञान होण्यास पंचज्ञानेंद्रियांची गरज नसतेव कोणत्याही कर्माकरिता कर्मेंद्रियांची आवश्यकता नसते. (१) परकाया प्रवेश, (२) दुसऱ्याचे अंत:करण जाणणे, (३) इच्छेनुसार शब्दस्पर्शादिकांचे ज्ञान होणे, (४) अतींद्रिय पदार्थाचे ज्ञान होणे, (५) अत्यंत दूर म्हणजे परदेशामध्ये सुद्धा एखादा बोलत असेल तर ते ऐकणे, (६) विलक्षण स्मरणशक्ती म्हणजे मागील अनेक जन्मांची स्मृती रहाणे, (७) शरीरावर दिव्य कांती असणे, (८) गुप्त होणे व प्रगट होणे. या अष्टसिद्धी योग्यांना त्यांच्या तपोबलाने अथवा ईश्वरोपासनेने प्राप्त होतात. यालाच अलौकिक ज्ञान, ज्ञानदृष्टी, ज्ञानचक्षू, दिव्यदृष्टी इ. नावे आहेत.

आयुर्वेदामध्ये प्रत्यक्षाप्रमाणे अनुमान हे दुसरे प्रमाण मानले आहे. परंतु यासंबंधी विशेष विवेचन केलेले नाही. अनुमान तीन प्रकारचे – (१) पूर्ववत, (२) शेषवत  व (३) सामान्यतो दृष्ट. कारणावरून कार्याचे अनुमान करणे याला ‘पूर्ववत’म्हणतात. जसे आकाशात घनदाट ढग आले म्हणजे आता पाऊस येईल, असे म्हणतातहे पूर्ववत अनुमान होयपूर्व याचा अर्थ कारण. कार्यापूर्वी कारण असते. जेथे कार्यावरून त्याच्या कारणाचे ज्ञान होते त्याला ‘शेषवत म्हणतात. जसे नदीला मोठा पूर आला, म्हणजे वर कुठे तरी वृष्टी झाली असली पाहिजे असे अनुमान केले जाते. शेष म्हणजे कार्य. ज्या अनुमानामध्ये वर सांगितल्याप्रमाणे कारण किंवा कार्य यांचा संबंध नसतो अशा अनुमानास ‘सामान्यतो दृष्ट’म्हणतात.

शब्दापासून यथार्थज्ञान किंवा अनुभव होत असल्यामुळे शब्द हे एक प्रमाण मानले आहे. शब्द म्हणजे आप्तवाक्यआप्त म्हणजे यथार्थ वक्तामनुष्यप्राण्यांचे हित होण्याच्या हेतूने जो उपदेश करतो, त्याला आप्त म्हणतातआणि त्याच्याच वचनाला ‘शब्द’ प्रमाण अशी संज्ञा आहेयालाच आगम असेही नाव आहे. तप आणि आत्मज्ञान यांच्या सामर्थ्याने अंतःकरणातील रजोगुण व तमोगुण नाहीसे झाल्यामुळे अत्यंत शुद्ध सत्व बनलेले जे पुरुष, त्यांना आप्त म्हणतात. त्यांना भूत-भविष्य-वर्तमान अशा तिन्ही काळांचे ज्ञान अखंड राहाते. त्यांच्या ज्ञानशक्तीला केव्हाही प्रतिबंध नसतो. ते जी गोष्ट सांगतील ती निःसंशय खरी असते. ते जो उपदेश करतील तो जीवाच्या हिताचाच असेल. आप्तोपदेश या शब्दात श्रुति, स्मृति, इतिहास, पुराणे, शास्त्रे या सर्वांचा अंतर्भाव होतो. कारण त्यांच्या ठिकाणी वर सांगितलेले संपूर्ण गुण असतात. लौकिक, अलौकिक व साधारण असे शब्दांचे तीन प्रकार, श्रुति, स्मृति, इतिहास, पुराण, न्याय, वेदान्तादी षडदर्शने हे सर्व अलौकिक आप्तोपदेशात मोडतात. कारण, जीवास नैष्ठिक सुख प्राप्त व्हावेरजगुण, तमोगुण नाहीसे होऊन त्यांस, अखंड अविनाशी सुख प्राप्त व्हावे, याच उद्देशाने त्यांची निर्मिती झाली आहे. मनुष्य प्राण्याच्या उपजीविकेकरिता किंवा ऐहिक ज्ञान देण्याकरिता निर्माण झालेली जी शास्त्रे त्यांना लौकिक आप्तोपदेश म्हणतात. व्यवहार नीट चालण्याकरिता जो आप्तोपदेश तो साधारण होय. ‘आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः’ या वचनानुसार संपूर्ण आयुर्वेदशास्त्र हे अलौकिक आप्तोपदेशात मोडते.

आष्टीकर, अ. वा.