राजशेखर : (नववे व दहावे शतक). संस्कृत साहित्यशास्त्रकार. हा महाराष्ट्रीय होता, असे दिसते. त्याच्या पित्याचे नाव दुर्दुक (दुहिक हा त्याच नावाचा एक पर्याय) आणि आईचे शीलवती. यायावर हे त्याचे कुलनाम. हे कुटुंब प्रतिष्ठित असून त्यात अकालजलद,सुरानंद, तरल,कविराज ह्यांसारखे कवी व विद्वान होऊन गेले, असे राजशेखराच्या काही ग्रंथांत आलेल्या माहितीवरून दिसते. अवंतीसुदंरी ह्या चौहानवंशीय विदुषीशी राजशेखराचा विवाह झालेला होता. महाराष्ट्रातून राजशेखराचे कुटुंब कनौजला आले आणि राजशेखर हा तेथील राजा महेंद्रपाल आणि त्याचा पुत्र महिपाल ह्यांचा गुरू वा उपाध्याय म्हणून राहिला. कनौज येथील वास्तव्यांनतर त्रिपुरी येथील कलचुरीवंशीय राजा युवराज पहिला केयूरवर्ष ह्याच्या आश्रयाला राजशेखर होता. राजशेखराने ⇨कर्पूरमंजरी, बालभारत (प्रचंडपांडव हे ह्याच ग्रंथाचे पर्यायी नाव), बालरामायण, विद्वशालमंजिका आणि काव्यमीमांसा हे ग्रंथ लिहिले. कर्पूरमंजरी हे एक प्राकृत सट्टक (प्राकृतमधील एक नृत्यप्रधान नाट्यप्रकार) असून आपली पत्नी अवंतीसुंदरी हिच्या मनोरंजनार्थ त्याने ते लिहिले. हे सट्टक मुख्यतः शौरसेनी प्राकृतात आहे तथापि त्यातील काही पद्यभाग माहाराष्ट्रीला जवळचा आहे. तसेच त्यात संस्कृतचाही थोडा फार उपयोग केला आहे. बालभारत, बालरामायणविद्वशालमंजिका ह्या नाट्यकृतीपैंकी बालभारत हे त्रुटित स्वरूपात(फक्त दोन अंक)उपलब्ध आहे. बालरामायण हे दहा अंकी असून त्यात रामाच्या राज्याभिषेकापर्यंतचा कथाभाग आलेला आहे. विद्वशालमंजिका हे चार अंकी नाटक. कर्पूरमजंरी आणि विद्वशालमंजिका ह्या दोन्ही नाट्यकृती प्रेमकथांवर आधारलेल्या आहेत.

राजशेखराचा काव्यमीमांसा हा ग्रंथ अठरा अधिकारणांत विभागलेला होता, असे त्या ग्रंथाच्या आरंभी दिलेल्या अनुक्रमणिकेवरून लक्षात येते. संपूर्ण ग्रंथ उपलब्ध नाही कविरहस्यनामक फक्त एकच अधिकरण उपलब्ध आहे तथापि त्यातही विपुल आणि वैविध्यपूर्ण अशी वाङ्मयीन माहिती आली आहे. वाङ्मयाचे शास्त्र आणि काव्य असे दोन प्रकार राजशेखराने सांगितले आहेत. काव्यपुरुषाची प्रतिमा त्याने उभी केली असून, शब्दार्थ हे काव्यपुरुषाचे शरीर, तर रस हा आत्मा, असे म्हटले आहे. अलंकारशास्त्राला राजशेखराने सातवे वेदांग मानले आहे. शक्ती हा एकमेव काव्यहेतू आहे, असे राजशेखर सांगतो आणि प्रतिभा व व्युत्पत्ती ह्या शक्तीपासूनच उद्भवतात असेही म्हणतो. काव्यातील सत्याचे स्वरूप कसे असते, ह्यासंबंधीही राजशेखराने विवेचन केले आहे. विश्वातील विषय जसे असतात, तसे सांगणे हे शास्त्राच्या कक्षेत येते परंतु कवी मात्र विश्वातील विषय त्याला जसे प्रतीत होतात, तसे ते काव्यातून मांडीत असतो, असा राजशेखराच्या विवेचनाचा आशय थोडक्यात सांगता येईल. काव्यातील वर्णनाला तो प्रतिभासनिबंधन म्हणतो.

राजशेखराची एकूण ग्रंथसंख्या नेमकी किती, हे सांगता येत नाही. उपर्युक्त ग्रंथाखेरीज राजशेखरकृत हरविलास नावाच्या एका महाकाव्याचा उल्लेख हेमचंद्राने केला आहे. काव्यमीमांसेभुवनकोश ह्या त्याच्या एका ग्रंथाचा उल्लेख आहे. हा भौगोलिक माहितीचा ग्रंथ होता, असे दिसते. हे दोन्ही ग्रंथ आज उपलब्ध नाहीत.

संदर्भ:1. Dasgupta, S.N. De, S. K. A History of Sanskrit Literature, Calcutta, 1962.

2. Kane, P.V. History of Sanskrit Poetics, Delhi, 1961.

३. देशपांडे,ग.त्रं. भारतीय साहित्यशास्त्र, मुंबई,१९५८, आवृ. २री, १९६३.

कुलकर्णी, अ.र.